अहिल्याबाई होळकर! भारताला लाभलेली सुखदा, वरदा, मंगला, कल्याणी महाराणी. या शिवभक्त राणीने १७६६ पासून १७९५ पर्यंत, ३० वर्ष न्यायाने व नीतीने राज्य केले. खरेतर अहिल्याबाई मध्य प्रदेशातील माळवा प्रांताची राणी. पण तिला भारतातील कोणताही प्रांत परका वाटला नाही. ती मनाने संपूर्ण भारताची राणी होती! आपल्या दातृत्वाने आणि कर्तृत्त्वाने तिने अखिल भारतीयांच्या मनावर राज्य केले आणि अजूनही करत आहे!
अहिल्याबाईंनी भारतभर शेकडो अन्नछत्रे, पाणपोया, गरीबखाने, मोहताजखाने स्थापन केले. अनेक धर्मशाळा, नदीवरील घाट व विहिरी बांधल्या. कित्येक रस्ते बांधले, रस्त्याच्या कडेने वृक्षारोपण करून पथिकांसाठी सावलीची सोय केली. किती मंदिरे बांधली आणि किती जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला याची गणतीच नाही. अहिल्याबाईंनी बांधलेली काही महत्वाची मंदिरे –
त्रेता के ठाकूर, अयोध्या
अयोध्येत रामाची तीन महत्वाची मंदिरे होती – जन्मभूमी मंदिर, त्रेतानाथ मंदिर आणि स्वर्गद्वार मंदिर. या पैकी जन्मभूमी मंदिर रामाच्या जन्मस्थानावर, त्रेतानाथ मंदिर रामाने अश्वमेध यज्ञ केला त्या स्थळी व स्वर्गद्वार मंदिर रामाने शरयुतीरी देह ठेवला तिथे होते. प्राचीन काळापासून या तिन्ही स्थानांवर मंदिरे होती. येथील शेवटची मंदिरे १० व्या – ११ व्या शतकात गहडवाल राजांनी बांधली होती. १६ व्या शतकात बाबरने आणि १७ व्या शतकात औरंगझेबने, तीनही मंदिरे पाडून त्या ठिकाणी मशिदी बांधल्या.
१८ व्या शतकात अहिल्याबाईने त्रेतानाथ येथील मशीद ताब्यात घेतली व तिथे पुन्हा एकदा रामाचे मंदिर बांधले. शरयू नदीत टाकून दिलेल्या राम-सीता-लक्ष्मणाच्या मुळ मूर्ती शोधून, त्या मूर्तींची पुनश्च प्रतिष्ठापना केली. ही रामाची मूर्ती काळ्या पाषाणातली असल्याने या रामाला ‘कालेराम’ सुद्धा म्हणतात. अहिल्याबाईंनी या मंदिरापासून जवळच एक सुंदर घाट बांधला, जो आज ‘अहिल्याबाई घाट’ म्हणून ओळखला जातो.
सोमनाथ मंदिर, प्रभास
असे म्हटले जाते की गुजरात मधील प्रभास येथे, प्राचीन काळी चंद्राने शंकराची आराधना केली होती. त्या नंतर चंद्राने समुद्र किनारी शंकराचे सोमनाथ नावाचे भव्य मंदिर उभारले. या मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार केला गेला. १२ ज्योतिर्लिंगापैकी हे पहिले मंदिर मानले जाते. ११ व्या शतकात मुहम्मद गझनीने सोमनाथवर हल्ला करून येथील संपत्ती लुटली. पुढच्या ६०० वर्षात – अल्लाउद्दिन खिलजी, पोर्तुगीज, औरंगझेब इत्यादींनी एकूण १७ वेळा या मंदिरावर हल्ला केला. मधल्या काळात गुजरातच्या परमार व सोळंकी राजांनी सोमनाथ मंदिराची डागडुजी व पुनःपुन्हा बांधणी केली. मात्र १६६५ मध्ये औरंगझेबने हे मंदिर तोडल्यावर, ते पुन्हा कोणी बांधायला धजले नाही.
१८ व्या शतकात अहिल्याबाईंनी जुन्या मंदिराच्या अवशेषा जवळ एक नवीन शिवालय बांधले. हे शिवालय दोन मजली असून, खालच्या मजल्यावर शिवलिंग स्थापन केले आहे. जवळ जवळ दोनशे वर्ष, सोमनाथला जाणारे यात्रेकरु अहिल्याबाईंच्या मंदिराला भेट देत असत.
स्वातंत्र्य मिळाल्यावर, सरदार वल्लभभाई पटेलांनी प्रभासला समुद्राचे पाणी हातात घेऊन सोमनाथचे मंदिर पुन्हा बांधण्याची शपत घेतली! मूळ मंदिराचे अवशेष उतरवून संग्रहालयात ठेवले. आणि त्याच ठिकाणी एक भव्य शिवमंदिर उभारले.
काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी
वाराणसीच्या प्राचीन विश्वनाथ मंदिराचे वर्णन पुराणांमध्ये मिळते. ८ व्या शतकात, आद्य शंकराचार्य या मंदिरात आले असल्याचे कळते. मात्र १३ व्या शतकापासून या मंदिरावर अनेक वेळा हल्ला झाला. १७ व्या शतकात औरंगझेबाने हे मंदिर पूर्णपणे उध्वस्त करून या जागेवर मशीद बांधली, जी ग्यानवापी मशीद म्हणून ओळखली जाते. अनेक राजांनी या जागेवर पुन्हा शिवमंदिर बांधायचा प्रयत्न केला. परंतु त्या प्रयत्नांना यश आले नाही.
१८ व्या शतकात अहिल्याबाईंनी मशिदीला लागून असलेल्या जागेत विश्वनाथाचे नवीन मंदिर बांधले.
या मंदिरांशिवाय अहिल्याबाईंनी गया, प्रयाग व मथुरा येथे मंदिरे बांधली. उत्तरेत गंगोत्रीपासून ते दक्षिणेला रामेश्वरपर्यंत आणि पश्चिमेला द्वारकेपासून ते पूर्वेला पुरी पर्यंत भारतभर अहिल्याबाईंनी बांधलेली मंदिरे पहायला मिळतात.
त्रेतायुगात, रामाच्या पदस्पर्शाने अहिल्या नावाची एक शिळा शापमुक्त झाली होती. तर, कलियुगातील या अहिल्येने जिथे म्हणून विशाल मंदिरांचे ठिकाणी शिळांचे ढिगारे पहिले, त्या शिळांना तिने पावन करून त्यांचे मंदिर केले. तिने बांधलेल्या, जीर्णोद्धार केलेल्या मंदिरातील एक एक शिळा म्हणत असेल –
अहिल्ये, चरण तुझे लागले,
आज मी शापमुक्त जाहले
– दिपाली पाटवदकर
संदर्भ –
१. Ayodhya Revisited – By Kunal Kishore