त्या नवीन प्रदेशात प्रवेश करती झाले तेव्हाच हरीणांचे हे सुंदर कळप जागोजागी दिसू लागले. थंडीनंतरचे दिवस होते तरी बहुधा बिनमौसमी येत असलेल्या पावसाने सगळं रान हिरवंगार झालं होतं. तो रानभर पसरलेला जंगलाचा स्वच्छ, ताजा वास, सुखद थंड काहीशी पावसाळी वाटणारी ओलीशी हवा, त्या हिरवळीवर क्वचित दिसणारे काळेभोर हत्ती, नीलगायी, आणि ही बागडणारी ठिपक्या ठिपक्यांची हरणं, उन्हाळ्याच्या हंगामात नरांची वळणदार, मोठी वाढलेली डौलदार शिंगं, स्त्री हरणांचे काजळ रेखीव डोळे आणि घुटमळणारी लहान मोठी पिल्लं बघून आयुष्यातले सगळे रस एकदम दाटून आले. जंगलात शिरत असताना असे सहज साध्य दिसणारे कळप बघितले तरी पुन्हा एकदा आवर्जून सफारी करून बघण्याचा मोह आवरला नाही. ते मुक्त, स्वच्छंद जीव बघितले तेव्हा गाडीच्या चौकटीचा कंटाळा आला.

शेकड्याने हरणं होती, जशा शेकड्याने इच्छा बागडत असाव्यात. पाउस सुरु झाला की त्यांची शिंगं गळून पडत होती आणि विणीच्या हंगामापर्यंत पुन्हा दिमाखदार, टोकदार! पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा चक्र, पुन्हा पुन्हा एखाद्या हिंस्र श्वापदाचं भक्ष! आणि पुन्हा पुन्हा सुदृढ, निकोप इच्छा टिकून राहण्याचा निसर्ग! माझ्या जगण्याची प्रेरणा ह्या इच्छा.. मी त्यांना असं जंगला धीन करून टाकलं की जंगलाच्या हिरवाईत त्या मिसळून गेल्या कळलं नाही. मी तिथली झाले इतकंच!

आणि मग इकडचे तिकडचे सगळे सोपस्कार आटपून जंगलातल्या आमच्या एक दिवसाच्या घरात गेलो. घराला खूप मोठं कुंपण होतं. चहाचा कप हातात धरून बाहेर डोकावलं आणि ते सुरेख दृश्य…. संध्याकाळच्या सोनेरी उन्हात एक एक करत कितीतरी हरणं कुंपणावरून उड्या मारत निवाऱ्याला येऊन बसली. कुंपणाबाहेर आता रात्र सुरु होणार होती आणि रात्री श्वापदांकडून होणारी शिकार. बहुधा त्यांनाही हे अलीकडे सुरक्षित वाटत असावं, माहित झालं असावं! संध्याकाळच्या उन्हात हे सगळे मृग अधिकाधिक गहिरे, अधिकाधिक तपकिरी चमकदार झाले होते. त्या कांचनआभेत न्हाऊन ते हिरवळीवर निवांत बसले.

त्या दिवशी थोडाच वेळात आकाशात बुद्धपौर्णिमेचा केशरी दुधासारखा चंद्र साकारला. जेवून बाहेर परातेस्तोवर माथ्यावर आला. हवेत सायीसारखा हळुवार मृदू थंडावा पसरला होता. आणि बाजूला दिसणारा डोंगर आणि रान चांदण्यात भलतंच शुद्ध वाटत होतं. रूमकडे जात असताना हिरवळीवर काही डोळे चमकले. मगाची हरणं शांतावली होती.

रात्री हलक्या झोपेत सगळ्या हरणांच्या पाठीवर चांदणं पडलं होतं. मग त्यांच्या पाठीवरचे पांढरे ठिपके चंदेरी चंदेरी होऊन गेले. मी त्यांच्या जवळ गेले, चंदेरी हरिणांना मायेने जवळ घेतले, ती आता माझी होती. मी त्यांना स्वीकारलं होतं. मग मीही मला खूप हवीशी वाटायला लागले.

पहाटे पुन्हा सफारीला जायचं म्हणून उठले, तांबडं फुटण्याच्याही अगोदरची वेळ होती. चंद्र मावळतीला होता. लवकरच फटफटलं! पुन्हा एकदा ती हरणं एकेक करून कुंपणावरून उड्या मारून त्यांच्या निजधर्मास अनुसरायला गेली. गाडीत बसून बाहेर पडत होतो तोवर प्रातःकाळच्या सोनेरी उन्हात त्यांचं तपकिरी अंग पुन्हा चमकत होतं. ती पुन्हा चंचल, चपळ, मोहमयी कांचनमृगे झाली होती.

अशा हजारो पोर्णिमा जातात तेव्हा एखादी पोर्णिमा प्रबुद्धतेचं चांदणं घेऊन येते. आपल्या वाट्याला त्यतल्या एखाद्या शलाकेचा आभास येतो तेव्हा न्हाऊन घ्यायचं ! त्यातलं कवित्व सामावून घ्यायचं! आपल्याकडे प्रत्येकाकडे Patronus असतात! “Expecto Patronum” म्हणत रहायचं! कधीतरी त्याला एखाद्या चित्राचा आकार येतो, कधीतरी कवितेचा, संगीताचा!

– विभावरी बिडवे


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

%d bloggers like this: