प्रिय बाबा …

प्रिय बाबा,
२८ मे १९ ला तुम्हाला जाऊन पाच वर्षं झाली .या पाच वर्षांत अनेकदा वाटलं तुम्हावर लिहावं.पण तुमचं माझं असं जे काही आहे, ते इतकं मौल्यवान आहे, की ते धन मला लुटावं नाही वाटत .आत स्पंद पावणारं जे काही आहे ते तुमचं अस्तित्वच तर आहे !

पण तुम्ही शरीर सोडून गेलात त्याच्याशी काही घटना घट्ट बांधल्या गेल्यात .आजचा दिवस ही तुम्हाला तुमच्या नव्या आयुष्याच्या पाचव्या वर्षाची सर्वात सुंदर भेट असणार आहे, म्हणून आज लिहावं वाटतंय.

२०१४ च्या निवडणुकांच्या निकालाचा दिवस होता. तुम्हाला खुबा फ्रॅक्चर झाल्यामुळं कोल्हापूरला हलवायचं होतं. मी नि चेतन अॅम्ब्युलन्समधे तुमच्या सोबत होतो. तुम्हाला प्रचंड वेदना होत होत्या. कातळासारखं खंबीर काळीज म्हणून तुम्ही सोसत होता. पण रस्ते ..! तुम्हाला बसणार्‍या हादर्‍यागणिक कळवळायला होत होतं तुम्हाला. आम्ही काही करु शकत नव्हतो. आणि अचानक चेतनला मेसेज आला. निवडणुकांचे कल कळू लागले. तो आकडा तुम्हाला सांगितला आणि तुमचा चेहरा जो काही खुलला ! सगळी वेदना क्षणात पुसली गेली. मग लहान मुलाला गुंगवल्यासारखं तो रस्ताभर तुम्हाला निकालांचे अपडेट देत राहिला. तुम्ही एकेका विजयाबरोबर वेदनेचा एकेक घोट पीत राहिलात. तिथं गेल्यावर आयसीयूतच न्यावं लागलं. तिथं टीव्ही असतो का? हा तुमचा पहिला प्रश्न ! मग संध्याकाळपर्यंत निकाल लागले. मोदी पंतप्रधान होणार हे चित्र स्पष्ट झालं. तुमच्या डोळ्यात अश्रू होते. केवळ तुमचीच नाही हजारो संघस्वयंसेवकांची तपश्चर्या तुमच्या डोळ्यातून सार्थक होऊन वहात होती. तुम्ही आत पेपर वाचत होता. आम्ही बाहेर टीव्हीवर बातम्या पहात होतो. ते दोन दिवस आपण जणू तुमचं दुखणं विसरलोच. आत भेटायला सोडलं की तुमच्या प्रकृतीबद्दल बोलणं बाजूलाच रहायचं .कुठल्या राज्यात किती जागा ,शपथविधीची काय तयारी यावरच चर्चा! मग मोदींचं सारं गतआयुष्य सांगितलं जात होतं. मा. लक्ष्मणराव इनामदारांवर एक स्पेशल फीचर झालं. ते ऐकून तुम्ही किती समाधानानं हसला होता !

वरुन हसत होता तरी आतून कोसळायला लागलं होतं तुमचं शरीर. मोदींचे फोटो दाखवून तुम्ही आतल्या स्टाफला सांगत होता, मी यांना अोळखतो. मी भेटलोय त्यांना. तेही मला नावानं ओळखतात . सिस्टर आम्ही आत गेल्यावर गंभीरपणे हे सांगून म्हणाली, बहुतेक आता त्यांना भ्रम सुरु झालेत. त्याही स्थितीत आम्हाला अगदी जोरात हसू आलं! आम्ही म्हणालो, अहो ते खरंच एकमेकांना ओळखतात. एका शिबिरात राहिलेत ते … 

मोदी गुजराथचे मुख्यमंत्री असताना तुम्ही एका कामासाठी त्यांना भेटला होता .तेव्हा त्यांनीच तुम्हाला ‘वसंतराव मी तुम्हाला अोळखतो , आपण अमुक शिबिरात एकत्र होतो’ वगैरे सांगून तुम्हाला चकित केलेलं ! पण तुमच्यातल्या विजिगीषू योद्ध्यावर एका तृप्त स्वयंसेवकानं मात केली का ? तुम्ही थांबला नाहीत ..पाच वर्षात तुमची आठवण पावलोपावली येत राहिली …

आताच्या निवडणुकापण किती हिरीरीनं अनुभवल्या असत्या तुम्ही ! वाटलं ,यांनी या पाच वर्षात कायकाय केलं हे सांगायला हवं तुम्हाला .

निवडणुकांमधली चिखलफेक अंगाला लावून घेऊ नये हे मनाला कळतं. शहाणे म्हणणारे लोक सुद्धा सभेतल्या आवेशाच्या भरात काहीतरी अनपेक्षित बोलून जातात. पण काही बारीक गोष्टीपण उगाच जिव्हारी लागतात. तशी अनेक तुसं बोचली परक्यांकडून, क्वचित आपल्यांकडून सुद्धा. बरीचशी निकालानंतर गळून पडली, पण एक सल राहिला. तुमची आठवण अजून गडद करणारा.
उर्मिला मातोंडकरच्या मुलाखतीतला. ती पडल्यानंतर कशाला लिहा, असं वाटलं होतं पण आजही तावातावानं पराभवाचं विश्लेषण करताना खुळ्या तर्कशास्रामागं लपणारे बुद्धिवंत पाहून वाईट वाटतंय, हसूही येतंय. म्हणून तो सल उच्चारावा वाटला. उर्मिला म्हणाली होती, “मला लहानपणापासून इंदिराजी आवडत होत्या. मान्य, की त्यांनी आणीबाणी आणली. अहो ,पण ते बरं! ती निदान सांगून सवरून, घटनेच्या एका कलमाचा आधार घेऊन आणलेली आणीबाणी होती,
तीही देशाच्या हिताकरता. पण आजचं काय? ही परिस्थिती किती भयंकर झालीये. कुणीही बोलू शकत नाहीये ….” वगैरे वगैरे तीच रेकॉर्ड. हे बोलतानाचा तिचा अभिनिवेश पाहून कधी नव्हे तो तीव्र संताप आला .आणीबाणी बरी? आजची स्थिती आणीबाणीपेक्षा भयंकर? तिला सांगावं वाटलं बये, हे त्यांना जाऊन विचार ज्यांनी आणीबाणी सोसलीय. उर्मिलाच्या अगदीच नकळत्या वयात आणीबाणी पर्व आल्यामुळं तिला कदाचित ती ‘रंगीली’ वाटत असेल. पण आपण किती बुद्धिमान आहोत नि कसं विचारपूर्वक उतरलो आहोत हे सांगणारीला आणीबाणीचं गांभीर्य कळू नये? मला माझ्या घरी कसं स्वातंत्र्य मिळालं ,लहानपणापासून कसं आईवडिलांनी प्रोत्साहन दिलं हे ती कौतुकानं सांगत होती ..

त्यावेळी मला आठवत होतं आपलं घर. तिच्याच वयाचा असेल चेतन. तुम्ही तुरुंगात आहात याचं गांभीर्यही कळत नव्हतं, इतका लहान होता तो. जेमतेम तीन वर्षांचा. पूर्ण एकवीस महिने तुम्ही आत होता. विसापूर जेलमधे, येरवडा जेलमधे तुम्हाला भेटायला आल्याचं अंधुक आठवतं. चेतन तेव्हा जेलरची टोपी घालून छडी हातात घेऊन खेळायचा! आम्ही दोघंही टायफाईडनं आजारी पडलो म्हणून पॅरॉलवर तुम्हाला येता यावं याचा अर्ज केला होता. मुलं खरंच आजारी आहेत का हे पहायला पोलीस घरी आले, तेव्हा खेळत असलेल्या आम्हाला दामटून झोपवलं होतं, कारण जवळपास दीड महिना उलटून गेला होता अर्जाला! घरची आवक पूर्ण थांबलेली. कधीही संग्रह वृत्ती नसल्यानं पुंजी काहीही नाही. स्वतःचा व्यवसाय असल्यानं कारखान्याचेही किमान खर्च सुरु अशी परिस्थिती. पंढरपूरच्या रखुमाईकडून उसनं आणलेलं प्रसन्न हसू त्याही काळात आईनं चेहर्‍यावर पांघरलेलं सतत. तेवढंच लेणं उरलं नंतर तिच्याकडं .त्या काळाची तप्तमुद्रा इतकी ठळक होती की ती पुसली जायला कितीतरी वर्षं जावी लागली. कितीतरी. तुमच्या वयाच्या चाळीशीच्याही आधीची उमेदीची दोन वर्षं तुमच्या आमच्या आयुष्यातून बाईंनं ओरबाडून घेतली. असे हजारो संसार उद्ध्वस्त झाले. आणि ही बाई म्हणत होती ‘अहो ती आणीबाणी बरी!! ‘

गेल्या वर्षी आणीबाणीतील स्वयंसेवकांना मानधन द्यावे अशा चर्चा सुरु झाल्यावर ‘त्या आणीबाणीत खचलेल्या व्यवसायाला वर आणण्यात माझंही निम्मं आयुष्य गेलं’ असं म्हणणारा तुमचा लेक, ‘असं मानधन देणं चूक आहे ‘ असं पत्र देऊन आला. त्याहीवेळी तुमचे डोळे भरले असतील ना? आम्ही तीघांनीही एकमुखानं तितक्याच सहजपणे तो विचार फेटाळला, जितका तातडीनं तुम्ही लाथाडला असता. आणीबाणीत सोसलेले हाल हा आपल्या मार्केटिंगचा विषय कधीच नव्हता. पण आज संघ स्वयंसेवकांच्या या तपश्चर्येची फळं दिसू लागल्यावरही विश्लेषकांना या विजयाच्या मागची खरी कारणं दिसत नाही आहेत याचं वैषम्य वाटतंय !

आणि मग बाबा, अशा कारणांची मालिकाच मनात सुरु झाली. या देशात बुद्धिवादी -पुरोगामी वगैरे शब्द ज्यांनी डागाळलेत अशा कंपूला हा देश समजलाच नाहीये. अर्थात हे त्यांचं दुर्दैव .भले हा समाज जातीनिहाय मोर्चे काढत असेल पण “भारत माता की जय ” या घोषणेची अवहेलना झाली, ती त्याला आवडली नाही. हजारो वर्षं प्राणपणानं हिंदूंनी धर्म जपला म्हणजे नेमकं काय केलं हे ‘त्यांना’ कळलंच नाहीये. लोकांनी देवासोबत राष्ट्रभावही जपला. या निखळ राष्ट्रभक्तांची थट्टा साध्या माणसालापण झोंबली.

आमचा धर्म परिपूर्ण नाहीये, अनेक त्रुटी दूर करायला हव्या आहेत हे आम्हाला कळतंय .पण म्हणून त्यावर ऊठसूट होणारे आघात समाज कसा सहन करेल ? हिंदू धर्मातल्या अनेक अंधश्रद्धा आपल्यालाही खटकतात. त्या आपण मानत वा पाळत नाही, फक्त त्याचे जाहीर वाभाडे न काढता आपल्या वागण्यातून ते बदल दाखवत जातो. परंपरा बदलायच्या तर हंटर चालवून चालत नाही.
समाजाला पुढं न्यायचं तर आपण समाजाच्या पुढं चालावं लागतं .तेही ‘एक पाऊल पुढे नि एकच पाऊल पुढे ‘या संघमंत्रानं ! कूर्मगतीनं पण काल सुसंगत असे बदल हिंदू समाज आणि अगदी संघही आचरणात आणतो आहे, आणि म्हणून दोन्ही टिकून आहेत, हे यांना समजत नाही. संघाची पाचसहा तपांची तपश्चर्या निःस्वार्थी स्वयंसेवकांच्या पिढ्या हा या विजयाचा खरा बेस आहे. राबणार्‍या स्वयंसेवकांना, प्रवासी कार्यकर्त्यांना आईच्या मायेनं जेवू घालणार्‍या पडद्याआड राहून काम करणार्‍या ‘वहिनी सिस्टीम’चं हे यश आहे.

मोदींच्या यशासाठी झालेल्या खर्चाचं मोजमाप हे लोक कसं करणार आहेत बाबा? विनामोबदला कामं करणारे नि श्रमपरिहार म्हणून चहाभडंगावर तृप्त होऊन परत आपापल्या कार्यक्षेत्रात जाणारे, केवळ मोदींचा शपथविधी पाहिला की कष्ट वसूल झाले असं मानणारे हजारो कार्यकर्ते , ही आहेत या विजयवृक्षाची मुळं.

स्वतःच्या घरचे खर्च मागं टाकून संघकार्य करणारी किती घरं दाखवू ? स्वतःच्या पोटचं मूल संघकार्यात गमावल्यावर किंवा एकुलता एक लेक आजन्म प्रचारक गेल्यावर , इथली शाखेवर येणारी सगळी आमचीच लेकरं म्हणून आपला मायेचा पदर विस्तारणारी किती घरं पसरलीत देशभर ! कट्टर धर्मवादी घरात वा अगदी ग्रामीण भागात , जात न विचारता थेट स्वयंपाकघरात माऊली जेवायला वाढते आहे वर्षानुवर्षं ! यांचे ‘मनुवादी संघटना’, ‘जातीअंताची लढाई ‘ वगैरे शब्दही इतके चलनी झाले नव्हते तेव्हापासून शिबिरात येणारी ,गळ्यात गळे घालणारी ,एका ताटात जेवणारी पोरं आम्ही ! आजही आम्हाला खूप काळ एकत्र काम केलेल्या कार्यकर्त्याची नेमकी जातच माहिती नाही !
बाबा ,तुम्ही तर कधी स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेतलं नाही .ना आमच्या कुणाच्या मनात कधी काही आलं .पण अखेर जातीचं घाणेरडं राजकारण करणार्‍यांना आमची ‘भारतमाता’ या एका आईला मानणारी लेकरं पुरून उरली ! जातीवाचक शिव्यांनी कधी मन दुखलं नाही त्यामुळं बाबा ; पण या चारपाच वर्षांत अनेक अपमान जिव्हारी लागले .

मोदींवरची विखारी टीका ,थट्टा म्हणजे स्वयंसेवकांच्याच नव्हे सामान्य माणसाच्याही मनात असलेल्या स्वाभाविक सच्चेपणाची ,सद्भावनेची थट्टा होती. प्रामाणिक, निःस्वार्थी कार्यकर्ता ही वस्तूच ज्यांना माहिती नाही अशा वाचाळवीरांनी मोदींवर केलेली चिखलफेक ही तुमच्यासारख्या लाखो तळमळीच्या देशभक्तांवर उडवलेली राळ होती .सावरकरांचा अपमान या देशानं मुकाट्यानं गिळला आहे या भ्रमात ते राहिले .वंदेमातरम च्या उद्घोषात आजही देशाला एक करण्याचं सामर्थ्य आहे हे त्यांना कळलं नाही.

त्यांच्या तोंडून होणारे बिनबुडाचे आरोप ,भ्रष्ट हातांनी केलेली चिखलफेक, ही आमच्या नेत्यावर नाही तर या देशातल्या सामान्य माणसाच्या सत्प्रवृत्तीवरच्या विश्वासावर होत होती.

राजकारणात धर्मकारणात काही अपप्रवृत्ती शिरत आहेत, आजची निवडणुकीची ,प्रचाराची पद्धत काही आदर्श नाही, पण या स्थितीला यायला काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते जबाबदार नाहीत ! विद्यापीठांच्या वा वर्तमानपत्रांच्या मनोर्‍यात बसून हिंदू धर्म, जीवनपद्धती, संस्कृती याला नावं ठेवली म्हणून सामान्य माणसाला भावणारा ,रोज भेटणारा धर्म ,त्याला बहात्तर हजारांपेक्षा अधिक महत्वाचा वाटतो आहे .परवा तुमच्या शेजारी रहाणारी भेळवाली आजी ‘गंगेचं शुद्धीकरण ‘ या मुद्द्यावर मी मत दिलं असं घरी येऊन सांगून गेली ,तेव्हा परत जाणवलं या देशातल्या सामान्य माणसांच्या श्रद्धा ,या देशाचं भावविश्व ते समजू शकले नाहीत हे त्याचं दुर्दैव .

सामान्य माणूस ऊठसूट त्याच्या श्रद्धेवरचे आघात सहन करेल असं कसं समजले हे लोक ?

देशापासून तुटू पहाणार्‍या पूर्वोत्तर राज्यांत अनेक दशके मूकपणे काम करणारे नि प्रसंगी जीव गमावलेले कार्यकर्ते , केरळ व अन्य कम्युनिस्ट राजवटीत पडलेले बळी ,यांच्या सांडलेल्या रक्ताची किंमत बुद्धीवाद्यांनी व मीडियानं केली नाही म्हणून ती त्या स्तरातल्या कार्यकर्त्यांना ,त्यांच्या परिवारांना सलत नाही वा त्याचे परिणाम दिसणार नाहीत असं वाटलं ? आज जे नेते पटलावर दिसत आहेत त्या एकेका नावामागे लाखो कार्यकर्ते आहेत .हजारो जण शांतपणे सेवाकार्यात गुंतलेले आहेत .
भारतमातेच्या लेकरांचं दैन्य दूर करणं एवढंच त्यांना दिसतं. कुणीतरी भडक बोलणारा, टोकाची भूमिका मांडणारा यांना दिसला ,त्याचं त्यांनी भांडवल केलं. पण तुमच्यासारखे गाजावाजा न करता, एका ओसाड खेडेगावात जाऊन, संघाच्या ध्वजाला साक्ष ठेवून, विचार आणि रोजगारातून एखाद्या खेड्याचं रूप पालटणारे स्वयंसेवक कुणाला दिसलेच नाहीयेत अजूनही ..

त्यांनी भावुक होणार्‍या प्रधानसेवकाची निर्दय थट्टा केली. पण भारतमातेचं चिंतन पूजन करणार्‍या संघटनेत काम करताना अशा उदात्त भावनेनं एकत्र डोळे भरुन यावेत असं भाग्य लाभलेले ,ती दिव्य अनुभूती घेतलेले लाखो कार्यकर्ते आहेत ; ही भावुकता त्यांच्याखेरीज अन्य कुणाला समजणारच नाही !

तुम्ही अत्यंत अडचणीत असतानाही संघकाम सोडलं नाही.तुम्हाला तुमच्या निराशेच्या काळात बळ देणार्‍या ओळी तुम्ही पेन्सिलनं तुमच्या मोत्यासारख्या अक्षरात भिंतीवर लिहिल्या होत्या .तोच तुमचा देव होता. त्या काळात कधीच देवदेव, नवस सायास केले नाहीत तुम्ही दोघांनीही.

बांध कटि हो अब खडे हम,
शक्तिसंग्रह कर बढे हम
चल रहे बाधा हटाते ,
भक्त के भगवान आगे ॥

या ओळींकडे पहात तुम्ही लढत होता आणि ‘जेथे राघव तेथे सीता अशी निरपवाद साथ आई देत होती. या ओळींनी काय बळ मिळतं , अशी अनेक गीतं गाताना मातृभूमीला परमवैभवाला नेणं एवढा एकच भाव मनात ठेवून जेव्हा सुरात सूर मिसळतात तेव्हाचे रोमांच ,यांना कसे कळतील बाबा ? कुठल्याही कुळाचारांचं अवडंबर न केलेल्या तुमचं माझ्या मनातलं सर्वात लाडकं रूप कोणतं असेल तर पूर्ण गणवेशात हातात बिगुल वा घोषदंड घेतलेलं ! त्यावेळी तुमच्या शरीरात जे दिव्यत्व संचारायचं, तेच आज मी पहाणार आहे !

विचारपद्धतीत, विकासाच्या मॉडेल बद्दल मतभेद असू शकतात. कार्यपद्धती भिन्नता असू शकते .
काही चुकाही होऊ शकतात. पण हेतूवर शंका घेणं प्रामाणिक माणसाच्या जिवाला लागतं. या मातीत प्रामाणिक स्वयंसेवकांच्या अनेक पिढ्यांचा घाम, अश्रू, रक्त मिसळलेलं आहे, त्याचा अपमान झाला बाबा, आणि तो भोवला! तो तसा झाल्याचं फारसं कुणी बोलूनही दाखवलंही नाही. पण सर्वांचं मिळून एक जे राष्ट्रमानस तयार झालं त्याची धडकन हे सत्य जाणून होती .त्या एका समूहमनानं आजचं चित्र रंगवलं आहे .

तुम्ही गेल्यानंतर भेटायला येणार्‍या लोकांतील कितीतरी जणांनी सांगितलं की आमचे वडील म्हणत आहेत की आता आम्ही डोळे मिटायला मोकळे झालो … तरीही बाबा , ‘पथका अंतिम लक्ष नही है
सिंहासन चढते जाना ‘ हे आम्ही जाणून आहोत .’सब समाज को लिए साथमे आगे है बढते जाना ‘ हे काम निरंतर सुरुच रहाणार आहे .

‘जो समाज आपल्याला जगवतो तो सन्मानाने जगला पाहिजे ‘ हे तुमचं व्यवसायाचं ब्रीदवाक्य होतं .
‘या देशात आता दोनच वर्ग असतील, एक गरीब, व दुसरा गरीबी संपवण्यास कटिबद्ध असलेला ‘असं परवा मोदी म्हणालेत. आज ते शपथ घेतील तेव्हा मनातल्या मनात लाखो स्वयंसेवक तीच शपथ घेऊन कामाला भिडणार आहेत .

आज होणार्‍या या सामूहिक शपथविधीचा आनंद, ही जबाबदारीची जाणीव ही तुमच्यापर्यंत पोचतेय, याची खात्री आहे. कुणातरी ‘शिशुवसंत’ च्या रुपात आज तुम्ही ध्वजप्रणाम करत असाल, शपथविधीचा आनंद लुटायची इच्छा असली तरी तुम्ही शाखा थोडीच चुकवाल ?

विनीता तेलंग

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s