‘सावरकर ‘या नावाला ज्या बंधूनी मंत्रसामर्थ्य बहाल केलं त्या बंधुत्रयीचे शिरोमणी म्हणजे तात्याराव .
तात्यारावांचं सारं जीवन समिधेसारखं स्वातंत्र्याच्या धगधगत्या यज्ञकुंडाला समर्पित होतं .पण आश्चर्य हे की या समिधा जेव्हा एखाद्या क्रांतीकारक विचाराच्या, कृत्याच्या संपर्कात येत तेव्हा आतल्या अग्नीने धडाडून पेटून उठत आणि जेव्हा एकांतात विचारमग्न असत तेव्हा त्याच समिधेच्या काष्ठावर मनातले विचार काव्याची लसलसती पालवी होऊन अंकुरत ; क्वचित प्रेमकवितांची सुकुमार फुलंही त्यावर उमलत ! जितकी प्रखर -ज्वलंत ध्येयनिष्ठा, तितकीच अलौकिक काव्य प्रतिभा हे एक अद्भुत मिश्रण सावरकारांच्या व्यक्तित्वात दिसतं !
शालेय वयापासूनच विनायक इतिहास, राजकारण आणि काव्य याचं आवडीनं वाचन करे . कोवळं वय ,तेजस्वी रूप, तरल काव्यप्रतिभा नि याला सर्वस्वी विसंगत वाटावा असा धगधगता अंगार मनात ! कविता आवडत होत्या ,जमत होत्या ,भराभर स्फुरत .तात्काळ लिहून देता येत . अन विषय ? मित्राला पत्रं तरी कवितेत.
मजेदार स्वप्न पडलं तरी ते काव्यात .विवाहाला उपस्थित रहाता अालं नाही तरी काव्यात . अन हे सारं कुठल्या वयात ? अवघ्या चवदा पंधराव्या वर्षी. या वयात खरंतर प्रतिभेनं प्रेमाचे पंख लावून प्रेमकाव्यं लिहायची .पण घरात येणारा केसरी निराळीच बीजं पेरत होता.अकरा बाराव्या वर्षी पहिल्या कविता लिहिल्या होत्या .’श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग ‘ हा फटका लिहिल्यावर शिक्षकांकडून कौतुका ऐवजी ‘गणमात्रा कशाशी खातात हे तरी माहीत आहे का ? ‘ असे फटकारणे मिळाले .
त्यातून जिद्दीनं वृत्त -गण -मात्रा अभ्यासल्या .अार्या, श्लोक, विविध वृत्तं ,अलंकार विनायक वापरुन पहात होता.’देवीविजय’ ही पोथी वाचून वाटलं ,महाराणा प्रताप, शिवाजीमहाराज अशा सर्व दुर्गाभक्तांच्या विजयाची पोथी लिहायला हवी .पोथीच्या आकाराचे कागद कापून ,बाजूला चौकट आखून ,सिद्धता केली .
इतिहास ज्ञात होता, कवित्व सिद्ध होतंच, तीनचारशे आोव्या लिहूनही झाल्या ! असे प्रयोग सुरु होते. कितीतरी कविता प्रसिद्ध झाल्या, काही तशाच राहिल्या. पुण्याच्या जगद्हितेच्छु मधे स्वदेशीचा फटका प्रकाशित झालेला . वाग्देवी मुक्तहस्तानं देत होती . विनायकाच्या नित्य नव्या स्फुरणांनी काव्यवृक्ष बहरत होता . पण सारी वाग्वैभव प्रतिभा अर्पण होत होती मातृभूमीच्या पायी . आजूबाजूला घडणार्या घटनांचे पडसाद काव्यात उमटत होते .
सरकारनं हाँगकाँगहून मागवलेल्या धान्यातून उंदीर आले, ते प्लेग घेऊन .हिंदुस्थानभर धान्य ,उंदीर व प्लेग पसरले . आधी उंदीर मरुन पडत ,वर्दी कळे ,मागून माणसं .प्लेगपेक्षा अमानुष ,क्रूर होते त्याचे निवारक .ते घरात घुसत, फेकाफेक, मुजोरी ,जबरदस्ती होई .लोक हैराण होत ,सांगत नसत .मग साथ अाटोक्यात येईना . मग अजून अरेरावी . नियंत्रण अत्याचारांच्या पातळीवर गेलं आणि २२ जून १८५७ ला चाफेकरांनी अत्याचारी रँडचा वध केला .सरकार अजून चवताळलं .संशय, धरपकड सुरु झाली .टिळकांनी जहाल अग्रलेख लिहिले. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ‘ व ‘राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे ‘ .हे लेख व ‘भवानी तलवार ‘ या टोपणनावानं लिहिलेली कविता ,अफझलखानाच्या वधाचं स्मरण व समर्थन करणारं वक्तव्य ,या सार्याचा आधार घेऊन सरकारनं टिळकांवर राजद्रोहाच्या खटला भरला. रविंद्रनाथांसह अनेक नेत्यांनी ,जनतेनं देशभरातून खटल्यासाठी निधी उभा केला .पण टिळक दोषी ठरवले गेले. दीड वर्षाची शिक्षा झाली.डोंगरी, भायखळा व शेवटी येरवडा असा प्रवास होऊन थोडी आधीच, म्हणजे एक वर्षानंतर टिळकांची सुटका झाली .टिळक अतिशय खालावलेली प्रकृती घेऊन परतले .पुण्यानं टिळकांचं मिरवणुकीनं, रस्तोरस्ती दीप उजळून , जंगी स्वागत केलं . त्यांचा नरसिंह देशासाठी, जनतेसाठी हाल सोसून परतला होता . टिळकांना खरी लोकमान्यता लाभली होती .
भगूरला विनायक हे सारं केसरीतून वाचत होता. टिळकांविषयी मनात अतीव आदर होता .देशकार्याची प्रेरणा ज्यांच्या तेजस्वी विचारांवर पोसली गेली ,ते टिळक सावरकरांना गुरुस्थानी होते .टिळकांच्या मुक्ततेप्रीत्यर्थ शाळेला सुटी जाहीर झाली होती .सगळी मुलं खूष होती .पण विनायकाला झालेला आनंद वेगळ्याच जातीचा होता .त्याच्या संवेदनशील मनात कविवृत्तीचा कंद असा रुजलेला होता की दुःख असो वा आनंद , भावना प्रकट होताना स्वभावतःच काव्यातून व्यक्त होत !
टिळकांच्या सुटकेचा आनंद कवितेतून व्यक्त करताना सावरकारांनी साक्षात आर्यभूला बोलतं केलं ! आर्यभू गात असलेली कविता ‘आर्या ‘ वृत्तात रचली .आर्येचा सारा गोडवा या कवितेत पहायला मिळतोच ,त्यांनी साधलेलं यमक, श्लेष याचंही सौंदर्य पहायला मिळतं .
सावरकरांना वयाच्या नवव्या वर्षीच मातृशोक झाला . येसूवहिनींकडून आईची माया मिळे, पण तोही सहवास फार लाभला नाही .भारतमाता हीच त्यांची खरी आई झाली .आईच्या वियोगावरही त्यांनी काव्य लिहिलं आहे .पण या आईचा -मातृभूमीचा उल्लेख मात्र जवळपास प्रत्येक रचनेत येतोच ! टिळक सुटून आले याचा या आईला किती आनंद झाला असेल अशी कल्पना करुन लिहिलेली ही कविता .
श्री टिळक आर्यभू भेट
ये ये बाळा ये क्षेम असो हो शतायु कुलतिलका
भरतें ये दाटुनि किति? स्वास्थ्य असे कीं गुणानुकुलटिळका ॥१॥
दे भेट जवळि ये चल चुंबन करण्यासि चित्त उत्सुकलें ॥
गेले ते दिन गेले बाळा किति तरि शरीर तव सुकलें
एकेक मोजुनी दिन अब्दवरी अंतरासि साहियलें
पळभरहि धिर न धरवे तोच सुदैवें मुखासि पाहियलें
कां तेथेंचि उभारे ? वाटे कीं ही न आपली दाई
परि शोकें कृश ऐसी स्तनपान्हा-चिन्ह तापलीं दाई
कीं आश्चर्ये थक्कचि शुद्धीपूर्वींच ही कशी शिवते ॥
बाळा प्रेमउमाळा शुद्ध स्वयें? मान मानसीं शिवतें ॥५॥
कीं कृद्ध मानसीं तू्ं ? ओवाळाया केंवि आउ नये ॥
भेटीसि विलंब नको , ऐक तसें की गृहात जाउं नये ॥६॥
श्री बाळ बहुप्रेमें धावें तों आर्यजननि घेच करीं ॥
सप्तमी दिनीं सकाळीं भेटीला दाटली घनश्चकरी ॥७॥
तुरुंगात सामान्य कैद्याची वागणूक दिल्यामुळं टिळक पार खंगले होते .पहिल्याच अोळीत ‘बाळा ‘ व कुल’तिलका’ अशी शब्दयोजना करत खुबीनं टिळकांचं नाव गुंफलं आहे .हा बाळ कुळाचाच नव्हे तर सार्या सद्गुणांचाही तिलक आहे .सार्या सद्गुणांना वास करायाला जणू टिळकांचं शरीर अनुकूल वाटतं ! आर्यभू अर्थात भारतमातेला ,वर्षभरानंतर तिच्या खुल्या भूमीवर चालत येणार्या या नरसिंहाला पाहून आनंदाचं ,वात्सल्याचं भरतं आलं आहे .तो दिसताक्षणी त्याची खंगलेली काया पाहून, ‘ तू बरा आहेस ना रे ? ‘ असा मातृसुलभ प्रश्न ती विचारते आणि ‘शतायुषी हो ! ‘ असा आशीर्वादही देते .खूप दिवसांनी भेटणारं लेकरु वयानं ,मानानं कितीही मोठं झालं, तरी आईला ते कधी एकदा जवळ येईल अन मी त्याला कुशीत घेऊन त्याचे पापे घेईन असं झालेलं असतंच ! ” किती सुकलाय माझा ‘बाळ ‘ , पण जाऊदे , आता गेले ते दिवस ! ” असं ती म्हणतेय . वर्षभरातला एकेक दिवस मोजत या आईनं त्याची प्रतीक्षा केली . तो विरह आता चरमसीमेला पोचला होता, धीर सुटत होता ,तोच अचानक बाळ सुटून आला !
पण हे काय ? तो अजूनही धावत माझ्याकडे का बरं येईना ? मी त्याची आई नव्हे असं वाटतं का त्याला ? मी तुझी खरी आई नसेन ,पण तिच्यामागं मीच तर तुला माझ्या मातीचं तेजस्वी स्तन्य देऊन वाढवलं आहे ! ( टिळक रत्नागिरीहून पुण्याला स्थलांतरित झाले त्यानंतर लगेचच म्हणजे शालेय वयातच त्यांचंही मातृसुख हरपलं होतं) आता तुझ्या विरहानं मी अशी कृश झालेय म्हणून आता माझ्याकडं तुला देण्यासाठी स्तन्य नाही अशी तुला शंका येतेय की काय ? की कारावासातून ,तिथल्या अमंगल वातावरणातून परत आल्यानंतर स्नानादि शुद्धी करण्याच्या आतच माता अलिंगनाला कशी बोलावते याचं तुला आश्चर्य वाटतंय ?
पण अरे , आईच्या मनातला प्रेमाचा निर्झर स्वतःच इतका पवित्र ,शुद्ध असतो की त्या स्पर्शानं सारं अमंगल दूर होऊन जातं .मी तर तुझं मन कवटाळायला पहाते आहे .ते कसं अशुद्ध असेल बरं ?
की मी अोवाळायला आले नाही म्हणून तू रागावला आहेस ? अरे, तुला रस्त्यात -घरात अौक्षण करुन घेणारच आहेत, पण तोवर आईला कुठला धीर ? तुझ्या भेटीसाठी आता अजून वेळ जायला नको व आईच्या धुळीनं शुद्ध होऊनच तू घरात प्रवेश करावास असं मला वाटलं !
बाळच्या भेटीसाठी व्याकुळ झालेली ही अार्यभू हरप्रयत्नांनी त्याची समजूत काढते आहे .त्याला कधी जवळ घेईन असं तिला झालंय .शेवटच्या कडव्यात अखेर बाळ धावत आर्यजननिकडे जातो असं वर्णन आहे .पण शेवटची अोळ वाचताना मात्र असं वाटलं की सावरकारांना अजूनही काहीतरी आयाम या मातृसंकल्पनेला द्यायचा आहे .भारत देश ही माता .पण तिची सेवा म्हणजे काय? तिच्या लेकरांची सेवा .टिळक हे लोकमान्य होते .लोकांसाठी त्यांचं सारं आयुष्य वाहिलेलं होतं. त्यामुळेच टिळकांची सुटका पुण्यानं मोठ्या जल्लोषात साजरी केली होती .
बाळ आता नुसता बाळ नाही ‘श्री बाळ ‘ झाला आहे .त्याच्या स्वागताला लोटलेला अफाट जनसमुदाय ही त्याची श्रीमंती ,हे त्याचं वैभव ! तो बाहेर येऊन धावत येणार, तो आईनंच त्याला उचलून घेतलं ! आईच्या वतीनं तिच्या हजारो सुपुत्रांचे हात त्याला उचलायला, कवटाळायला आले होते! ७ सप्टेंबर १८९८ या ‘सप्तमदिनी ‘ ही जनतेची घनश्चकरी दाटली होती !सप्टेंबर चे दिवस, कदाचित आकाशही दाटून आलं असेल, कोसळलं असेल , पण सावरकरांना दिसत होतं जनतेच्या हजार हातांनी बाळला कवटाळणारं आईचं प्रेम ! तो जनसागर, तो प्रेमाचा आवर्त ! देश म्हणजे देशातील लोक ! देशाची सेवा म्हणजे जनतेची सेवा .देशावर प्रेम म्हणजे इथल्या लोकांवर प्रेम .तिची मुक्तता म्हणजे इथल्या बद्ध जनतेची मुक्ती .तिचं ऐश्वर्य म्हणजे इथल्या सामान्य माणसाचं उत्थान .त्यमुळंच तिचं प्रेम म्हणजे तिच्या लेकरांनी दिलेलं प्रेम .जे टिळकांना नेहमीच भरभरून मिळालं होतं !
सावरकरांनी टिळकांवर अजूनही दोन मोठ्या कविता लिहिल्या .एक टिळक स्तवन नावाने आर्या (गीती) वृत्तातील रचना अाहे जी सावरकरांनी सतराव्या वर्षी लिहिली .दुसरा टिळकांवर लिहिलेला अप्रतिम ‘ फटका’ जो सावरकरांनी एकोणीस वीसाव्या वर्षी लिहिला आहे .वयानुसार कवितेत आलेली पक्वता , बांधेसूदपणा या कवितांकडे पहाताना जाणवतो .पण वर उल्लेखलेली कविता सर्वात आधी , वयाच्या पंधराव्या वर्षी लिहिली आहे .या कवितेआधी म्हणजे टिळक तुरुंगात असताना सावरकरांनी दोन छोटे श्लोक रचले आहेत .पूर्वी जेवणाच्या पंगती बसत असत व कितीही साधं अन्न असलं, पंगतीचा थाट नसला तरी या पंगती श्रीमंत होत असत ते त्यावेळी होत असलेल्या पठणांनी .पंगत वाढून होईतो कुणीतरी श्लोक म्हणत असे .सावरकरांनी अनेक प्रसंगी तात्काळ रचना करुन आपलं शीघ्रकवित्व बालवयातच सिद्ध केलं होतं. कदाचित अशाच कुठल्यातरी विवाहप्रसंगी पंगतीत रचलेले हे श्लोक …
अुपवर स्तुतिकन्ये ,मानला बाळ भारी ।
परि सवतिभयें तो नित्य तीते निवारी ॥
करुनि मग गुणांही ,युक्त त्याते सुकंठी ।
दृढ कवळुनि आता नित्य ती काळ कंठी ॥१॥दुरोनी अैकोनी वरगुणगुणालुब्ध रमणी ।
मृगाक्षी कीर्ती ये टिळक वरण्या अुत्सुक मनी ।
परी कारागारी वसत न कळोनी न भवनी।
प्रियाते शोधाया भटकत फिरे ती त्रिभुवनी ॥२॥
वास्तविक टिळकांचा विवाह केव्हाच झालेला होता ! पण टिळकांच्या उत्तरोत्तर वाढत चाललेल्या कर्तृत्व व लोकप्रियतेला या दोन उपवर कन्या भलत्याच भाळल्या होत्या ! त्यमुळं स्तुती व कीर्ती या दोन सद्गुणांना टिळकांना वरण्याची इच्छा झाली ,अशी कल्पना करून विनायकाने हे श्लोक रचले!
‘स्तुती’ ही कन्या ‘बाळ’ वर कितीही भाळली असली तरी ‘बाळ’ नं दृढनिश्चयानं तिला दूर ठेवलं .टिळकांच्या निःस्पृहपणाचं किती सुंदर वर्णन ! मग नाईलाजानं स्तुतीनं मग त्याचे गुणच अपल्या गळ्यात धारण केले व त्यांना कवळूनच ती राहू लागली , अर्थात टिळकांच्या सद्गुणांना कायमच स्तुतीचा आश्रय लाभला !
तर दुसरी कन्या कीर्ती .टिळकांचं गुणवर्णन ऐकून ती तर दुरून आली .परंतु टिळक कुठंच न आढळून त्या मृगनयनीचा भ्रमनिरास झाला .ते कारागृहात आहेत हे न कळल्यानं ती त्यांना शोधत सारं त्रिभुवन पालथं घालत आहे ! टिळक कारावासात असताना देखील त्यांची कीर्ती तीन्ही लोकात जगभर कशी पसरली ,याचं हे उत्तर !
त्यावेळच्या रीतीनुसार स्वतः विवाहाच्या वयात असताना विवाहेच्छू युवतीच्या भावना मनात येणं अगदी स्वाभाविक होतं ! पण मनात देशभक्तीचं स्फुल्लिंग इतकं धगधगतं होतं की त्या कोवळ्या वयात कधी तारुण्यसुलभ भावना कवितांमधे डोकावल्याच नाहीत .जे काही मित्रमंडळींसाठी फडाच्या लावण्या व फटके लिहिणं होत होतं तेही पंधराव्या वर्षी घेतलेल्या ‘स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरेतो झुंजेन ‘ या प्रतिज्ञेनंतर बंद केलं होतं . प्रेमभावना त्यांनी जणू फुरसतीसाठी राखून ठेवली होती .क्वचित परदेशातील प्रवासात तारकांस पाहून लिहिलेले ‘सुनील नभ हे ‘ सारखं दीर्घकाव्य ,असं एखादं उदाहरण वगळता सारं काही लिहिलं जात होतं ते देश व समाजाला केंद्रस्थानी ठेवूनच . पुढं अंदमानाच्या अतीव श्रमानंतर आलेल्या थकव्याचा जणू परिहार करण्याकरता काही हळव्या रचना त्यांच्याकडून झाल्या . इतक्या मरणयातना सोसल्यानंतर अशा तरल रचना लिहून होणं हे एक महदआश्चर्यच !
पण मुळात वाग्देवीचा हा फुलवरा जसा त्यांना अनुभवाला आला, प्रकटू लागला तेव्हाच त्यांनी तो आर्यभूचरणी अर्पण केला होता .अवघं जीवनच जिथं वाहून टाकलं होतं तिथं काव्यप्रतिभा तरी निराळी कशी रहाणार ! म्हणूनच तर देहान्त शासन होऊ शकेल अशा गुन्ह्यासाठी अटक झाली असता येसूवहिनींना लिहिलेल्या पत्रात आपलं शेवटचं मनोगत कळवताना हा महाकवी आपलं जीवनध्येय लिहीत होता ,जणू मातृभूमीला दिलेलं वचन अधोरेखित करत होता ..कुटुंबियांनीच काय माझ्या प्राणसखी काव्यप्रतिभेनेही माझ्याकडून अन्य अपेक्षा करु नयेत असंच जणू सुचवीत होता !
हे मातृभूमि तुजला मन वाहिलेलें
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेलें
तूंतेचि अर्पिली नवी कविता रसाला
लेखांप्रति विषय तूचिं अनन्य झाला !
– विनिता तेलंग
कालजयी सावरकर : मुंबई तरुण भारत विशेषांकातील लेख