कलाकाराच्या नजरेतून गणपती

‘कलाकाराच्या नजरेतून गणपती’ ह्या विषयावर ह्यावेळच्या ‘विवेक’ च्या अंकासाठी हे आर्टिकल लिहिलंय. माझे काका अविनाश लेले हे गणेश मूर्तींच्या क्षेत्रात ४५-५० वर्षं कार्यरत आहेत. अनुभव त्यांचे, शब्द फक्त माझे. आर्टिकल प्रिंटसाठी असल्यामुळे मोठं आहे.

पहाटेचे पावणे चार वाजले होते. मी कारखान्यात नेहमीसारखाच लवकर येऊन कामाला बसलो होतो. रात्री उशिरापर्यंत कामं करून कारखान्यात काम करणारी मुलं जागा मिळेल तिकडे पथाऱ्या पसरून आडवी झाली होती. मी आपल्या जागी कामाला येऊन बसलो. मुलांनी झोपायच्या आधी फिरकीवर गणपतीच्या मूर्ती ठेवल्या होत्या आणि माझ्या कामाची सोय करून ठेवली होती.

प्रत्येक शांततेला आपापलं अंगं असतं. पहाटेच्या निरव शांततेला मांगल्याचं अंगं आहे. आणि गेल्या अनेक वर्षात ते माझ्या परिचयाचं झालं आहे. दोन्ही बाजूला दिवे, बाजूला ठराविक रंगांच्या बाटल्या, वॉटर कलरच्या ट्युबस, आखणीसाठीचे ब्रशेस आणि फिरकीवर गणपतीच्या मूर्ती ह्या चित्राने अनेक वर्षांचे आषाढ श्रावण बघितले आहेत. क्वचित प्रसंगी रिपरिप पडणाऱ्या पावसाच्या थंडाव्याबरोबर केवड्याचा सुगंधही कारखान्यात फिरून गेला आहे. आजही अंगावर शहारा आणणारी ती दिव्य अनुभूती श्री गजाननाची होती ह्यात शंका नाही.

फिरकीवर माझ्यासमोर असलेली गजाननाची मूर्ती यंदा शंभराव्या वर्षात पदार्पण करणार आहे. गेली चाळीस पंचेचाळीस वर्षं गणपतीबाप्पा ही मूर्ती माझ्या हातून घडवून घेतोय. ही आणि अश्या अनेक मूर्ती बाप्पाने घडवून घेतल्या आहेत. ‘घडवून घेणं’ हेच म्हणणं संयुक्तिक ठरेल. कारण माझ्या कामात कर्ता मी असलो तरी करविता श्रीगणेश आहे, ह्याची खात्री आहे. इतकी वर्षं लोकांनी मला दिलेली संधी ही त्यांची देवावरची अखंड श्रद्धा आणि मूर्तिकार म्हणून माझ्यावर दाखवलेला विश्वास ह्याचं प्रतीक असल्याचं मला वाटत आलं आहे.

आपण साकार करतोय ते परमेश्वराच्या अव्यक्त शक्तीचं सगुण रूप आहे, त्या शक्तीचं ते मानवी आकलनासाठीचं रुपांतरण आहे, हा इतका अध्यात्मिक विचार माझ्या मनात गणपती करताना कधी नसतो. समोर आलेली मूर्ती भक्तवत्सल दिसेल, सामान्यांना भावेल, त्यांना आशादायी वाटेल अशी आश्वासकता देवाच्या डोळ्यांमधून उतरेल अश्याप्रकारे ते रंगवणे हेच माझं त्या त्या क्षणीचं काम असतं.

एका मातीच्या गोळ्याचा ईश्वर स्वरूपात रूपांतर व्हायच्या प्रवासाचा मी एक साक्षीदार असतो. लाकडाच्या छोट्या मोठया कोरण्या, रंग, ब्रशेस हे केवळ त्या प्रवासातली साधनं नाहीयेत तर हे सगळे प्रवासातले सोबती असतात. हातातली कला ह्या सगळ्यांना घेऊन चालत असली तरी त्यांना मार्ग दाखवायला आणि योग्य ठिकाणी आणून सोडायला श्रद्धा असावी लागते. ती श्रद्धा असली की बाप्पा प्रेमाने मार्ग दाखवतो. मग हवं ते स्वरूप आपसूक आकारायला लागतं. बालगणेशाच्या रूपात खट्याळ हास्य दाखवता येतं, कृष्ण रूपातलं प्रेम व्यक्त करता येतं, प्रचंड रूपातून आश्वस्त करता येतं किंवा दागिन्यांनी नटलेलं वैभवही दाखवता येतं. गंडस्थळमदमस्तक असो, इवले इवले डोळे सुपासारखे कान असो वा विशाल उदर, गणरायावर विश्वास ठेवला की, हवं ते रूप बरहुकूम साकारता येतं. त्यासाठी श्रद्धा हवी.

भगवंताच्या कृपाप्रसादामुळे मनुष्यात कला प्रसवत असते. श्रीगणेशाच्या सगुण साकार रुपाने परमात्मा समान्यांवर कृपा करत असतो. अश्या परमेश्वराची मूर्ती साकारून इतरांनाही त्या कृपेचे लाभार्थी बनवण्याच्या प्रक्रियेत आपण एक माध्यम असणं, ह्यासारखा दुसरा आनंद नाही.

समोरच्या फिरकीवरचा गणपती आणि मी- आमच्या दोघांमध्ये अनेकदा शांततेच्या क्षणी तिसरा कुणीही नसतो. श्रीगणेशमूर्ती घडवणे, रंगवणे ह्यातला ह्यात भक्तीमार्ग आणि कर्ममार्ग कायम एकत्र चालतात, अशी माझी धारणा आहे. कामाच्या मौसमात चहुबाजूंना आणि डोक्यात कायमच गणपती ह्या एकाच विषयामुळे नकळत होत असलेली भक्ती आणि दुसरीकडे कर्मापासून न होणारी फारकत हा एक अनोखा संगम मला वाटतो.

पूजन झाल्यावर ज्या मूर्तीच्या जवळही सामान्य मनुष्य जात नाही ती मूर्ती माझ्या अगदी काही इंचावर असते. अखेरचा हात फिरवायला, मूर्तीचे डोळे रंगवून त्यात भाव ओतायला मी त्या मूर्तीच्या समक्ष असतो. गेली अनेक वर्षं हे सानिध्य लाभलं आहे. त्यासाठी मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. हा सहवास म्हणजे प्रचंड ऊर्जा आणि सकारात्मकता ह्यांचा स्रोत आहे. कामाच्या वेळी आलेल्या अडचणींवर मात करत पुढे जायचं धारिष्ट्य ह्या सहवासात असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपार आनंद आणि समाधान ह्या सानिध्यात असतं. गणपतीची कामं चालू झाली की, सर्व कारखान्यांमध्ये उत्साह आणि चैतन्य पसरतं. शेवटच्या दिड दोन महिन्यांमध्ये ते अगदी टिपेला असतं. मात्र सगळे बाप्पा आपल्याला घरी गेले की, हा चैतन्याचा स्रोत अचानक लुप्त होऊन गेल्याचा अनुभव अनेकांना येतो. श्रीगजानन आपापल्या भक्ताच्या घरी जाताना ते सोबत घेऊनच जात असावा.

मातीला एकदा बाप्पाचा आकार आला की, आमच्यासाठीही तो केवळ एक ‘मातीचा गोळा’ राहात नाही. त्या क्षणापासून तो ‘गणपती’ झालेला असतो. आणि म्हणूनच आमच्या कारखान्यात ‘मूर्ती’ हा शब्द वर्ज्य आहे. ‘गणपती’ हा शब्द वापरायचा अलिखित नियमच कारखान्यात बनून गेला आहे.

पार्थिव श्रीगणेशाची स्थापना व्हायला लागल्यावर तात्पुरत्या काळासाठी स्थापन होणाऱ्या मूर्तींमध्ये कल्पकता यायला सुरुवात झाली. गेल्या तीस चाळीस वर्षांत वैविध्य मांडायला कलाकारांना अधिक वाव मिळाला. इतर आराध्यांच्या स्वरूपात गणपती मांडला जाऊ लागला. कल्पनेत जो विचार होता तो प्रत्यक्षात आणायची कलाकारांना संधी मिळाली. गणेश मूर्तिकला ही एक वेगळी शाखा विकसित झाली.

मात्र कलेच्या स्वातंत्र्यात सामान्यांच्या भावनांचं भान ठेवायचा विचार कलाकारांना ह्यावेळी गणपतीने दिला. मूर्ती करताना कलेच्या चौकटीत राहून पावित्र्य राखायचा विचारही कलाकारांना गणपतीने दिला.

एक मूर्तिकार म्हणून गणपतीबाप्पाने मला अलिप्तता शिकवली आहे. वर्षभर मेहेनत करून, शेवटचे काही महिने रात्रंदिवस काम करून घडवलेली मूर्ती त्या त्या भक्ताच्या हातात देताना दिर्घकाळाची भावनिक गुंतवणूक सोडवावी लागते. काही काळातच त्या मातीच्या मूर्तीचं  रूपांतर प्राणप्रतिष्ठा केलेल्या दैवतात होणार असतं आणि त्या क्षणाचा मी एक दूरस्थ साक्षीदार असतो.

श्रीगणेशमूर्तींचा व्यवसाय हा एक आर्थिक व्यवहार कधी असू शकत नाही. त्यात कोरडी देवाणघेवाण नसते. भक्तांच्या भावना त्यात गुंतलेल्या असतात. प्रत्येक भक्ताच्या मनात एक देवाची एक प्रतिमा असते, तिला मूर्त स्वरूप द्यायचं माध्यम माझ्यासारखे मूर्तिकार असतात आणि प्रत्येकाच्या प्रतिमेला न्याय द्यायची जवाबदारी सांभाळावी लागते. कर्ता करविता बाप्पा असला तरी माध्यमाला चुकण्याची मुभा नसते. तो चोखच असावा, अशी अपेक्षा असते.

गणेशमूर्ती रंगवून पूर्ण तयार होईस्तोवर आणि साचे वापरून मूर्ती गिऱ्हाईकाकडे सुपूर्त करेस्तोवर काही वेळा गणपती प्रत्यक्ष अनुभूती देतो तर काहीवेळा विविध पंथाचे, वेगवेगळया पार्श्वभूमीतुन आलेले त्याचे चाहते विलक्षण चांगला अनुभव देऊन जातात.

त्यातलंच एखादं हौशी कुटुंबं असतं. गणपतीबाप्पावर प्रेम करणारं. ३-४ फुटी मूर्ती घरात बसवणारे असतात. घरातले सर्व आवर्जून नटून थटून गणपती आणायला येणारे. घरातल्या स्त्रिया सोन्याने मढून गणपती घ्यायला येणाऱ्या. म्हातारी बाप्पाची पूजा करणारी. “देवा, तूच मला सर्व दिलंस! देवा, सुखी ठेव रे बाबा! माझी नौका वाचव !” एका वाक्यात पाच पन्नास वेळा “देवा, देवा” म्हणत देवाला आळवणारी असते. गणपतीच्या पुढ्यात बसल्यावर टचकन सहजगत्या डोळ्यातून आसवं गाळते.

दुसरं एखादं कुटुंबं उत्साही असतं. बाप्पाची मूर्ती निवडताना चोखंदळ असतं. हिर्याच्या व्यापारातला पैसा केवळ बाप्पाच्या कृपेने येतोय ह्याची त्यांना जाण असते. घरात ६-७ फुटी सजावट करतात. मूर्ती सजवण्यासाठी भरपूर वेळ घालवतात. बाप्पावर अगाध श्रद्धा असते.

एखादं साधारण कुटुंबं असतं. दिडच दिवसाचा गणपती, पण त्यातही उत्सव साजरा करतात. हवी तशी मूर्ती मिळण्यासाठी आणि रंगवून घेण्यसाठी अनेक खेटा घालतात.  मांडव घालून, सजावट करून उत्साहाने बाप्पाला घेवून जातात.

एखादं सनातनी कुटुंबं असतं. सोवळं ओवळं पाळणारं. ह्यांचा गणपती नवसाला पावणारा. दीड दिवसात ह्यांच्या घरी किती माणसं दर्शनाला येतात आणि किती जेवून जातात ह्याचा हिशोबच नसतो. शंख वाजवून पारंपारिक पद्धतीत गणपती घरी नेतात. घरी दर्शनाला गेल्यावर अगत्याने स्वागत करणारं.

एखादा मोठा परिवार असतो. मूर्ती रंगीत संगीतच असायला हवी ह्याचा हट्ट करतात. शक्य तेवढा भडक बाप्पा त्यांना आवडतो. “आजी , मूर्ती मोठी आहे, वजन होईल, कशी नेणार?” ह्या प्रश्नावर “देवाचा भर आपण काय घेणार! देवच स्वत: घरी येणार! नेवू डोक्यावर!” असं म्हणुन २.५-३ फूट मूर्ती सरळ डोक्यावर ४-५ किलोमीटर सहज चालत नेतात.

हि आणि अशी अनेक कुटुंबं बाप्पाच्या भक्ताच्या रुपात येतात. गणपती बाप्पावर प्रचंड श्रद्धा असणारी! बाप्पावर जीवापाड प्रेम करणारी!

हे सर्वजण बाप्पा घरी येणार हे सौभाग्य समजतात.  बाप्पासाठी उत्साहात उत्सव साजरा करतात. २-४ महिने आधीच बाप्पाच्या आगमनाचे वेध लावून घेतात आणि त्याच्या स्वागताची जय्यत तयारी करून बाप्पाला प्रेमाने व्ही व्ही आय पी ट्रिट्मेण्ट देतात. जातिपंथाच्या चौकटीत लोकं वेगवेगळ्या उपासनापद्धती जोपासतात. श्रद्धेचा एक धागा मात्र सर्वत्र समान असतो.

आणि ह्याच सर्वांसाठी प्रेमाने गणपती बाप्पा तयार करणारे, आनंदाने रंगवणारे अनेक गणपती कारखान्यातले माझ्यासारखे कितीतरी मूर्तिकार, कलाकार! हातातली कला हि बाप्पाचीच कृपा ह्या श्रद्धेवर मी ठाम असतो. जे जे छान रंगले आहे त्याचा करता करविता बाप्पाच आहे, ह्याची खात्री असते. दिवस रात्र मेहेनत करून जो बाप्पा घडवायचा तो त्याच्या घरी जाणार ह्या विचाराने गलबलून येतं तरीही तटस्थपणे बाप्पाला त्याच्या भक्ताच्या हातात देत असतो. सगळे बाप्पा आपापल्या घरी गेल्यावर कारखान्यांमध्ये आणि मनामध्ये येणारे रितेपण दरसाली झेलत असतो. अश्याच अनेक कलाकारांपैकी मीही एक ! दरवर्षी दोन्ही बाजूंचा साक्षीदार असणारा. गणपती बाप्पा जाताना आणि येताना एकच गजर उत्साहाने करणारा!

मंगSSSSSल मूर्ती !!! मोSSरया!!!!

– अविनाश लेले, आगाशी.

शब्दांकन- सारंग लेले.

(लेखक हे कमर्शियल आर्टिस्ट असून ४५ वर्षांहून अधिक काळ गणेशमूर्तींच्या व्यवसायात आहेत.)


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

%d bloggers like this: