फडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे …

कधीतरी आपण सकाळी लवकर उठून काहीतरी करत असतो. खूप लक्ष देऊन करायला हवंय असं काही नसतं. आजूबाजूला मस्त शांतता असते. अश्यावेळी गाणी लावावी.

लोकांसाठी गाण्यांचे प्रदेश वगैरे असतात. तेही वेगवेगळे.  आपल्यासाठी मात्र ती एकामागोमाग एक लागत गेलेली प्लेलिस्ट असते. त्यात क्रम नसतो. शाळेतल्या धड्यांसारखं असतं. तिथे कोणीही कुठेही कसंही येऊ शकतं. हवं ते पान उलटावं.  एकांतात शब्दांचा ध्वनी काही मायक्रोसेकंद आधी कानात शिरतो. गर्दी असली की शब्द निमूट असतात. गर्दीत चाल पुढेपुढे करते. मनसोक्त काही ऐकायचं असेल तर अश्या निवांत वेळी मराठी गाणी ऐकावी.

भावना वगैरे म्हणून जे काही असतं त्या अचूक ठिकाणी अचूक पोहोचायला, यॉर्करसारखं अचूक पडायला आपली भाषा समर्पक असते. आपल्या भाषेतले शब्द भावनावेधी असतात.

हव्या त्या भावनेला मातृभाषेतल्या शब्दांचा नेम अचूक लागतो.

आदल्या दिवशीचं अर्धवट ऐकलेलं गाणं पुन्हा ऐकायचं असतं. सकाळीच विरहिणी कशाला? पण तो प्रश्न पडू द्यायचा नसतो. आपल्याला आवडेल ते आवडत्या वेळी ऐकावं.

‘चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्होवनमाळी वेगे भेटवा गा..’

एकेक शब्द ऐकून घ्यावा. चंदन असूनही पोळून निघणे इतका विरह ज्ञानोबांना कुठून सुचला असेल? तोही इतक्या लहान वयात? आणि तेही थेट अनुभव नसताना?

विरहाची वगैरे इतकी आर्तता दाखवायला ‘पोळी’ ह्या शब्दाला दुसरा शब्द कदाचित असू शकणार नाही. चोळी अंगाच्या जवळ असते म्हणून पोळी शब्द असेल? भाजून निघणं अपेक्षित नसेल कदाचित. हिट ट्रान्सफरचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यातला योग्य म्हणून भाजण्याऐवजी पोळणे हा वेगळा शब्द वापरला असेल का?

पुढचं कडवं लागतं..

“सुमनाची शेज शीतळ वो निकी..”

ह्यात खूप जवळच्या माणसासाठी शेज शब्द अपेक्षित असेल का? अंथरूण हा रुक्ष शब्द न वापरता जिव्हाळ्याचा म्हणून शेज शब्द असेल का? नात्यामधली जवळीक दाखवायला भारंभार शब्द न गोळा करता ‘शेज’ हा एकच नेटका शब्द वापरला असेल का? ह्या सगळ्यासाठी माऊलींना आपण हात जोडायचे असतात.

सूर्यकांत खांडेकरांचं ‘त्या फुलांच्या गंधकोशी’ चालू होतं. प्रत्येक वाक्यात एकेक प्रश्न असतो आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असतं.

‘मूर्त तू मानव्य का रे? बालकांचे हास्य का?’ मुलांमधल्या देवत्वासाठी हेच शब्द हवेत.

देवाच्या मुलासाठी ‘जैसे बन्सी कोई बजाये पेंडो के तले’ हे ‘तारे जमीन पर’ मधलं चालेल, पण मुलांमधल्या देवासाठी ‘बालकांचे हास्य का’ हे जास्त सुसंगत वाटतं.

गाणी पुढे सरकत जातात.

‘लाजऱ्या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जीवा,

अंतरीच्या स्पंदनांनी, अन थरारे ही हवा’

ह्यातली रोमँटिक वगैरे जी काही स्पंदनं असतात ती आणि थरारणे हे दोन्ही हिंदीत कसं लिहिणार? किंवा इंग्रजीत त्याला तितके साजेसे शब्द मिळतील का ? ही शंका असते. उत्तर मलातरी माहिती नसतं.

‘निरवता जशी ती तशीच, धुंदी आज ती कुठे?’

ह्यातला निरवतेला दुसरा चांगला शब्द कोणता असू शकतो का?शांतता वेगळी आणि निरवता त्याहून वेगळी. त्यामुळे नो रिप्लेसमेंट.

‘निजलेल्या गावातून, आले मी एकटीच

दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच’

ह्यातल्या ‘कळलावे’ शब्दाला तितकाच चहाडखोर शब्द मिळू शकेल?  नाही मिळणार.

किंवा नाधोंच्या “अंगं झिम्माड झालं” मधल्या ‘झिम्माड’ला ऑप्शन कुठे मिळायची? हाही नाही मिळणार.

ह्यातल्याच ‘नभ उतरू आलं’ ह्याला तितकंच छान मेरे नैना सावन भादो चालेल? नको. यात पावसाचा फील असला तरी आकाश उतरून यायची मजा नाही.

महाराष्ट्रात आणि खासकरून कोकणात जे उतरतं ते नभ असतं. सावन भादोचा ह्या प्रसंगाशी संबंध नाही. दोन्ही गाण्यांचे भाव आणि भूगोल वेगळे आहेत. त्यामुळे इकडे ‘नभ उतरू आलं’ हेच उत्तम.

लता मंगेशकरांचं ‘श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीमधारा’ चालू होतं.बहुतेक पावसाची गाणी आपोआप क्यू मध्ये आलेली असतात. पाडगावकरांनी श्रावणासाठी म्हणून रिमझिम ‘रेशीमधारा’ निवडल्या असतील. आषाढसरी असत्या तर त्यांनी एखादा बोचरा शब्द शोधला असता.

‘छेडीती पानात बीन, थेंब पावसाचे,

ओल्या रानात खुले, ऊन अभ्रकाचे,

मनकवडा घन घुमतो, दूर डोंगरात’

ह्यातल्या पानांवर जमून उन्हात चमकणाऱ्या थेंबांचा अभ्रक जितका भारी आहे तितकंच वसंतराव देशपांड्यांच्या आवाजातून गोल गोल घुमणारा घनसुद्धा भारीच आहे.

निसर्गाच्या एकेका एलिमेंटचा वापर करून निवडलेले शब्द गाण्यातून यायला सुरवात होते.

‘निर्जीव उसासे वाऱ्यांचे, आकाश फिकटल्या ताऱ्यांचे

कुजबुजही नव्हती वेलींची, हितगुजही नव्हते पर्णाचे

ऐशा थकलेल्या उद्यानी.. ‘

ह्यातली सिच्युएशन वेगळी असते आणि म्हणून यशवंत देवांचा निसर्ग वेगळा असतो.

‘ती आम्रवृक्षवत्सलता रे,

नवकुसुमयुता या सुलता रे,

तो बालगुलाबही आता रे,

फुलबाग मला हाय पारखा झाला’

ह्यातली आतली तळमळ वेगळी असते म्हणून सावरकरांचा निसर्ग शब्द वेगळे भासतात

आणि

‘माझ्यापास आता कळ्या,

आणि थोडी ओली पाने’

ह्यातला संदर्भ अजूनही भलताच असतो, त्यामुळे त्यातली कळ्या आणि पानं वेगळीच असतात.

मध्येच गाणी ट्रॅक बदलतात, मूड वगैरे बदलतो.

‘माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषी तात

राज्य त्याग काननयात्रा, सर्व कर्मजात

खेळ चाललासे माझ्या पुर्वसंचितांचा…’

ह्यात कर्मबंधन मान्य करणारा राम असतो.

आणि

‘कुणी आप्त ना, कुणी सखा ना जगती जिवांचा,

क्षणभंगुर ही संसृती आहे खेळ ईश्वराचा,

भाग्य चालते कर्मपदाने, जाण खऱ्या वेदार्था’

ह्यात कर्माचं समीकरण मांडणारा कृष्ण रामापेक्षा वेगळा असतो.

फक्त दोनचार मूड्समध्येच फिरणारी गाणी ऐकून झालेली असतात. तीही पूर्ण नाहीच. तास दिडतास सुरेल आणि सुरेख झालेला असतो. लिमिटेड वेळात फक्त ओपनिंग पेअरच खेळत असते. हेन्स आणि ग्रीनिज ह्यांची पहिल्याच दिवसाचं पाहिलंच सेशनसुद्धा संपलेलं नसतं. अजून खालची पूर्ण लाईन अप बाकी असते.

गीतकार, कवी बदलत राहतात, संगीतकारसुद्धा बदलतात.

एकामागोमाग एक गाणी वाजत जातात. ‘तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही’ अशी अवस्था होते कधीतरी.

आपण अनुभवलेले भाव आपल्याच शब्दांमध्ये मिळायला लागतात.

खूप भूक लागली आहे आणि समाधान व्हावं इतकं जेवावं वाटलं तर त्याला घरचा आमटीभातच हवा. घरी एखादा कार्यक्रम आहे, जवळचे येणारेत अश्यावेळी मनापासून खाऊ घालायला पुरणपोळी किंवा श्रीखंड हवं. चमचम किंवा खीर कोदमने खाऊ घातल्याचं समाधान कसं होईल? मराठी गाण्यांचं तसं असतं. मी मराठी बोलतो म्हणून माझं तसं. मला खात्री आहे की, बाकीच्यांचं त्यांच्या त्यांच्या भाषांमध्ये होत असेल.

लेखनातले सगळे रस लीलया वगैरे म्हणतात तसे हाताळणाऱ्या लेखक कवींबद्दल मला जितकं कौतुक वाटतं तितकंच प्रेम त्या भावना तितक्याच सोपेपणाने व्यक्त करू देणाऱ्या मराठी भाषेबद्दल वाटतं.

आपण दुसऱ्या कामाला लागतो. आजचा कोटा संपतो. गाण्यांसाठी सहज चालून आलेली आजची वेळ संपलेली असते.

थवा उडून जातो. शुद्ध सुरांचं आणि शुभ्र शब्दांचं फडफडणे मागे उरून राहतं.

– सारंग लेले, आगाशी.


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

%d bloggers like this: