इसरो: साधी माणसं, अफाट कर्तृत्व

आज दुपारी ठरलेल्या वेळी म्हणजे २ वाजून ४३ मिनिटांनी इसरोचं चांद्रयान २ आकाशात झेपावलं. १५ जुलैच्या रात्री आढळलेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करून आजच्या दिवशी चांद्रयानाने उड्डाण घेतल्यावर प्रत्यक्षात आणि टीव्हीकडे डोळे लावून बसलेल्या अनेक भारतीयांनी सुटकेचा श्वास टाकला असेल. उड्डाणाच्या आधी काउन्टडाउनच्या वेळी जाणवणारी धडधड उड्डाण झाल्यावर सामान्यांसाठी थांबली असली तरी पुढचे ४८ दिवस चांद्रयान २ चंद्रावर पोहोचेपर्यंत आणि त्यानंतर १५ दिवस अपेक्षित निरीक्षणं हाती येइपर्यंतचा काळ इसरोच्या शास्त्रज्ञांसाठी कसोटीचा असणारे. सव्वातीन लाखा किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर जराही माहिती नसलेल्या ‘टोटल ब्लाइंड स्पॉट’ असलेल्या चंद्राच्या दक्षिण भागात चांद्रयान २ नेऊन उतरवणे, हे आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. वेगवेगळ्या प्रकारची गणितं करून कमीतकमी इंधन वापरत चंद्राच्या कक्षेत एखादं यान स्थिर करणं आणि नंतर त्याद्वारे माहिती मिळवणं, हे आपल्यासाठी भयंकर अगम्य आहे. बरं गम्मत म्हणजे हे सगळं हाताळणारी इसरोच्या नियंत्रण कक्षातली माणसं ही आपल्याबरोबर टपरीवर चहा पिणाऱ्या माणसांच्या इतकीच साधी दिसत होती. त्यातल्या अनेकांच्या कपाळावर गंध होतं. त्यांची बुद्धी, त्यांचं अफाट काम, त्यांचा आधुनिक विज्ञानाचा मार्ग ह्याच्यात त्यांची श्रद्धा अडसर ठरत नसावी, असा माझा कयास आहे.

ह्या सर्व शास्त्रज्ञांमध्ये कैलासवदीवु अर्थात के सिवन हे एव्हाना सर्वांना परिचित इसरोचे प्रमुखही होते. सिवन हे अत्यंत गरीब आणि सध्या कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे वडील फक्त एकरभर जागेत भातशेती करत. तामिळ मिडीयममधून शिक्षण पूर्ण केलेल्या सिवन ह्यांनी गणितात बीएस्सी केलं. नंतर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोनॉटिकल इंजिनीरिंग आणि पुढे त्याच विषयात आयआयएससीतुन मास्टर्स केलं. २००६ साली त्यांनी आयआयटी मुंबईतून आपली पीएचडी पूर्ण केलीय. १९८२ साली सिवन इसरोत रुजू झालेत.

उड्डाणाच्या आधी चेहऱ्यावर न काळजी वा भिती आणि पहिल्या महत्त्वाच्या पायऱ्या पूर्ण झाल्यावर ना जल्लोष, ना हर्षोल्लास. परिपूर्ण, परिपक्व आणि विद्वत्तापूर्ण स्थितप्रज्ञता श्री सिवन ह्यांच्यासकट इसरोच्या नियंत्रण कक्षात इतर सर्वांच्या देहबोलीतून दिसत होती.

अमेरिकेच्या नासाप्रमाणेच इसरो ही जगातली एक अत्यंत प्रगत अंतराळ संस्था आहे. विकिपीडियाच्या माहितीनुसार इसरोत आजमितीला १६,८१५ लोक काम करतात. ही संख्या नासाच्या जवळपास आहे. मात्र इसरोला भारत सरकारकडून मिळणारा निधी १२ हजार चारशे कोटी रुपये आहे तर अमेरिकन सरकार नासाला १.४ लाख कोटी रुपये पुरवते. दोन्ही संस्थांमधला हा एक मोठा फरक आहे. कमीतकमी पैशात यशस्वी मोहिमा राबवणं ही इसरोची खासियत म्हणायला हवी. मंगलयान मोहीमेचा एकूण खर्च होता ४०० कोटी रुपये जो हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांपेक्षा कमी होता. चांद्रयान २ चं बजेट आहे ९७८ कोटी रुपये. म्हण्जेच फक्त बाहुबली २ च्या कमाईमध्ये दोन चांद्रयान मोहिमा होऊ शकतील आणि बीसीसीआयला आयपीएलच्या लिलावातून मिळालेल्या पैशातून तब्बल सोळा चांद्रयान मोहिमा होऊ शकतील. इसरो किती कमी पैशात सगळं भागवते ते कळावं (आणि भारतीय लोक आपला पैसा कुठे ओतत असतात हेही कळावं) ह्यासाठी हे आकडे. त्यामुळे मिळणाऱ्या निधीचा वापर करून इसरोने केलेली वाटचाल ही नक्कीच अभिमानास्पद आहे.

चांद्रयान २ ही भारतासाठी जशी एक मोठी मोहीम आहे, त्याचप्रमाणे इसरोची पुढच्या वर्षीची सुर्यावरची मोहीम ही देखील महत्त्वाची असणारे. त्यासाठी इसरो आदित्य-एल १ ह्या यानावर काम करते आहे. हे यान पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर स्थिरावून आपली निरीक्षणं इसरोकडे पाठवेल. सर्व जगभरातला सूर्य मोहिमेचा हा प्रमुख प्रयत्न असणार आहे.

मागील वर्षी १५ ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी भारताच्या पहिल्या मानवी मोहिमेची घोषणा केली होती. ‘गगनयान’ ह्या नावाची ही मोहीम २०२२ पर्यंत अपेक्षित आहे. त्याचबरोबर शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी ‘शुक्रयान’ ही मोहीमसुद्धा प्रस्तावित आहे.

अंतराळ मोहिमेपेक्षा जास्त काम इसरो इतर उपग्रहांवर करतेय. कारण ती आपल्या देशाची ती गरज आहे. इसरोच्या उपग्रहांनी दिलेली हवामानाची माहिती आणि सुरक्षेसाठीची पडताळणी ही दोन महत्वाची कामं गेल्या काही महिन्यात भारताला अत्यंत उपयोगी पडली आहेत.

स्कॅटसॅट-१, ओशनसॅट-२ आणि पोलार ऑरबीटिंग मिनिएचर सॅटेलाईट ह्यांनी मे महिन्यात ओरिसाच्या किनाऱ्यावर आलेल्या फणी वादळाच्या वेळी दर पंधरा मिनिटाला अचूक माहिती पुरवली होती. त्या माहितीच्या आधारे साडेअकरा लाख लोकांचं सुरक्षित स्थलांतर करून मोठी जिवीतहानी टाळण्यात यंत्रणांना यश मिळालं होतं.

ह्या व्यतिरिक्त कोरसॅट- १ आणि कोरसॅट- २ हे दोन अत्यंत महत्त्वाचे उपग्रह भारताच्या ताफ्यात आहे. ह्यातला कोरसॅट- २ हा उपग्रह साधारण दीडेक तासात पृथ्वीप्रदक्षिणा करतो. ६५ सेंटीमीटर इतकं कमी त्याचं रेझोल्युशन आहे. (चीनच्या उपग्रहाची क्षमता ५ मीटर इतकी आहे.) अगदी पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालयात किती गाड्या आहेत हेही हा उपग्रह टिपू शकतो. पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ह्या उपग्रहाची फार मोठी मदत भारतीय सैन्याला झाली होती.

सायकलवरून सामान वाहून नेण्यापासून ते सूर्यचंद्रांना गवसणी घालण्यापर्यंतच इसरोचा प्रवास प्रत्येक भारतीयासाठी अभिमानस्पद आहे. अंतराळ आणि अवकाशाच्या संशोधनात भारताची परंपरा फार गौरवशाली आहे. इसरोच्या यशाने ती उत्तरोत्तर उजळत जावो.

सारंग लेले, आगाशी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s