मागच्या महिन्यात आम्ही घर बदलले. समानाची बांधाबांध त्या आधीच सुरु झाली होती. मी स्वयंघोषित ‘Organizer शिरोमणी’ आहे. त्या गुणाबद्दल चिक्कार गर्व पाळला आहे. त्याला अनुसरून, मी घर बदलण्याच्या कार्यक्रमाचा अत्यंत आखीव रेखीव plan केला. दोनच वर्षांसाठी घर बदलतोय. कशाला न्यायचे सगळं समान. अगदी जरुरी पुरतंच नेऊ. बाकी समान जुन्या घरातील खोलीवजा closet मध्ये ठेवायचे ठरले.
मग, रोजच्या वाचनात नसलेली पुस्तके काढली. त्याचा एक मोठा डोंगर closet मध्ये नीट रचून ठेवला. काचेचे dinner set काय करायचे? ते पण जुन्या घरातच ठेवायचे ठरवले. जास्तीचे अंथरुण –पांघरूण ते पण राहू देत म्हणून closet मध्ये गेले. करत करत त्या खोलीत एक लहानसा मेरू पर्वत उभा राहिला.
आता न्यायच्या सामानाची बांधाबांध. ते एकेका खोक्यात भरून, त्यावर आत काय भरलंय आणि नवीन घरात कोणत्या खोलीत ठेवायचे ते लिहीले. packing करता करता, ज्या मार्करने मी आणि शरू खोक्यावर लिहित होतो ते कोणत्या खोक्यात प्याक केलं गेलं ते देवच जाणे! पुढची खोकी निनावी राहिली.
माझे organized packing संथ गतीने चालू होते. नरेनच्याच शब्दात सांगायचे तर, “आता खाली टेम्पो येऊन उभा राहील!” अशी परिस्तिथी आली तरी बांधाबांध चालूच! शेवटी नरेनने आणखीन खोकी आणवली आणि मग आम्ही ‘दिसेल_ते_मावेल_त्या_खोक्यात’ हे धोरण अमलात आणले, आणि सुसाट वेगाने उरलेलं सामान भरत सुटलो! “Organized packing” चे आधीच बारा वाजले होते, आता पार तीन तेरा वाजले! आम्ही नवीन घरात पोचायच्या आधीच, माझ्या गर्वाने त्याचे घर खाली जात जात basement मध्ये पोचले होते!
नवीन घरात सामन लावायला सुरुवात झाली. कितीतरी दिवस ‘सुरुवात’ च चालू होती. “समान लावणे” या प्रक्रियेचा मध्य कधीतरी पार केला पण त्याचा अंत काही लागत नव्हता! स्वयंपाकघर लावतांना गॅस गळत असल्याचे लक्षात आले. झालं! गॅस बंद! एजन्सी शोधून, दुकान गाठून, कर्मचारी हजर आहे, दुकानाला सुट्टी नाही, कुठला मोर्चा नाही, बंद नाही, सगळे फोर्म बरोबर भरलेत … असे सगळे योग जुळून येण्यात एक आठवडा गेला.
दरम्यान गॅस मिळेपर्यंत, ‘आता_आपण_रोज_हॉटेल_मध्ये_मस्त_जेऊ’ चा आनंद २-३ जेवणातच संपला. जेंव्हा शरू सुद्धा घरचंच जेवण छान असते, असे म्हणाली, तेंव्हा काहीतरी उपाय करणे प्राप्त झाले. नवीन घरात काही मजाच वाटेनाशी झाली. स्वयंपाकघर तर अगदीच मलूल भासू लागले. एक चूल पेटली नव्हती, तर घराचे घरपणच हरपले होते.
अग्नी शिवाय घर म्हणजे नुसताच निवारा होता. हॉस्टेल किंवा हॉटेल नाहीतर धर्मशाळेसारखा. जोपर्यंत घरात अग्नी प्रज्वलित होत नाही, अन्न शिजत नाही, घरातला आणि घरी आलेला मनुष्य अन्न खाऊन तृप्त होत नाही, तोपर्यंत घरला ‘घरपण’ नाही हे लक्षात आले. सर्वात आधी अग्नी हवा! बाकी सगळं त्याच्या नंतर येतं. एकत्र कुटुंबातील सून जेंव्हा नवीन घर करते, तेंव्हा तिने ‘वेगळी चूल मांडली’ असे का म्हणतात ते मला या निमित्ताने नीट कळले.
वीज येण्याच्या आधीच्या काळात, अन्न शिजवायला, रात्री उजेडाला आणि थंडीत उबेला मनुष्य अग्निवरच अवलंबून होता. त्याही आधीच्या काळातला मानव प्राण्यांपासून संरक्षणासाठी सुद्धा अग्नीवरच भिस्त ठेवून होता. अशा अग्नीवर आदिमानवाने देवत्व बहाल केले त्यात नवल ते काय? वैदिक ऋषी सुद्धा अग्नीचे गुणगान करतात. ऋग्वेदाच्या पहिल्याच सूक्तात मधुच्छंदा वैश्वामित्र ऋषी अग्नीची स्तुती करतांना म्हणतो –
अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवऋत्विजम् | होतारं रत्नधातरम् || १.१.१ ||
देवांचा ऋत्विज, होता असलेल्या अग्निची आम्ही नित्य स्तुती करतो. यज्ञात सर्वात पुढे असलेला अग्नी आम्हाला रत्नांनी विभूषित करो! अग्नी मनुष्याला वर्धमान करतो, धन आणि यश देतो, संरक्षण करतो आणि आम्ही दिलेली आहुती देवतांना पोचवतो! त्या अग्नीस माझा नमस्कार असो! आम्हा गृहस्थ लोकांना अग्नी प्राप्त होवो! जसे पुत्राला सहज पिता प्राप्त होतो, तसा तू आम्हास बाधारहित होऊन प्राप्त हो! पूर्वीच्या ऋषींनी तुझे गुणगान केले होते, आणि आता आधुनिक काळात देखील आम्ही तुझे गुणगान करत आहोत. हे अग्नि! तू आमच्या निकट येऊन रहा! आमच्या मध्ये वास कर!
गॅस कधी येणार आणि चूल कधी पेटणार म्हणून मी देखील, “अग्नी देवा, पाव रे बाबा! ये माझ्या घरी!” असे म्हटलेले आठवले. तेंव्हा, किती हजारो वर्ष लोटली असली, तरीही मानवाची अग्निबद्दलची भावना तशीच आहे असे वाटून गेले!
अग्निचे आगमन होईपर्यंत, माझ्या मैत्रिणी मदतीला धावून आल्या. प्रीतीने तिची Induction ची शेगडी दिली. पल्लवीने त्यावर चालणारी भांडी दिली. “काय करायचा?” म्हणून जुन्या घरातल्या closet अर्थात अडगळीच्या खोलीत मध्ये ठेवलेला rice cooker आठवला. तिथला मेरू पर्वत पोखरून rice cooker खणून काढला. नाना खटपटी करून विजेवरचा अग्नी प्रज्वलित केला. आणि ३ ऱ्या दिवशी सकाळी नवीन घरात पहिल्या चहाला आधण आले! कष्टाने प्रकट होणाऱ्या अग्निला वेदात, ‘सहस: सूनु’ का म्हटले ते त्याने आज मला पटवूनच दिले होते!
दगडावर दगड आपटून, नाहीतर दोन काटक्या एकमेकांवर घासून आदिमानव कष्टाने अग्नी निर्माण करत असे. असा अग्नी एकदा चेतवला की दिवस – रात्र पेटता ठेवणे सोयीचे होते आणि आवश्यक देखील. सतत पेटलेल्या अग्नीचे घरातील रूप म्हणजे – गार्हपत्य अग्नि. जन्मभर साथ देणारा हा अग्नी नवदांपत्याला विवाहात मिळत असे. नवरा – बायको दोघे मिळून या अग्नीची सेवा करत. या अग्नीत रोज सकाळ – संध्याकाळ आहुती देत. घरातील प्रत्येक कार्य या अग्नीच्या साक्षीने होत असे. नवीन बाळाचे बारसे असो, घरातला लहान मोठा यज्ञ असो, किंवा मुलांचा विवाह असो. सर्व संस्कार या अग्नीला नमन करून होत असत. या दांपत्यापैकी जो आधी मृत्यू पावेल, त्याच्या बरोबर हा अग्नी शेवटच्या प्रवासाला मडक्यातून जात असे. जन्मभर अग्नीची सेवा करून शेवटी आपला देह सुद्धा अग्नीला अर्पण करणे हा अंतिम संस्कार!
वैदिक ऋषींनी अग्नीला नाना रुपात पहिले. भूमीवर अग्नी म्हणून. आकाशात सूर्य म्हणून तर अंतरिक्षात वीज म्हणून पूजले. ऋग्वेदात अग्नीची स्तुती करतांना म्हणले आहे –
चत्वारि शृंगा त्रयोऽअस्य पादा द्वेशीर्षे सप्तहस्तास्योऽअस्य ।
त्रिधाबद्धो वृषभो रोरवीति महो देवो मर्त्यां आविवेश ॥ ४.५८.३ ||
चार शिंग, तीन पाय, दोन शीर्ष, सात हात असलेल्या अग्निला तीन ठिकाणी बांधून काबूत ठेवावे लागते. वृषभा सारखा रोरवणारा, महान देव, आम्हा मर्त्य लोकात येऊन राहो!
चार फॉर्मस्, तीन नवस, दोन अजेन्सी आणि सात वाऱ्या केल्यावर, तो महान देव मला प्रसन्न झाला! गॅस सिलेंडर आणि त्याद्वारे पेटलेल्या अग्नीला काबूत ठेवणारा रेग्युलेटर आम्हा पामरांच्या घरी आला! नवीन घरात खराखुरा अग्नी आला!
पहिल्यांदा स्वयंपाक केल्यावर अग्नीत थोडा भात टाकला, देवापर्यंत हवि पोचवणाऱ्या ‘हव्यवाहक’ अग्निला मनोमन नमस्कार केला. बऱ्याच दिवसांनी आज घरात चारी ठाव स्वयंपाक झाला होता. पाने मांडून उदरभरणाच्या यज्ञकर्माची जय्यत तयारी झाली! तूपमिश्रीत वरण-भाताची पहिली आहुती पोटात पडली आणि जठराग्नी तृप्त झाला!
– दीपाली पाटवदकर