मानवतेचा महापूर …

२००५ सालानंतर पुन्हा एकदा महापुरानं थैमान घातलं पण यावेळच्या पुरानं सांगलीला अक्षरशः नेस्तनाबूत केलं .सोमवारपासून पाणी वाढायला लागलं नि पहाता पहाता परिस्थिती गंभीर ते अतिगंभीर बनत गेली .
सुरुवातीला लोकांना, प्रशासनाला कुणालाच असं वाटलं नाही की २००५ सालापेक्षा परिस्थिती वाईट होईल.
म‍ाझ्या मते पहिली गफलत हीच झाली की २००५ साली केवळ अलमट्टी, कोयना व अन्य धरणांच्या विसर्गाबाबत समन्वय नसल्यामुळेच महापुराचं संकट आलं असं सर्वांचं ठाम मत होतं .
त्यानंतर १४ वर्षांत कधीच अशी परिस्थिती न आल्यामुळे या मताला पुष्टी मिळाली .

यावर्षी परिस्थिती भिन्न होती कारण पावसाचं प्रचंड प्रमाण .एकाचवेळी धरणक्षेत्रात व विसर्गक्षेत्रात सतत सलग व प्रचंड पाऊस होता .धरणांना विसर्ग करणं भागच असतं .प्रशासनाला गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यांनी इशारे देणं सुरु केलं .परंतु लोकांनाच पाच सालच्या अनुभवाचा इतका जबरदस्त आत्मविश्वास होता की आता इतकं येणं शक्यच नाही असं म्हणत लोक गाफील राहिले. हट्टानं घरात राहिले .आमचाही याला अपवाद नाही .आम्ही हरिपूर गावात रहातो .या गावाच्या इतिहासात म्हणजे किमान सव्वाशे वर्षांच्या ज्ञात इतिहासात हरिपूर गावात पाणी आलेलं नाही .२००५ साली देखील हरिपूर गावाच्या दोन्ही वेशीच्या खूप लांब पाणी थांबलं होतं .

पण गेल्या पंधरा वर्षांत हरिपूरचा हिरवागार व दोन्हीबाजूला शेतींनी वेढलेला रस्ता घरांच्या वसाहतींनी भरून गेला .महापुरानंतर जागा स्वस्तात मिळतील म्हणून खरेदी झाल्या .नंतर दोनपाच वर्षं पूर नाही हे पाहून भराभर बांधकामं झाली .
पुरावेळी ठराविक पातळीनंतर नदी तिच्या ठरलेल्या प्रवाहानुसार पसरू लागते .ते जुने सारे मार्ग, नाले यात इमारती उभ्या राहिल्यात .त्यामुळे अमुक फुटाला इथंवर पाणी- हे अंदाजही यावेळी कोसळले .पाणी आपली वाट काढून पसरू लागलं .
हरिपूरला कृष्णा वारणा संगम आहे .यावर्षी वारणेलाही महापूर होता .ती कृष्णेचं पाणी दाबत होती, इतका जोर तिला होता .पुढं पंचगंगा मिळते .तिलाही महापूर होता .अलमट्टी दोन लाखापासून पाचलाखापर्यंत पाणी सोडत राहिलं .कृष्णेत येणारं पाणी साठ हजार ते दीडलाख क्युसेक्स, असंच गणित दिसत होतं .एकाच वेळी एकमेकींना मिळणार्‍या सर्व नद्यांना महापूर ,सर्वत्र एकाचवेळी प्रचंड पाऊस, असं चित्र यावेळी होतं .ज्या लोकांना गांभीर्य समजलं वा त्यांची सहज सोय होती ते वेळेवर बाहेर पडले .जे राहिले ते त्यांच्या कारणांकरता, त्यांच्या जबाबदारीवर राहिले ,असं बहुतेक ‍अडकलेल्या लोकांबाबत समजलं .विशेषतः शहरातील वा हरिपूर परिसरातील लोक .हरिपूर ग्रामपंचायत यंत्रणा, स्वतः सरपंच व अन्य अनेक कार्यकर्ते, तरूण स्वयंस्फूर्तीनं फिरत होते .ट्रक ट्रॅक्टर घेऊन दारात जाऊन हातापाया पडत सांगत होते की निघा .त्यावेळी जे लोक हट्टानं घरात राहिले तेच नंतर ‘आम्हाला वाचवा ‘ असे अाक्रोशी मेसेज टाकत होते .नावानिशी येणार्‍या अनेक मेसेजबाबत हे खात्रीनं सांगता येईल .त्यांनीही जाणीवपूर्वक केलं नसेलच .सर्वांचेच अंदाज चुकलेत पण असे मेसेज इतके फिरले की प्रशासन काहीच करत नाहीये असा अपप्रचार सुरु झाला .केलेली कामं मात्र समोर येत नव्हती .अतिशय त्रास होत होता ते मेसेज पाहून .काहीही करता येणं शक्य नव्हतं .बोटी पाठवणं इतकं सोपं नसतं .लहान गल्ल्या , बोटींना लागणार्‍या कंपाउंडच्या तारा, मुख्य म्हणजे पाण्याला असलेली प्रचंड अोढ आम्ही पहात होतो .घराच्या छतावर जरी असाल अाणि थोडं खाणं पिणं असेल तरी तिथंच जास्त सेफ आहात असं अाम्ही सांगत होतो .सगळ्यांबाबत असंच होतं का? तर नाही .पण प्रयत्न तरी कुठं कमी होते ? अंतरं फार नसली तरी एरवी रस्त्यावरून एकेकाला पिकअप करत जाण्याइतकं सोपं नसतं पुरातून रेस्क्यू करणं.त्यासाठी प्रशिक्षित वा जिगरबाज लोक लागतात .हे दोन्ही लोक लगेच कामाला लागले होते .

सोमवारी गावात जाताना हरिपूर सांगली रस्त्यावरच्या छोट्या पुलाच्या दोहो बाजूला पाणी आलं होतं .आम्ही अंदाज केला की कदाचित रात्रीपर्यंत रस्ता बंद होईल .सारं सामान भाजी घेतली .वाटेतल्या घरी आईबाबा, दीरजाऊ असतात .त्या घरात पाच साली तीन फूट पाणी तीन दिवस होतं .त्या लेवलनं घर आवरून दीरजाऊही बाहेर पडले .आईबाबांना आम्ही हरिपुरात आणलं सुरक्षित म्हणून .मी स्वतःही अगदी खात्रीनं लोकांना सांगत होते की आयर्विन पुलाचा रस्ता साठ फुटावर आहे नि हरिपूर अडुसष्टच्या पातळीवर .येईलच कसं पाणी ? 
पण पाणी नदीकाठावरून वेशीतून येणार्‍या रस्त्यावरून चढत थोडंच येतं ? नदीकडच्या वेशीच्या बाहेर दोनशे मीटरवर पुराचं पाणी असतानाच अाजूबाजूच्या शेतं व प्लॉटमधे घुसलेलं पाणी सांगलीकडच्या वेशीतून आत आलं नि नदीकडच्या बाजूलाही बाजूच्या भागातून पाणी आत आलं .
हरिपूरकरांच्या फुशारकीला धक्का बसला .त्या दिवशी खरंच तोंडचं पाणी पळालं .आपण आईबाबांना आणलं आहे त्यांना सुरक्षित ठेवता आलंच पाहिजे याचं दडपण आलं .पाणी हळूहळू दारात आलं .गाव पाच गल्ल्यांमधून आक्रसत दोन गल्ल्यांत एकवटलं .पण गाव नुसतं एकवटलं नाही एकजुटीनं उभं राहिलं .जागा असेल त्यांनी माणसं -वहानं- जनावरं यांना सामावून घेतलं .माणसं एकमेकांना सांभाळत- जगवत राहिली .काय कमी आहे ते पुरवत राहिली .

अगदी गावात पाणी शिरल्यावरच लाईट बंद झाले .त्यामुळं एक चांगलं झालं की विनाकारण वाहिन्यांवरचा उद्रेक बघावा लागला नाही .अचानक नेटवर्क बंद किंवा क्षीण झाली .चारचाकी गाड्यांमधे चार्जिंग करणं व रेंज अाल्यास संपर्क करून निरोप देणं घेणं सुरु झालं . एकेक मेसेज बातम्या समजत होत्या .अडकलेल्या लोकांची स्थिती खरोखरच गंभीर होती .पण सुटका करण्यातले अडथळे प्रत्यक्ष पाण्यात रहाणारे समजू शकतात . चारी दिशांनी प्रयत्न सुरु आहेत हे समजत होतं .ट्रकच्याही डोक्यावरून जाईल इतक्या पाण्यामुळं गावातून काही हालचाल करणं शक्यच नव्हतं .
अचानक बेळगावच्या काकांचा फोन आला .ते त्यांचा हायलेवल संपर्क वापरून आमच्यासाठी हेलिकॉप्टरची सोय करायच्या खटपटीत होते .म्हटलं अहो, आम्ही अगदी सेफ आहोत .घरात आहोत .घरात पाणीही नाही .मग कशाकरता कॉप्टर सुटका ? तर त्यांनी बातम्यात पाहिलं की पुन्हा कोयना सर्व दरवाजे पूर्ण उचलणार आहे .म्हणजे अजून सताठ फूट पाणी वाढेल .तुम्ही आता काही करून बाहेर पडा .असं काहीही नाही याची आम्हाला खात्री होती कारण आम्ही बातम्या पहातच नव्हतो .आम्हाला जिल्हा प्रशासनाचे अधिकृत आकडेवारीचे मेसेज दर चारसहा तासंनी येत होते .मग मीडिया या आकडेवारीचं प्रसारण का करत नव्हता ? सनसनाटी पसरवणं, आम्हीच प्रथम दाखवतोय म्हणून लोकांचा आक्रोश टिपणं आणि विनाकारण घबराट पसरवणं हे पाप मीडियाकडून झालंच नाहीये का ? इलेक्ट्रॉनिक मीडियाचं इतकं चांगलं साधन, सोशल मीडियाचा वेग हाताशी असताना केवळ अधिकृत बातम्या देणं हे पथ्य का पाळलं जाऊ नये ? कुणीतरी सुटकेचे मेसेज टाकतं ते पोचून ते सुटले पाहिजेत ही कळकळ योग्यच आहे .पण खरंच जेव्हा ते सुटतात त्यानंतरही ते मेसेज फिरतच रहातात .
अनेकजण अजूनही अडकून आहेत हे माहिती आहे .पण एकाचवेळी हजारो फोन -संदेश -मागण्या अाल्यावर मदतीची प्राथमिकता कशी व कोण ठरवणार ? यंत्रणेच्या शक्यतेनुसार उपलब्धता, अडचणी, गांभीर्य हे पाहूनच ठरणार .ती सर्वांना मान्य होते का?तर होत नाही .मग हजारो जणांना सोडवलं हे पुसट होतं व शेकडो जण अडकलेत हेच दिसत रहातं .या बातम्याचं प्रेशर निर्माण करणं व ते लोक सुटेपर्यंत पाठपुरावा करणं हेही समजू शकतं .पण विकली जातील अशी दृश्यं जास्त दळत बसणं व सकारात्मक गोष्टी उल्लेख करुन सोडून देणं यातून जनतेचं व मदत करणार्‍यांचं मनोधैर्य खचत नाही का ? सरकार जनतेच्या व मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला व परिस्थितीला जबाबदार आहेच .पण आमच्या जबाबदारीचं काय ? बोट आली की झुंबड लावून मारामार्‍या करणारे ,आपल्या हट्टानं घरात राहून मग आपल्याकरता खास मदत येते का याचा प्रयत्न करणारे, येणार्‍या निवडणुका बघून आपल्याला सोयीच्या जागी जाऊन मदतवाटप करणारे ,मदत आली की गरज नसतानाही ती अोरबाडणारे ,अफवा पसरवणारे ,चुकीच्या बातम्या देणारे, असंव‍ेदनशील प्रश्न विचारणारे, यांचं काय करायचं ? यांना कधी कुणी समोर बसवून प्रश्न विचारणार नाहीये .
‘मदतीच्या किटवर नाव का घातलं’ म्हणून अोरडणारे तेच असतात जे गाजावाजा न करता मदत करणार्‍यांनाच ‘त्यावेळी तुम्ही कुठे होतात ?’ असं विचारतात .सरकारची निष्क्रीयता ,नियोजनातला अभाव,
दिरंगाई याबाबत माध्यमांनी बोलायलाच हवं .पण पूर येताच कुणीही न सांगता मागील अनुभव लक्षात घेऊन तातडीनं स्वयंसेवी संस्थांची मदतकार्यं सुरु झाली .त्याला बातम्यात मिळणारं स्थान किती ? मंत्री फोटो का काढतात म्हणणारे वार्ताहर बातम्या देताना तिथल्या लहानात लहान, दुर्बळात दुर्बळ ,केविलवाण्या मुला माणसांनाच का दाखवत रहातात ? सरकारला शहाणपण सांगणारे लोक नेमके उपाय सुचवतात का ? स्वतः एखाद्या नियोजनबद्ध मदत यंत्रणेचं उदाहरण घालून देतात का ? पत्रकारांचं कामच आहे की जे झालेलं नाही ,जिथं कुणी पोचलेलं नाही ते लक्षात आणून देणं .पण चुकून आज बातम्या पाहिल्यावर वाटलं की हे सरकारला जागं करत आहेत की लोकांना भडकवत आहेत ? प्रशासन काय करत होतं असं विचारण्याचा हक्क पत्रकारांना नक्कीच आहे .मग शोधपत्रकारिता करणार्‍यांनी तरी जनतेला हे पटवलं होतं का ,की तुम्ही सुरक्षित स्थानी हलणं कसं गरजेचं आहे ? अशा आपत्तीनंतर याचा अभ्यास करून काहीतरी निष्कर्ष काढण्याचे कष्ट कोण घेतं ? मदत करणार्‍यांची इच्छाशक्ती बळकट करणं, त्यांना योग्य साधनं ,प्रशिक्षण देणं हे कोणी का करत नाही ?

आपत्तीच अशी आहे की कितीही प्रयत्न केले तरी अपुरे पडणारच आहेत .
अशावेळी काय अधोरेखित करायचं ? प्रयत्न की अपयश ? मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून पहायचं नाही तर काय नावेतून गल्लोगल्ली फिरायचं ? गेल्या पुराच्यानंतर जे मदतवाटप झालं त्यातून कुणीकुणी आपला फायदा केला हे सामान्य जनतेला विचारा !
मदतीचं नीट नियोजन ,योग्य व न्याय्य मदत जलद व सुलभ पद्धत यासाठी सरकारच्या मागं लागायलाच हवं पण ते करताना हेतू शुद्ध हवा .सरकारला तोंडघशी पाडण्याकरता हे बोलणं वेगळं नि खरंच मदत पोचावी ही कळकळ वेगळी .अशा वेळी प्रशासन माध्यमे, स्वयंसेवी संस्था यांनी समन्वयानं काम करायची गरज आहे .पण त्यासाठी यंत्रणांनी जबाबदारीनं वागणं पुढाकार घेणं व बाकी घटकांनी त्यांना विश्वासानं व खुल्या दिलानं मदत करणं गरजेचं आहे .असं झालं तर आज जे मानवतेचे लहानलहान प्रवाह दिसत आहेत ते पहाता पहाता एकत्र येतील व मानवतेच्या महापुरात आपत्तीचं दुःख वाहून जाईल .गावं पुन्हा उभी रहातील .

आज हरिपूर गावानं जी एकजूट नियोजन आणि बंधुतेचं दर्शन घडवलं अाहे ते अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे .यात राजकारण न आणता, कुणाचीही सत्ता असली तरी गावागावात काही मूलभूत स्वयंपूर्ण यंत्रणा उभ्या करता येतील का ? लोकांनी जबाबदारीनं वागावं याकरता प्रबोधन करता येईल का ? निसर्गाचं चक्र बदलतं आहे ते लक्षात घेऊन जे बदल धोरणांमधे, निर्णयांमधे व अंतिमतः जीवनशैलीत करावे लागतील त्याला आमची तयारी आहे का ? जातपात पक्ष विचारसरणी हे काहीही मनात न येता केवळ अडचणीत असेल त्याला मदत हे एकमेव ध्येय मनात असणारे आमच्या गावासारखे गट तयार होतील का ? त्यांच्या या मानसिकतेला माध्यमं बळ देतील का ? आपण ज्या सुखसुविधा वापरतो त्याकरता आपण सारेच निसर्गाला वेठीला धरत आहोत . आम्ही गावात एकमेकांना धरून उभे राहिलो .पण शेतांत वस्त्यांत आपला अन्नदाता रहातो .त्याचं ,लहान उद्योग व्यवसाय करणार्‍यांचं सारं लुटलं गेलंय .त्याला तात्पुरते कपडे अन्न आपण देऊही .परत अशी वेळ येऊ नये हे म्हणणंही स्वप्नरंजन ठरेल .याला तोंड देण्याकरता अधिकाधिक प्रशिक्षित मनुष्यबळ ,अभ्यास करून व योग्य दिशेने प्रयत्न ,सकारात्मक व सहकार्याचा दृष्टिकोण अशा अनेक बाबी समाज म्हणून आपल्यालाही उत्पन्न कराव्या लागतील .अन्यथा वाहिन्यांचे अरण्यरूदन जोर पकडेल , सरकारवर खापर फुटेल , सरकारं बदलत रहातील, आपत्ती येतच रहातील, आपण शिकणार काहीच नाही ..
तसं व्हायला नको असेल तर यंत्रणेला नावं ठेवण्यापेक्षा तिला कामाला लावूया .घबराट न पसरवता नेमकं सांगूया .शांत राहून काम करू व करायला देऊया .
आपापला वाटा उचलूया .परिस्थिती माणसांना जोडते याचा प्रत्यय देऊ व घेऊया .
आपत्तीच्या महारथा या सारे मिळुनी अोढूया ..

हरिपुरात सर्व्हे सुरु आहे .नेमक्या गरजा शोधून यादी करुन मदतकार्य सुरु होईल .आपल्या मदतीचा हात असेलच !

विनीता तेलंग ,हरिपुरातील पुरातून .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s