मागच्या वर्षीची गोष्ट आहे. गोकुळाष्टमीच्या आदल्या आठवड्यात एका सकाळी मी गणपती कारखान्याच्या अंगणात काहीतरी करत बसलो होतो. “बाबू, थोडी माती मिळेल का?”मी एकदम वर बघितलं. शेजारच्या बिल्डिंगमध्ये जिने झाडायला आणि कचरा उचलायला येणाऱ्या मावशी अंगणाबाहेर उभ्या होत्या. त्यांना गणपतीची शाडू माती हवी होती. “कशाला हवीय, मावशी? किती हवीय?” मी सहजच विचारलं. म्हंटलं “त्यापेक्षा लहान गणपती हवा असेल तर तो घ्या. छोटे गणपती कधीतरी स्पेअर असतात कारखान्यात.””नको, गणपती नको, मातीच दे!”मी एका मुलाला माती आणून द्यायला सांगितली. मातीवर पुडीतून आणलेलं हळद कुंकू वाहिलं, एका पिशवीत मळलेली माती मावशींनी भरली आणि किती पैसे झाले विचारलं. “राहुदेत, काही नका देऊ!” इतक्या कमी मातीचे काय पैसे घ्यायचे आणि तेही ओळखीतल्या झाडूवाल्या काकूंकडून काय घ्यायचे म्हणून तात्काळ नको म्हणून टाकलं. “पण काय करणार तुम्ही ह्या मातीचं?” मी विचारलं.”गोकुळाष्टमीच्या आदल्या पंचमीला आमच्याकडे आमच्या देवाची पूजा करतात. माझी सासू करायची. आता मी करते.” त्यांचा एक गावाकडचा देव असतो म्हणाल्या. त्यांनी सांगितलेलं नाव मी संध्याकाळपर्यंत विसरूनही गेलो.
दुसऱ्या दिवशी मावशी एक नारळ आणि एका कागदात पेढे घेऊन आल्या. “झाली काल पूजा, संध्याकाळी विसर्जन केलं, त्याचाच हा प्रसाद” मावशीनी कारखान्यातल्या एका गणपतीच्या पायाशी पेढे आणि नारळ ठेवला. मी हात जोडले आणि प्रसाद कारखान्यात वाटून टाकायला सांगितला. काय मागितलं देवाकडे? हा भोचक प्रश्न क्षणभर डोक्यात आला होता. पण ठरवून टाळला.
मावशी निघून गेल्या आणि पण विषय काही डोक्यातून गेला नाही. केरकचरा काढणारं त्यांचं अतिसाधं कुटुंब आहे. गेली काही वर्षं मी त्यांना आणि त्यांच्या नवऱ्याला रोज बघतोय. इतक्या वर्षात त्यांच्या परिस्थीतीत काही विशेष फरक पडलेला दिसला नाहीये. पण त्या जे काही काम करत होत्या त्याने त्यांच्या कुळाचारावर फरक पडला नव्हता. तिथीवार सांभाळून त्यांनी ते पूर्णही केलं होतं. काय मिळत असेल त्यांना? भौतिक प्रगती? ती कधी दिसली नाही. अध्यात्मिक उन्नती? बोलण्यातून तेही जाणवलं नाही. सुखाचे दिवस? की समाधान? वरकरणी हेही कधीच दिसलं नाही. तरीही मावशी करत होत्याच. आणि अगदी मनोभावे करत होत्या. त्याच कशाला जगात असे शेकडो हजारो लोक आहेत जे मनोभावे श्रद्धेने मानलेल्या देवाचं काही ना काही करत असतात. आणि आपापली कामं न सोडता. अनेकदा निरपेक्षपणे. त्यांच्या सत्कृत्याने, देवाच्या कृपेने एखादा आशेचा किरण अश्या प्रत्येकाच्या हृदयात कधी ना कधितरी डोकावत असेलच. केलेल्या कष्टाचं चीज होत असेलच. देव म्हणा, कर्म म्हणा, प्रयत्न म्हणा, अज्ञात शक्ती म्हणा, काहीही म्हणा. फळ प्रत्येकाला मिळत असेलच. वाईट भोगावं लागत असेल तसं सुखही उपभोगायला मिळत असेलच. श्रद्धा आणि सबुरीची परीक्षा देव घेत असेल. मात्र कष्टांच्या आणि श्रद्धेच्या जोरावर लोक उत्तीर्णही होत असतील. सोमवारपासून आपापल्या घरी विराजमान होणारा गणपतीबाप्पा अशीच अशीच श्रद्धा आणि सबुरी प्रत्येकाला देवो, ही त्याच्या चरणी मनोभावे प्रार्थना!
– सारंग लेले, आगाशी