तिबेटच्या पठाराच्या पलीकडे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. हिमालयाच्या या उंच पठरामुळे तिबेटच्या उत्तरेला ताकलामकान आणि ईशान्येला गोबीचे वाळवंट पसरले आहे. गोबी आणि गोबीच्या पलीकडचा गवताळ प्रदेश म्हणजे मोंगोलिया. कडाक्याची थंडी, उष्ण उन्हाळे, थंडीत बर्फवर्षाव आणि उन्हाळ्यात थोडाफार पाऊस अशा हवामानाचा हा देश कृषीसाठी फारसा अनुकूल नाही. प्राचीन काळापासून येथील लोक घोडे निर्यात करून चीन कडून कापड व कृषी उत्पादने आयात करत. इथले जीवन सुकर नव्हते. जगण्यासाठी सतत संघर्ष करायला लावणाऱ्या या प्रदेशाने चिवट व क्रूर योद्ध्यांना जन्म दिला.
या मोंगोल लोकांच्या सततच्या आक्रमणांना रोखण्यासाठी चीनी सम्राटांनी चीनची ती प्रसिद्ध भिंत उभारली. या भिंतीने बरीच आक्रमणे थोपवली खरी. पण मंगोलियाच्या चेंगीझ खानने ही भिंत ओलांडून चीनवर आक्रमण केलेच. चेंगीझ खानने चीन पासून युरोप पर्यंतचा भूभाग काबीज करून जगातील सर्वात मोठे साम्राज्य स्थापन केले. मृत्युनंतर त्याचे राज्य त्याच्या चार मुलांनी वाटून घेतले.
चेंगीझ खानचा नातू कुब्लाई खान. याने १३ व्या शतकात राज्य विस्तार करत चीन, कोरिया आणि तिबेट काबीज केले. चीन मध्ये त्याने युआन (Yuan) हे राजघराणे स्थापन केले. कुब्लाई खानच्या तिबेट वरील हल्ल्याने मात्र एक वेगळेच वळण घेतले. त्याने तिबेट जिंकला खरा, पण येथील बौद्ध गुरु – ड्रोगोन चोग्याल फाग्पा यांच्या शिकवणुकीने त्याचे मन जिंकले. कुब्लाई खानने यांना आपले राजगुरू म्हणून नेमले आणि तिबेटचा राज्यकारभार बौद्ध संघावर सोपवून दिला. याच्या मृत्युनंतर चीन मोंगोलांपासून स्वतंत्र झाला, पण तिबेट मात्र बौद्ध संघाच्या छत्राखाली खाली राहिले.
या काळात, उझबेकिस्तान मधील मोंगोलांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. १४ व्या शतकात उझबेकिस्तान मध्ये तैमूरलंगचा जन्म झाला. तैमुर हा चेंगीझ खानच्या कुठल्याशा पूर्वजाचा वंशज. त्याने चेंगीझ खानचे धडे गिरवत एक एक गाव जिंकण्यास सुरुवात केली. आणि चेंगीझ प्रमाणेच, गाव जिंकले, की गावाच्या रक्षणार्थ जे उभे राहिले होते त्यांना ठार मारण्याची परंपरा कायम ठेवली. त्याने पर्शिया, इराक, सिरीया, तुर्की, जॉर्जियावर येथील शहरांवर हल्ले केले. १३९८ मध्ये त्याने दिल्लीवर हल्ला चढवला. त्यावेळी दिल्लीवर तुघलकांचे राज्य होते. तैमुरने हिरत व दिल्ली मध्ये मारलेल्या लोकांच्या कवट्यांच्या मोठमोठाल्या ढिगांचे तत्कालीन वर्णन मिळते. याने मुस्लीम, ख्रिश्चन, हिंदू, पर्शियन, असायरीयन अशा सर्व धर्माच्या लोकांना मारले. त्याने त्याच्या कार्यकाळात जगाची लोकसंख्या ५% ने कमी केली होती असा अंदाज व्यक्त केला जातो.
या क्रूरकर्मा तैमुरच्या नातवाचा नातू म्हणजे बाबर. हा उझबेकिस्तानच्या लहानशा भागात राज्य करत होता. त्याने पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहीम लोधीला हरवले व मुघल घराण्याची स्थापना केली. अयोध्यायेचे रामजन्मभूमीचे मंदिर पाडायचे काम मीर बाकी या बाबरच्या सेनापतीने केले. याच्या मुलाला, हुमायूनला शेरशहा सुरीने हरवल्यावर त्याने पर्शिया मध्ये आश्रय मिळवला. १५ वर्षांनी त्याने आग्र्याचे तख्त जिंकले. त्याचा मुलगा अकबरने पानिपतच्या दुसऱ्या लढाईत हेमचंद्रला हरवल्यावर मुघल राज्य भारतात स्थिरावले.
पर्शिया मध्ये अनेक वर्ष राहिलेल्या मुघलांवर पर्शियन संस्कार झाले होते. त्यामुळे मुघल राज्यात भारतात मोंगोलियाची संस्कृती न येता पर्शियाची संस्कृती आली. अकबर पासून मुघालांवर भारतीय तत्त्वज्ञानाचे संस्कार होऊ लागले. अकबराने हिंदू, जैन, इस्लाम आदी धर्मांच्या शिकवणुकीतून दिन-ए-इलाही नावाच्या नवीन धर्माची स्थापना केली. यावरून त्याने प्रयाग क्षेत्राचे नाव बदलून ‘इलाहबाद’ असे ठेवले. त्याच्या नंतर जहांगीर व पुढे त्याचा मुलगा शहाजहान यांनी राज्य केले. शहजाहानचा मोठा मुलगा दारासुखो हा तर पूर्ण भारतीय झाला होता. याने हिंदू धर्माचा, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून ५२ उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला. खरे तर हा थोरला मुलगा असल्याने मुघल सम्राट व्हायचा, पण धाकट्या औरंगझेबने सर्व भावांची हत्या करून, वडिलांना तुरुंगात टाकून, सिंहासन हडपले. औरंगझेबने अनेक वर्ष राज्य केले, पण त्याच्या मृत्यनंतर मुघल साम्राज्य पार कोसळले. नामशेष झाले.
मुघलांच्या देशातील मूळ मुघल वंशज काय करतायत ते पाहू. कुब्लाई खानने बौद्ध धर्म स्वीकारला होता तिथपर्यंत पहिले. तिबेटच्या बौद्ध भिक्षूला त्याने आपला राजगुरूही केले होते. होता होत, तिबेट मधून मोंगोलिया मध्ये बौद्धधर्माचा प्रसार झाला आणि मोंगोलिया मध्ये बौद्ध धर्म स्थिरावला.
तिबेट मध्ये या पूर्वी भारतातून शेकडो बौद्ध ग्रंथ पोचले होते. ते सर्व संस्कृत भाषेतील होते. तसेच काही संस्कृत ग्रंथांची चीनी भाषांतरे तिबेट मध्ये उपलब्ध होती. या सर्व संस्कृत व चीनी ग्रंथांची तिबेटी भाषांतरे केली गेली होती. या ग्रंथाच्या संचांना कांजूर व तांजूर असे म्हणतात. कांजूरच्या १०८ ग्रंथांमध्ये बुद्धाची वचने आहेत, तर तांजूरच्या २२६ शास्त्रीय ग्रंथात तत्त्वज्ञान, व्याकरण, वैद्यकी, गणित, संस्कृत शब्दकोश असे अनेक विषय हाताळले आहेत.
१८ व्या शतकात या ग्रंथाच्या संचाचा मोंगोलियन भाषेत अनुवाद केला गेला. हा अनुवाद बौद्ध भिक्षु, शास्त्रज्ञ, शिक्षक, गणितज्ञ अशांनी केला. २५ वर्ष हे अनुवादाचे काम चालू होते. या कामामुळे मोंगोलियाची भाषा आणि लिपी दोन्ही मध्ये सुधारणा झाल्या. तेथील शास्त्रीय शिक्षणावर तांजूरचा प्रभाव पडला. तांजूरचा प्रत्येक ग्रंथ चीनी जाड कागदावर, उभ्या ओळींमध्ये, सुंदर लाल अक्षरात लिहिला आहे. पानापानावर सुरेख चित्रे काढली असून चंदनाच्या लाकडी पट्ट्यांमध्ये बांधला आहे. २०११ मध्ये मोंगोल तांजूरला UNESCO ने ‘जागतिक दस्तऐवज’ (UNESCO’s World Documentary Heritage) म्हणून मान्यता दिली.
आज मुघलांच्या घराघरात बुद्धाचे मंदिर दिसते. बुद्धाची वचने गायली जातात. भारतातील शास्त्र, गणित शाळेत शिकवले जाते. आज मोंगोलिया हा बौद्ध बहुल देश असून मुघलांचे खरे वंशज आपल्या बौद्ध वारशाचा सार्थ अभिमान बाळगून आहेत.
पण भारतातील जे लोक स्वत:ला ‘मुघलांचे वंशज’ समजतात ते भारतीय गोष्टींना कडाडून विरोध करण्यात धन्यता मानतात. स्वत:च्या हिंदू प्रजेवर जिझिया लादणाऱ्या, स्वत:च्या राज्यातील हिंदू – जैन मंदिरे उध्वस्त करणाऱ्या औरंगाझेबचे नाव दिल्ली मधील एका महत्वाच्या रस्त्याला होते. २०१५ मध्ये, या रस्त्याला भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे नाव दिले. तसेच २०१८ मध्ये इलाहाबादचे नाव पुन्हा होते तसे प्रयागराज केले. बाबरने पाडलेल्या रामजन्मभूमी मंदिर व औरंगझेबाने पाडलेल्या काशी – मथुरेच्या मंदिरांसाठी शेकडो वर्ष संघर्ष चालू आहे.
मुघलांचे स्वयं घोषित, बनावट वंशज, स्वत:ला दारा सुखोचे वंशज न मानता, औरंगझेब, बाबर व तैमुरचे वंशज समजतात हे त्या थोर मुघालाचे दुर्भाग्य आहे. राममंदिराला विरोध करणे हा फक्त भारताच्या नाही तर मोंगोलिया आणि पर्शियाच्या संस्कृतींचा सुद्धा पराभव आहे. स्वत:ला मुघलांचे वंशज समजणार्यांचे हे दुर्दैव आहे, की पूर्वजांच्या दुष्कृत्याचे ते समर्थन करत आहेत. स्वत:ला मुघलांचे वंशज मानणार्यांची ही शोकांतिका आहे की त्यांना त्यांच्या so called पूर्वजांचे चांगले गुण कळलेच नाहीत.

संदर्भ –
- The Mongols: From Genghis Khan to Tamerlane By W. B. Bartlett
- Archives of the Memory of the World Program