ग्रेट पॅसिफिक गारबेज पॅच

‘ग्रेट पॅसिफिक गारबेज पॅच’ हे नाव फार कमी लोकांनी ऐकलं असेल. साहजिकच नावात आहे त्याच्यावरून हा कचऱ्याचा महाकाय पट्टा पॅसिफिक समुद्रात आहे. संपूर्णपणे प्लास्टिकच्या कचऱ्याचा बनलेल्या ह्या पट्ट्याचं क्षेत्रफळ तब्बल १६ लाख स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे. बाटल्या, डबे, पिशव्या आणि माणसाला नको झालेल्या अनेकानेक विविध अश्या १.८ ट्रीलीयन प्लास्टिकच्या वस्तु पॅसिफिक समुद्रात ह्या पट्ट्यात पोहोताहेत. आपल्या मिल्की वे ह्या आकाशगंगेत असलेल्या ताऱ्यांच्या दसपट हा आकडा आहे आणि ह्या सर्वांचं एकूण वजन ८०,००० टन इतकं आहे. प्लास्टिक पाण्यापेक्षा हलकं असल्यामुळे ह्या वस्तू धड बुडत नाहीयेत आणि प्लास्टिकचं विघटन होत नसल्यामुळे त्या पाण्यात विरघळतदेखील नाहीयेत. ह्या सर्व मालात अर्ध्याच्या आसपास मासेमारीसाठी वापरलं जाणारं प्लास्टिकचं जाळं आहे. कचऱ्यामधल्या ह्या जाळीचं सरासरी आयुष्य ६०० वर्षं आहे आणि त्यातल्या प्रत्येक प्लास्टिक बाटलीचं आयुष्य ४५० वर्षं आहे. साधारणपणे मनुष्य जमात ही वर्षभरात ३०० अब्ज किलो प्लास्टिक एका वर्षात तयार करते आणि त्यातलं अर्ध फक्त एकदाच वापरते. उरलेलं बरचसं प्लास्टिक ह्या त्या वाटांनी समुद्रात जाऊन जमा होतंय. कालांतराने ह्या प्लास्टिकचे सूक्ष्म तुकडे होऊन जातात. तुकडे झालेलं हे मायक्रोप्लास्टिक समुद्रातल्या माश्यांच्या, कासवांच्या आणि समुद्राच्या आसपास वास्तव्य करणाऱ्या पक्षांच्या पोटात जातं. तेच मासे मनुष्य खातो आणि मग आपल्याही पोटात जातं. 

अजून काही इंटरेस्टिंग आकडेवारी देतो. सकाळी उठून सर्वप्रथम आपण सर्वजण दात घसतो. दात घासायची पेस्ट ही मनुष्यासाठी घातक नसली तरी त्यात केमिकल्स असतातच. अभ्यासकांच्या आकड्यानुसार २०१७ मध्ये फक्त भारतीयांनी २ लाख १७ हजार मेट्रिक टन म्हणजेच २१ कोटी किलो टूथपेस्ट वापरली. अर्थातच ह्यातलं बहुतेक केमिकल किंवा रसायन हे पाण्याच्या एखाद्या स्रोतात जाऊन मिसळते. जी गोष्ट टूथपेस्टची तीच शाम्पूची. डोक्याला लावायचा शाम्पू हा केमिकल्सनी बनलेला असतो. २०१८ साली २ लाख १२ हजार मेट्रिक टन म्हणजे २१ कोटी किलो इतका शाम्पू केवळ भारतीयांनी वापरला.  जगभरातली आकडेवारी ह्यापेक्षा खूप मोठी आहे. ह्यातली सर्व केमिकल्स शेवटी पाण्याला आणि समुद्राला जाऊन मिळतात. आपण सर्वजण कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी डिटर्जंट वापरतो. ह्या डिटर्जंट पावडर नैसर्गिक नसतातच. डिटर्जंट ह्या नावाखाली भारतीयांनी २०१८ साली १५ कोटी किलो इतकं केमिकल पाण्यात सोडलं आहे. (हे सर्व आकडे statia.com ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.)भारत हा जास्तीत जास्त कोळसा वापरणारा जगभरातला दुसरा देश आहे. आपल्या देशात वापरल्या जाणारा ७५% टक्के कोळसा हा वीज निर्मितीसाठी वापरला जातो. हीच वीज आपण घरात वापरतो आणि जितकी जास्त वापरतो तितकाच थेट प्रदूषणाला हातभार लावत असतो. 

भारतात एक चारचाकी गाडी सरासरी १० हजार किलोमीटर चालते असं मानलं तर वर्षभरात एक गाडी १.३ टन्स इतका कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन करते. ऍव्हरेज कमी देणाऱ्या आणि हाय पॉवरवाल्या गाड्यांचं उत्सर्जन ह्याहून अधिक असतं.

आपल्या दैनंदिन आयुष्यात ज्याचा संबंध येईल असे हे आणि अनेक आकडे काढले जाऊ शकतात. ही सर्व आकडेवारी शोधण्यामागचं कारण म्हणजे सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवामुळे होणारं तथाकथित प्रदूषण ह्यावर सध्या सामाजिक माध्यमात फिरणारे व्हिडिओज, हे आहे. गणेश मूर्तींमुळे प्रदूषण होतं ही गेल्या काही वर्षातली रड आहेच, त्याबरोबर यंदा गणेश मूर्तींमुळे प्लास्टिक कचरा होतो, हे अजबच ऐकायला यायला लागलं आहे. हिंदू धर्म आणि त्यातल्या चालीरीती ह्या कायम प्रगतिशील राह्यल्या आहेत. काळानुसार हिंदूंनी अनेक प्रथांमध्ये बदलही केला आहे. मात्र दिवसेंदिवस होळी, गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी ह्या सणांना आणि पर्यायाने धर्माला खलनायक ठरवलं जाण्याची जी चाल आहे, ती केवळ अमान्य आहे.आपले सण हे वर्षांतले फक्त काही दिवसच असताना आणि प्रदूषणासाठी त्यांचा हातभार अत्यल्प असतानाही टिकेचं लक्ष ठरताहेत. पेन संपल्यावर पेन टाकून न देता नवीन रिफिल वापरणे, प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी, कागदी पिशव्या वापरणे, पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या दरवेळी नवीन न घेता घरची स्वतःची बाटली धुवून वापरणे, सार्वजनिक वाहनसेवेचा वापर करणे, गरज नसताना एसी न वापरणे, गरज नसताना लाईट पंखे बंद करणे, शक्य असेल तिकडे सायकल वापरणे, हे आणि असे अनेक उपाय रोजच्या रोज करण्याऐवजी काहीच दिवस असणाऱ्या सणांवर टीका करणे आणि त्यातून ‘पर्यावरण वाचवा’ वगैरे फंडे मारणे म्हणजे ‘पेनी वाईज पौंड फुलीश’ असला वेडेपणा आहे. हे म्हणजे एका दिवसाच्या डाएटने बारीक होणे किंवा एक दिवस व्यायाम करून तब्येत बनवण्यासारखं किंवा एकदा स्वयंपाक करून मास्टर शेफ होण्याची अपेक्षा करणे ह्यासारखं आहे. सणांचं स्वरूप बदलायला हवंच पण केवळ त्यामुळेच प्रदूषण होतंय, हे केवळ असत्य असू शकतं. गंमत प्रदूषण प्रदूषण ही बोंब केवळ सणांच्या वेळी ऐकायला येते. इतर वेळी वर्षभर ह्या व्यक्ती/ संस्था इतक्याच उत्कटतेने प्लास्टिक बंदी किंवा अजून कोणत्याही प्रदूषण प्रश्नावर कंठशोष करताना दिसत नाहीत. आणि ह्यामुळेच ह्या सर्वांच्या हेतुवर संशय घ्यायला जागा राहते. त्यामुळे म्हातारी मेल्याचं दुःख होत नाही पण काळ सोकावतो. ह्या सर्वात आपल्या लोकांचीही गंमत असते. जिथे आपल्या ‘कंफर्ट झोन’ला धक्का लागेल अश्या ठिकाणी आपल्याला पर्यावरणाची आठवण होत नाही. मात्र आपल्याच सणांना ठोकून काढायला आपणच धावत सुटतो. ह्यावर आपणच विचार करायला हवा. 

आपल्या सणांमुळे जागतिक प्रदूषणात अतिप्रचंड वाढ होतेय, हे बिंबवण्यात जे कोणी संबंधित असतील ते यशस्वी होताहेत आणि आपणच नको त्या जाळ्यात फसत चाललो आहोत.  सणांचं स्वरूप बदलत चाललं आहे. अनेक बदल स्वीकारावे असेच आहेत. मात्र पुढे हेच सण बंद व्हावेत, असा संदेश पसरवला जाईल,  त्या बुद्धिभेदाला आपण बळी पडण्याची घोडचूक करू नये.

– सारंग लेले, आगाशी.


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

%d bloggers like this: