परीकथेतील राजकुमार

(आई, आई, एक गोष्ट सांग न!
बर. पण एकच गोष्ट सांगेन, मग झोपायचं!)

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.

(आई, Twentieth century मधली गोष्ट का ग?
नाही, त्याही पेक्षा पूर्वीची. आता अगदी सालच सांगायचं झालं, तर इस पूर्व २००० ते इस पूर्व १८०० च्या मधल्या काळातली ही गोष्ट आहे. ऐक – )

काय झालं? एक उंचपुरा, घारागोरा, नाकेला, देखणा, राजबिंडा, तरुण असा राजकुमार होता. थंड गवताळ प्रदेशात तो राहत होता. एके दिवशी तो एका शुभ्र वगैरे घोड्याच्या रथात बसून वायुवेगाने दक्षिणेकडे निघाला. गवताळ प्रदेश मागे टाकत हिंदूकुशच्या डोंगराळ भागात पोचला. मग रस्ता काढत काढत, त्याने खैबर खिंड ओलांडली. आणि समोर पाहतो तर काय? इथल्या राज्यात अनेक सुंदर आटपाट नगरी होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी टुमदार घरे होती, रस्त्याने बैलगाड्यांची, पाठीवर समान लादलेल्या खेचरांची लगबग होती, जो तो आपापल्या कामात गुंतला होता. कोणी मडकी घडवत आहे, कोणी मणी करत आहे, कोणी दागिने करत आहे, कोणी शेती करत आहे, कोणी कापड विणत आहे, कोणी कापड रंगवत आहे, कोणी जहाज बांधत करत आहे, कोणी व्यापारी जहाजात माल भरत आहे … सगळं कसं छान होतं! पण …

(पण? पण काय झालं आई?)

अरे, हे सगळे लोक बसक्या नाकाचे आणि काळेकुट्ट होते.

(आई, very bad! आम्हाला टीचर न सांगितलंय की याला body shaming म्हणतात. असं नसतं बोलायचं.
शू SSS! त्या राजकुमाराला हे कोणी शिकवलं नव्हतं. ऐक पुढे – )

त्या mannerless राजकुमाराला असे वाटलं की ही सगळी – कुठलीतरी द्राविडी भाषा बोलणारी, शिव, मातृदेवता आणि निसर्गाची उपासना करणारी काळी लोकं अगदीच मागास होते.

(मागास? पण ते तर industrious होते!
त्या गोऱ्याला काय वाटलं ते सांगतेय मी. ऐक बरे!)

त्या मागास लोकांकडे ना रथ होते, ना घोडे!! काहीही करून ही परिस्तिथी सुधारणे राजकुमाराला भाग होते.

इतक्यात राजकुमाराची नजर इथल्या ‘संस्कृती’ वर पडली. आणि राजकुमार तिच्या प्रेमातच पडला! काळी-सावळी असली तरी ती हुशार, मनमिळावू, प्रेमळ, क्षमाशील, समंजस, सहिष्णू वगैरे होती. राजकुमाराने तिच्याशी विवाह केला. कोण आनंद झाला सगळ्यांना! रथ असलेला, घोडे असलेला जावई मिळाला! संस्कृतीने तर लग्नात घेतलेल्या उखाण्यात पण रथ आणला होता –

घोड्यावर घोडे, चार घोडे
घोड्यांनी ओढला रथ,
रथात रथ, स्पोक्ड रथ
हलका सुसाट रथ,
रथात चाबूक, चाबकाला गोंडा
गोंड्याच्या रंगाचा ध्वज,
ध्वजधारी ‘आर्य’राव आले रथातून
रथ पाहून मी बाई गेले भारावून!

(आई, म्हणजे, त्या संस्कृतीला राजकुमारच्या गोऱ्या रंगापेक्षा त्याचा रथ आणि घोडेच जास्त आवडले होते!
हं!)

तर त्या राजकुमाराचे नाव ‘आर्य’ होते! तर हा आर्य पडला PIE भाषिक. आणि आपल्या संस्कृतीची भाषा द्राविडी! पण यांच्या बाबतीत ‘कानडीने केला मराठी भ्रतार’ वगैरे गोंधळ अजिबात उडाला नाही! त्यांनी आपापसात ठरवलं तुझंही नाही आणि माझंही नाही. आपण नवीन भाषा तयार करून मुलांना शिकवायची!

(आई! हे सगळं त्यांनी कोणत्या भाषेत ठरवलं?
गप रे! ऐक पुढे – )

त्यांनी PIE भाषेतून संस्कृत नावाची नवीन भाषा तयार केली. आणि मुलांना PIE नाही, द्राविडी नाही, सरळ संस्कृतच शिकवायची ठरवली. तस्मात, द्राविडी आईच्या मुलांची ‘मातृ’भाषा ‘संस्कृत’ झाली बरं का!

(आई, आई! तू आम्हाला रागावतेस तेंव्हा – ‘गधड्या’, ‘कार्टे’, ‘गीळ मेल्या’ वगैरे म्हणतेस. तसे तिने काय म्हटले?
उगीच काहीतरी विचारू नकोस! तिने मुलांना धपाटे घालतांना चुकूनही द्राविडी भाषेतून त्यांना ‘रट्टे खाशील’ वगैरे म्हटले नाही! पोरांनी तिची भाषा उचलली असती तर? शांतम् पापम्!)

पुढे ऐक – दुसरं काय होतं? राजकुमार आर्य हा इंद्र, अग्नी आणि विष्णूची उपासना करायचा. तर संस्कृती ही शिव आणि शक्तीची. पण, अगदी समजूतदारपणे कसलीही भांडणे वगैरे न होता, यांची मुले दोन्हीकडच्या देवांची पूजा करायला लागली!

(आई, आई! म्हणजे हे आर्य पितृसत्ताक नव्हतेच तर!
या बाबतीत ते पितृसत्ताक नव्हते! OK? पुढे सांगू? )

तर एकूणच यांचा गोड असा गंगा-जमना संगम झाला. इकडे संस्कृती मुलांना वाढवत होती, त्या दरम्यान आर्यने संस्कृतीच्या माहेरच्यांना सुधारण्याचे काम हाती घेतले. पहिले तर त्याने काही काळ्या लोकांची हत्या केली. मग त्यांच्या आटपाट नगरी उध्वस्त करून टाकल्या. ते पाहून बरेचसे भूमिपुत्र भयाने दक्षिणेला पळून गेले. जे कोणी मागे राहिले त्यांना या आर्यने दास करून घेतले. हे सगळं केलं, तेंव्हा कुठे सिंधू खोऱ्यात शांतता प्रस्थापित झाली.

(म्हणजे स्मशान शांतता का ग?
हंम्म! तशीच.)   

हे महान कार्य उरकल्यावर, सगळी गावे ओस पडल्याने ‘राहायचं कुठे?’ हा प्रश्न आला. त्यात सगळे न्हावी दक्षिणेला पळून गेल्याने आर्यच्या दाढी जटा वाढल्या. मग त्याने हातात जपाची माळ घेतली आणि सरस्वती नदीच्या काठावर जाऊन अनुष्ठान केले. मग हातोहात वेद, उपनिषदे, वेदांगे, रामायण, महाभारत वगैरे रचून टाकले. फावल्या वेळात आश्रम व्यवस्था प्रस्थापित केली. दुसरीकडे वर्ण व्यवस्था पण लावून दिली. लगोलग मनुस्मृती पण खरडून काढली.

माहेरच्यांना हाकल्यामुळे संस्कृतीने आधी थोडी कुरबुर केली. पण मग ती सुद्धा सेटल झाली. हे सगळं करता करता १,००० वर्ष गेली कशी गेली ते कळलच नाही! इसपूर्वचे ५ वे शतक उगवले. आता दोघे मिळून छान पशुबळी देत, यज्ञ करत आनंदात दिवस घालवत होते. सगळे जण अशा प्रकारे सुखाने राहणार तोच …

(सांग ना, पुढे काय झाले?
ते आता उद्या सांगते हं! झोप आता!
पण आई, या परीकथेचे नाव काय आहे?
बाळा, ही परीकथा नाही. हा AIT चा सिद्धांत आहे.
कैतरीकाय?!
खोटे वाटत असेल तर इतिहासाच्या पुस्तकात वाच. आणि आता मुकाट्याने झोप बरे!
आई, ती PIE म्हणजे PIZZA ची बहिण असते का?
PIE म्हणजे Proto-Indo-European भाषा. काय झालं? भारतीय आणि युरोपियन भाषांमध्ये कशामुळे साम्य आहे, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी युरोपियन अभ्यासकांनी असे गृहीत धरले की एक प्राचीन PIE भाषा होती. ती सगळ्या उत्तर भारतीय व युरोपियन भाषांची जननी होती. विविध भाषेतील शब्दांच्या मूळ धातुंवरून जुन्या PIE भाषेची पुनर्रचना केली.
आई, ही PIE भाषा कोण बोलते?
जगभरात ही भाषा बोलणारी एकही जमात अस्तित्वात नाही. पूर्वी अस्तित्वात असल्याच्या खुणा नाहीत. या भाषेत लिहिलेले एकही अक्षर उपलब्ध नाही. या भाषेत रचलेले मौखिक साहित्य उपलब्ध नाही. PIE ही एक काल्पनिक भाषा आहे.
पण, मग तो आजच्या गोष्टीतला आर्य? तो PIE बोलायचा ना?
कुर्गन हायपोथेसिस प्रमाणे, ही काल्पनिक भाषा बोलणाऱ्या लोकांचे नाव ‘आर्य’ असे होते.
म्हणजे आर्य पण काल्पनिक होते?
झोप बरे! आता!
म्हणजे त्यांचे रथ आणि घोडे आणि त्याचं द्राविडी भाषा बोलणाऱ्या सिंधू संस्कृतीच्या लोकांना हाकलणे … सगळंच काल्पनिक का ग? सांग ना!
ते तुझं तू ठरव. गुड नाईट! )

2 Comments

  1. छान कथा आहे आई व मुलच्या संवादातुन बराच चर्चेचा भाग उत्तम रितिने मांडला. मुलगा हा जिज्ञासु अन् समजदार आहे.
    योगेश नं काटे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s