अजिंठाचे उपासक

आज अजिंठा लेण्यांचा अभ्यास करायचा झाल्यास डॉ. वॉल्टर स्पिंक यांच्या संशोधनाचा आधार घेतल्याशिवाय सुरुवात आणि शेवट सुद्धा होऊ शकत नाही. मुळचे अमेरिकेन असलेले डॉ स्पिंक यांनी तब्बल ६० वर्ष अजिंठा लेण्यांचा अभ्यास केला आहे. त्यांच्या अभ्यासाने अजिंठा, अजिंठा कोरवून घेणारा राजा हरीषेण आणि त्याचे वाकाटक घराणे यांच्या विषयीची माहिती प्रकाशात आली. नुसतीच नवीन माहिती मिळाली असे नाही, तर भारतीय इतिहासातील सुवर्ण युग समजला जाणाऱ्या गुप्त काळाचे नाव – “गुप्त-वाकाटक काळ” असायला हवे, हे त्यांच्या संशोधनाने सिद्ध केले!

नव्वदीच्या घरातील स्पिंक, गेली २० वर्ष अजिंठा येथे कार्यशाळा घेतात.  ही कार्यशाळा केवळ अजिंठाच्या अभ्यासकांसाठी असते. त्यांच्या अफाट कार्याविषयीची इथे अगदी थोडक्यात माहिती.

वॉल्टर यांचा जन्म १९२८ मध्ये बोस्टन येथे झाला. ३ भावंडात ते एक. लहान असतांना एका धरणामुळे स्पिंक कुटुंब विस्थापित झाले. त्यावेळी गाव सोडून ते शहरात येऊन राहिले. वॉल्टर आता शहरातील शाळेत शिकू लागला.

शालेय जीवनात वॉल्टरला प्राण्यांची फार आवड होती. काही काळ त्याने प्राणीसंग्रहालयात देखील काम केले. त्या आवडीपायी त्याने पुढे जीवशास्त्राचे शिक्षण घेण्याचे ठरवले. त्याकरिता महाविद्यालयात प्रवेश घेतला खरा  परंतु प्राण्यांचा अभ्यास म्हणजे त्यांचे शवविच्छेदन करणे हे काही रुचले नाही. त्या नंतर वॉल्टरने Art History च्या अभ्यासाकडे मोर्चा वळवला व त्यामध्ये पदवी घेतली.

त्यांचा सुरुवातीचा अभ्यास हा अर्थातच पाश्चिमात्य कलांचा होता. १९५० मध्ये त्यांनी PhD साठी भारतीय कला हा विषय घेतला. भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी त्याच वर्षी ते भारतात येऊन दाखल झाले. त्यांनी मंदिरांचा, शिल्पांचा अभ्यास करायचे ठरवले आणि त्यांच्या अभ्यासाची सुरुवात झाली उदयगिरी खंडगिरी येथील जैन लेण्यांपासून. 

या अभ्यासात त्यांच्या लक्षात आले की या लेण्यांची कालनिश्चिती बरोबर झाली नव्हती. त्या लेण्यांना ज्या कालखंडात बसवले होते त्याच्या आधीच त्याची निर्मिती झाली होती, हे त्यांनी ताडले. या विषयावरच त्यांनी आपले संशोधन केले.

विविध लेण्यांचा अभ्यास करत ते अजिंठाला पोचले. आणि त्या लेण्यांशी आपले मागच्या जन्मातील नाते आहे असे वाटू लागले. या लेण्यांचा त्यांनी अनेक अंगांनी अभ्यास केला. चित्रांचा आशय, चित्रांची शैली, शिलालेख, साहित्य, इतिहास अशा सर्वांचा अभ्यास केला. श्री. स्पिंक यांनी अजिंठातील चित्रांचा इतका अभ्यास केला आहे, की ते चित्रातील कुंचल्याचा फटकारा पाहून कोणत्या कलाकाराने कोणकोणती चित्रे काढली आहेत ते सांगू शकतील!

उदयगिरी खंडगिरी या लेण्यांची कालनिश्चिती केल्यावर त्यांना लेण्यांच्या काळाचा अभ्यास करायची आवडच जडली. त्यांनी जेंव्हा अजिंठाचा अभ्यास सुरु केला, तेंव्हा या लेण्या बद्दल मान्य असलेली माहिती होती जेम्स फर्ग्युसन व जेम्स बर्गेस यांच्या संशोधनातून आलेली. हे दोन्ही ‘gems’ ब्रिटन मधले. फर्ग्युसन यांनी काही वर्ष कोलकोता येथे इंडिगोचा व्यवसाय केला. नंतर मात्र ते सोडून देऊन ते लंडनला स्थाईक झाले. पुढील काळात त्यांनी भारताच्या अनेक वाऱ्या केल्या. त्यांनी भारतीय स्थापत्याबरोबरच मध्य आशियातील व पश्चिम आशियातील स्थापत्याचा अभ्यास केला. त्यांनी भारतीय मंदिर व लेण्यांच्या स्थापत्याचा सखोल अभ्यास केला. त्यांनी भारतीय लेण्या व स्थापत्य याविषयी अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या नंतर जेम्स बर्गेस यांनी त्या संशोधनात भर घातली. जेम्स बर्गेस हे ब्रिटीश नागरिक होते व ASI (Archaeological Survey of India) चे General Director. कामानिमित्त बर्गेस भारतात भरपूर फिरले होते. त्या मधून त्यांनी मिळवलेली माहिती व त्यांच्या निष्कर्षांची भर फर्ग्युसन यांच्या कामत घातली. या दोघांचे “Cave Temples of India” हे पुस्तक १८८० मध्ये प्रसिद्ध झाले. या पुस्तकातून त्यांनी प्राचीन भारतीय स्थापत्य, स्थापत्याची प्रगती, आणि स्थापत्य शैलीवरून लेण्यांचा काळ पद्धतशीरपणे ठरवला. भारतातील लेण्यांवर हे कदाचित पहिलेच काम असावे. या संशोधनातून लेण्यांची झालेली कालनिश्चिती आजही वापरली जाते इतकी ती तर्कशुद्ध रीतीने मांडली आहे.  

तर, या दोघांनी अजिंठा लेण्या दोन कालखंडात कोरल्या गेल्या होत्या हे सिद्ध केले होते. या बौद्ध लेण्यांचा पहिला टप्पा कोरला गेला होता सातवाहन राजांच्या काळात, इस पूर्व १ ले शतक ते इस १ ले शतक या दोनशे वर्षातला. या काळात कोरलेल्या लेण्या होत्या – ९, १०, १२, १३ व १५ अ. दुसऱ्या टप्प्यात कोरलेल्या उर्वरित लेण्या ५ व्या ते ७ व्या शतकातील दीडशे वर्षातल्या होत्या असा त्यांचा निष्कर्ष होता.

Ajanta cave 19, original sketch by James Fergusson. From “Illustrations of the Rock-Cut Temples of India” by James Fergusson, 1845

श्री स्पिंक यांनी अजिंठाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली तेंव्हा मान्य असलेली ही कालनिश्चिती होती. स्पिंक यांनी अभ्यास सुरु केल्यावर, त्यांना पाहिलं कोडं घातलं लेणी क्रमांक १ ने. या लेणीतील एका चित्राने त्यांचे लक्ष वेधून घेतले. ते चित्र होते – चालुक्य राजाच्या दरबारात दाखल झालेल्या पर्शियन राजाच्या दूताचे. या निष्कर्षावरून या लेण्या चालुक्य राजाच्या नंतरच्या म्हणून ७ व्या शतकातल्या होत्या असे अनुमान होते. पण स्पिंक यांना प्रश्न पडला की दक्षिणेतील राजाच्या दरबाराचे चित्र अजिंठा मध्ये का काढले असावे?

Ajantha Cave 1 – Persian Embassy Group. PC Wikimedia

हे कोडे उलगडले अजिंठाच्या आणखी एका गाढ्या अभ्यासकाने Dieter Schlingloff यांनी. त्यांनी ते चित्र जातक कथेतील आहे हे शोधले. पण त्या कथेकडे जायच्या आधी थोडेसे श्री. श्लींग्लोफ  यांच्याबद्दल. या जर्मन अभ्यासकाचा जन्म १९२८ चा. बौद्ध संस्कृत ग्रंथ आणि भारतीय कला हे त्यांचे अभ्यासाचे विषय. तर, अजिंठाची चित्रे आणि त्या चित्रांचा आशय हे त्यांच्या संशोधनाचे विषय. बौद्ध धर्म, योगाचार, बौद्ध स्तोत्र यावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. बौद्ध धर्माच्या अभ्यासावर आधारित अजिंठाच्या चित्रांच्या आशयाचा त्यांनी अर्थ लावला. बौद्ध साहित्याची जाण असल्याने त्यांना अजिंठातील चित्रांची भाषा कळायला लागली. त्यांनी चित्रांची सांगड बौद्ध कथांशी लावली. भिंतीचे टवके उडाल्याने, रंग गेल्याने, चित्र खराब झाली आहेत. अशा अर्धवट दिसणाऱ्या चित्रातून पूर्ण चित्र कल्पनेने उभे करावे लागते. श्लींग्लोफ  यांनी जातककथांवर आधारित असलेल्या अनेक चित्रांचा कथेशी धागा जोडला. काही चित्रात त्यांना अश्वघोषाच्या सौन्दारानंद  मधील दृश्य दिसली. लेणी १ मधील, कोड्यात टाकणारे चित्र महासुदर्शन राजाची जातक कथा होती हे त्यांनी सिद्ध केले. या कथेत गौतम बुद्ध पूर्व जन्मातील महासुदर्शन राजा होता.

श्लींग्लोफ यांनी हा अर्थ सांगितल्यावर या लेण्या ७ व्या शतकात कोरल्या असण्याची गरज राहिली नाही. मग श्री. स्पिंक यांनी अजिंठाच्या काळाचा अभ्यास मुळापासून करण्यास सुरुवात केली. इथे त्यांना उपयोग झाला अजिंठा पासून जवळ असलेल्या घटोत्कच लेण्यांचा. या लेण्या करवून घेतल्या होत्या – वराहदेवाने. वराहदेव हा राजा हरीषेणाचा मंत्री. त्याने लिहिलेल्या घटोत्कच लेण्यातील शिलालेखातुन, व अजिंठा मधील त्याने लिहिलेल्या शिलालेखातुन, स्पिंक यांना अजिंठाचे अंतरंग उलगडू लागले. त्यांनी अजिंठाची निर्मिती १५० वर्षात नाही, तर केवळ १४ ते १५ वर्षात झाली हे दाखवून दिले. आणि ही पूर्ण निर्मिती वाकाटक राजा हरीषेणाच्या काळातली झाल्याचे सिद्ध केले. काही लेण्या मंडलिक राजा उपेन्द्रगुप्त याने, तर काही अश्मक राजाने कोरावली होती. हरीषेणाच्या मृत्युनंतर मात्र अजिंठाचे काम थांबले.

वाकाटक घराण्याच्या ऱ्हासाची माहिती दंडीने दशकुमारचरित मध्ये लिहिली आहे. ती सुद्धा एका राजकुमाराची कथा म्हणून आली आहे. नावे बदलून लिहिलेली हि कथा वाकाटकांची, हरीषेणची आणि वराहदेवाची आहे हे स्पिंक यांनी सप्रमाण दाखवले. आणि मग या कथा साहित्याचा आधार घेत, इतर ऐतिहासिक माहिती गोळा करत, वाकाटकांचा इतिहास जोडला.  

श्री. स्पिंक यांच्या संशोधनातून – अजिंठाच्या निर्मितीचा काळ, त्यासाठी लागलेला वेळ, लेण्या खोदायाच्या व चित्र काढायच्या पद्धती या सर्वाबद्दल माहिती मिळाली. इतकेच नव्हे तर इतिहासाच्या वनात हरवून गेलेल्या वाकाटक घराण्याची माहिती सुद्धा मिळाली. वाकाटकांचे राज्य, वैभव, उतरता काळ आणि त्यांचा शेवट सुद्धा स्पिंक यांच्या अभ्यासातून कळला. भारत ज्याला विसरला होता, त्या एका मोठ्या राजघराण्याची ओळख स्पिंक यांनी आपल्याला करून दिली. हे घराणे इतके मोठे होते की भारताच्या एका वैभवशाली काळाला वाकाटकांचे नाव असणे आवश्यक आहे हे देखील श्री स्पिंक यांनी दाखवून दिले.

अजिंठा लेण्यांचा काळ ७ व्या शतकातून ५ व्या शतकात आल्यामुळे त्याचे पडसाद इतरत्रही उमटले. घारापुरी लेण्यांचा काळ आधी ८ व्या शतकातला मनाला जात होता. त्यांचा कालखंड २०० वर्ष मागे गेला. घारापुरी लेण्या व ते करवून घेणाऱ्या राजघराण्याबद्दल सुद्धा अधिक माहिती मिळण्यास श्री स्पिंक यांच्या कामचा उपयोग झाला.

६० वर्ष, एकाच ध्यासाने, अक्षरशः वेड लागल्या सारखे श्री स्पिंक यांनी अजिंठाचा अभ्यास केलाय. करत आहेत. त्यांना मिळालेले ज्ञान वाटत आहेत. आणि तरीही त्यांना असे वाटते की काम अजून शिल्लक आहे.

वॉल्टर स्पिंक असोत, श्लींग्लोफ असोत, जेम्स फर्ग्युसन असो किंवा जेम्स बर्गेस असो. या सर्वांनी झोकून देऊन लेण्यांचा अभ्यास केला. भारताचा, भारतातील साहित्याचा, कलेचा, शिल्पांचा, चित्रांचा, चित्र निर्मितीचा, चित्रशैलींचा, स्थापत्याचा, धर्मांचा, धार्मिक ग्रंथांचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या या सर्व ऋषींना मानाचा मुजरा!

अभ्यास कसा करावा, किती करावा, किती अंगांनी करावा, किती खोल करावा, आपल्या विषयाचे चिंतन कसे करावे हे या ऋषींकडून शिकायला हवे. संत तुकारामांच्या शब्दात सांगायचे तर –

विठ्ठल गीती गावा | विठ्ठल चित्ती ध्यावा | विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ||

आपल्या अभ्यासाचा विषय डोळ्यासमोर साक्षात मूर्तिमंत होऊन उभा राहावा इतकं त्याचे ध्यान केले पाहिजे!

संदर्भ –

  • The Startling Story of Ajanta – Shubha Khandekar
  • इतिहासावर प्रकाशझोत – विनायक परब, लोकसत्ता मधील श्री स्पिंक यांची मुलाखत, जॅनेवारी २०१५.
  • The Life and Times of Walter Spink –  Bonnie Brereton
  • Indian Archaeology from Jones to Marshall – Sourindranath Roy

हा लेख प्रसाद दिवाळी अंक, २०१९ मध्ये पूर्व प्रकाशित झाला आहे.

3 Comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s