एक होते ‘उदयन’

डॉ. उदयन इंदूरकर गेल्याची बातमी कळली. गेले काही महिने ते अर्धांगवायूने आजारी असल्याचं कळल्यापासून नजिकच्या भविष्यात हे होणार आहे अशी अटळ भीती गेला मनात होती आज सत्यात उतरली. या भीतीला विविध कंगोरे होते. एक प्रचंड ज्ञानी माणूस आपल्याला सोडून जाणार या भीतीबरोबरच काही अत्यावश्यक गोष्टी आता होऊ शकणार नाहीत ही भीतीसुद्धा तितकीच प्रबळ होती.

उदयन इंदूरकर हे भारतविद्या म्हणजेच इंडोलॉजी विषयातलं खूप मोठं नाव. मंदिरांचं स्थापत्य हा त्यांचा विशेष आवडीचा आणि अभ्यासाचा विषय. मंदिरांच्या रचनेतलं गणित, विज्ञान, स्थापत्य याचा त्यांचा अभ्यास विलक्षण होता. ‘वेरूळ’ या विषयाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं पुस्तक त्यांच्या अभ्यासाची प्रचिती देतं. मंदिरांच्या अभ्यासातून इंदूरकर यांनी एक अनोखा दृक्श्राव्य कार्यक्रम साकारला होता : ‘एक होतं देऊळ’ ! माझा मामा इंदूरकरांचा अगदी जवळचा मित्र. त्याच्याकडून या कार्यक्रमाबद्दल आधी ऐकलं होतं. मी काहीही करून तो बघायलाच हवा यासाठी तो खूप आग्रही होता. ५-६ वर्षांपूर्वी त्याचे अधूनमधून प्रयोग होत पण काही ना काही कारणाने ते पाहण्याचा योग्यच येत नव्हता. मग अचानक त्याचे प्रयोग बंद होईनासे झाले. मग मामाकडून कळलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने हा कार्यक्रम आता थांबला आहेत. सुदैवाने ते बरे झाले आणि ३-४ वर्षांपूर्वी पुन्हा काही प्रयोग झाले तेव्हा त्यातला एक मला बघायला मिळाला. जणू नजरबंदी करणारा सव्वातीन तासांचा कार्यक्रम! अक्षरशः क्षणभरही नजर चित्त विचलित होऊ नये अशी ताकद त्या संहितेत होती. भारतात मंदिर बांधणी कशी सुरु झाली इथपासून ते मंदिरनिर्मितीमागे असणाऱ्या तत्वज्ञानापर्यंत अनेक कंगोरे आपल्यासमोर उलगडले जात. प्रोजेक्टरवर अनेक छायाचित्रं, चित्रफिती आणि आकृत्या, त्यासोबत चित्रा खरे आणि स्वतः इंदूरकर यांचे अत्यंत ओघवते निवेदन यातून आपल्या इतिहासाची वैभवशाली पानं उलगडत जात. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात काही महत्वाची मंदिरं पाहायला मिळत तर उत्तरार्ध (जवळपास सव्वा ते दीड तास) फक्त आणि फक्त कंबोडियाच्या विस्तीर्ण मंदिरसमूहाला वाहिलेला होता. त्या मंदिरांची भूमितीय प्रमाणबद्धता, भारतीय पुराणकथा प्रकट करणारी तिथली शिल्पं, तिथला इतिहास हे सारं काही कुठेही क्लिष्टता न येऊ देता सांगत. वर्षाच्या प्रत्येक दिवसानुसार इथे असणाऱ्या समुद्रमंथनच्या कोरीव शिल्पातल्या एकेका देवावर/राक्षसावर सकाळचा कवडसा पडत जातो हे त्यांनी सांगितल्यावर तर तोंडात बोटंच गेलं!! कार्यक्रम पाहून बाहेर पडत असताना कमालीचं भारावलेपण आलं होतं. आपल्या पूर्वजांनी भारतातच नव्हे तर पार आग्नेय आशियातही हिंदू संस्कृतीची पताका फडकवत ठेवलेलं पाहून फार समाधान वाटलं होतं. राष्ट्राने पराभूत आणि गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी अशा गोष्टी सांगत राहणं आणि त्यातून नवनिर्मितीला प्रेरणा, चालना देत राहणं गरजेचं असतं.

उदयन इंदूरकर यांच्याकडून घडलेलं एक महत्वाचं काम म्हणजे हरिभाऊ वाकणकर यांचं छोटेखानी चरित्र. हरिभाऊ हे पुरातत्व विषयातलं अतिशय मोठं नाव. मध्यप्रदेशामध्ये भीमबेटका येथे अगदी अडनिड्या जागी असणाऱ्या अत्यंत दुर्लक्षित गुहांमध्ये जाऊन तिथली अश्वमयुगीन कालखंडातली आदिमानवाने काढलेली चित्रं प्रकाशात आणणाऱ्या हरिभाऊंचं नाव जगभरात आदराने घेतलं जातं. त्यांनीच पुढे कलाविषयाला वाहिलेल्या आणि कलेतूनही राष्ट्रीय विचारांचे भान जपणाऱ्या ‘संस्कार भारती’ या संस्थेची स्थापना केली. अशा महान व्यक्तित्वाची माहिती आज फार कमी जणांना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि ‘संस्कार भारती’चे कार्यकर्ते असणाऱ्या उदयन इंदूरकरांनी ‘द्रष्टा कलासाधक’ या छोटेखानी पुस्तकाच्या माध्यमातून हरिभाऊंचं चरित्र सर्वांसमोर आणलं हे फार बरं झालं. संस्कार भारती अनेकांमधल्या अंगभूत कलेला नेमकी दिशा देण्याचं काम करत असते त्याला इंदूरकर यांचादेखील आपल्यापरीने हातभार लागत आला आहे.

इंदूरकर यांनी दीडशे ठिकाणच्या तब्बल ४०० वारसास्थळांना भेटी दिल्या होत्या. कंबोडियाबद्दलचा त्यांचा अभ्यास प्रचंड होता. तो केवळ भारतात राहून न करता अनेकवेळा तिथे प्रत्यक्ष जाऊन केल्याने त्याचं मूल्य अधिक आहे. त्यांना स्वतःला कंबोडियन भाषा येत असल्याने त्यांच्याकडे स्थानिक भाषेतील माहितीही भरपूर होती. याबद्दलही डिजिटल माध्यमात काही ना काही साठवण होणं गरजेचं होतं. पण ते घडलं नाही. अलीकडच्या काळात ते स्वतः कंबोडियामध्ये ‘हेरिटेज टूर’ आयोजित करत असत आणि त्या सहलीसोबत ते स्वतःही असत. त्यामुळे त्यांच्यासोबत या सहलीला जायची खूप इच्छा होती. त्यांच्या जग सोडून जाण्याने सहलीची, त्यांच्या ज्ञानाच्या डिजिटायझेशनची इच्छा कायमची राहून गेली आहे.

‘एक होतं देऊळ ‘ हा कार्यक्रम पाहून प्रेरित होऊन लोक इंडोलॉजी विषयाकडे वळल्याचीही उदाहरणं आहेत. असा हा कार्यक्रम चित्रित व्हावा अशी माझी खूप इच्छा होती. इंदूरकर आपल्या पुस्तकांमधून बोलले आहेतच, पण त्यांचा अभ्यास डिजिटल माध्यमातूनही साठवणं खूप आवश्यक होतं. ” ‘एक होतं देऊळ’ ध्वनिचित्रमुद्रित व्हायला पाहिजे” असं मी मामाकडे बोलून दाखवलं. मामाकडून कळलं की असा प्रयत्न झालाही होता, पण काही कारणाने तो पूर्णत्वास जाऊ शकला नव्हता. काही काळाने मामाकडे बोलताना मी पुन्हा विषय काढला आणि त्यासाठी छायाचित्रकार उपलब्ध करून द्यायचीही तयारी दाखवली. त्यावेळी मामाकडून कळलं की त्यांना अर्धांगवायू झाला आहे. ते ऐकलं आणि काळजात चर्रर्र झालं. हा अफाट कार्यक्रम आता फक्त उदयन इंदूरकरांच्या स्मृतीत राहणार या भीतीने ग्रासलं. आज त्या भीतीतून कायमची सुटका झाली पण ही सुटका अधिक दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. डॉ. उदयन इंदूरकर त्यांच्या पुस्तकांमधून जो वारसा ठेवून गेले आहेत तो जपणे त्याचा अधिकाधिक प्रसार करणे हेच आपल्या हातात आहे.

येथे त्यांच्या प्रकाशित साहित्याची आणि कामाची यादी पुढीलप्रमाणे:

 • Drashta Kalasadhak ( द्रष्टा कलासाधक). Biography of Late Haribhau Wakankar. Originally written in Marathi. Translated in Hindi and Telegu.
 • Adbhut Bharteeya Shilpa – Verul (अद्भुत भारतीय शिल्प – वेरूळ ) (In Marathi)
  Temples of Cambodia (English).
 • He has produced a 13 episode National T. V. Serial Shilpa Saundarya (1999).
 • He has contributed to theatre with scripts for following performances:
  — Tamsao ma jyotirgamaya.
  — Sattava
  — Katahakadikathak
  — Lalit alankrut Maharashtra
  — Rani ki vav
  — Verulchya Nayika
  — Laya -the Beginning (music by Pt. Ronu Mujumdar).

—प्रसाद फाटक

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s