भारतीय दर्शन परिचय – अष्टावक्र गीता

राजा जनक त्या भयानक जंगलातून पुढे पुढे जात होता. प्रचंड भूक लागलेली होती. जवळ एक लहानशी तांदळाची पुरचुंडी केवळ होती. त्याने ती पुरचुंडी उघडली. त्यातील तांदूळ पाहून त्याची भूक पुन्हा एकदा वाढली. आजूबाजूच्या काटक्या त्याने गोळा केल्या. तीन दगडांची चूल मांडली. बाजूलाच पडलेल्या तुटक्या खापरात त्याने जवळच्या ओढ्यातून पाणी आणले. चकमकीने चुल पेटवली. खापराच्या तुकड्यात तांदूळ शिजायला टाकले आणि तो वाट बघत बसला. तांदूळ अर्धे शिजून झाले, पांढरा फेस वर येऊ लागला होता. आता मात्र त्यांना भूक आवरेना. त्याने तांदूळ बोटचेपे झाल्याचे बघितले आणि लगेच आजूबाजूच्या झाडांची मोठी पाने जमिनीवर पसरली व शिजलेला भात त्यावर पसरला. आणि थोडा निवला कि खाऊया म्हणून तो त्या गरम अन्नाचा गंध घेऊ लागला.

तेवढ्यात एक मोठा वळू तेथे आला आणि त्याने आपल्या खूरांनी तो शिजलेला भात मातीत मिसळून टाकला. आता राजा जनकाला काही सुचेना! त्याच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब गोळा झाले. हातांना थरथर सुटली. पावले अडखळायला लागली. एकातरी पानावर थोडासा चांगला भात शिल्लक आहे का ह्याचा शोध तो घेऊ लागला. मातीमध्ये मिसळलेले भाताचे कण त्याला दिसू लागले. भावना अनावर झाल्या आणि तो रडू लागला. आपलाच आवाज त्याच्या कानावर पडू लागला. आणि हलकेच त्याने डोळे उघडले. आपण आपल्या मंचकावर झोपलेलो आहोत आणि स्वप्न पाहत आहोत हे त्याच्या लक्षात आले.

तो अत्यंत अस्वस्थ झाला. सकाळी उठून राज्यकारभारातील महत्त्वाच्या गोष्टी त्याने पार पाडल्या. पण आतला अस्वस्थपणा काही जाईना. खरा जनक कोणता? दोन ओंजळ अन्नासाठी अस्वस्थ असलेला की हा आता राज्यकारभार बघणारा? या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल याबाबत त्याला दरबारातल्या एकाही विद्वाना विषयी स्पष्ट खात्री वाटेना. शास्त्रार्थ करायला हे सर्व जण उत्तम आहेत, यात शंकाच नाही. परंतु या अतिशय आतल्या आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची क्षमता या कोणातच नाही. असे वाटून त्याला वैषम्य आले. दुपारी जेवायला बसला. समोर सुवासिक तांदळापासून केलेला भात होता. पंचपक्वान्ने होती. उत्तमोत्तम भाज्या होत्या. परंतु तो मातीत मिसळलेला भात काही त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. पहिला घास घेतल्या बरोबर त्याला एकदम आठवले की आर्य बंदिशी चर्चा करायला आलेला तो लहानगा कुरूप यति, तोच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल!

र्आय बंदी! आपल्या पिताश्रींना, कहोड यांना वरुणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्याने आर्य बंदि जवळ शास्त्रार्थ केला होता. तो नेहमीच्या बौद्धिक वाद चर्चेपेक्षा काहीसा वेगळा होता. जेव्हा सारेजण त्याच्या आठ ठिकाणी वक्र असलेल्या शरीराकडे बघून हसले होते, तेव्हा त्यानेही आपल्याकडे केवळ हसून बघितले होते. आणि खणखणीत स्वरात म्हणाला होता, ‘राजा तुझ्या दरबारात विद्वान आहेत असे ऐकून होतो परंतु येथे तर सारेच चामड्याचे जाणकार बसलेले दिसतात! ‘असे म्हणून त्याने संपूर्ण दरबाराला विचारात पडले होते! कोणताही अभिनिवेश नाही, अहंकार नाही. परंतु आत्मसन्मानाचा लखलखता दिवा शरीर मनाच्या आत पेटत आहे, असे त्याच्या डोळ्यांमधून आणि वाणी मधून लक्षात येत होते. तोच आपल्याला या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल. पण कुठे असेल तो?

राजाला एकदम आठवले की उद्दालक ऋषींचा मुलगा श्वेतकेतू त्याचा मामा आहे. नक्कीच आश्रमातून त्याची माहिती मिळू शकेल. राजाने त्वरित घोडेस्वार आश्रमात पाठवले. आणि अष्टावक्र यांची माहिती घेऊन येण्यास सांगितले. घोडेस्वार परतले. त्यांनी सांगितले की घनदाट अरण्यामध्ये अष्टावक्र यांनी त्यांचा आश्रम उभारलेला आहे. राजा लवाजम्यासह निघाला. जंगलाच्या सीमेवर आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आतमध्ये अंबारी हत्ती तंबू इत्यादी नेणे अवघड आहे. सारे तेथेच ठेवून सहा घोडेस्वारांसोबत तो पुढे निघाला. पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आले की आता येथे एका वेळी एकच घोडा जाऊ शकतो. त्याने सहा घोडेस्वार तिथे थांबवले आणि केवळ एकटाच निघाला. बराच पुढे गेल्यानंतर त्याला एका झाडाखाली अष्टावक्र मुनी दिसले.

त्यांच्या कडे जाण्यासाठी रिकीबीतून डावा उजवा पाय काढून तो त्याने हवेत वर घेतला आणि डाव्या पायावर शरीर तोलून तो खाली उतरणार, तेवढ्यात अष्टावक्र म्हणाले, “राजन थांब” त्याच आवस्थेत राजा स्तब्ध झाला. डावा पाय रिकिबीत, उजवा पाय घोड्यावरुन बाहेर आलेला, हवेत, दोन्ही हात घोड्यांवर आणि शरीराचा तोल सावरला. अशा अवस्थेत तो अष्टावक्रांकडे पाहू लागला. जरा वेळाने अष्टावक्र म्हणाले, “राजन खाली उतरा! ” डावा पाय काढून आणि उजवा पाय मागे घेत राजा उतरला.

बोधाने भारलेल्या अवस्थेमध्ये राजा मुनींकडे गेला. प्रणाम करून आपल्या स्वप्नाची हकीकत सांगून म्हणाला, “मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत” अष्टावक्र म्हणाले “राजन त्यासाठी तुला आश्रमात राहावे लागेल” राजा म्हणाला, “मी तयार आहे” आणि मग या अद्भुत गुरु-शिष्यांच्या संवाद सुरू झाला. यालाच अष्टावक्रगीता असे म्हटले जाते. जनकाची परंपरा एकोणीस जनक राजे होऊन गेले असे सांगते. त्यातील एक म्हणजे नरकासुराचा प्रतिपाळ करणारा कूर्मावताराच्या वेळेचा राजा जनक आणि दुसरा म्हणजे वैदेही सीतेचा पिता जनक हे आपणास ठाऊक असतातच. त्यांच्या या आधीचा हा अष्टावक्र गीतेतला जनक होय.

अष्टावक्र गीतेचे वेगळेपण अष्टावक्रगीता ही उपनिषद काळात रचली गेली. मात्र या ग्रंथास “अष्टावक्र गीता” असे म्हटले गेले. संस्कृत साहित्याच्या दृष्टीने, वेदांनंतर ब्राह्मणे, आरण्यके उपनिषदे, आर्ष महाकाव्ये म्हणजे रामायण, महाभारत आणि तत्त्वज्ञान या क्रमाने एकामागोमाग एक येतात. वेदांमधील यज्ञाच्या कर्मकांडांची माहिती ब्राह्मणांमध्ये असते. तर आरण्यके ही वेदांच्या अंती येतात. आरण्यके आणि उपनिषदे ही दोन्ही वेदांच्या शेवटी येणारी असली, तरी त्यांच्यात सूक्ष्म फरक आहे. अरण्यकांमध्ये यज्ञाच्या गूढ अशा तत्त्वाचा विचार केला जातो. आरण्यक हे यज्ञ कर्माच्या सूक्ष्म रूपावर चिंतन करणारे असते. तर उपनिषद ब्रह्म चिंतन करणारे असते.

अरण्यकांचा आणि उपनिषदांचा सर्वात महत्त्वाचा भेद म्हणजे अरण्यकांपर्यंत मनुष्याच्या जीवनाचे ध्येय हे आनंद आणि स्वर्गप्राप्ती एवढेच होते. यज्ञकर्म हे त्याचे इष्ट कार्य होते. मात्र उपनिषदांनी ज्ञानयज्ञाला श्रेष्ठता देऊन मोक्ष हेच मनुष्याच्या जीवनाचे सर्वात महत्वाचे असे कर्तव्य ठरवले. उपनिषदांमध्ये ईश्वर, जगत्, आत्मा(जीव) आणि ब्रह्म यांची चर्चा केली जाते. ज्यावेळी अष्टावक्र यांचे आजोबा, उद्दालक (आरुणी) छांदोग्य उपनिषद सांगत होते आणि त्यांचे मामा श्वेतकेतू तत्वमसि हे महत्वपूर्ण सूत्र मिळवत होते, अशावेळी उपनिषदा प्रमाणेच गुरु-शिष्य संवादाचे तंत्र असलेल्या, या समकालीन ग्रंथास मात्र “अष्टावक्र संहिता, अष्टावक्रगीता किंवा कौशिकीय संहीता” असे म्हटले गेले. उपनिषदांमध्ये रहस्यविद्या, ब्रह्मज्ञान किंवा पराविद्या यांची चर्चा केलेली आहे. अष्टावक्र संहितेमध्ये आत्मज्ञानाची चर्चा आहे. ज्यावेळी उपनिषदांचा रोख हा, सृष्टी काय आहे? जीव सान्त आहे की अनंत? जन्माच्या आधी काय होते, मृत्यू नंतर काय असेल? जीवन मृत्यू सोबतच संपते का? मृत्युनंतर स्वर्ग मिळतो का? मिळत असेल तर कसे कळते? यासारख्या प्रश्नांकडे होता. त्यावेळी अष्टावक्र संहितेमध्ये पहिलाच प्रश्न विचारला आहे की ज्ञान, मुक्ती आणि वैराग्य कसे प्राप्त होईल. अष्टावक्र संहिता ही या प्रश्ना पासूनच योगपर आणि संन्यासपर अशा उपनिषदां पासून थोडी वेगळी आणि स्वतःचे वैशिष्ट्य घेऊन आलेली लक्षात येते.

ब्रह्मसुत्रे, उपनिषदे व श्रीमद्भगवद्गीता ही प्रस्थानत्रयी मानली जाते. साधकाच्या यात्रेची सुरुवात येथे होते.

मात्र, जसे कालिदासाचे ‘अभिज्ञान शाकुंतल’ हे लोकप्रिय काव्य आहे, परंतु विद्वान आणि खरे रसिक हे ‘रघुवंशामध्ये’ अधिक रमतात. त्याप्रमाणेच अर्जुनाच्या विषाद योगाने सुरू झालेली श्रीमद्भगवद्गीता ही सर्वांना मोहूवून टाकते, मात्र मुमुक्षु साधक हा भगवद्गीता, उद्धव गीता आणि अष्टावक्रगीता या मार्गाने पुढे जातो.

उपनिषद काळातील असूनही उपनिषद नाही, अद्वैत तत्वज्ञानाची गंगोत्री मानली गेली असूनही दर्शन शास्त्र नाही, अशीही मोक्षगीता-अष्टावक्रगीता.

अष्टावक्र संहितेमध्ये 20 अध्याय व 298 सूत्रे आहेत. सूत्रे ही कमीतकमी शब्दांत अधिक आशय सांगणारी असतात. ही सूत्रे अष्टावक्र मुनींनी जनकाला सांगितली. अष्टावक्र हे मुनी होते. मुनी म्हणजे मनन करणारा. मौन पाळणारा! राग द्वेष रहित अशी व्यक्ती. ऋषी आणि मुनी हे दोन शब्द बऱ्याच काळापासून एकाच अर्थाने वापरले जात असले तरी, एकेकाळी ह्या दोन्हीचा विशिष्ट अर्थ होत असे. श्रुती समजणारा, ऋष म्हणजे वेदवचने बघणारा (अवतरीत होतांना), यज्ञ करणारा आणि वेदानुसार जीवन जगणारा तो ऋषी होय. ऋषति प्राप्नोति सर्वांन मन्त्राण. ज्ञानेन पश्यति संसार पारं वा. ज्ञानाच्या डोळ्यांनी संसाराच्या पलिकडचे बघणारा तो ऋषी. मुनी दोन प्रकारचे असतात. एक वेदांना प्रमाण मानून साधना करणारे, परंतु यज्ञ आणि अन्य कर्मकांड न करणारे. हे “ब्राह्मण मुनी” म्हणून ओळखले जात. तर वेद प्रमाण न मानणारे आणि वेगळ्या प्रकारची साधना करणारे ते “श्रमण मुनी” म्हणून ओळखले जात. भ. गौतम बुद्ध अनेक ठिकाणी बोधप्राप्त व्यक्तींचा उल्लेख करतांना, “श्रमण-ब्राम्हण” अशी जोडी वापरतात, ती याच अर्थाने! ! अष्टावक्र हे ब्राह्मण मुनी होते. अष्टावक्र संहितेला गीता असे म्हटले जाते. गीता म्हणजे “गायले गेलेले”. गीत अनेक जणांच्या हृदयाला स्पर्श करू शकणारे असते. गीत नेहमी ताजे असते. आत्मिक मौलिक आणि वेळेवर तयार झालेले असते. ते नूतन असते आणि सखोल असते. म्हणूनच जेव्हा तत्वज्ञान हे केवळ बौद्धिक पातळीवर नसते, तर हृदयापर्यंत, आत्मिक स्तरावर पोहोचते तेव्हा त्यास गीता म्हटले जाते.

श्रीमद्भगवद्गीता, उद्धवगीता, व्याधगीता आणि अष्टावक्रगीता ही त्याची उदाहरणे आहेत.

असेही म्हटले जाते की नंतरच्या कालखंडात आलेला बुद्धिस्ट झेन ध्यानाचे बीज अष्टावक्र संहितेमध्ये आपणास दिसून येते. हे म्हणण्याचे कारण म्हणजे, ज्यावेळी अष्टावक्रांनी जनकाला अचानकपणे थांबण्यास सांगितले, त्यावेळी जी स्थिती होती, अशा प्रकारच्या स्थितीत शिष्याला थांबवणे, झेन गुरु करत असतात. तसेच तुला आत्ता आणि याच ठिकाणी लगेच वैराग्य आणि मुक्ती मिळू शकेल असे मुनी अष्टावक्र म्हणतात! हे वाक्यही झेन साधनेत नित्य म्हटले जाते. अश्वघोष याने लिहिलेल्या बुद्धचरित्रात राजा जनकाचा बोधिप्राप्त व्यक्ती म्हणून आदरपूर्वक उल्लेख आढळतो!

अध्याय पहिला – मुमुक्षू अशा जनकाने अष्टावक्रांना विचारले की “हे प्रभो ज्ञान कसे प्राप्त होते मुक्ती कशाने मिळते आणि वैराग्य कशाप्रकारे प्राप्त होते हे मला सांगा” यामध्ये ज्ञान मुक्ती आणि वैराग्य ह्या तीन संकल्पना सुरुवातीलाच येतात. हे तीन शब्द एका कथेची आठवण करून देतात ती म्हणजे विवेकानंदांचे कथा ! असे म्हटले जाते की विवेकानंदांना “अष्टावक्रगीता” हे एकमेव पुस्तक रामकृष्ण परमहंस यांनी आवर्जून वाचण्यास सांगितले होते. याच तीन शब्दांचा त्यांच्याच एका कथेमध्ये आपणास उल्लेख आढळतो.

जेव्हा विवेकानंदांना काही घरगुती अडचणी सतावत होत्या, त्यांची आई त्या अडचणीमुळे स्वस्थ्य नव्हती. तेव्हा विवेकानंद रामकृष्ण यांना म्हणाले की, “मला आईला या अडचणी मधून बाहेर आणायचे आहे. काय करू?” तेव्हा रामकृष्णांनी सांगितले की, “आत जा कालीमातेच्या समोर उभा रहा आणि तिला हवे ते माग.”

कालीमातेच्या समोर उभे राहिल्यानंतर विवेकानंदांच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले, “मुक्ती दे! ज्ञान दे! वैराग्य दे!” हीच गोष्ट एकामागोमाग एक तीन वेळा घडली. तीनही वेळेला विवेकानंदांनी आपल्या सांसारिक अडचणीतल्या काहीही गोष्टी कालीमातेला मागू शकले नाही आणि त्यांनी केवळ “मुक्ती ज्ञान आणि वैराग्य” मागितले.

ही कथा मुमुक्षु मनुष्याचे यथार्थ वर्णन करते. विवेकानंद जेव्हा गर्भगृहात मातेसमोर उभे राहतात तेव्हा ते संसारातील अडचणी विसरतात आणि आतून जे हवे आहे ते स्वाभाविकपणे बाहेर येते. रामकृष्ण तीन वेळा त्यांना परत परत पाठवतात आणि तीनही वेळेला तीच गोष्ट पुन:पुन्हा मागितले जाते. सुखदुःख, अडचणी ह्या असणारच. पण जेव्हा आतून मुक्ती ज्ञान आणि वैराग्य हवे असेल, तेव्हाच मनुष्य हा खऱ्या अर्थाने मुमुक्षु असतो. संसार हा कधीही संपत नाही. मात्र त्याच्याशी सतत जोडलेले राहणे आवश्‍यक नसते. वरवरच्या इच्छांची आवरणे दूर होऊन जेव्हा आंतरीक मूळ इच्छा दिसते, तेव्हा मनुष्य हा या मार्गाकडे वळतो. मनुष्याला स्वाभाविकपणे शांती हवी असते. तीच त्याची आंतरिक अभिप्सा असते. त्याची सतत धडपड ही त्याच दिशेने असते. ही मूळ इच्छा पूर्ण होत नाही, तोवर विविध प्रकारच्या इच्छांमागे मनुष्य धावत असतो. मात्र जेव्हा हा सर्व भ्रम संपतो आणि आपल्याला मुक्ती ज्ञान आणि वैराग्य हेच हवे आहे व आपल्या सर्व धडपडीमागे याच तीन मूळ इच्छा आहेत, हे ध्यानात येते तेव्हा तो या ज्ञानाचा अधिकारी ठरतो. अष्टावक्र जनकाला म्हणतात, “जर तुला खरोखरच मुक्ती मिळवण्याची इच्छा उत्पन्न झाली असेल तर तुला विषयांना विष समजून त्यागले पाहिजे आणि क्षमा आर्जव दया संतोष आणि सत्य यांना अमृत समजून धारण केले पाहिजे. सुरुवातीच्या या दोन सूत्रांमध्ये “ज्ञान, मुक्ती, वैराग्य, विषय, क्षमा, आर्जव, दया, संतोष आणि सत्य” हे पारिभाषिक शब्द आलेले आहेत त्यांचे अर्थ पाहू.

राजा जनक बोधाने भारलेला होता. त्यामुळे त्याने विचारलेल्या प्रश्नापासून अष्टावक्र संहितेचा जन्म झाला! जनक हा तात्त्विक जाणीवेने युक्त असा मनुष्य होता. त्याला ज्ञान, मुक्ती आणि वैराग्य म्हणजे काय हे माहीत होते.
मनुष्य जेव्हा उपयुक्ततावादाकडून आध्यात्मिककतेकडे जाऊ लागतो, तेव्हा त्याला आपल्यातील अंतर्विरोध दिसू लागतात. त्याचबरोबरीने बोधाची अदृश्य पावले आपल्या सोबत चालत असल्याचे जाणवू लागतात. आणि मग तो गुरूचा शोध घेऊ लागतो. म्हणूनच जी व्यक्ती ज्ञानी आहे, मुक्त आहे आणि विरागी आहे अशा व्यक्तीला, जनक विचारतो की, “ज्ञान, मुक्ती आणि वैराग्य मिळवायचे कसे?” या संकल्पनांचा थोडक्यात अर्थ पाहूया.

मुक्त असणे म्हणजे प्रकृतीच्या नियमांनी बद्ध नसणे होय.  वैराग्य म्हणजे बघितलेल्या आणि ऐकलेल्या विषयांबद्दल वितृष्णा असणे होय. विगतो राग, ज्याची आसक्ती गेली आहे तो म्हणजे विरागी. ज्ञान म्हणजे देश, काल आणि निमित्ताच्या पलीकडे असलेल्या सत्तेला जाणणे होय. जनकाचे तीन प्रश्न ऐकल्यानंतर अष्टावक्र मुनी म्हणतात, “तुला जर खरोखरच मुक्ती हवी असेल तर तुला ‘विषयाला’ त्यागले पाहिजे.”

‘विषय’ हा शब्द आध्यात्मामध्ये वारंवार येतो. या ‘विषयाला’ दोन स्तरांवर समजून घेतला पाहिजे. एक म्हणजे पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, आणि उभयात्मक इंद्रिय मन, यांची आंतरिक सृष्टी आणि बाह्यसृष्टी, यांची परस्परांशी चाललेली देवाण-घेवाण याला विषय असे म्हणतात. विषयाचा दुसरा एक स्तर असतो. जेव्हा प्रकृतीची अकरा इंद्रिये बाह्यसृष्टीशी संपर्क करतात, तेव्हा त्यातून स्मृती, भावना आदी कोष निर्माण होतात. या कोषांमुळे ज्ञेय वस्तु ‘विषयीकृत’ होते! ती मनामध्ये संस्कार रूपाने शिल्लक राहते. आणि मग नव्याने येणारे विषय त्या संस्कारां सोबत गुंतत जातात. अष्टावक्र सांगतात तुला या “विषयांचा” विष समजून त्याग केला पाहिजे. म्हणजेच या अकरा इंद्रियांच्या दारातून, परवानगी शिवाय आत येणारे विषय तू थांबवले पाहिजेत. आणि क्षमा, दया, आर्जव, संतोष व सत्य या गुणांना तुझ्यामध्ये अमृत समजून वसवले पाहिजे. जेव्हा आपण या नेहमी माहित असलेल्या शब्दांना, अशा एखाद्या सूत्र वांङ्गमयात वाचतो, तेव्हा त्या शब्दांचे पारिभाषिक अर्थ आपण लक्षात घेतले पाहिजेत. अशी वचने ही सूक्ष्म पातळीवर सांगितलेले असतात. मनाला उभयात्मक इंद्रीय असे म्हटले जाते. म्हणजे ते एकाच वेळी ज्ञानेंद्रिये पण आहे आणि कर्मेंद्रिये पण आहे. बोध प्राप्तीच्या मार्गावर मनाला जाणणे, समजून घेणे ही पहिली पायरी असते.

संत कबीर म्हणतात – मन चाहे तो जाने दो | मत जाने दो शरीर | कितना भी तने धनुष कुछ न हो | जब तक ना छुटे तीर ||

म्हणजेच स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर यातील स्थूल शरीराला जेव्हा आपण थांबवू शकतो तेव्हा वैराग्याची वाट सुरू होते. अष्टावक्र मुनींनी अमृतासमान असणारे जे गुण सांगितले, त्यांची लक्षणे पाहूया.

क्षमा – म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या, आपल्याला अवांच्छित वर्तनामुळे निर्माण होणारी मानसिक प्रतिक्रिया थांबवणे होय. ती व्यक्ती आणि आपल्या मध्ये द्वेषाचे, अपराध भावनेचे अथवा हीन भावनेचे नाते निर्माण होऊ न देणे हे महत्त्वाचे असते.

आर्जव – म्हणजे सर्वकाळी सर्व प्राणिमात्रांशी समभावाने वागणे होय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात – जैसे हितकारी बालकासि स्तन्य | सारिखे चैतन्य नाना भूती | तैसी प्राणिमात्री भली वागणूक | आर्जव ते देख पंडुसुता ||

दया – बोध प्राप्त व्यक्ती एका वेगळ्या विश्वामध्ये प्रवेशित झालेला असतो. त्याला आजूबाजूच्या लोकांचे वर्तन खटकू लागते. अशावेळी त्यांचे विश्व जाणून घेणे म्हणजे दयाभाव होय. जसे लहान मुलाला एखादे खेळणे तुटल्यावर अत्यंत दुःख होते आणि तो रडू लागतो. अशावेळी त्या खेळण्याला काहीच मोल नसतानाही, आपण त्याची समजूत काढतो. कारण त्याच्या भावविश्वात त्या खेळण्याचे तितके महत्त्व असते. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा सर्वसामान्य संसारी लोक हे आपल्या लहान-मोठ्या समस्या विश्वरूप समजून त्यांच्याशी झगडत असतात, तेव्हा त्यांच्या त्या भावविश्वाला धक्का न लावता होता होईतो मदत करणे म्हणजे दयाभाव होय. “अनाग्रहो नाम प्रथमं बुद्धी लक्षणम्” असे बोधाचे वर्णन केले जाते.

संतोष – सुख दुःख येत जात राहणारच! सुखाबद्दल आसक्ती अथवा अनुराग नसणे आणि दुःखाबद्दल द्वेष अथवा विषाद नसणे म्हणजे संतोष होय.

सत्य – ही एक वेगळी संकल्पना आहे. सर्वसामान्य भाषेत आपण खरेपणा जसेच्या तसे असणे याला सत्य म्हणतो. परंतु सत् म्हणजे ‘जे आहे ते’ या शब्दापासून सत्य हा शब्द तयार झाला आहे. सत् काय आणि असत् काय हे ओळखता येणे आणि त्यातील सत् ला नेहमी मनामध्ये स्थान देणे म्हणजे सत्य धारण करणे होय. जसे, एखादी वस्तू वरुन फेकली असता खाली पडते. हा पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. परंतु स्वतः पृथ्वी आणि ग्रहगोल हे अधांतरी फिरत असतात, ते कुठे पडत का नाहीत? कारण तेथे कशावर तरी पडणे ही संकल्पनाच नाही! या उदाहरणातून हे जाणून घ्यायचे आहे की आहे-नाही खरे-खोटे काळे-पांढरे या द्विमितीय विचारांच्या ही पलीकडे इंद्रियातीत असे काही असू शकते याची जाणीव होणे म्हणजे सत्य होय.

या सर्व गोष्टींना तू धारण केलेस तर तुला मुक्ती मिळू शकेल असे अष्टावक्र म्हणजे जनकाला सांगतात. पुढे ते म्हणतात पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपैकी कोणीही नाहीस. तू केवळ साक्षी आहेस आणि तुला जर हा देह वेगळा काढता आला तर तुला याचक्षणी शांती आणि सुखाचा लाभ होईल. कोणत्याही वर्ण आश्रम यांचा आश्रय करून राहिलेले व्यक्तित्व किंवा डोळ्यांनी दिसणारे हे तुझे शरीर म्हणजे तू नाहीस.

धर्म अधर्म सुखदुःख हे मनाचे धर्म म्हणजे तू नाहीस. या सर्वांचा कर्ता तू नाहीस आणि भोक्ता ही तू नाहीस. या सर्व गोष्टींना साक्षित्वाने पाहणारा असा तु द्रष्टा आहेस. हे एकदा जाणले की सदासर्वदा तू मुक्तच आहेस. या सूत्रांमध्ये अष्टधा प्रकृती चे वर्णन, सामाजिक व्यक्तित्त्वाचे वर्णन आणि दृश्य आणि द्रष्टा या दोन महत्त्वाच्या संकल्पना आल्या आहेत.

या मती: सा गतिर्भवेत. सूत्र तीन ते दहापर्यंत अष्टावक्र जनकाला मुक्ती म्हणजे काय ते सांगतात आणि अकराव्या सूत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की ज्याला मुक्तीची आस आहे तो मुक्त होतो आणि ज्याला बंधनात राहणे अभिमानाचे वाटते तो बंधनात राहतो. तिसऱ्या सूत्रापासून दहाव्या सूत्रापर्यंत अष्टावक्र म्हणतात, “तू पृथ्वी नाही, जल नाहीस, वायू नाही, तेज नाही, आकाश सुद्धा नाहीस, तू सर्वांचा साक्षी आहेस. चैतन्य आहेस. स्वतःपासून देहाला वेगळे काढ, तू याच क्षणी बंधमुक्त होऊन सुखी व शांत होशील. तू ब्राम्हणादि वर्णांचा किंवा आश्रमाचा किंवा इंद्रियांद्वारे जाणता येणारा नाहिस. धर्म, अधर्म (जगात कसे वागावे, कसे वागू नये), सुख दुःख, तुझे नाहीत. ते मनाचे धर्म्य विषय आहेत. तू कर्ता नाहीस भोक्ता नाहीस. तू पूर्ण मुक्त आहेस. तू द्रष्टा आहेस. मात्र मी कुणीतरी वेगळा आहे हे मानणे हेच तुझे बंधन आहे. मी कर्ता आहे, या अहंकाराच्या काळसर्पाने तुला दंश केला आहे. मी कर्ता नाही, या विश्वासाचे अमृत प्राशन कर. ‘मी विशुद्ध बोध आहे’ या अग्नीने अज्ञान जाळून, शोक रहित हो. हे विश्व मनाच्या कल्पनेतून दोरी मध्ये साप दिसावा तसे आहे. हे बोध स्वरूपा तू बोधाची प्राप्ती करून सुखी हो. ”
जनकाला अस्पष्ट, अमूर्त असे काहीतरी सरूप आहे का असे वाटले होते आणि त्याक्षणी आपण आजवर मिळवलेले ज्ञान हे त्या क्षेत्रापर्यंत पोहोचत नाही हे त्याला जाणवले होते. त्याच्या स्वप्नापासून आत प्रश्नाचे बीज पडले होते आणि आपले ज्ञान ही केवळ वरवरची गोष्ट आहे आणि स्वतःचे खरे स्वरूप हे अद्याप आपल्याला अजिबातच कळाले नाही हे त्याच्या लक्षात आले होते. तेव्हा त्याने अष्टवक्रांना शरण जाऊन आपले प्रश्न विचारले.

त्याच्या प्रश्नांची उत्तरे सुरू होतात, सूत्र 3 ते 10पासून. ही अष्टधा प्रकृती आणि बोधयोग म्हणजे काय हे सांगणारी सूत्रे आहेत. मुळात पंचमहाभूतांनी तयार झालेले शरीर. मन बुद्धी आणि अहंकार या त्याच्याच अधिक परिष्कृत झालेल्या सूक्ष्म झालेल्या, परंतु प्रकृतीच्याच तत्त्वाने वेष्टित असलेल्या बाबी. हे सर्व म्हणजे अष्टधा प्रकृती होय.

सर्व प्रकारच्या विचार भावना या प्रकृतीतूनच उत्पन्न झालेल्या गोष्टी असतात. विषय उत्पन्न होत राहतात, कारण ती प्रकृतीची संताने आहेत. संसार म्हणजे “समं सरति”, पुढे जात राहणे म्हणजे, संसार!

अध्यात्मिक व्यक्तीने आपले आचरण कसे ठेवावे हे ही सुरुवातीची सूत्रे सांगतात. त्यामध्ये सुखदुःख आणि धर्म अधर्म (कसे वागावे, कसे वागू नये इ. समाजमान्य नियम) या महत्त्वाच्या गोष्टींचे चर्चा केली आहे.

सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून जगताना मनाचे धर्म आणि समाजाचे नीती नियम हे त्या व्यक्तिमत्वाला लागू होणारच. त्यानुसार सुखाची अनुभूती, दुःखाची अनुभूती, धर्माने वागणे, अधर्माला त्यागणे हे सर्वकाही करावेच लागेल.

परंतु ज्याप्रमाणे पृथ्वीवर ऋतू येतात. पाऊस पडला की हिरवळ दिसू लागते, ऊन पडले की रुक्षता येते. यामध्ये जितके स्वाभाविक बदल आहेत, तितकेच स्वाभाविक बदल आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आपल्या मनामध्ये व्हावेत. त्याचा बोध यावा. त्याकडे आपण जसे ऋतूंकडे बघतो तसे बघता यावे. ते धर्म आपले नाहीत हा बोधयोग आहे. यामध्ये मनाला प्रकृतिस्थ करणे शिकावे लागते. आणि द्रष्टा स्वतंत्र आहे याचा बोध प्राप्त करावा लागतो.

हा बोधयोग हा इतर योगांपेक्षा येथेच भिन्न होतो. भगवद्गीतेत अर्जुनाला पडलेले प्रश्न आणि अष्टावक्रगीतेत जनकाला पडलेले प्रश्न हे मूलतः भिन्न आहेत. अर्जुनाला आपल्या बाह्य कर्मांविषयीचे प्रश्न पडलेले होते, तर जनकाला प्रकृतीने आवेष्टित केलेले अस्पष्ट अमूर्त असे काही आत आहे का याचा शोध घ्यायचा होता! ! त्यामुळेच हा योग ज्ञाना कडून बोधाकडे जाणारा आहे. ज्ञान देखील प्रकृतीचा भाग आहे. ते असत् आहे. मनाचे सतत दोन मितींमध्ये असणे हे संसारात मनुष्याला गुंतवून ठेवत असते. त्याची गती ही स्वीकार अस्वीकार, आहे नाही, योग्य-अयोग्य, सुख दुःख अशा दोन मितींमध्ये फिरत असते. द्रष्टा हा मनाच्या या धर्मांशी स्वतःला एकरूप करून घेतो. दृश्याला अहंकाराचे कोंदण मिळते आणि मग मन “अपूर्व”राहत नाही. तर प्रत्येक गोष्ट ही आधीच्या प्रमाणाशी, अनुभवाशी ताडून घेतले जाते. अष्टावक्र म्हणतात मनाने अपूर्व होणे म्हणजे बोधयोग. काट्याने काटा काढावा आणि मग तो काटा ही फेकून द्यावा त्याप्रमाणे ज्ञानाने देहाभिमान आणि मनाची सुखदुःखे ही काढून टाकण्यास अष्टावक्र सांगतात. अष्टावक्रगीतेमध्ये कोणीतरी असीम करुणामय असा ईश्वर नाही. अज्ञानाचे दुःखाचे दाहक अस्तित्व देखील नाकारलेले नाही. मनुष्याचे रोजचे आयुष्य त्याचे भूमिकेनुसार ठरलेले काम, त्यादृष्टीने त्याला मिळणारी सुखदुःखे प्राप्त होणारे धर्म आणि अधर्म हेही नाकारलेले नाहीत. देह असेपर्यंत हे सारे त्याच्याकडे असणारच. मात्र त्यातून निर्माण होणाऱ्या अहंमन्यतेकडे बघण्याची दृष्टी अष्टावक्र येथे देतात.

एका राजाला जेव्हा स्वप्नात भिकारी असलेले आपण राज्याचे स्वामी देखील आहोत आणि दोन्ही वेळेला अनुभवास येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अनुभूती ह्या अत्यंत स्पष्ट आहेत, असे लक्षात येते तेव्हा या दोन्ही मितींच्या पलीकडे काही तिसरे जग असेल का असा प्रश्न त्याला पडतो. आणि तेथून अष्टावक्र गीतेचा मार्ग सुरु होतो.

मनाच्या, स्वभावाच्या मर्यादा, त्याचा आवाका हा जाणून घेणे, त्याला वेगळे जाणणे आणि त्याकडे बघता येणे, द्रष्टा भाव निर्माण होणे हाच या सुरुवातीच्या सूत्रांचा मुख्य उद्देश आहे.

रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे की, “हे घर मी सोडून जात आहे, त्याच्या किल्ल्या मी इथे ठेवत आहे. येथे मी जे पाहिले ते सर्व सुंदर होते” निघून जाणारा कोणीतरी कवीला सापडतो, तत्वज्ञाला दिसतो, एखाद्या संगीतकार, चित्रकार शिल्पकाराला अस्पष्टपणे जाणवतो, तोच हा द्रष्टा भाव होय.

बोधकथा – कबिरांनी त्यांचा पुत्र कमाल याला एकदा गवत कापायला पाठवले. बराच वेळ झाला कोयता घेऊन रानात गेलेला कमाल, अजून परत का आला नाही, म्हणून कबीर स्वतः रानात गेले. तेथे पुरुषभर उंचीचे गवत वाढले होते आणि कमालला शोधता-शोधता त्यांना एक विलक्षण दृश्य दिसले. कोयता जमिनीवर पडलेला होता. आणि कमाल गवताच्या पात्यांबरोबर दोन्ही हात हवेत उंचावुन डुलत होता! सृष्टीची तत्त्वे सृष्टीमध्ये मिळून गेली की सर्व मुक्त चैतन्य सर्वव्यापी होते! अष्टावक्र येथे हाच उपदेश जनकाला करतात. ते म्हणतात, ”हे पुत्रा तू देहाच्या अभिमानपाशाने बद्ध झालेला आहेस. मी बोध आहे, या ज्ञानाच्या तलवारीने हे बंधन कापून टाक. असंग, क्रियारहित दोषरहित असा असलेला तू, ईश्वरप्राप्तीसाठी समाधी अनुष्ठान करतोस हेच खरे म्हणजे तुझे बंधन आहे!”

या सूत्रामध्ये अष्टावक्रांनी हा मार्ग बोधमार्ग आहे आणि योगमार्ग नाही, हे स्पष्ट केले आहे. येथे समाधी आदी अनुष्ठाने बंधनास कारणीभूत म्हटली आहेत. बोधमार्ग हा योगमार्गापेक्षा भिन्न असतो. योग मार्गामध्ये वृत्ती आणि क्लेश यांना जाणून घेऊन त्यांचे हळूहळू तनुकरण करणे, म्हणजेच त्यांना लहान करत जाणे अभिप्रेत असते. त्यामध्ये विधी असतात, योगाचे प्रकारही असतात. . टप्प्याटप्प्याने साधक पुढे जात असतो. साधकाला मार्गामध्ये कोणकोणत्या सिद्धी प्राप्त होतील, याचेही संपूर्ण विवरण असते. तर बोधमार्ग हा याहून पूर्णपणे निराळा असतो. यामध्ये केवळ आनंदाचा स्रोत नाही तर दुःखाचे मूळ देखील शोधले जाते. कोणत्याही विधिशिवाय, क्षणात बोधी प्राप्त होते! अष्टावक्र येथे आरशाचे उदाहरण देतात. ते म्हणतात आरसा त्याच्यातील प्रतिबिंबित रूपात आहे आणि त्या रूपाच्या बाहेर भौतिक स्वरूपात सुद्धा आहे. त्याप्रमाणे सर्वव्यापी असे एकच आकाश आत बाहेर व्याप्त आहे.

हा उपदेश ऐकताच राजा जनकाला बोधिप्राप्त होते. आणि तो बोलू लागतो की, “मी बोधस्वरूप आहे. द्वैत हेच दुःखाचे मूळ आहे आणि स्वर्ग-नरक, बंध, मोक्ष आणि भय या केवळ कल्पना आहेत. एका क्षणाला भावविभोर होऊन म्हणतो, “अहो मी आश्चर्यजनक आहे! माझाच मला नमस्कार असो. देहधारी असून सुद्धा मी कुठे जात नाही, कुठून येत नाही, मी संपूर्ण विश्वात व्याप्त आहे. मी शरीराला स्पर्श न करताच विश्वाला माझ्यात धारण केले आहे. ज्ञेय ज्ञान आणि ज्ञाता हे तिन्ही अवास्तव आहेत. आणि केवळ अज्ञानामुळेच मला आजवर ते जाणवत होते. या सागर-स्वरूप आत्मरूपा मध्ये जीव तरंग निर्माण झालेले, खेळलेले आणि लय पावलेले मी पहात आहे.”

हे सगळे बोलून झाल्यानंतर हा भ्रम आहे की बोध आहे हे जाणून घेण्यासाठी अष्टावक्र मुनि, राजा जनकाला काही प्रश्न विचारतात. येथे लक्षात घेतले पाहिजे की अनेक वेळा आपले मानसिक जीवन हे इतके अस्थिर असते की, त्यामुळे ज्या विषयाचे पांडित्यपूर्ण ज्ञान आपण मिळवतो, त्या विषयात पारंगत झाल्याचा भ्रम आपल्याला हळूहळू होऊ लागतो.
आध्यात्मामधील हा सर्वात मोठा धोका आहे. राजा जनक तर गेली कित्येक वर्षे पंडितांनी वेढलेला होता. त्याकाळातील को$हम सो$हम तत्वमसि, ब्रम्ह आदी सर्व बाबींची त्याला पूर्ण जाण होती. त्यामुळेच आपण केलेला उपदेश हा नक्की आत्मज्ञानाच्या पातळीवर खरा ठरला आहे का हे तपासून घेणे अष्टावक्रांना आवश्यक वाटले.
म्हणूनच त्यांनी काही प्रश्न विचारले.

  • राजन, तुझ्यासारख्या आत्मज्ञानी माणसाला अर्थार्जन का करावे वाटते?
  • जर हे विश्व तरंगरूप आहे तर मग तेच मी आहे असे समजून तू का धाव घेतोस?
  • सर्व आत्म्यामध्ये भूतमात्र आहेत असे जाणून सुद्धा अनेक मुनी देखील ममतेने वेढलेले का असतात?
  • अद्वैत प्राप्ती होण्यासाठी उत्सुक असलेला पुरुष काम सुखासाठी बेचेन का असतो?
  • जो नित्यानित्य विवेक जाणतो, विरक्त आहे तोही मोक्षाला का घाबरतो?
  • मृत्यू आल्यानंतर धीर सुद्धा भयभीत का होतो?
  • स्तुती किंवा नींदे मुळे तो विचलित का होतो?
  • भोग किंवा व्यथे मध्ये प्रसन्न अथवा संतप्त का होतो?

ज्या कुणाला आपण आध्यात्मिक प्रगती केली आहे, असा भ्रम झालेला असेल, त्याच्या डोळ्यात अष्टावक्रांचे हे प्रश्न झणझणीत अंजन घालणारे आहेत! अनेकदा साधनेला, दर्शनाला नीतिशास्त्र मानले जाते. असे मानणाऱ्या लोकांना निव्वळ उघड्या डोळ्यांनी आध्यात्म समजून घेता येत नाही. त्यांच्यासाठी हे प्रश्न मुनी अष्टावक्र विचारतात. राजा जनकाची यावर काय उत्तरे मिळतात ते पुढील भागात पाहू.

अष्टावक्रांनी जनकाला प्रश्न विचारले. “तू जी भाषा बोलत आहेस, ती आत्मज्ञानाच्या पराकाष्ठेची आहे. तिची रूपे तुझ्या बोलण्यातून सांगत आहेस!” परंतु जनका, मी तर ज्ञान बोलणारे अनेक लोक हे भ्रांतीमध्ये जगतांना पाहिले आहेत. मोक्षाची इच्छा करणारे मोक्षाला घाबरून गेलेले पाहिले आहेत. मोक्षाच्या गोष्टी बोलणारा माणूस हा व्यथेने पीडित होताना, स्तुती-निंदेने विचलित होताना, मृत्युने भयभीत होताना दिसत असतो! ! मग तो आत्मज्ञानी आहे हे कसे जाणणार?” मनुष्यास जेव्हा आत्मज्ञान होते, त्यानंतरही चंचल आणि अस्थिर जगामध्ये त्यास राहावे लागते. अशावेळी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचे ज्ञान हे कर्मामध्ये उतरले आहे की नाही हे पहावे लागेल. आत्मज्ञान कर्मामध्ये झळकले, प्रतिकूल परिस्थितीत टिकले तर ते खरे असणार ना? येथे गुरुने शिष्याला डोळ्यात डोळे घालुन विचारले आहे की, “फिरून फिरून येणाऱ्या या वृत्ती सर्वसंगपरित्यागी लोकांना देखील चुकत नाहीत. मग कोणत्याही भौतिक पदार्थांचा त्याग न केलेल्या, राजवाड्यात राहणाऱ्या, राजवस्त्रे घालणाऱ्या तुझ्यासारख्या राजाने त्या वृत्ती त्यागल्या आहेत हे कसे जाणावे? ” कृष्ण देखील गीतेमध्ये एकेठिकाणी अर्जुनाला असेच म्हणतो “प्रज्ञावादांश्च भाषसे.”

अष्टावक्र हे प्रश्न का विचारतात हे आपल्याला समजून घेतले पाहिजे. बोधमार्गात पायऱ्या नसतात. कर्मयोगामध्ये वृत्तींना सातत्याने शोधित केले जाते( स्वच्छ केले जाते) तर राजयोगामध्ये वृत्तींचा सातत्यपूर्ण निरोध केला जातो.
चेतनेवरची आवरणे हलके हलके दूर केले जातात. त्यानंतर जागृत झालेले अंतःकरण हे जणू आत्म्याचा दूत म्हणून काम करू लागते. चित्त हे आत्म्याचा आवाज होऊन जाते आणि त्यामुळे व्यक्तीच्या साक्षी असण्याचे पुरावे समोर येऊ शकतात.

कर्ममार्गात शोधन आणि योगमार्गात अवरोध केला जातो. मात्र बोधमार्गात आरोहण घडत असते. म्हणूनच बोधमार्गामध्ये एक महत्वाची अडचण निर्माण होते, ती म्हणजे आत्मज्ञान नसते तेव्हा कल्पनेने अज्ञानाचे खड्डे भरून काढले जातात. स्वतःच्या कल्पनेतच आपण “आत्मनिष्ठ” झालो आहोत, असे साधकाला वाटू लागते.
साधक जीवनाच्या एका विशिष्ट उंचीवर, चेतनेच्या एका विशिष्ट उंचीवर, काही क्षणांसाठी जाऊन आलेला असतो. अनेकदा, तो तेथे टिकून राहू शकत नाही. मात्र त्याला आपण अजूनही त्याच स्तरावर आहोत अशी भ्रांती सातत्याने होत राहते. यातूनच खंडित व्यक्तित्वाचा उदय होतो.

बाहेर दिसणाऱ्या व्यक्तित्वाचे, व्यवहाराचे पैलू आणि आंतरिक व्यक्तिमत्व यामध्ये अनेकदा अंतर पडलेले असते. मात्र अनुकूल काळामध्ये ते स्वतः साधकालाही लक्षात येत नाही. प्रतिकूलतेच्या पायरीवर गेल्यानंतर आपण भ्रांतीमध्ये जगत आहोत की प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त केले आहे हे समजते.

उत्तर देताना राजा जनक सहा सूत्रांमध्ये शांतपणे आपल्या अवस्थेची माहिती देतो. अहंकारा शिवाय वस्तुस्थिती जेव्हा सांगितली जाते तेव्हा तो बोध बोलत असतो. बोधाखेरीज बोलणाऱ्या मनुष्यांची प्रकृती अहंकाराशी जोडलेली असते. अहंकाराला स्वतंत्र अस्तित्व नसते. त्याला अस्तित्वासाठी प्रकृतीचे विकार लागत असतात.
त्यामुळे बोलणारा अहंकारातून बोलत आहे की बोधातून बोलत आहे हे ज्ञानी माणूसच समजू शकतो! प्रकृती ही वृत्तींच्या माध्यमातून चक्रवत् सुरू असते. क्रोध येतो मनुष्य क्रोधाविष्ट होतो, लोभ येतो मनुष्य लोभी होतो. ममत्व येते मनुष्य मायाळू होतो! हे होणे अहंकारासोबत साकारते!

यामध्ये द्रष्टा भाव नसतो. अहंकार विकाराच्या आधाराने प्रकृतीच्या अधीन होतो. मात्र जेव्हा ज्ञान बोधाच्या सहाय्याने द्रष्टा भाव धारण करून बोलू लागते, तेव्हा ते आत्मज्ञान ठरते! काळ्या मेघांनी आच्छादलेले आकाश मलीन भासते, तशी माझी राजवस्त्रे, विलास धुमवत् आहे, मी मात्र आकाशासारखा निर्लेप आहे, असे म्हणणाऱ्या जनकाने सांगितलेली सहा सूत्रे पुढील भागात.

राजा जनकाला अष्टावक्र विचारतात की, तू बुद्धीने नाहीतर बोधाने बोलत आहेस हे कसे जाणावे? त्यातही ते हा प्रश्न थेट विचारत नाहीत. तर वेगळ्या मार्गाने विचारतात. त्यावेळी आपण आत्मज्ञानाने परीपूर्ण झालेलो आहोत, हे सहा सूत्रांमध्ये जनक सांगतो. ही सहा सूत्र म्हणजे आत्मज्ञानी व्यक्ती स्वतःचेच वर्णन अहंकाराचा लवलेशही न बाळगता कशा पद्धतीने करून देऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण आहे. पहिल्या सूत्रात राजा जनक म्हणतो की, संसाराला स्वतःच्या मनामध्ये धारण करणाऱ्या लोकांसोबत, संसाराशी केवळ लीला म्हणून नाते ठेवणाऱ्या आत्मज्ञानी व्यक्तीची तुलना कशी बरे होऊ शकेल? या सूत्रामध्ये राजा जनक लीला आणि माया या दोन बाबींमधील भेद दाखवितात. लीला ही सकारात्मक असते, विधायक असते, विवेकी असते तर माया ही मोह वासना अहंकार यांच्या मागे भरकटत जाते. अहंकाराला दुखावणाऱ्याचा द्वेष करणे. विरोधी परिस्थितीत क्षुब्ध राहणे आणि अनुकूल परिस्थितीत शंकाग्रस्त राहणे ही मायेची लक्षणे आहेत. तर लीला म्हणजे बाह्य प्रकृती आणि आन्तरिक प्रकृती यांचे एकमेकांशी चाललेले आदान-प्रदान हे प्रकृती गत आहे हे जाणून असणे. त्यापासून अलिप्त राहणे. ज्यावेळी बाह्य प्रकृतीचा विचार केला जातो तेव्हा ती पंचमहाभूतांनी तयार झाली आहे आणि अत्यंत भौतिक आहे असे आपण जाणतो. मात्र त्याच वेळी भावना, बुद्धी, विचार या आपल्या आंतरप्रकृतीचे पदार्थगत स्वरूप आपण लक्षात घेत नाही. ते काहीतरी वेगळे आहे, विशेष आहे, भौतिकापेक्षा भिन्न आहे असे आपल्याला वाटत असते. परंतु तीदेखील प्रकृतीच आहे. सूक्ष्म असली तरी पांचभौतिकच आहे!
त्यामुळे विचार, भावना म्हणजे एका प्रकृतीचे दुसऱ्या प्रकृतीला दिले जाणारे प्रतिसाद आहेत हे जाणणे ही बोधाकडे जाणारी पहिली पायरी आहे. त्याच प्रकृतीच्या अत्यंत शेवटच्या अशा तुकड्याने, म्हणजेच ‘साक्षीभावाने’ या देवघेवीला बघणे जेव्हा घडते, तेव्हा त्या व्यक्तीची बोधाकडे वाटचाल सुरू होते. यातही ही साक्षी भावना देखील प्रकृतीचाच ‘परिष्कृत’ झालेला ‘एक तुकडा’ आहे हे सतत ध्यानात ठेवावे लागते. आता हे सगळे जोपर्यंत आपण शब्दांनी जाणून घेत आहोत, बुद्धीने जाणून घेत आहोत, तोपर्यंत त्याचे स्वरुप हे पदार्थगतच राहते.

मग बोध म्हणजे पुन्हा नेमके काय किंवा साक्षी भावाच्याही पलीकडे असणारा द्रष्टा भाव जागृत होतो, ते म्हणजे नेमके काय हा प्रश्न पडतो. शास्त्रकार म्हणतात की हे अनुभूतीने जाणून घ्यावे लागते. म्हणूनच जेथे शब्दांची मर्यादा संपते तेथून पुढच्या वाटचालीला शास्त्रामध्ये ‘अनिर्वचनीय’ अशी संज्ञा आहे. गुळाची गोडी एखाद्या मुक्या माणसाने चाखली, तरी तिचे वर्णन तो करू शकत नाही आणि जरी त्याने ते केले तरी गुळ न खाल्लेल्या व्यक्तीला ते समजू शकत नाही. असे काहीसे बुद्धीच्या पलीकडे विकसित होणाऱ्या बोधाबाबत म्हणता येईल.

दुसऱ्या सूत्रामध्ये जनक म्हणतो, की ज्या पदाची इच्छा इंद्रासारख्या सर्व देवताही करीत असतात, त्या पदावर आसनस्थ झालेले योगी किंचितही हर्ष प्रकट करत नाहीत.

या दुसऱ्या सूत्रामध्ये मनुष्य आणि सर्व देवता यांनी स्वीकारलेले एक तथ्य जनक सांगतो. ते तथ्य म्हणजे मुक्ती आणि शांती हे जीवाचे अंतिम ध्येय आहे. स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवता देखील अस्वस्थ, बेचैन असतात ते म्हणजे मुक्ती आणि शांती मिळावी यासाठीच! बाह्य उपायांनी उपायांनी सुख शांती तात्पुरते मिळवली जाते. अगदी स्वर्गातील देवता देखील सुख, कला, विलास या माध्यमातून अस्वस्थतेपासून मुक्ती मिळवत असतात आणि शांती कडे जात असतात. मात्र ही सुख शांती क्षणभंगुर असते. एकदा का त्या सुखाची भौतिक शरीराद्वारे अनुभव घेण्याची मर्यादा संपली की, त्या सुखाचा नाश होतो. जनक येथे म्हणतात ज्या शांतीसाठी, मुक्तीसारही सर्वजण एवढे अस्वस्थ असतात, त्या शांतीचे परमपद ज्या योग्यांनी प्राप्त केले आहे, ते मात्र हर्ष प्रकट करतांना कधीही दिसणार नाहीत. कारण प्रकृती द्वारा प्रकट होणारा हर्ष हा क्षणिक असतो. तर बोधने प्राप्त झालेला आनन्द हा कालातीत असतो.

तिसऱ्या सूत्रामध्ये जनक म्हणतो, जो आत्मतत्त्व जाणणारा तज्ञ आहे त्याला पाप आणि पुण्य या दोन्हीचा हे स्पर्श होत नाही. जसे आकाश धुराने भरलेले दिसतअसले तरी आकाशाला धुराचा स्पर्श होत नाही.

येथे जनक एक महत्त्वाची गोष्ट सांगतात ती म्हणजे विधि-निषेध, काम्य-अकाम्य, विहित-अविहीत या प्रकारची कर्मे ही प्रारब्धाच्या गतीने बांधल्या गेलेल्या सामान्य संसारी व्यक्तीसाठी असतात.

जो आत्मज्ञानी झालेला आहे, अशा व्यक्तीसाठी या गोष्टी विशेष महत्वाच्या रहात नाहीत. ज्याप्रकारे आकाश हे काही काळापुरते धुराने भरते परंतु धूर निघून गेल्यानंतर पुन्हा एकदा निरभ्र होते! आवरण घातलेले असताना देखील कोणत्याही प्रकारे बाधित होत नाही. त्या आकाशासारखे आत्मज्ञानी व्यक्तीचे झालेले असते. तो पूर्णपणे अलिप्त होऊन संसारातील सर्व क्रिया पार पाडतो. येथे जनकाने आपण योगी असून देखील राजवस्त्रे का धारण करतो राजोचित का वागतो आणि तशा सर्व विलासामध्ये राहून देखील आपण अलिप्त कसे आहोत हे स्पष्ट केले आहे.

जनकावर आश्रमातील साधक हे टीका करीत असत, त्याला राज्याचा मोह आहे असे म्हणत असत. या आक्षेपांना स्पष्टपणे जनक उत्तर देताना दिसतो. यासाठीच तो आकाश व धुमाचे उदाहरण देत आहे.

टीप – या सर्व बाबींचे विवेचन करताना गीतेतील “क्षेत्र-क्षेत्रज्ञ न्याय”, आदिशंकराचार्यांची ”अपरोक्ष-अनुभूती’, ज्ञानेश्वरी मधील ”परा-अपरा” प्रकृतीची उदाहरणे देण्याचा वारंवार मोह होत राहतो. मात्र अष्टावक्रगीता ही कालानुक्रमे या सर्वांपेक्षा खूप आधीची असल्याने, नंतरच्या शास्त्रातील उदाहरणे देणे शास्त्रसंमत ठरत नाही. म्हणून केवळ उल्लेख करून आजचे विवेचन थांबवते.

राजा जनकाची उरलेली तीन सूत्रे जाणून घेण्याआधी आपण जनकाच्या बोधाविषयी थोडे अधिक जाणून घेऊया. अष्टावक्रांनी जनकाला हे प्रश्न साधनेच्या सुरुवातीला विचारले. त्यानंतरही अनेकवेळा जनकाला या प्रश्नांचा सामना करावा लागला आहे. कारण तो सरधोपट मार्गाने चालला नाही. साधारणपणे बोध झाल्यावर, ज्ञान मिळाल्यावर, मुक्ती प्राप्त झाल्यावर, वैराग्य प्राप्त झाल्यावर मनुष्य कर्मा पासून निवृत्त होतो असेच सार्‍यांनी पाहिले होते!

त्यामुळे आश्रमात राहून, ज्ञान प्राप्त झाल्यावर, पुन्हा एकदा राजाची वस्त्रे घालून जनक निघाला, तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. राजमहालातील सुखे भोगावयाची होती, तर दीक्षा का घेतली असे प्रश्न निर्माण झाले.

राजा जनक राजमहालात गेला. तेथील जीवनात व्यग्र झाला. ते पाहून आश्रमातील बंधूंना प्रश्न पडत. ज्या वातावरणामध्ये जनक गेला आहे त्या वातावरणामध्ये त्याला आपला नि:संग निर्लेप बोधाचा स्वभाव कायम राखता येत असेल का? आजूबाजूला असलेली आकर्षणे त्याला मोहात पाडत नसतील का? सत्तेची नशा असते आणि त्यातच राहून बोधाचा मार्ग अनुसरणे हे कसे जमत असेल? एक कथा सांगितली जाते. राजा जनक अष्टावक्रांकडून अनुग्रह घेऊन पुनश्च एकवार राजपाठाच्या कामाला लागला. त्यांच्यासोबत साधना केलेला गुरुबंधू, संन्यासी एकदा त्याच्याकडे कडे गेला. दिवसभर जनकासोबत घालवला. जनक राजोचित विलासांचा उपभोग घेत असलेला त्याला दिसला. शेवटी त्याने जनकाला विचारले की या सगळ्या वातावरणामध्ये तू बोधाचे अमृत कसे सुरक्षित ठेवतोस? तेव्हा जनकाने रात्री त्या साधूची आपल्या मंचकावर झोपण्याची व्यवस्था केली. मऊ परांच्या बिछान्यावर झोपल्यानंतर साधूने सहज वर बघितले. तो दचकला. कारण बरोबर छातीच्या वर एक तलवार टांगलेली होती. ती तलवार एका दोऱ्याने छताला बांधलेली होती. तुळईला बांधलेली ती तलवार कोणत्याही क्षणी आपल्या अंगावर पडू शकेल, या भयाने साधू रात्रभर झोपला नाही. पहाट होताच तो जनका कडे गेला आणि म्हणाला अरे ती तलवार का टांगून ठेवली आहेस? ते ही दोऱ्याने? अशाने मंचकावर झोप कशी येणार तुझ्या? त्या साधूला जनकाने जी उत्तरे दिली तिच या तीन सूत्रांमध्ये मांडलेली आहेत. जनक म्हणाला, “आपल्याला बोधाच्या मार्गावर चालताना जड संसार सहजगत्या दूर सारता येतो. कारण पंचमहाभूतांमधून निर्माण होणारे विकार, त्यांचे स्वरूप, त्यांच्या वृत्ती ह्या सहजपणे पकडीत येतात. मात्र ज्यावेळी जड, चैतन्याचे मायावी रूप घेऊन फसवण्यासाठी येते, त्यावेळी ती तलवार कामाला येते. जी सातत्याने सांगते की “तू जो विचार करत आहेस, ज्या भावना तुझ्या मनामध्ये उदित होताना दिसत आहेत, त्या माझ्या आहेत असे तुला वाटत आहे. हे विचार शाश्वत आहेत असे वाटत आहे! असे सर्वच त्या जड तलवारीने क्षणार्धात नाहीसे होऊ शकते. कारण तुझ्या पंचमहाभूतांच्या शरीरा प्रमाणेच तुझे विचार, भाव, अस्मिता, अहंकार सर्व जड आहे. शरीरा सोबतच नष्ट होणारे आहेत, हे लक्षात ठेव.”

चौथ्या प्रकरणाच्या शेवटच्या तीन सूत्रांमध्ये, जनक हेच सांगत आहे. मात्र सूत्रे ही घनीभूत असतात. त्यांना समजून घेण्यासाठी ज्याने सांगितली त्याच्या जीवनातील उदाहरणे उपयुक्त ठरतात. जनक म्हणतो की ज्याने आत्मरुप जाणले त्याने सगळे ब्रह्मान्ड जाणले. त्याने इच्छा आणि अनिच्छा दोन्हींचा त्याग करण्याचे सामर्थ्य मिळवलेले असते. त्याला आता कसलेही भय नसते. ही सगळी सहा सूत्रे निरंतर बोध मार्ग कसा चालत रहावा याची मार्गदर्शक सूत्रे आहेत. एकत्रितपणे त्यांचे सार असे होईल चैतन्याचा शोध घेण्यासाठी, सतत जडाची जाणीव राखणे आवश्यक आहे. मायेच्या आवरण व विक्षेपाने जड कधीकधी चेतन भासते. तेव्हा त्याचेही सतत निराकरण करत राहणे म्हणजे बोधमार्ग होय. आपल्यात काय चेतन नाही,ते जाणत राहिले की सत्याचे ऋतात रूपांतरण होते. म्हणजेच बोध!

 

1 Comment

  1. फारच सुंदर खुप मोठी सविस्तर माहिती दिली आहे *

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s