तिचा सांस्कृतिक वारसा – आम्ही मैत्रिणी

स्त्रीजीवन सुंदर व समृद्ध करणारा सांस्कृतिक वारसा …

मैत्रिणींना एकत्र आणणाऱ्या अनेक परंपरा आहेत. त्यापैकी एक आहे वटपौर्णिमा. घराच्या, शेजारच्या सख्या मिळून जवळच्या वडाच्या झाडाला जातात. आपापले पूजेचे साहित्य घेऊन, गप्पा मारत तिथे पोचतात. वडाची पूजा करून, सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून मनोमन प्रार्थना करतात. विश्वशक्तीकडे पाठवलेली ही एक शुभेच्छा. वडाला प्रदक्षिणा घालून, नमस्कार करून पुन्हा गप्पा गोष्टी करत सख्या घर गाठतात. तसेच हरतालकेची पूजा असो, नागपंचमी असो किंवा नवरात्रीत देवीची ओटी भरायचे निमित्त असो, मैत्रिणींनी एकत्र मिळून साजरं करण्याची पद्धत आजही आहे. भेटीगाठी झाल्या, गप्पा-गोष्टी झाल्या की परत घरी. मग आहेच परत रोजचे रुटीन.

मागे मी एक वडाचे रोप कुंडीत लावले होते. ३-४ वर्षांनी छान १०-१२ फुट उंच वाढल्यावर घराजवळच्या रस्त्यावर लावले. आपलं घरातलं प्रेमाने वाढवलेलं झाड, असं रस्त्यावर लावतांना जीव थोडा थोडा झाला. झाड सुरक्षित राहील ना? कोणी तोडणार तर नाही? काही दिवस त्याची पाण्याची सोय? खूप प्रश्न मनात आले, पण त्या वृक्ष होऊ घातलेल्या झाडाला कुंडी कशी पुरणार? शेवटी एका वटपौर्णिमेच्या सकाळी, रस्त्यालगत झाड लावले. संध्याकाळी पाहते तर ते झाड छान नटून बसलं होतं. त्याच्या पायाशी फुलांचा ढीग, अंगाभोवती सूत, हळद-कुंकू वाहिलेलं रुपडं पाहून मन भरून आलं. इतके दिवस फक्त माझं असलेलं झाड आता गल्लीतल्या सगळ्या स्त्रियांचे होतं. वटपौर्णिमेच्या परंपरेने मला वडाची काळजी वाहणाऱ्या काही मैत्रिणी मिळाल्या. असा हा मैत्रिणी जोडणारा सण. 

अशीच अजून एक परंपरा आहे – तुळशी विवाहाची. तुळशीच्या रोपाला, घरातली कन्या मानायची प्रथा आहे. कार्तिकी शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या चार-सहा दिवसातला मुहूर्त निवडून, तुळशीचा कृष्णाशी विवाह लावायचा. गोरज मुहूर्तावर, उसाच्या मांडवाखाली, तुळशीचे वृंदावन सजवायचे. हिरवा शालू आणि चुडा घालून नटलेल्या  तुळशी सोबत गोपाल कृष्णाची मूर्ती ठेवायची. संध्याकाळी आजूबाजूच्या मैत्रिणी मिळून, तुळशीचे आणि कृष्णाचे लग्न लावतात. मंगलाष्टके म्हणून वधू-वरावर अक्षता टाकतात. संध्याकाळच्या वेळेला, लग्नासाठी आवरून मैत्रिणीच्या घरी जाणे आणि छान गाणी म्हणून, कार्यक्रमाचा आनंद घेऊन परत येणे.     

तशीच परंपरा आवळी भोजनाची. दिवाळी नंतर, कार्तिक शुद्ध अष्टमी पासून पौर्णिमेपर्यंत एकत्र मिळून करायचे भोजन. आवळ्याच्या झाडाची पूजा करून, त्याच्या जवळ दिवे लावून त्याच्या खाली बसून एकत्र भोजन करणे. खेळ खेळणे आणि गाणी म्हणणे. आयुर्वेदात, भविष्य पुराणात घराजवळ लावायाची झाडे सांगितली आहेत. त्यामध्ये आवळा लावण्यास आवर्जून सांगितले आहे. साधारणपणे आवळ्याच्या झाडाची पूजा घरातील ज्येष्ठ पुरुषाने करायची पद्धत आहे. पण दुपारी झाडाखाली बसून जेवणे हे बायका-पोरांकडे. घराच्या, शेजारच्या मैत्रिणी जमवून, झाडाखाली जेवण. मग झाडाखाली शतपावली घालणे, आणि दुपार कलतांना झाडाची आंबट-तुरट फळे खाणे. आवळीभोजन, कांदेनवमीचे जेवण किंवा भोगीचे जेवण अशा काही ना काही कारणाने मैत्रिणींनी मिळून एकत्र जेवणाचा कार्यक्रम होतो.

हळदी कुंकूचे कार्यक्रम तर अजून विशेष. चैत्रातले, श्रावणातले, गौरीचे, लक्ष्मीपूजनाचे, संक्रांतीचे … काही ना काही  निमित्ताने एकमेकिंकडे जाणे. त्यातही प्रत्येक हळदी कुंकूचे वैशिष्ट्य वेगळे! चैत्रात गौरीची सजावट, कैरीचे पन्हे आणि कैरीची डाळ. त्याने शिणच जातो उन्हाचा! लक्ष्मीपूजनाच्या हळदी कुंकवाला लाह्या आणि बत्तासे. श्रावणात साखर फुटाणे. संक्रांतीला तिळगुळ आणि वाण! प्रत्येक हळदी-कुंकूला जायचे ते छान पोशाख करून. गेल्यावर गजरा, अत्तर, गुलाबपाण्याने स्वागत होते. होस्टेसला आपले कलागुण विविध पदार्थातून, सजावटीतून, रांगोळ्यातून दाखवयला वाव. आपल्याच वयाच्या नाही, तर लहान मोठ्या सर्व वयोगटातील बायकांशी संवाद होतो. एरवी एकमेकींना “कधीतरी भेटू ग नक्की!” असे आपण म्हणतो खरे. आणि वर्ष निघून गेले तरी दोघींना जमेल अशी वेळ काही येत नाही. पण “अमुक तारखेला संध्याकाळी हळदी कुंकू आहे” असे आमंत्रण गेले की आपोआप भेट जमून येते!

तर अशा विविध celebrations चा वारसा स्त्रीचे जीवन मैत्रीच्या सुगंधाने भरून टाकतो!

– दीपाली पाटवदकर

1 Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s