भारतीय दर्शन परिचय – जागृती, स्वप्न, आणि सुषुप्ती

फिलॉसॉफीच्या तासाला आमच्या शिक्षकांनी सांगितले आज प्रश्न उत्तरांचा खेळ खेळूया! कोणी कोणताही प्रश्न विचारला तरी उत्तरे  कालच्या तासाला जे शिकवलं त्याला धरून द्यायची! कालच्या तासाला “जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या जीवाच्या तीन अवस्था” शिकवून झाले होते. त्याला धरूनच उत्तरे सुरू झाली.

राखीने पहिला प्रश्न विचारला, “आपल्या सगळ्यांना चित्रपट, साहित्य आणि नाटके इतकी का आवडतात?”
सेल्वराज म्हणाला, “जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांमध्ये जीव मायेच्या आवरणाखाली असतो. मात्र आनंद मिळण्यासाठी साक्षित्व महत्त्वाचे! आणि ते आपल्याला चित्रपट बघताना,साहित्य वाचतांना अनुभवता येतं.”
शिवांगी त्याला जोडूनच म्हणाली, “स्वप्न चालू आहे आणि त्याचबरोबर आपण जागृत देखील आहोत, ही अनुभूती आपण नाट्य साहित्यात घेतो. आणि सुषुप्तीच्या पातळीवर ते समजून देखील घेत असतो”
रोहन म्हणाला,”साहित्यात, काव्यांत मिनिटा मिनिटाला घटना बदलतात. तेव्हा प्रतिसाद प्रतिक्रिया देणारी आपलीच बदलती चेतना आपण आपल्यातच अनुभवतो!”
या उत्तरांनी आमचे सर खूप आनंदित झाले! चला तर जाणून घेऊ जीवाच्या तीन अवस्था काय आहेत ते …
जागेपणी आपण जे जग अनुभवत असतो ती असते जीवाची जागृत अवस्था! यात भौतिक जगाचा, व्यवहाराचा अनुभव येत असतो. या वेळी जीव जे काही करतो त्याला वैश्वानर रूप म्हटले जाते. म्हणजे विश्वाचा प्रतिनिधी! त्यानंतर जेव्हा शरीर मन थकून जाते, डोळे मिटू लागतात. पण तरीही मन:पटलावर जगाच्या आकृती उरतातच. यावेळी स्वप्ने पडतात. जीव या अवस्थेत तैजस या नावाने ओळखला जातो. संकल्पविकल्प, सुखदुःख यांची हवी तशी मांडणी करून जीव जागृतीत दुखावलेल्या अहंकाराच्या जखमा येथे भरून काढतो. त्यानंतर एक प्रगाढ निद्रा येते. ही सुषुप्ती होय. यात स्वप्ने नसतात. अनेकदा अतींद्रिय क्षमतांची पुसट जाणीव असते. विज्ञान, साहित्य, काव्य, शास्त्र या बुद्धिजन्य बाबी येथे आकाराला येतात. या अवस्थेत जीव प्राज्ञ म्हणून ओळखला जातो.
या तिन्ही अवस्थांमध्ये टप्प्याटप्प्याने साक्षीभाव धारण करत जाणे, म्हणजे साधना होय. हे सयंत्र तुम्ही ऐच्छिक पणे चालवत नसून, त्यात भाग न घेता देखील चालू शकते, हे कळलं की मायेचा पडदा दूर होतो आणि तुरीय या अवस्थेकडे साधक जाऊ लागतो. मात्र ही एकदाच करून संपणारी क्रिया नसते, हे दीर्घकाळ करत रहावे लागते.
अद्वैत वेदांतामध्ये ज्याला जीव उपाधी दिली जाते, साधारणपणे त्याच अर्थाने योगशास्त्रात चित्तवृत्ती ही संकल्पना मांडलेली असते. घटना प्रकृतीत घडत असतात. जेव्हा या घटनांचा कर्ता भाव जीव घेतो तेव्हा तो भोक्ता होतो. भोक्ता घटनेपासून स्वतःला वेगळे जाणत नाही. मात्र त्याने साक्षीभाव धारण केला तर तो चेतनेचा बदलणारा स्तर अनुभवू शकतो.
स्फटीकाजवळ लाल फुल ठेवले असता जसे स्फटीक लाल दिसते पण वस्तूत: असत नाही तसे जीव प्रकृती पासून स्वतःला भिन्न जाणतो आणि तो विषयरुप होत नाही. जे जाणले जाईल त्याच्या आणखी मागे जाऊन थांबतो – तोच प्रत्यगात्मा होय! त्याविषयी व पंचकोशां विषयी पुन्हा कधीतरी …
रमा दत्तात्रय गर्गे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s