ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाच्या सुरुवातीला शारदेला नमन करतांना म्हणले आहे – जी शब्दांचा नित्य नवनवीन विलास करते; जी शब्द, भाषा, गद्य, पद्य, काव्य, गीत, आवाज, श्रुती, स्वर, सूर, तान, आलाप, गायनादीने विश्वाला मोहून टाकते; जी चातुर्याची, अर्थाची आणि सर्व कलांची देवता आहे; त्या शारदेला मी नमन करतो!
आता अभिनव वाग्विलासिनि |
जे चातुर्यार्थकलाकामिनि |
ते श्रीशारदा विश्वमोहिनी |
नमिली मिया || ज्ञानेश्वरी १.२१ ||
रामदास स्वामी दासबोधाच्या सुरुवातीला शारदेला नमन करतांना म्हणतात – शारदा या वाचेच्या देवीला मी वंदन करतो. वाचेचे चार भाग मानले आहेत – परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परा – ‘मला काही सांगायचे आहे’ या उर्मीची ठिणगी. पश्यंती – जे सांगायचे आहे त्याचा अर्थ दिसतो. मध्यमा – अर्थासाठी योग्य शब्द जन्म घेतात. वैखरी – मुखावाटे शब्द बाहेर पडतात.
मनुष्याचा सगळा व्यवहार चालतो तो ‘वैखरी’ च्या शब्दावर. एखादा मनुष्य ‘शब्द देतो’ किंवा ‘सांगीतल्या प्रमाणे करायचंय’ अशी सूचना देतो किंवा भावासाठी घासाघीस करतो, वाद-विवाद करतो, संवाद साधतो, उपदेश देतो हे सर्व काही वैखरीच्या राज्यात चालते. ‘आज काय स्वयंपाक करायचा’ इथ पासून ते शासन कोणती योजना राबवणार इथपर्यंत सर्व चर्चा वैखरीच्या माध्यमातून होतात. आपल्याला व्यवहारात जी शब्दाची किंमत, शब्दाची ताकद दिसते ती शारदेच्या शक्तीची केवळ एक झलक आहे.
म्हणूनच ग्रंथ लिहितांना रामदास स्वामी वाचा शक्तीला नमन करतांना म्हणतात –
नमू शारदा मूळ चत्वारी वाचा |
संत ज्ञानेश्वर व रामदास स्वामींच्या वर्णनातील शारदा निराकार आहे. शब्दांच्या नवनवीन अविष्कारांची देवी आहे. पण आद्य शंकराचार्यांनी केलेल्या नमनात शारदेच्या रूपाचे वर्णन आहे. प्रपंचसारतंत्र या ग्रंथाची सुरुवात शारदा स्तवनाने करतांना ते म्हणतात –
अकचटतपयाद् यै: सप्तभि: वर्णवर्गैर्विरचितमुखबाहापादमध्याख्यहृत्का |
सकलजगधिशा शाश्वता विश्वयोनिर्वितरतु परिशुद्धीं चेतस: शारदा व: ||
अर्थात वर्णमालेच्या अ, क, च, ट, त, प आणि य वर्गाच्या सात मातृका किंवा सात शक्ती या शारदेचे मुख, दोन बाहू, दोन पाय, मध्यभाग व हृदय आहेत. संपूर्ण जगाची अधिश्वरी, सकल जगन्माता, शाश्वत शक्ती असलेल्या शारदेला मी नमन करतो.
या स्तवनात शारदेला मानवी रूप दिले आहे. आवाजाच्या सात शक्तींचे मानवी रूप. Sharada is the personified form of Sound Energy. शारदेचे रूप प्रकट केले आहे वर्णमालेने.
भारतीय लिपींच्या अक्षरांची वळणे जरी वेगळी असली तरी त्या सर्वांमध्ये खालील ७ वर्ग आहेत.
अवर्ग – अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:
कवर्ग – क, ख, ग, घ, ङ
चवर्ग – च, छ, ज, झ, ञ
टवर्ग – ट, ठ, ड, ढ, ण
तवर्ग – त, थ, द, ध, न
पवर्ग – प, फ, ब, भ, म
यवर्ग – य, र, ल, व, श, ष, स, ह
या सात वर्गांतून आवाजातील शारदा अक्षर रूपाने प्रकट होते. अक्षराची व्याख्याच अशी केली आहे – “न क्षरती इति अक्षर:” जे मिटत नाही, संपत नाही – ते अक्षर! जे शब्द हवेत विरून गेले असते त्यांना अक्षरांनी दगडात कोरून अमर केले! आकाशाच्या गुणाला अक्षरांनी पृथ्वीवर गोंदले. ज्या आवाजाला रूप, रस, रंग, गंध नव्हते त्या आवाजाला दिलेले रूप म्हणजे अक्षर. A Form given to Sound!
“अरुपाचे रूप दाविन” असे म्हणून वाग्देवता – सरस्वती, ब्राह्मी, शारदा, मैथिली, सिद्धमातृका, गुरुमुखी, नागरी, पल्लव, ग्रंथ आदी लिपींचे रूप लेवून पुस्तकातून अवतरली! त्या शारदेला आज वसंत पंचमी निमित्त वंदन करूया!