शिवपार्वती

इतक्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ किंवा खरेतर ‘व्हॅलेंटाईन सप्ताह’ संपन्न की काय तो झाला! तरुणाईकरिता अगदी गजबजलेला आठवडा. ‘रोझ डे’, ‘टेडी डे’, ‘चॉकलेट डे’ वगैरे कसले कसले ‘डेज्’ झाले. ‘रोझ डे’ला गडद लाल रंगांचे गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करायचे. ‘प्रॉमिस डे’ हा प्रेमाच्या आणाभाका घ्यायच्या. ‘प्रोपोज डे’ आपल्या प्रेमाची कबुली देऊन, लग्नाची मागणी घालायची. प्रेमी युगुलांसाठी हा एक सणच म्हणा. प्रेम करणे, प्रपोज करणे नवीन का आहे? मानव पृथ्वीवर अवतरण्याच्या आधीपासून ‘प्रपोज डे’ आहे.

मानवांमध्ये, देवांमध्ये मात्र मनपसंत जोडीदाराला ‘प्रोपोज’ करणाऱ्यांमध्ये आद्य प्रेमिका आहे – उमा! हिमवान् पर्वताची कन्या पार्वती. लाडाकोडात वाढलेली राजाची कन्या! ही गिरीकन्या गिरीजा, आकंठ प्रेमात पडली! कुणाच्या? तर अंगाला भस्म लावलेल्या, व्याघ्रांबर परिधान केलेल्या, दाढी जटा वाढवलेल्या एका कफल्लक जोग्याच्या! त्याच्याशीच लग्न करायचा विचार तिचा पक्का होता. किती समजावलं तिला, कोणी राजकुमार पाहू गं तुझ्यासाठी! पण, पार्वती काही बधली नाही. तिने शिवशंकर शंभोला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या आरंभली. फक्त पाने खाऊन उपवास केले. पुढे पाने खाणेसुद्धा बंद केले, तेव्हा तिला ‘अपर्णा’ नाव मिळाले. तिने पंचाग्नी पेटवून घोर तपश्चर्या सुरू केली. आपल्या प्रेमाची प्रांजळ कबुली देणारी, स्वत: पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती आदर्शच म्हणायला हवी.

शंकर तर ध्यान लावून बसलेले. त्यांना या कशाचाच पत्ता नाही! इकडे तर इंद्रादिक देवसुद्धा वाट पाहू लागले, कधी शंकर डोळे उघडणार, कधी पार्वतीच्या तपश्चर्येला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार! पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली, “जा रे, तू तरी शंकराला ध्यानातून जागे कर. तुझ्या मदनबाणाने त्याला घायाळ कर! म्हणजे तो पार्वतीशी विवाह करायला उत्सुक होईल!” कामदेवाने त्याचा उसाचा गोड धनुष्य घेतला, भात्यात पाच प्रकारचे मदनबाण घेतले आणि कैलासावर पोहोचला. त्याने शंकरावर मदनबाण सोडताच शंकर ध्यानातून जागे झाले. डोळे उघडताच समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकराच्या लक्षात आला. आपल्याला समाधीतून उठवणाऱ्या कामदेवावर शंकर संतापले. शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला क्षणात भस्मसात केले! (शंकराचा राग उतरल्यावर, कामदेवाच्या पत्नीने रतीने, शंकराकडे क्षमा मागितली. त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जीवंत केले. कामदेवाला जिथे पुन्हा शरीर प्राप्त झाले, नवीन रूप मिळाले तो प्रांत ‘कामरूप’ या नावाने प्रसिद्ध झाला. जो आज आपण ‘आसाम’ म्हणून ओळखतो.)

आत्ता कुठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेले. तिची मागणी त्याला कळली. तेव्हा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. एका बटूचा वेश घेऊन तो पार्वतीकडे गेला आणि तिच्या पुढे शंकराला नावे ठेवू लागला. “तो काय पडला जोगी, तू तर राजकन्या, कशाला त्याच्या मागे लागतेस? त्याला राहायला न घर ना दार. कधी उठून गणांना घेऊन स्मशानात जाऊन बसेल, तर कधी कैलासात ध्यानस्थ बसेल! त्या जोग्याचा काही नेम नाही बरे का!” शंकराची निंदा ऐकून पार्वतीला फार राग आला. तिने त्या बटूला तेथून चालते व्हायला सांगितले. त्यावर शंकराची खात्री पटली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे. शंकर प्रसन्न झाला! त्याने पार्वतीला लग्नाला होकार दिला!

फार शिकण्यासारखी गोष्ट आहे ही. लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जाळून भस्म केले आहे! वासनारहित शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे हे दाखून दिले. अगदी इतक्यात घडलेली दोन-तीन जळीतकांड वाचत आहोत. ‘प्रपोज’ केल्यावर ‘नाही’ म्हटले म्हणून किंवा उपभोग घेऊन स्त्रीला जाळले गेले. अशा घटना वाचून सांगावेसे वाटते की, स्त्रीला नाही, कामवासनेला जाळायचे असते. स्वत:च्या ‘Lust’ ला जाळायचे असते. पण, हे शिकवणार कोण? शिवपुराणातील ही शंकराची कथा हे शिकवण्यासाठीच लिहिली आहे. लहानपणापासून पुराणातील या गोष्टी सांगितल्या-ऐकल्या तर संस्कार होतील आणि याचसाठी आपले पौराणिक ग्रंथ व कथा ही पुराणातली वानगी नाहीत, तर आजही ‘रिलेव्हन्ट’ आहेत. त्यातील धडे आजही गरजेचे आहेत.

शंकराने विवाहाला होकार देताच सगळीकडे आनंदी आनंद झाला. लग्नाची तयारी झाली. पार्वतीचे आई-वडील आलेत. विवाहाला स्वत: ब्रह्म पुरोहित म्हणून आला आहे. गंधर्व नवीन जोडप्यावर आकाशातून पुष्पवृष्टी करत आहेत. मंगल वाद्ये वाजत आहेत. वधू-वर दोघेही किंचित संकोचलेले आहेत. शंकर एक पाय गुडघ्यात वाकून उभा आहे. अधोवदना पार्वती पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत आहे आणि वधूचा हात वरच्या हातात द्यायच्या ऐवजी, चक्क शंकराचा हात पार्वतीच्या हातात दिला आहे! चुकलं का काही पुरोहिताचे? की पार्वतीने लग्नात शंकराचा हात मागितला असे सुचवायचे आहे?

प्रेमळ जोडपे कसे असावे याचे धडेच शिव-पार्वतीने घालून दिले आहेत. शंकर उगीच फोनमध्ये किंवा पेपरमध्ये डोके खुपसून बसणारा किंवा लग्नाच्या आधी गणांसोबत रमायचा तसे तासन्तास त्यांच्यात रमणारा नवरा नाहीये. पार्वती पण आपल्या माहेरच्या वैभवाचे गुणगान करणारी बायको नाही. दोघे एकमेकांना वेळ देतात. गप्पागोष्टी करतात. आपल्या मनातील गुज सांगतात. एकत्र फिरायला जातात. कित्येक कहाण्यांची सुरुवात ही ‘एकदा काय झालं? शंकर पार्वती विमानातून जात होते’ अशी होते. इतकंच काय, दोघे मिळून सारीपाटाचा डावसुद्धा खेळतात. एकदा सारीपाट खेळताना शंकर सारखा जिंकला, तेव्हा पार्वती खट्टू झाली. मग शंकर एक डाव मुद्दाम हरला, त्या डावात पार्वतीने त्याचा नंदी जिंकून घेतला आणि आपल्या सख्यांकडून तिने नंदी आणवून घेतला!

Image result for shiva parvati playing dice

लक्षात घेण्यासारखे आहे बरे, पार्वती कधीच एकटी नसते. तिच्याबरोबर कायम तिची सखी असते. सखी-पार्वती अशी जोडगोळीच आहे. तिच्या बरोबर तिच्या मैत्रिणी असतात. ‘माझे मूड, माझ्या स्त्रीमनातील तरल संवेदना’ वगैरे नवऱ्याने समजून घेतल्याच पाहिजेत, असा तिचा आग्रह नाही. शॉपिंगला नवऱ्याने आलेच पाहिजे, अशी तिची अपेक्षा नाही. अशा तिच्या गरजा पण नाहीत. कारण, तिला मैत्रिणी आहेत. जीवाभावाच्या, साथ देणाऱ्या, तिच्या तक्रारी ऐकून घेणाऱ्या, उपाय सुचवणाऱ्या आणि तिची चूक असेल तर ती चूक दाखवून देणाऱ्यासुद्धा.

आता संसार म्हटला की, भांडणे आलीच! शंकर-पार्वती असले म्हणून काय झालं? एकदा काय झाले, रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला. पण द्वारपालांनी त्याला अडवले. ‘अंदर की बात’ अशी की, शंकर-पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते. पार्वती रुसली होती. रागावून, तोंड फिरवून बसली होती. आता तिथे रावणाला कसे पाठवणार? पण रावणाला आला राग. तो म्हणाला, “मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो!” रावण कैलास तोलू लागला. पर्वत हलायला लागला. पशुपक्षी, यक्ष-गण सगळे घाबरून सैरावैरा पळू लागले. पार्वती पण घाबरली. पण भांडण झालंय, मग शंकराला कसे बिलगणार? म्हणून दुरूनच तिने शंकराच्या हाताला धरले आहे आणि शंकर स्थितप्रज्ञपणे आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाबतो. त्या भाराने रावण चिरडला जाऊ लागतो. त्याचा अहंकार गळून पडतो. त्यावर रावण शिवतांडव स्तोत्र गाऊन शंकराची स्तुती करतो. शंकर त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतो!

design 2_1  H x

शिव-पार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात चढउतार पण आलेत. आता हा गंगावतरणाचाच प्रसंग पाहा. आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे. गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही, म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभा आहे आणि सवत आणली की काय, या विचाराने खिन्न होऊन तिथून काढता पाय घेणारी पार्वती. शंकर एका हाताने तिला थांबवत जणू म्हणत आहे, “अगं, जाऊ नकोस. तू समजतेस असे काही नाही! या भगीरथासाठी गंगेला जटेत झेलत आहे इतकेच!”

शंकराचा राग, संताप, तिसरा डोळा उघडणे, पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणांगणासाठी राखीव आहेत. ‘ऑफिसचा स्ट्रेस’ घरी आणून बॉसचा राग तो बायकोवर काढत नाही. घरी तो अतिशय शांत, सुस्वभावी, प्रेमळ आणि भोळा नवरा आहे. संसारात, मुलाबाळात रमणारा गृहस्थ आहे. एखाद्या रविवारी सकाळी जर पार्वतीने “अहो! किती रद्दी साठली आहे, तेवढी टाकून येता का?” असे म्हटले तर तो शांतपणे, “येताना भाजी आणायची का?” असे विचारून रद्दीची पिशवी घेऊन जाईल! शंकर-पार्वती आणि त्यांची दोन मुले हे चौकोनी कुटुंब आहे. अशा कुटुंबवत्सल शंकराचे वर्णन करताना संत कृष्णसुत म्हणतात-

गणूबाळ खेळे लडिवाळ,

धरुनी मृदू गाल, चुंबना घेई

ते कौतुक पाहुनी हासे अंबाबाई

श्रीसांब जगादिस्तंभ, गौरी हेरंभ जयाच्या अंकी

उद्धार करा मी, रुतलो या भवपंकी

या दैवी जोडप्याच्या संसारात, पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते. जसे, समुद्रमंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रकट झाले, तेव्हा सर्व देवांनी शंकराकडे धाव घेतली. शंकराला म्हणू लागले काहीतरी करून जगाला संहारापासून वाचव! तेव्हा शंकराने हलाहल पिण्याचे ठरवले. पार्वतीने त्याला सावध केले, विरोध केला. तरीही शंकराने हलाहल प्राशन केलेच. तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पट्कन त्याचा गळा धरला. पार्वतीच्या या प्रसंगावधानाने ते विष शंकराच्या कंठात राहिले. त्याचा कंठ विषाने काळानिळा झाला. कर्पुरासारख्या गौरवर्णीय शंकराला ‘नीलकंठ’ नाव मिळाले. शंकर-पार्वतीचा संवाद तर दैवी आहे!

कधी पार्वतीने म्हणावे, “मला किनई आज अगदी बोअर झालंय गडे! एखादी गोष्ट सांगा ना!” की लगेच शंकराने तिला विद्याधर राजांच्या सात भल्यामोठ्या रोमांचकारी कहाण्या सांगाव्यात. त्यांच्या या संवादातून बृहत्कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहाचा जन्म होतो किंवा पार्वतीने कधी योगसाधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योगमार्गाचे ज्ञान द्यावे. या संवादातून नाथपंथाचा जन्म होतो. कधी पार्वतीने नवल करावे, इतका एकसारखा ज्याचा विचार करत बसला आहात, ते गीतातत्त्व आहे तरी काय? तेव्हा शंकराने तिचेच कौतुक करत म्हणावे, “देवी, तुझे रूप जसे नित्यनूतन असल्याने तुझा थांग लागत नाही. तसे गीतेतील तत्त्वज्ञानाचा विचार करू जावे, तर रोज नवीनच आहे असे दिसते!”

तेथ हरू म्हणे नेणीजे ।

देवी जैसे का स्वरूप तुझे ।

तैसे हे नित्य नूतन देखिजे ।

गीतातत्त्व ॥ ज्ञा. १.७१ ॥

त्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण असे जर शंकराला विचारले, तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल. शंकराच्या नावातून पण हे कळते. त्याला पार्वतीच्या नावाने ओळखले जाते. जसे, ‘गिरिजापती’, ‘उमाकांत’, ‘पर्वतीपती.’ पण, पार्वतीची मात्र स्वत:ची ओळख आहे. अंबा, दुर्गा, गौरी, उमा! ती कधी स्वत:ची ओळख, ‘मी शंकराची भार्या’ अशी करून देत नाही. पहा तर या शिल्पात शंकरदेखील हेच सुचवत आहे – शक्तीशिवाय मी अचेतन शव आहे! पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे, प्राण आहे!

सहजच भारतातील ‘व्हॅलेंटाईन डे’ हा शिव-पार्वतीच्या स्मरणाने होतो. लग्नाच्या आधी वधू गौरीहराची पूजा करते ते याकरिता की, माझा संसार शिव-पार्वतीच्या संसारासारखा होवो! लग्नानंतर पहिली पाच वर्षे नवरी श्रावण महिन्यात मंगळागौरीची पूजा करते. ते देखील यासाठी की, गौरीने प्रसन्न होऊन माझा प्रपंच नेटका करावा! पार्वती जशी शंकराच्या गळ्यातील ताईत झाली, तालिका झाली तसे पत्नीने नवऱ्याच्या गळ्यातील ताईत व्हावे, म्हणून विवाहिता दर वर्षी हरतालिकेची पूजा करते. हे सगळे आपल्याकडचे प्रेम साजरं करायचे ‘डेज’ आहेत. सेंट व्हॅलेंटाईनच्या  कित्येक शतके आधीपासून आपल्याकडे प्रेमाचे ‘डेज्’ साजरे केले जात आहेत. या ‘डेज्’ ना शिव-पार्वतीच्या कथेची पार्श्वभूमी लाभली आहे.

शिव-पार्वतीच्या कथेला फक्त संसारिक, प्रापंचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक जोड आहे. शिव-पार्वती नुसतेच ‘प्रपोज’ करायला शिकवत नाहीत, तर ‘प्रपोज’ करणाऱ्याची/करणारीची परीक्षा घ्यायला शिकवतात. ‘प्रपोज’ करणारा/करणारी परीक्षेत पास झाली तरच ‘हो’ म्हणायचे हे शिकवतात. नुसतेच ‘एकमेकांवर प्रेम करत फिरा,’ असे शिकवत नाहीत, तर ते विमानातून फिरताना कोणी दु:खी कष्टी दिसले, तर तिथे थांबून त्याची चौकशी करून त्याला मदत करायला शिकवतात. नुसतेच लग्न करायला शिकवत नाहीत तर ते निभवायला शिकवतात. नवरा – बायकोची बरोबरी शिकावात. “गप गं! तुला काय कळते यातले!” असे न म्हणता बायकोचे ऐकायला शिकवतात आणि नवरा-बायकोचे अद्वैत शिकवताना दोघांना पुरुष-प्रकृतीच्या पातळीवर घेऊन जातात.

  • दीपाली पाटवदकर

2 Comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s