एखाद्या समारंभामध्ये एकमेकांना अपरिचित वाटणारे असे चार सहा जण एकत्र यावेत आणि गप्पा मारता मारता त्यांना कळावे कि ते सारेच परस्परांचे जवळून दुरून असे नातेवाईकच आहेत. मग त्यांच्या समान विषयांवर गप्पा व्हाव्यात.तसे काहीसे वारकरी नाथपंथ महानुभव पंथ वीरशैव या साऱ्यांचा अभ्यास करताना ध्यानात आले!
शिव आणि वैष्णव संप्रदायांविषयी अनेकदा पूर्वग्रहदूषित मते असतात. शैव-वैष्णव वाद हा खोटारड्या इतिहासकारांनी अतिरंजित करून रंगवलेला वाद आहे. मग त्यामध्ये कट्टर शैवमत आणि कट्टर वैष्णवमत असणारे लोक कसे वागतात याविषयीच्या काही गमतीदार गोष्टीही सांगितल्या जातात. जसे शंकराचे नाव तोंडात येऊ नये म्हणून कट्टर वैष्णव कपडे शिवायचे न म्हणता कपडे विष्णायाचे आहेत, असे म्हणतात. अशी उभी आडवी कट्टरता खरे तर सर्वसामान्य माणसांमध्ये नसते आणि संतांमध्येही नसत. ही फक्त ज्यांना समाजामध्ये एकसंघतेचे सूत्र शोधायचेच नाही आणि सर्वकाही परस्पर विरोधी कसे आहे ते सांगायचे आहे, अशाच लोकांमध्ये दिसते. अन्यथा शैव संतकवी शिवदास यांनी
शिव थोर विष्णू थोर
ऐसे भांडो भांडणार
आम्हीं न लागो त्या छंदा
व्यर्थ कोण करी निंदा
असे म्हटले नसते आणि समर्थ रामदास या थोर वैष्णवाने ही सर्वांगसुंदर आरती रचली नसती –
लवथवती विक्राळा
ब्रम्हांडी माळा
वीषे कंठ काळा
त्रिनेत्री ज्वाळा लावण्य
सुंदर मस्तकी माळा
ऐसा शंकर शोभे
उमा वेल्हाळा
मुळात संत द्रष्टे महापुरुष उच्च कोटीची अध्यात्मिक स्थिती प्राप्त केलेले लोक आणि सर्वसामान्य भक्त यांच्या मनामध्ये असे प्रश्नच नसतात। पंथीयअभिनिवेश हा केवळ अहंकार जोपासण्यासाठी आणि उपास्य देवता मध्ये फुट पाडण्यासाठी काही लोकांनी मुद्दाम् म्हणून तयार केलेला डाव आहे।
या सगळ्या संप्रदायामध्ये एक सुंदर नात्याचे सूत्र आहे हे सूत्र भिन्नभिन्न ग्रंथांवरून लक्षात येते ज्ञानदेव गाथा स्थळ नवनाथ कथासार हे सारे ग्रंथ आणि तत्कालीन संतांचा रचना या देखील या सर्वांचे परस्पर संबंध स्पष्ट करतात।
हे नाते आहे साधारणपणे बाराव्या शतकामधले. परंपरेनुसार वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय म्हणून ओळखला जातो।वीरशैव हा संप्रदाय शैवसंप्रदाय म्हणून ओळखला जातो ।महानुभाव पंथामध्ये एक मुखीदत्त आणि पंचकृष्णाची पूजा केली जाते.आणि नाथपंथी हे शुद्ध पारमार्थिक असे साधक असतात आणि शिव शक्ती व दत्तात्रेय या देवतांना मानतात.
परंतु या साऱ्या उपासना पंथांचे अध्वर्यू परस्परांशी संबंधित आहेत. वारकरी असलेल्या विठ्ठल भक्त नामदेव महाराजांचे गुरुविसोबा खेचर हे वीरशैव तत्वज्ञानातील महत्त्वपूर्ण गाभा “षटस्थळ” या ग्रंथाचे लेखक आहेत. त्याच ग्रंथामध्ये विसोबांनी आपण नाथपंथाच्या परंपरेचे पाईक असल्याचे त्यांनी सांगितले आहे। आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चांगदेव अशी ही परंपरा त्यांनी सांगितली आहे। याच परंपरेमध्ये गोरक्षारित्या नावाची ज्येष्ठ साधिका ही चक्रधरांची गुरु आहे। जी ज्ञानेश्वरांची भगिनी मानली जाते। आणि श्री पर्वतावरील कदलीवनात तिचा मठ आहे। चक्रधरांचे गुरु गुंडम राऊळ आणि चांगदेव राऊळ हे नाथ संप्रदायातील नाथसिद्ध साधक होते। वैष्णव परंपरेतील महत्त्वपूर्ण ग्रंथ गीता यावर ज्ञानेश्वरी ही टीका लिहीणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे गुरु,ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ हे गहिनीनाथांचे शिष्य होते। तर महात्मा बसवेश्वर यांनी आपल्या शिवशरण संप्रदायाची मुहूर्तमेढ पंढरपूर जवळच्या मंगळवेढा या या भागात रोवली तेथेच रुद्रमुनी रेणवसिद्ध आणि जवळच्या सोलापूरमध्ये सिद्धरामेश्वर हे संत राहत होते।
पंढरपुरात त्याच वेळी वैकुंठीचा राणा विठ्ठल याची वारी,उपासना घडत होती. विसोबाखेचर यांचे गोपाळकाला खाल्ल्याच्या उल्लेखाचा दाखले ज्ञानदेवगाथा मध्ये मिळतात। विसोबांचे मंदिरही सोपानदेव आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराजवळ पंढरपुरात आहे। रा.चिं. ढेरे म्हणतात, “कैलासीचा राणा आणि वैकुंठीचा राणा एकाच वेळी एकाच भूमीत भक्तांना समता आणि कारूण्याची दीक्षा देत होते”
एकूणच महाराष्ट्राची अध्यात्मिक जडणघडण ज्या चार संप्रदायांनी विशेषत्वाने केली त्या चार संप्रदायांचे परस्परांशी असलेले मौलिक नाते हे “हरीहर ऐक्याचे” प्रतीक आहे.
कालक्रमानुसार कोणता पंथ अर्वाचीन कोणता प्राचीन हे ठरवणे खरे तर फार कठीण आहे। कारण सिद्धांत शिखामणी हा वैदिक शैवागम ग्रंथ शैवपंथावह्या प्राचीनतेचे दाखले देतो।तर आठव्या शतकातील वसुगुप्तच्या शिवसुत्रांवर गोरक्षनाथांनी स्थापन केलेला नाथपंथमध्ये,कलियुगाच्याही आधी असलेल्या शिवशक्ती सामरस्यात्मक अद्वैताचे वर्णन केले जाते।महानुभावाच्या श्रीचक्रधरांची परंपरा चांगदेव राऊळ,गुंडम राऊळ यांच्याही आधी असलेल्या गुरू परंपरेत आढळते। त्याचप्रमाणे वारकरी पंथ हा माळकरी संप्रदाय म्हणून जरी ज्ञानेश्वरांनी रचला असला तरी, त्यांचे आधी देखील पंढरीची वारी सुरू होती याचे अनेक दाखले मिळतात।
या सर्व पंथ संप्रदायांची थोडक्यात ओळख करून घेऊ.
१) नाथपंथ – इसवी सनाच्या आठव्या शतकात वसुगुप्ताला काश्मीर प्रदेशामध्ये शिवसूत्रांचे दर्शन झाले। या शिवसूत्रांना अनुसरूनच नाथपंथाची पुढची सगळी वाटचाल झालेली आहे अशी मान्यता आहे। नाथपंथ हा उत्तरेकडचा शैवसंप्रदाय आहे। या नाथपंथाला अवधूतमत, सिद्धमत, सिद्धपंथ, सिद्धमार्ग अशी अन्य नावे आहेत ।
गोरक्षनाथांनी या संप्रदायाला संघटित स्वरूप दिले। भारतामध्ये अशा एखाद्या संप्रदायाच्या प्रवर्तकाचा कालखंड ठरवणे फार कठीण असते ।कारण त्याने जे शाश्वत तत्व सांगितले असते त्याखेरीज स्वतःविषयी अन्य काही सांगितलेले नसते।त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे संशोधन करून त्याचा काळ ठरवावा लागतो। तत्कालीन भाषेचा बाज लक्षात घेऊन,त्यातील उदाहरणांवरून तो ऐतिहासिक कालखंड कोणता असेल याचा अंदाज बांधला जातो। एखाद्या राजाचे नाव साहित्यात आले असेल तर त्याच्यावरून किंवा एखाद्या शिलालेखावरून अशा महात्म्यांचा कालखंड ठरवावा लागतो। विद्वानांच्या मते नाथपंथाचे प्रवर्तक गोरक्षनाथ हे नवव्या शतकामध्ये होऊन गेले। या कालखंडामध्ये पारमार्थिक साधनेचे सुवर्णयुग उदयाला आले।
गोरक्षनाथांनी काही ग्रंथ संस्कृत मध्ये तर काही ग्रंथ हे हिंदी लोकभाषेमध्ये रचलेली आहेत। गोरक्षनाथांनी भारतभर भ्रमण केले। परमार्थाच्या नावावर चालणारे कर्मठपणा दूर करून नव्याने परमार्थ सांगितला।विशुद्ध योगसाधना व हठयोगाचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित केले।
महाराष्ट्रातील नाथसिद्ध
महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरांचे पणजे त्र्यंबकपंत यांना गोरक्षनाथाचा अनुग्रह लाभला होता।तर अमरनाथ गहिनीनाथ ,कवी मुकुंदराज हे महाराष्ट्रातले नाथपंथी साधक होते। निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचा अनुग्रह मिळालेला होता। तर ज्ञानेश्वर जेव्हा देश भ्रमणाला निघाले तेव्हा मुक्ताबाई यांनी बारा वर्षे अज्ञातवासात काढली ,ती नाथसिद्ध होण्यासाठी असे म्हटले जाते। तापी नदीच्या तीरावरील चांगदेव हे महान योगी देखील नाथसिद्ध होते। तसेच चक्रधरांचे गुरु गुंडम् राऊळ हेदेखील नाथ संप्रदायातील होते।मराठीतील पहिले कवी मुकुंदराज हे ही नाथ संप्रदायाचे होते।
महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर,चंद्रगिरी, पैठण ,आळंदी ,शिंदवाडा, खेडले ही ठिकाणे नाथ संप्रदायाशी संबंधित आहेत।
२) वारकरी संप्रदाय
वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपुरच्या विठोबाचा संप्रदाय।या संप्रदायाचे उपास्य दैवत विठ्ठल।विठ्ठल हा अकराव्या बाराव्या शतकापासून वैष्णव देव म्हणून ओळखला जातो। मात्र कोणत्याही श्रुती स्मृती पुराण आदी ग्रंथांमध्ये विठ्ठलाचा विष्णू म्हणून उल्लेख आढळत नाही।
वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरी ,एकनाथी भागवत आणि तुकारामांचे अभंग गाथा या तीन ग्रंथांना आपले मुख्य ग्रंथ मानतो। या संप्रदायाला “माळकरी संप्रदाय” असेही म्हटले जाते। कारण तुळशीची माळ घालणं हा एक विशेष सांप्रदायिक विधी-समारंभ या संप्रदायात केला जातो।
वर्षातून दोनदा(किमान एकदा) वारी करणे ,अभक्ष भक्षण न करणे, दररोज हरिपाठ म्हणणे ही वारकऱ्याची आचारसंहिता असते।ही पायी वारी आषाढी एकादशीला व कार्तिकी एकादशीला केली जाते। एकूणच एकादशीचे या संप्रदायात खूप महत्व आहे.
तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई (1628) यांनी या संप्रदायाविषयी लिहून ठेवले आहे-
ज्ञानदेवे रचिला पाया।
उभारिले देवालया
नामा तयाचा किंकर
तेणे रचिले ते आवार
जनार्दन एकनाथ
खांब दिधला भागवत
तुका जालासे कळस
भजन करा सावकाश
संत कृपा जाली
इमारत फळा आली।
मात्र विठ्ठलाच्या पायी वारीचा प्रघात ज्ञानेश्वरांच्या आधीपासूनच होता असे लक्षात येते।मात्र वारी करणाऱ्याने देवाच्या दारापुढे समानता मानावी,असे सूत्र संप्रदाय म्हणून ज्ञानेश्वरांनी आणि नामदेव महाराजांनी ठेवले! भक्ती सदाचार नीती शिकवली. एकनाथ महाराजांनी पुढे या संप्रदायाला भागवताची बैठक दिली आणि तुकारामांनी भक्ती व वैचारिकतेची वाट दाखवली।
न लगे सायास।जावे वनांतरा
सुखे येतो। घरा नारायण।
विष्णुमय जग।वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम ।अमंगळ।
असे अभंग रचून तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाला लोकाभिमुख केले. महासमन्वय, त्याग निष्ठा सहिष्णुता औदार्य आणि राजाश्रय न घेणे ही या संप्रदायाची वैशिष्ट्ये ठरली.
तुका म्हणे तेचि संत ।
सोशी जगाचे आघात।
देशी भाषा आणि श्रोत्यांशी संवाद,तसेच सर्व ज्ञाती मधील भक्त या मुळे हा संप्रदाय सर्वाधिक लोकप्रिय झाला।
नरहरि सोनार,चोखामेळा, जनाबाई, सेना न्हावी,सावता माळी यांनी आपापल्या व्यवसायानुसार प्रतिके वापरून कवने रचली।
देवाच्या दारापुढे समता मानली आणि चातुर्वर्ण्य व जातीव्यवस्था या विरोधात बंड केले नाही।
चोखामेळा लिहितात –
हीन यति माझी देवा
कैसी घडे तुझी सेवा।
मज दूर दूर हो म्हणती
तुज भेटू कवण्या रीती।
असा हा वारकरी पंथ आजच्या मराठी माणसाच्या आध्यात्मिक जडणघडणित महत्वाचा ठरलेला आहे.
३) महानुभाव पंथ
हा पंथ गुजरात आणि महाराष्ट्र,त्यातही विशेषतः मराठवाडा खान्देश या भागामध्ये लोकप्रिय आहे। भडोच येथील राजा हरपाल देव याला साक्षात्कार झाला आणि त्यानेच त्यानंतर चक्रधर असे नाव धारण केले।महानुभव पंथाची स्थापना चक्रधर यांनी केली। या पंथाचे साहित्य सकळ लिपी आणि सुंदर लिपी या जुन्या लिपिं मध्ये लिहिलेले आहे। या पंथामध्ये उपासकांचे दोन प्रमुख असे भाग पडतात। एक उपासक म्हणजे उपदेशी आणि दुसरे उपासक म्हणजे संन्यासी होय।संन्यास घेण्याचा अधिकार सगळ्या वर्णांना आणि स्त्री-पुरुषांना आहे ।एकदा दीक्षा घेतली की जातीचे बंधन रहात नाही। या पंथाचे संन्यासी काळ्या रंगाचे वस्त्र वापरतात। देवतांमध्ये श्रीकृष्ण आणि दत्तात्रय हे परमेश्वराचे पूर्ण अवतार म्हणून मानले जातात।या पंथाला कृष्णपंथ असे देखील म्हटले जाते। महानुभाव पंथाचे मराठी मध्ये उत्तम वाङ्मय आहे ।
चक्रधर स्वामींच्या जीवनावर कथा आहेत।म्हाईमभटाचेलीळाचरित्र ,
दामोदराचे वच्छाहरण, नरेंद्राचे रुक्मिणीस्वयंवर ,भास्करभटाचे शिशुपालवध,केसोबासाचा दृष्टांतपाठ आणि स्वतः चक्रधरांची सिद्धांत सूत्रे असे विपुल वाङ्मय मराठीमध्ये या पंथाने निर्माण केले आहे।
४) लिंगायत वीरशैव पंथ
कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागात पसरलेल्या पंथाचे नाव वीरशैव संप्रदाय आहे देहावर चांदीचे किंवा लाकडाचा करण्यात शिवलिंग धारण करत असल्याने लिंगायत समाज असे देखील म्हटले जाते । सामान्य अनुयायी लिंग गळ्यात घालतात तर जंगम मस्तकावर धारण करतात।या संप्रदायाचा प्रसार 11 व्या शतकामध्ये बसवेश्वरांनी अधिक प्रमाणात केला।बसवेश्वर हे महाराष्ट्रातल्या मंगळवेढा मध्ये बिज्जल राज्याच्या कारभारासाठी राहिलेले असल्यामुळे, त्यांचा प्रभाव महाराष्ट्र वरही पडलेला आहे।
विद्वानांच्या मते शैवपंथ दोन प्रकारात विभागला गेलेला असतो। एक म्हणजे वैदिक लिंगायत संप्रदाय आणि दुसरा म्हणजे अवैदिक शिवशरण लिंगायत संप्रदाय। परंतु सर्वसामान्य समाजात जर आपण बघितले तर त्यांच्यामध्ये असे वैदिक आणि अवैदिक अशा वेगवेगळ्या मान्यता नसतात।
अक्षय तृतीयेला बसवेश्वर यांची जयंती साजरी करणारा एखादा शैव हा देवघरामध्ये सिद्धांत शिखामणी नावाचा वैदिक ग्रंथदेखील आदराने ठेवतो। त्याचबरोबर तो कपिलधाराच्या मन्मथ स्वामींच्या तीर्थक्षेत्राला जातो विसोबा खेचर यांचे षटस्थळ वाचतो, औंढा नागनाथ येथे भक्तिभावाने सोमवार-शिवरात्र अशा पर्वकाळात जातो तर त्याचबरोबर सिद्धरामय्या यांच्या सोलापूरच्या मंदिरातही जातो।
त्यामुळे ज्या पद्धतीने वीरशैव यांच्या श्रद्धा संकल्पना याविषयी विद्वान लोक बोलतात तशाप्रकारची भिन्नता सामान्य साधकांमध्ये नसते। अष्टावरण, पंचाचार, षटस्थळ, शिवपुराण या सर्व गोष्टी शिरोधार्य मानणारा आणि त्याचबरोबर बसवेश्वरांच्या वचन साहित्याचे वाचन करणारा असा हा महाराष्ट्रातला शैवपंथी आहे।
उपसंहार
महाराष्ट्रामध्ये असलेल्या लिंगायत (वीरशैव) महानुभाव आणि वारकरी हे तीन पंथ आणि एकूणच सर्व आध्यात्मिक परंपरांवर आपली छाप सोडणारा नवनाथ नाथसिद्ध संप्रदाय!! या सर्वांचा महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर ,त्यांच्यातील उपास्य देवता थोड्याफार फरकाने भिन्न असल्या, संकल्पनांमध्ये लहान-मोठे भेद असले, तरीही त्यांच्यातील आंतरिक ऐक्य आपल्याला चकित करून जाते।
नाथपंथी असणारे ज्ञानेश्वर महाराज हे वैष्णवांचा थोर ग्रंथ गीता यावरची मराठीतील टीका लिहितात। तर थोर वैष्णव नामदेव हे वीरशैव लिंगायत पंथाच्या तत्वज्ञानाचा महत्त्वाचा ग्रंथ षटस्थळी लिहिणाऱ्या विसोबा खेचर यांचा अनुग्रह घेतात। तेच विसोबाखेचर हे आपल्या ग्रंथामध्ये आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरखनाथ मुक्ताई चांगदेव आणि कृष्णनाथ यांची परंपरा लिहितात। गोरक्षारित्या नावाची ज्ञानेश्वरांची भगिनी आणि चक्रधराची भेट झाल्याचे दाखले देतात.कर्दळीवनात तंत्र शाखेचा अभ्यास चक्रधर करतात,आणि तेच पुढे महानुभाव पंथ स्थापन करतात।
या महानुभाव पंथामध्ये एकाच वेळी नाथपंथामधील श्रीदत्तात्रेयांचे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असते तर, त्याच वेळी नारायणाचा आठवा अवतार कृष्ण याला देखील पूर्णावतार म्हणून या पंथांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळते। चक्रधरांचे गुरु गुंडम् राऊळ आणि चांगदेव राऊळ हे दोघे तर नाथसिद्ध होतेच। त्याचबरोबर मुकुंदराज हे मराठीचे आद्यकवी हेदेखील नाथसंप्रदायातले होते।
एकूणच विद्वान लोक शैव-वैष्णव वाद ज्या पद्धतीने रंगवत असतात, त्याचा मागमूस देखील या सगळ्या परंपरांमध्ये आपल्याला कोठेही पाहायला मिळत नाही. तर एक अत्यंत सुंदर अशी ऐक्याचे धारा आपल्याला या सगळ्यातून बघायला मिळते।
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब गावच्या मन्मथ स्वामींनी वीरशैव परंपरेमध्ये पंचाचार्य आणि बसवेश्वर या दोघानाही आदराचे स्थान दिले. हरिपाठाच्या धर्तीवर शिवपाठ तयार केले।
महाराष्ट्राच्या मध्ययुगीन कालखंडात पारमार्थिक साधनेचे सुवर्णयुग निर्माण करणारे हे सारे संप्रदाय!!या संप्रदायामध्ये वरवरचे साधनेचे भेद जरी असले, तरी या सर्व संप्रदायांचे काही महत्वपूर्ण सामान्य तत्वे ही एक सारखे आहेत
अ) वर्णाश्रमधर्म, रूढी, कर्मठपणा इत्यादी आचारांना या सर्व संप्रदायांनी कडवा विरोध केला .
आ) या सर्व संप्रदायांनी देशी भाषांना म्हणजे त्या त्या भागातील भाषांना अत्यंत महत्त्वपूर्ण असे स्थान दिले.आध्यात्माची सूत्रे ही त्या-त्या भाषेमधून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्न केले ।मग त्यामध्ये ज्ञानेश्वरी मन्मथ नाथांचे परमरहस्य तसेच महानुभाव पंथाचे लीळाचरित्र सूत्रपाठ यासारखे वाङ्मय हे सामान्य मनुष्यांना आध्यात्मिक साधनेकडे नेणारे ठरले।
इ) या सर्व संप्रदायांचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे या संप्रदायांनी समाजातील उच्चनीचता जातीभेद यावरच प्रहार केला असं नाही तर स्त्री-पुरुष भेद यावरही प्रहार केला. अनेक तपस्विनीनी या सर्व संप्रदायामध्ये आपले अत्यंत मोलाचे योगदान दिलेले आहे। महदंबा अक्कमहादेवी भावंडीदेवी विमलादेवी तपस्विनी मुक्ताबाई का सुगलक्का, जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा अशा सर्व स्त्री संत तपस्वी साधिका होऊन गेल्या। स्त्रियांना देखील अध्यात्माचे तसेच दीक्षा देण्याचे अधिकार आहेत हे त्यांनी दाखवून दिले।
ई) या सर्व संप्रदायांनी विविध मतांच्या प्रवाह मधून परमार्थाकडे जाऊ इच्छिणाऱ्या सामान्य साधकांना बाजूला काढून योग्य दिशा दिली आणि त्याचबरोबर दया-क्षमा-शांती समता आणि विश्वबंधुत्वाचा जो मूळ धागा आहे तो धागा मिळवून दिला.
या सगळ्यांमध्ये नवनाथांच्या विषयी आणखी एक प्रवाह असा आहे की, नवनाथ हे नव नारायण यांचे अवतार आहेत।आता नाथ हे शंकराची उपासना करणारे हठयोगाचे साधक आणि त्याचबरोबर ते नवनारायणांचे अवतार म्हणजे विष्णूचे ,म्हणूनही मान्यता प्राप्त आहेत. एकूणच या सर्व संप्रदायामध्ये उच्च नीच , स्त्री-पुरुष ,शैव वैष्णव असा कोणताही भेद नाही.
गुळाचे एखादे पक्वान्न एखाद्याला आवडत असावे तर दुसऱ्याला गुळाचे दुसरे पक्वान्न आवडत असावे इतकाच भेद या संप्रदायामध्ये आपल्याला आढळून येतो त्यामुळे खिरीतही गुळाची गोडी आणि पुराणातही गुळाचीच गोडी!!
डॉ रमा दत्तात्रय गर्गे