भारतीय दर्शन परिचय – बौद्ध दर्शन

इतिहास
बौद्ध धर्म संस्थापक सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्म शाक्य वंशात झाला. उत्तर बिहारमध्ये कपिलवस्तु येथे शाक्य वंशाचे राज्य होते. राजा शुद्धोदन व राणी मायावती यांच्या पोटी सिद्धार्थचा जन्म झाला. गौतम हे त्याचे गोत्र नाम होते. सिद्धार्थ गौतमाचे बालपण अत्यंत लाडाकोडात व ऐश्वर्यात गेले. राजपुत्राला उचित असे शिक्षणही त्याला प्राप्त झाले. योग्य वयात यशोधरा या राजकन्येशी त्यांचा विवाह झाला. त्यांना राहुल नावाचा पुत्र झाला.
वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी छन्ना या सारथ्या सोबत राज्याभिषेकाच्या आधी “राज्य दर्शन” घेण्यासाठी युवराज सिद्धार्थ निघाला. वाटेत जर्जर म्हातारा, महारोगी, प्रेतयात्रा आणि विरक्त संन्यासी असे चार प्रकारचे दर्शन त्याला झाले. त्यानंतर दुसऱ्या रात्री सिद्धार्थ गौतम राजवाड्याच्या बाहेर पडले. आत्म शांतीच्या शोधासाठी निघाले. आलारकालाम या गुरुंकडे काही काळ त्यांनी साधना केली नंतर राजगृह येथील उद्रकरामपुत्र या गुरुंकडे साधना केली. पराकोटीचे शारीरिक कष्ट त्यांनी या साधनांसाठी. घेतले मात्र त्यांना आत्मज्ञान शांती व समाधान मिळू शकले नाही. नंतर बोधीवृक्षाखाली स्व चिंतनाने त्यांना बोध प्राप्त झाला. तेव्हापासून ते बुद्ध म्हणून ओळखले जावू लागले.
तेव्हापासून वयाच्या ऐंशीव्या वर्षी पर्यंत समस्त प्राणिमात्रांचे दुःख दूर व्हावे म्हणून बुद्धाने आपल्या मतप्रणालीचा प्रसार केला. ही शिकवण साधी सरळ सोपी होती. नैतिक आचरण हा तिचा पाया होता. कोणतेही कर्मकांड विधी यांचे अवडंबर त्यात नव्हते. हे तत्त्व लोकभाषा पाली मधून बुद्ध सर्वांना सांगत असत. बुद्धांनी सर्वांना आत्मज्ञानाचे दरवाजे उघडून दिले. आपल्या बौद्ध संघासाठी त्यांनी आचारसंहिता निर्माण केली. वयाच्या ऐंशीव्या वर्षी कुशीनगर येथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले.

बुद्धपूर्व काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थिती
बुद्धपूर्व हातात वैचारिक घुसळण मोठ्या प्रमाणात सुरू होती. देशात संन्यासी वैरागी यांचे प्रमाण लक्षणीय झाले होते. उपनिषदांनी सुरू केलेल्या वैचारिक क्रांतीच्या वृक्षाला फळे लागू लागली. उपनिषदांनी वेदांमधील बाजूला पडलेल्या प्रश्नांवर काम करणे सुरू केले. संसारातील सुखोपभोग, यज्ञाने देवतांना संतुष्ट करणे, भरपूर काम करणे, स्वर्गप्राप्ती, आनंद, , आयुष्याची, कामना करणे, दुधा तुपाने समृद्ध असणे या वैदिक काळातील समृद्धीच्या कल्पना उपनिषदांमध्ये कालानुक्रमे विकसित आणि भिन्न होत गेल्या. अभ्युदया बरोबरच नि:श्रेयसाचा जन्म झाला. Metaphisical बाबी मनुष्याला दैनंदिन जीवन सुखकर असेल तरच सुचतात. अशा अनेक विषयांची पुरचुंडी उपनिषद् कारांनी मानवाला दिली. ज्यामुळे मानवी संस्कृती विविधांगांनी बहरत गेली.
बुद्धपूर्व कालखंडात समाजात दोन प्रकारच्या मान्यता होत्या. एक म्हणजे यज्ञाला इष्ट म्हणून वैदिक धर्म पालन करणारे लोक. हे लोक देव देवतार्चन करून पुरोहिताला दक्षिणा देऊन आपला गृहस्थाश्रम चालवीत होते. परंतु जे लोक यावरच संतुष्ट नव्हते त्यांनी विविध प्रकारे धर्म शोधण्याचा प्रयत्न केला.
दिघनिकायाच्या साम्फल सुत्तात याचे वर्णन मिळते. हे प्रकार पुढीलप्रमाणे होते.

अक्रियावाद – पुरण कश्यप याचा हा मार्ग. पापपुण्य काही नसते असे त्याचे प्रतिपादन होते
दैववाद – मक्खलीघोषाल याचा मार्ग. पुरुषार्थ यांना नियती पुढे काही महत्त्व नाही. जग बलहीन आहे. स्वभावाने सर्व चालते. असे त्याचे प्रतिपादन होते.
उच्छेदवाद – अजित केशकम्बली याचा हा मार्ग. मनुष्य तेज वगळून इतर चार महाभूतांनी तयार झालेला आहे. मरणानंतर तत्वे पुन्हा स्वस्थानी जातात. पंडित आणि मूर्ख यांची गती शेवटी एकच असते. या मताला जडवाद असेही म्हणतात.
अकृतांत वाद – पकुध कात्यायन याचा हा मार्ग. मनुष्य स्वतः काही करत नसतो. समजा कोणी धारदार शस्त्राने कोणास मारले तरी हत्या होत नाही. कारण तो फक्त शस्त्राने घेतलेला अवकाशाचा वेध ठरतो. असे त्याचे मत होते.
अनिश्चितता वाद – संजय बेलठ्ठीपुत्त याचा हा मार्ग. यात कोणत्याही गोष्टीचे प्रतिपादन ठाम नाही. कर्मफळ असेल देखील नसेल देखील. परलोक असेल किंवा नसेल. मनुष्य मेल्याशिवाय तो जाणू शकत नाही किंवा मेल्यावर परत काही सांगू शकत नाही. असे विक्षिप्त प्रतिपादन हा पंथ करीत असे.
निगंठनागपूत्त याचा सर्व मत प्रमाण मार्ग – हा जैन आचार्य वरील सर्वांना समर्थन देत असे. याचा स्वतंत्र संघ होता.
एकीकडे औपनिषदिक ज्ञानमार्ग शोधणारे विरक्त साधक, दुसरीकडे जैनांचा त्यांच्यापुरता श्रमण मार्ग तर तिसरीकडे यज्ञीय हिंसा आणि पुरोहितवादाचे प्राबल्य असा कोलाहल होता. तो कमी की काय म्हणून असे लहान-मोठे संप्रदाय उदयाला येत होते. सामान्य माणसाला शांती सुख समाधान देणारा धर्म मात्र मिळत नव्हता. अशा परिस्थितीत बुद्ध धर्माची स्थापना झाली.
प्रसार
फक्त भारतातच नाही तर परदेशातही भरपूर अनुयायी मिळवणारा हा धर्म. केवळ कारूण्याच्या आणि अहिंसेच्या मार्गाने स्वतःच्या प्रचार प्रसार करणारा बौद्ध हा एक अभिनव धर्म आहे. सुरुवातीच्या काळात बौद्ध धर्माचा भारतात झपाट्याने प्रसार झाला. त्याला खालील गोष्टी कारणीभूत होत्या
गौतम बुद्धाचे चरित्र
गौतम बुद्ध हा राजघराण्यातील असून त्याने सर्वसंगपरित्याग करून कठोर तपाचरण केले. याचा प्रभाव लोकांवर पडला. मृदू आणि आकर्षक व्यक्तिमत्व आणि उदात्त जीवन हे लोकांना बौद्ध संघाकडे आकर्षित करून घेण्याचे कारण ठरले.
सोपी शिकवण
बुद्धाने नैतिक आचरणाच्या पायावर अत्यंत साधी सरळ शिकवण दिली. ज्या काळात मन आत्मा, लोक परलोक, स्वर्ग यांच्या चर्चा चालत यज्ञ याग होत, त्या काळात केवळ प्रज्ञा, शील आणि करुणा या त्रयींवर बुद्धाने लोकांना जगण्यास शिकवले.
पाली भाषेचा वापर
लोकांना स्वतःच्या जीवनाची, व्यवहाराची भाषा ही धर्म शिक्षणासाठी वापरणे माहीतच नव्हते. ती बुद्धाने प्रथमच वापरली. त्यामुळे लोक अधिकाधिक प्रमाणामध्ये या धर्माकडे आकर्षित झाले.
समानता
बुद्धाने स्थान दिले नाही आधी प्रवज्जा घेतलेला असेल त्याने दुसऱ्याला द्यावे मग तो कोणत्याही वर्णाचा असला तरी चालेल सर्वांना मोक्षाचे द्वार बुद्धाने उघडून दिले. स्त्रियांनाही नंतर संघात प्रवेश दिला.
राजाश्रय
बिंबिसार, अजातशत्रू, प्रसेनजित, उदयन यांनी व नंतर अशोक कनिष्क हर्ष यांनी स्वतः बौद्धधर्म स्वीकारला. सम्राटाने स्वतः धर्म स्वीकारला त्यामुळे प्रजेने आपसूकच तो धारण केला.

अशा अनेक कारणांनी बौद्धधर्माचा प्रसार होत गेला. नंतर हा धर्म श्रीलंका चीन जपान ब्रह्मदेश या ठिकाणीही प्रसारित झाला.

धम्म म्हणजे नियम होत.
अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी मानवाला दुःख भोगावे लागते, तो असमाधानी असतो व यातून तो मुक्ती इच्छितो हे जाणले!  या समस्येवर सर्वांसाठी उपयुक्त असे उपाय त्यांनी शोधले. वर्षानुवर्षे त्यांनी उग्र तप केले, विविध प्रयोग केले. शेवटी त्यांनी अंतर्विश्वात प्रवेश केला. समस्येचे स्वच्छ स्वरूपात दर्शन घेतले आणि ती समूळ नष्ट करण्याचे उपाय शोधले. प्रथम स्वतः सिद्धार्थ गौतम दुःखमुक्त झाले. नंतर त्यांनी उर्वरीत आयुष्य मनुष्याला आत्मनिर्भर होण्याचा मार्ग दाखवण्यात घालवले.
त्यांनी स्वतःला कधीच प्रेषित अगर देवदूत म्हणवून घेतले नाही. त्यांच्यात असणारे गुण कोणासही प्रयत्नांती मिळू शकतात हे ते सांगत असत. ते स्वतःस पूर्ण विकसित मनुष्य, शास्ता, तथागत म्हणू देत असत. मात्र देव किंवा प्रेषित होणे त्यांनी नाकारले. संयुक्तनिकायात त्यांनी काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. त्यात त्यांनी पंथ, तत्वज्ञान, विशिष्ट श्रद्धा यांची शिकवण मी देत नाही असे सांगितले आहे. आपल्या शिक्षणास ते धम्म म्हणतात!  दुःख म्हणजे काय आणि त्याचे निराकरण कसे करायचे याचा मी शोध लावला आहे, असेच ते म्हणतात. आपणांस मिळालेले ज्ञान, सत्य कोणाच्याही कृपाप्रसादाने मिळालेले नाही. ते स्वप्रयत्नाने मिळाले आहे असे भ. बुद्ध स्पष्ट करतात.

अंगुत्तर निकायात कालामांना केलेला उपदेश हा मानवाची परंपरेतून, पोथीनिष्ठेतून व त्यामुळे त्याच्या मानेवर असलेल्या अदृश्य जोखडातून केलेली सुटका आहे. ते म्हणतात, “माझ्याप्रमाणे अगर थोडया वेगळ्या मार्गाने, पूर्वीही अनेकांना सत्य मिळाले होते. अंतिम सत्यावर कोणाचीही मक्तेदारी नाही. कोणत्याही गोष्टीच्या दिखाऊपणावर जाऊ नका. केवळ धर्मग्रंथात सांगितले म्हणून त्या विषयी मान्यता ठेऊ नका!  मान्यवर व्यक्तीने सांगितल्या म्हणून गोष्टींचा स्वीकार करु नका. प्रत्यक्ष अनुभवाने जी तत्त्वे अंगिकारल्यामुळे दुःख होते हे जाणाल त्यांचा त्याग करा. जी तत्त्वे अंगीकारल्यामुळे आपले मंगल व कल्याण होते आणि इतरांचे अहित होत नाही, त्यांचा स्वीकार करा. कोणतीही शिकवण फक्त स्वानुभवाच्या कसोटीवरच तपासून घ्या.”

धम्मपदातील यमक वग्गात तथागत म्हणतात, “ग्रंथांची नुसती घोकंपट्टी केली, आणि त्या बाबी व्यवहारात आणता येत नसतील तर आपण दुसऱ्याच्या मालकीच्या गायी मोजत बसणाऱ्या गुराख्याप्रमाणे ठरणार!  सत्याच्या स्पष्ट अनुभूतीचा मार्ग म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाचे आपण स्वतःच केलेले निरीक्षण होय. आपण आयुष्यभर मनाला बहिर्मुख होण्याची सवय लावली आहे. बाहेर घडणाऱ्या घडामोडींचाच आपण मागोवा घेत आलो आहोत. दुसरे लोक काय करतात याबद्दलच आपण जागरूक आहोत. फार कमी वेळा आपण अंतरंगात डोकावतो. त्यामुळे आपणच आपल्याला अपरिचित, अनोळखी राहिलो आहोत. त्यामुळेच आपण अंत:प्रेरणेचे गुलाम होत जातो! ”
सत्तीपट्टाण सुत्त
तथागत गौतम बुद्ध हे आनंदी जीवन जगण्यासाठी मानसिक प्रशिक्षण देणारे आचार्य आहेत. आपण स्वतःला जाणू शकतो, आपल्या आंतरिक स्वभावाची ओळख करून घेऊ शकतो. विधायक, उपयोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो हे त्यांनी प्रयोग करून मांडले. त्यासाठी प्रशिक्षणाचे नियमबद्ध मार्ग तयार केले. आत्मा, ईश्वर, मोक्ष परलोक, गुरू, वर्ण या आध्यात्मामध्ये महत्वाच्या मानल्या गेलेल्या बाबींना बुद्धाने मौनाने थोपवले!  त्यामुळे त्यांचा आध्यात्मिक मार्ग सोपा सुटसुटीत असा झाला!  त्या मार्गातील महत्वाच्या संकल्पना म्हणजे परियत्ती, पटीपत्ती, पटीवेध या होत. त्यासाठी प्रत्यक्ष साधना म्हणजे समथ, विपस्सना आणि सत्तीपठ्ठान होय!  आधुनिक शिक्षणातील learning the doctrine आणि practising the doctrine म्हणजे बौद्धिक समज व प्रत्यक्ष कृती याप्रमाणेच बौद्ध धम्म साधना पद्धती आहे!
स्वतःचे निरीक्षण केले की सुरुवातीलाच एक गोष्ट आपल्याला कळते, ती म्हणजे आपण ज्याला मी म्हणतो, त्यात दोन मुख्य भाग असतात. भौतिक शरीर म्हणजे रूप व मानसिक चित्त म्हणजे नाम!  पण प्रत्यक्षात या दोन बाबींचा मागोवा कसा घ्यायचा? दुसऱ्याने केलेल्या वर्णनाचा नुसता स्वीकार करणे पुरेसे नाही. नुसतेच बुद्धीच्या स्तरावर स्वतःचे शरीर व चित्त समजून घेणे उपयोगी नाही. अनुभूतीसाठी प्रत्येकाला स्वतःच प्रयोग करावे लागतात! स्मृतीप्रस्थानात दोन मार्गांवर, चार विषय घेऊन काम करावे लागते. या दोन मार्गांवर दोन गाड्या आहेत!  पहिली गाडी काया आणि मार्ग वेदना!  तर दुसरी गाडी चित्त आणि मार्ग धम्म होय!  दोन मार्ग आणि त्यावर धावणाऱ्या दोन गाड्या असे चार अभ्यासविषय या साधनेत आहेत! काया, वेदना, चित्त आणि धम्म.
कायानुपस्सना वेदनानुपस्सना
आपल्या शरीराविषयीचे सत्य आपण स्पर्शाने अनुभवतो. तसेच ते आपल्याला जाणिवेतूनही कळते. डोळे बंद केल्यावर आपल्याला हात, पाय, डोके आदी शरीराच्या भागांची जाणीव होऊ शकते. पुस्तकाला जसे दोन भाग असतात, एक बाह्यांग आणि दुसरे अंतरंग! पहिले म्हणजे मुखपृष्ठ, पाने इ. तर दुसरा भाग म्हणजे पुस्तकाच्या आतील गाभा! जो वाचल्यावर लक्षात येतो. आपली भौतिक रचनाही तशीच असते. त्यात बाहेरचे वस्तुनिष्ठ सत्य म्हणजे काया आणि आंतील व्यक्तिनिष्ठ सत्य म्हणजे वेदना किंवा संवेदना होय. ज्या प्रमाणे पुस्तक वाचल्यावरच आपण ते आत्मसात करू शकतो, नुसते सोबत घेऊन फिरल्याने नाही. त्या प्रमाणेच आपण शरीराचे ज्ञान संवेदनांच्या माध्यमातूनच करून घेऊ शकतो. अन्यथा सतत सोबत असणाऱ्या शरीरा विषयी आपण अनभिज्ञ असतो. संवेदनांच्या जाणिवेशिवाय आपल्या भौतिक रचनेचे ज्ञान होऊ शकत नाही. म्हणूनच पहिल्या दोन अनुपस्सनांमध्ये शरीराबाबत श्वासातुन जागरूकता ठेवणे आणि शरीरात सर्वत्र अनुभवाला येणाऱ्या शारीरिक संवेदना आणि प्रेरणांची जाणीव ठेवणे हे साधावे लागते.
चित्तानुपस्सना धम्मानुपस्सना
येथे देखील बाह्यस्वरूप व गाभा अशीच रचना आहे. चित्त(मन)व चित्तात निर्माण होणाऱ्या गोष्टी. चित्ताला आहे तसे जाणणे. सतत उठणारे विचार तरंग, ते शृंखलाबध्द नसून एकाचा अस्त होतो व दुसऱ्याचा उदय हे जाणणे. चित्त आसक्तीसहीत आहे की आसक्तीरहित आहे, द्वेषयुक्त आहे की द्वेषमुक्त आहे हे पाहत रहाणे. म्हणजे चित्तानुपस्सना होय. तर धम्मानुपस्सना म्हणजे परियत्ती मध्ये जाणलेल्या सैद्धांतिक बाबींचा, आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब होत आहे का हे पाहणे होय. या पहाण्यात ज्ञाता म्हणून नव्या चित्ताकृतीची ढवळाढवळ अपेक्षित नसते! ! सर्वंम् अनात्मम् अनुभूतीने केवळ पहाणे अपेक्षित असते. या अशा सतत पहाण्याला विशेष पश्यना म्हणजेच विपस्सना असे नाव आहे.

आर्य सत्ये
प्राचीन बौद्ध मार्गाचे तत्वज्ञान प्रामुख्याने चार आर्य सत्यांशी निगडीत आहे
दुःख – हे पहिले आर्य सत्य आहे जन्म जरा व्याधी आणि मृत्यु यांनी वेढून टाकले जीवन हे विवेकी व्यक्तीसाठी दुःखमय आहे.
दुःख समुदाय – हे दुसरे आर्य सत्य आहे प्रत्येक दुःखास कारण आहे. ते आकस्मिक नाही. दुःखाचे मूळ कारण आहे अविद्या!  त्यातून तृष्णा निर्माण होते व दुःखाची निर्मिती होते.
दुःख निरोध – हे तिसरे आर्यसत्य होय. तृष्णेचा नाश झाला तर सर्व प्रकारच्या दुःखांचा अंत होतो. कारण तृष्णा हे दुःखाचे कारण आहे.
दुःख निरोध गामिनी प्रतिपदा – हे चौथे आर्य सत्य आहे. दुःख निरोध करण्याचा जो मार्ग बुद्धाने सांगितला, तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. हीच निरोध गामिनी प्रतिपदा होय. मार्गामध्ये आठ वर्तन तत्वे आहेत. ज्यांच्या आधी सम्यक असा शब्द जोडलेला आहे. त्याचा अर्थ शुभ किंवा योग्य असा होतो.

अष्टांग मार्ग
सम्यक् दृष्टी,  सम्यक् संकल्प,  सम्यक् वाचा, सम्यक् कर्मांत, सम्यक् जाणीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृती, सम्यक् समाधी.

पंथ

बुद्धाच्या आनुयायांमध्ये प्रामुख्याने दोन तट पडले. ते अनुक्रमे महायान हीनयान ओळखले जातात.

महायान
यान म्हणजे वाहन. महा म्हणजे मोठे. गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर एक परिषद भरली जी, परिषद संगीति म्हणून ओळखली जाते. या संगीतिच्या वेळी दोन प्रमुख गट पडले. त्यातील एक गट महासंघिक गट होता. त्यांचे मत ठीक ठिकाणच्या लोकसमुदायाच्या समजुती, आचार विचार, यांनाही बुद्ध धर्माच्या चौकटीत बसवावे, थोडा व्यापक अर्थ लावावा असे होते. या महासंघिका मधूनच पुढे महायान हा पंथ निर्माण झाला. स्थानिक धार्मिक बाबी यात अंतर्भूत झाल्याने, बुद्धाचा निरिश्वरवाद मागे पडला. पूजाअर्चा, कर्मकांडे, बुद्धाला शरण जाऊन त्याचा कृपाप्रसाद मिळवणे या बाबी या पंथात सुरू झाल्या. तिबेट, चीन, जपान, कोरिया, मंगोलिया येथे महायान पंथाच्या वर्चस्व आहे. विविध प्रकारच्या बुद्धमूर्ती, मोठा स्तूप, विहार, तेथील कर्मकांडे यांचे या पंथात अत्यंत महत्त्व आहे

हीनयान
संगीति मध्ये जो दुसरा गट झाला त्याला स्थविर वादी किंवा थेरवादी म्हणतात. बुद्ध वचनांचा अर्थ आणि स्वतः गौतम बुद्धाचे जीवन यावरून लावावा असे यांचे मत आहे. स्वतःच्या निर्वाणासाठी प्रयत्नशील रहावे, असा विचार करणारा हा प्रवाह होता. या यानातून एका वेळी एकच जण प्रवास करणार असे असल्यामुळे याला हीनयान असे नाव देण्यात आले. हीनयान हा पंथ बुद्धवचनाला प्रमाण मानतो. व्यक्तीने स्वतःचा मोक्ष हेच परम साध्य मानावे असे म्हणतो. साधनाही ही व्यक्तिगत असते असे या पंथाचे मत आहे. समुदायाने करण्याची गोष्ट साधना नव्हे, याविषयी हा पंथ निश्चित मत देतो.

तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने विभाग

हीनयान –

वैभाषिक – अभिधम्म पिटकावर पूर्ण विश्वास

सौतांत्रिक – सुत्तपिटकावर अधिक विश्वास

महायान –

योगाचार – विज्ञानवादी

माध्यमिक – शून्यवादी

पालीभाषेतील ग्रंथ
पाली भाषेमध्ये सुत्तपिटक विनयपिटक आणि अभिधम्मपिटक यांचा समावेश आहे. सुत्तपिटकामध्ये बौद्ध सिद्धांत मांडले आहेत. विनय पिटकामध्ये भिक्षूंची आचारसहिता कशी असावी हे सांगितले आहे. तर अभिधम्मपिटक या मध्येसुद्धा वरील विषयाचा अधिक ऊहापोह व विद्वत्तापूर्ण विवेचन केले आहे.

सुत्तपिटकाचे पाच विभाग (निकाय) आहेत- दिघ निकाय, मज्झीम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय व  खुद्द निकाय
अभिधम्म पिटकाचे सात भाग आहेत – पथ्ठान, धम्म संगती, धातूकथा पुगगल पन्नती, विभंग, यमक आणि कथावस्थु.
विनय पिटकामध्ये धार्मिक विधींचे नियमन आहे हे कसे राहावे याचे विवरण आहे. सुत्त वीभंगआणि खंदक हे त्याचे विभाग आहेत.
याशिवाय “मिलिंद पन्हा” अर्थात ग्रीक राजा मीनिंडार याचा नागसेन या भिक्षूची झालेले प्रश्नोत्तर रुपी संवाद या ग्रंथात आहे. “जातक कथा” पाली भाषेमध्ये आहेत. या कथा बीजरूपाने दहा गुणांचे वर्णन करतात. एका बीजास पारमिता असे म्हटले जाते. दान, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, विर्य क्षांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री व उपेक्षा या पारमिता होत. बोधिसत्व अनेक जन्म घेतल्याचे यात म्हटले आहे.

संस्कृत भाषेतील ग्रंथ
ललित विस्तार -राजा कनिष्काच्या कालखंडात रचना,
बुद्धचरित -अश्वघोष याची रचना
याशिवाय अवदान कल्पलता, लंकावतार सूत्र हेही महत्त्वाचे ग्रंथ आहेत. महाभिनिष्क्रमण सूत्र हा एक मोठा ग्रंथ आहे.

तिबेटी ग्रंथ
ललित विस्ताराच्या आधारे आधारे रत्न धर्मराज यांनी काही ग्रंथ लिहिले आहेत.

चिनी भाषेतील ग्रंथ
चिनी भाषेमध्ये अनेक ग्रंथांचे भाषांतर झाले आहे. त्यात प्रमुख म्हणजे अश्वघोषाच्या बुद्धचरित आणि महाभिनिष्क्रमण सूत्र हे संस्कृत ग्रंथ होत. जातक निदान आणि महापरिनिर्वाण सूत्र यांचेही चीनी अनुवाद प्रसिद्ध आहेत.

ब्रह्मदेश
येथे “मलंगवत्तू” हा ग्रंथ विशेष मानला जातो. तसेच बऱ्याच पाली व संस्कृत ग्रंथांचे भाषांतर झालेले आहे.

श्रीलंका
दीपवंस व महावंस हे दोन महत्त्वाचे ग्रंथ सिंहल द्विपाच्या इतिहासावर आधारित आहेत. त्यातच अश्वघोषाच्या चरित्र लिहिले आहे. तसेच पाली व संस्कृत साहित्य अनुवादित केले आहे.

हिंदू पुराणग्रंथ
श्रीमद्भागवत ग्रंथ प्रथम स्कंधाच्या तिसऱ्या अध्यायात बुद्ध हा विसावा अवतार सांगितला आहे. तसेच अग्नि पुराण वराह पुराण यामध्येही बुद्धाचे उल्लेख व माहिती येते.

– रमा दत्तात्रय गर्गे

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s