रँडला का मारले?

PC – Damodar Hari Caphekar portrayed in VandeMataram Calendar.

सध्या अचानक अनेकांना ब्रिटीश अधिकारी रँडचा पुळका आला आहे. यावर दोन-तीन लेख वाचनात आले. या सर्व पोस्ट्सचा एकंदरीत सूर असा आहे, रँडच्या प्लेगला आळा घालण्याच्या उपाययोजनांना पुण्यातील सनातनी ब्राह्मणांचा आणि विशेषतः टिळकांचा विरोध होता. त्यांनी रँडच्या रुग्ण तपासणीच्या कामात अडथळा आणला, टिळकांनी आपल्या अग्रलेखांतून सरकारविरुद्ध वातावरण तयार केले आणि त्यामुळे रँडला मारला, वगैरे.

🔹या रँडची भारतीयांशी वागणूक कशी होती?

१. दि. २७/०९/१८९४ या दिवशी वाद्यनिर्बंधाचा भंग केला म्हणून त्याने वाईतील तीन सावकार, नगरपालिकेचे प्रमुख, लोकल बोर्डाचे प्रमुख आणि इतर आठ लोक यांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

२. या शिक्षा सुनावताना रँडचे उद्गार होते,

“It is not less clear to me as these men are all of respectable high caste families, they will feel more than others the degradation and inconvenience of imprisonment.”

यातून रँडची काय वृत्ती होती, हे स्पष्ट दिसते.


🔹रँडच्या प्लेगविरुद्ध असलेल्या उपाययोजना कशा होत्या?

आता ज्यांनी हे तथ्यहीन आरोप केलेत, त्यांनी आपली स्मशानातली कोल्हेकुई करण्याअगोदर खालील काही गोष्टी नजरेखालून घातल्या असत्या तर बरं झालं असतं. रँडचा वध ही आकस्मिक झालेली घटना नव्हती. ती एक योजनाबद्ध कृती होती. त्याला कारणीभूत रँडचा मनमानी आणि द्वेषपूर्ण कारभार होता.

१. दि. ११/०३/१८९७ च्या “देशमित्र” नामक दैनिकात उल्लेख आहे की, बुधवार व शुक्रवारपेठेतील काही भागांना २०० स्वार व १०० पायदळ सैनिक आणून वेढा घातला. पुरुष, बायका, मुले यांना उघडे बोडके, अनवाणी अशा अवस्थेत युध्दकैद्यांप्रमाणे प्लेग छावणीकडे हाकून नेले. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या घरातील कपडे व वस्तूंची जाळपोळ केली. अधिकाऱ्यांसमक्ष दुकाने लुटली.

२. दि. १५/०३/१८९७ च्या “ज्ञानसागरने” लिहिले आहे की, या जाळपोळीमुळे आणि घरफोड्यांमुळे पुण्याला जिंकून लुटलेल्या नगराची अवकळा आली आहे. पुरुषांना अक्षरशः नागव्याने उभे करीत आणि बायकांना चोळ्या काढून तसेच लुगडी वर करून उभ्या करीत. हे अत्याचार थांबवण्याची विनंती करण्याकरीता नागरिकांचे एक शिष्टमंडळ रँडसाहेबाला भेटले आणि विनवण्या केल्या कि आमच्या बायकांची अशी राजमार्गावर विटंबना करू नका. तेव्हा त्यांनी (रँडने) औदार्याचा आव आणून सांगितले कि पडदा पाळणाऱ्या मुसलमान स्त्रियांना हा छळ वाटेवर सोसावा लागणार नाही. पण हिंदू आणि इतर धर्माच्या लोकांच्या घरात यांच्यापेक्षा अधिक अंधेर (अंधार) असल्याने त्यांची अशी तपासणी बाहेरच करणे आवश्यक आहे…!

३. रँडच्या काळातील अजून एक प्रकार म्हणजे धडधाकट लोकांना प्लेगचे संशयित म्हणून पकडून रुग्णालयात न्यावे आणि दुसऱ्या टोळीने त्या कुटुंबातील इतर व्यक्तींना संसर्गाच्या निमित्ताने प्लेगच्या छावणीत पाठवून घराची लुटालूट जाळपोळ करावी. त्या कुटुंबप्रमुखाने आपण निरोगी असल्याचे प्रमाणपत्र मिळवून परत यावे तर घराची वाताहत झाल्याचे त्याला दिसावे.

४. दि. ०४/०८/१८९७ या दिवशी मुंबईच्या विधीमंडळात लॉर्ड सँडहर्स्ट यांनी असे स्त्रियांचे भररस्त्यावर अथवा अंगणात कपडे उतरवणे इ. अत्याचार झाल्याचा आरोप अप्रत्यक्षपणे मान्य केला आहे. मात्र त्याला अत्यंत हास्यास्पद कारण दिले आहे.

“A great many houses in Poona are extremely dark. It was considered necessary to get all the inmates of such houses, not always in the streets but into some lighted room or into a courtyard to see if they looked ill. If there were indications that the persons were not in good health, a medical examination did ensue, but with every regard to decency.”

५. रँडच्या सैनिकांच्या या अत्याचाराच्या बातम्या जेव्हा महाराष्ट्रभर पसरू लागल्या तेव्हा पुणेकर हा असा अत्याचार कसा निमुटपणे सहन करतात? असे विचारणारी पत्रे टिळकांना येऊ लागली. त्या पत्रांना केसरीतून खालील उत्तर दिले होते,

“बाजीरावापासून इंग्रजांनी पुणे जिंकून घेतले, तेव्हा जितके इंग्रज सैन्य जमविले होते, त्याहून अधिक गोरे सैनिक आज पुण्यात धिंगाणा घालीत आहेत.”

६. आपली विटंबना सहन न झाल्याने काही स्त्रियांनी सदाशिव पेठेतील शनी पारावर डोकी आपटून कपाळमोक्ष केला. हा प्रकार झाल्यावर हादरून जाऊन अनेकांनी रँडवधाच्या प्रतिज्ञा घेतल्या.


🔹टिळकांनी रँडवर फक्त टीका केली, लोकांचा प्रत्यक्ष फायदा होईल असे काही केले का ? तर हो..!

रँडचे टिळकांविरुद्ध अनेक डावपेच चालत असत. सरकारी रक्षकविभागात क्लर्क म्हणून काम करणारे बाबासाहेब देशपांडे यांनी असाच एक कट टिळकांच्या कानावर घातला, ज्यात त्यांना सरकारी रुग्णालयात नेऊन प्लेग जडविण्याचा घाट घातला जात होता. असाच प्रकार चित्रशाळेचे वासुकाका जोशी यांच्याबाबतीतही घडला. पण ते शिताफीने निसटले. पुढे चित्रशाळेवर असणारा इंग्रज सरकारचा रोष जास्तच वाढला. पण हा कट टिळकांना कळल्यामुळे टिळकांनी एक स्वतंत्र रुग्णालय उभे करून ज्यांना सरकारी रुग्णालयात नसेल जायचे त्यांची सोय केली. रँडने हे रुग्णालय बंद करायचा आदेश दिला होता, पण टिळक त्याच्या वरताण असल्याने त्यांनी त्याच्या वरिष्ठांकडून त्यावर बंदी आणली.


🔸 रँडच्या मृत्यूला केवळ टिळकांचेच अग्रलेख कारणीभूत होते का?

तर याचे उत्तर आहे नाही. टिळकांनी “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” असा जळजळीत अग्रलेख जरूर लिहिला होता. पण त्यातून रँडला मारा, असा थेट संदेश कुठेच नव्हता. यामुळेच टिळकांनी पुढे न्यायालयात आपल्या बचावासाठी केसरीतील अग्रलेख ठेवले होते. मात्र, त्याचवेळेस इतर वर्तमानपत्रांनी दिलेले मथळे वाचण्यासारखे आहेत. (राजद्रोही अग्रलेखांची ही माहिती ब्रिटीशसरकारनेच गोळा केली होती. मात्र या एकाही पत्रावर कसलीही कारवाई झाली नाही, म्हणजे लोक फक्त टिळकांचेच अग्रलेख वाचून भडकणार होते…!)

सुधारक –
१. राजनिष्ठेचा कळस
२. प्लेगसमितीने चालविलेला छळ
३. भेकडांप्रमाणे असे रडता काय?
४. पुण्याच्या नागरिकांना उपदेश
५. सरकार बंदोबस्त करत नसल्यास तुमचा तुम्हीच करा.

प्रतोद –
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सिद्धता

पुणे वैभवच्या अंकातील तीन लेख


🔹रँडवध सनातन ब्राह्मणांनी घडवला असा आरोप केला जातो, याचा अर्थ इतर जातीत रँडविषयी काही असंतोष नव्हता का? रँडचा त्रास त्यांना नव्हता का?

रँडला मारण्याची योजना केवळ चापेकर बंधूच तयार करत होते, असं अजिबात नाही. पुण्याच्याच भाऊसाहेब रंगारी तालमीचे वस्ताद ठकुजी जाधवही रँडवधाची योजना आखत होते. जर चापेकर बंधूंना त्यात अपयश आले असते तर निश्चितच रँड जाधवांच्या हातून मारला गेला असता.


🔹ज्यांनी प्रत्यक्ष रँडवध केला, त्या हुतात्मा दामोदर हरी चापेकरांनी रँडचे अत्याचार लिहून ठेवले आहेत.

चापेकरांनी आपल्या आत्मवृत्तात या अत्याचारांविषयी लिहिले आहे,
“या लुटीबरोबर आम्ही नेहमी जात होतो. जावयाचा उद्देश, अन्याय स्वचक्षुने पहावयाचा, मी त्याला तपासणी म्हणण्यापेक्षा लूट म्हणणे पसंत करीतो. ही लुट चालू असली म्हणजे रॅंडसाहेब मुख्य त्यामध्ये. असे बडे बडे काही इकडून तिकडे फिरत असायचे म्हणजे कुलुपे कशी तोडतात, माल लांबवतात कसे, झोटिंगशाही काय चालली आहे. बरोबर काम करितात की नाही याची देखरेख यांच्याकडे होती. त्यावेळेस यांच्या डोक्यांत एक प्रकारची धुंदी असते. त्यामुळे ते कोणाही हिंदु गृहस्थास ओळखत नाहीत. बंडखोर मंडळीना नाही तिकडे जाळपोळ पाडतोड, धरपकड याखेरीज दुसरे आढळत नसे. ज्यांनी हा देखावा पहिला असेल तो या नराधमाना बंडखोरावाचून दुसरी उपमा देतील असे मला वाटत नाही. ही लूट कोणत्या प्रकाराने होई याविषयी नियम केले होते. त्या लेखी नियमांत पुष्कळ सौम्यपणा ठेवला होता. वर्तणुकीमध्ये त्याच्या अगदी उलट प्रकार दृष्टीस पडत असे. नियमांत कोणाच्या देवधर्म सोवळेओवळे याचा जेणेकरून उपमर्द होईल अशी वागणूक कोणी करू नये, असा स्पष्ट उल्लेख आहे. पण वागताना हे गोरे मुद्दाम आम्हाला चीड उत्पन्न होईल अशी वर्तणूक अमलात आणित असत, आणि हा प्रकार रँडसाहेब मोठ्या खुशीने पाहत असे.”


आपल्या देशबांधवांवर झालेल्या अत्याचारांना विरोध करणाऱ्या देशभक्तांना मूर्ख ठरवून रँडला परोपकारी दाखवून त्याचा पुतळा उभारण्याच्या आणि त्याची क्षमा मागण्याच्या गप्पा करणारे उद्या जनरल डायरचाही पुतळा बांधावा असेही सल्ले देतील. त्यांच्या चुका त्यांना वेळेत उमगतील, हीच ईश्वराला प्रार्थना.

  • Sagar Y. Kulkarni

संदर्भ :
१. स्वातंत्र्ययुद्धाच्या इतिहासाची साधने खंड २
२. क्रांतिकारक टिळक नि त्यांचा काळ – अ. ज. करंदीकर
३. हुतात्मा दामोदर हरी चापेकर यांचे आत्मवृत्त
४. कंठस्नान आणि बलिदान – वि. श्री. जोशी
५. चित्रशाळेचा इतिहास – रा. प्र. कानिटकर

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s