सन १९५७. दिल्लीहून निघालेली एक रेल्वे भोपाळच्या दिशेने वेगात निघाली होती. या गाडीचा वेग भोपाळ स्टेशन येण्याआधी थोडा कमी झाला होता. आणि अचानक त्या गाडीतून एका तरुणाने उडी मारली आणि समोर दिसणाऱ्या डोंगराच्या दिशेने धावत सुटला. गाडीतल्या प्रवाशांनी त्याच्याकडे एक तुच्छ नजर टाकली आणि गाडीने पुन्हा वेग घेतला. हे साहस करणारा तरुण म्हणजे डॉ. श्रीधर विष्णू वाकणकर. अर्थात हरिभाऊ वाकणकर. भारतातील सर्वात पुरातन शैलाश्रय (rock shelter) शोधणारे पुरातत्वशास्त्रज्ञ.
मानवी संस्कृतीचा उगम शोधण्याची धडपड ही अशा अभयासकांकडून अव्याहतपणे सुरू आहे. संस्कृतीचा उगम, विकास आणि ऱ्हास शोधण्याचे कुतूहल कालातीत आहे. Indology म्हणजे भारतविद्या / भारतशास्त्र ही विद्याशाखा या कुतूहलाला संशोधनाचा भक्कम आधार देते. या शास्त्रात मुख्यतः प्रागैतिहासिक कालखंड (prehistoric age) ते साधारणपणे १२ वे शतक (मुघलांची आक्रमणे सुरू होण्याआधी) या कालखंडाचा अभ्यास केला जातो. हा प्राचीन भारत या अभ्यासाच्या केंद्रस्थानी आहे. या शाखेच्या आधारे इतिहासाच्या आणि संस्कृतीच्या खुणा अभ्यासणं हे मोठं रंजक काम आहे. आदिम संस्कृतीच्या पाऊलवाटेने निघालेली ही इतिहासाची शाखा १२ व्या शतकापर्यंत येता येता एका देखण्या राजमार्गाचं रूप धारण करते. इतिहासाच्या या वाटेवरचा हा प्रवास मोठा अद्भुतरम्य आणि विलक्षण अनुभव देणारा आहे.
काळाचा प्रवाह अनादि आहे. या अनादि कालौघाचे अनेक मूक साक्षीदार आजही उभे आहेत. अनेक स्थित्यांतरातून जाऊन सुद्धा हे साक्षीदार काळाची एखादी कडी सांभाळत आहेत. अशा अनेक सुट्या कड्यांना एकत्र जोडण्याचं काम संशोधकांकडून सुरू आहे. त्या पैकी एक कडी आहे भीमबेटका.
भीमबेटका हे मध्य प्रदेशातील रायसेना जिल्ह्यातील एक प्रागैतिहासिक स्थळ. आज जागतिक वारसा म्हणून प्रसिद्धी पावलेले. रेल्वे मधून उडी मारून हरिभाऊ वाकणकरांनी शोध लावलेले हेच ते ठिकाण. विंध्य पर्वतराजीमध्ये असणारे सुमारे आठशे शैलाश्रय (rock shelters) इथे आहेत. त्यापैकी पाचशे गुहांमधून चित्रे काढलेली आढळतात. ही चित्रे भिन्न कालखंडातील आहेत. सर्वात जुनी चित्रे सुमारे ३०,००० वर्षांपूर्वीची आहेत. तर सर्वात अलीकडची चित्रे १२व्या शतकातील आहेत.
आदिमानवाच्या चित्रांतून त्या वेळच्या जीवनशैलीचे प्रतिबिंब या चित्रांमधून दिसते. शिकार, मृतदेहाचे दफन, सामूहिक नृत्य , पाठीला टोपली लावून अन्नाच्या शोधार्थ जाणाऱ्या स्त्रिया अशा अनेक चित्रांतून आदिमानवाचे जीवन काहीसे समोर येते.
तरीही भीमबेटका ही काही भारतातील प्रागैतिहासिक कालखंडाची पहिली कडी नाही. या कालखंडाचे पुरावे मुख्यतः भौतिक (physical) किंवा अलिखित असतात. म्हणजे असे शैलाश्रय, दगडी हत्यारे, मातीची भांडी, दफन स्थळे, शिल्पे इत्यादी. ज्या काळाचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत तो ऐतिहासिक कालखंड म्हणून ओळखला जातो.
या प्राचीन कालखंडाचा काळाच्या प्रवाहात लुप्त झालेला भारतीय संस्कृतीचा महत्वाचा तुकडा एका अपघातानेच हाती आला. त्या आधारावर एका प्राचीन, भव्य आणि पूर्णत्वाला पोचलेल्या संस्कृतीचे देखणे चित्र साकार झाले. या चित्राने जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांचे डोळे दिपले. या अपघातानंतर भारतातील indology च्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली.