सन १९२१. एव्हाना ब्रिटिश राज्याचा अंमल पूर्ण भारतात पक्का झाला होता. टपालसेवा, तारसेवा आणि रेल्वे सेवा यांच्या आधारावर ब्रिटिशांनी भारताचा कानाकोपरा एकमेकांशी जोडायला सुरुवात केली होती. सध्या पाकिस्तानात असणाऱ्या पण तत्कालीन हिंदुस्थानचाच प्रदेश असणाऱ्या पंजाबात लाहोर मुलतान रेल्वे मार्ग टाकण्याचे काम सुरू होते. या कामावर देखरेख करणाऱ्या कंत्राटदाराला बांधकामात काही वेगळ्या प्रकारच्या विटा वापरल्याचे लक्षात आले. त्याने चौकशी केली असता बांधकामाचे साहित्य कमी पडले म्हणून जवळच्या भागातून या विटा गोळा केल्याचे मजुरांनी सांगितले. त्या भागात कुतूहलापोटी त्याने जाऊन पाहिले असता तिथे असणाऱ्या इमारतींचे अवशेष हे अगदी वेगळ्या प्रकारचे दिसून आले.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याची (Archeological survey of India) स्थापना १८६१ साली सर अलेक्झांडर कनींगहॅमने केली होती. रेल्वेच्या बांधकामातील विचित्र पेचप्रसंगामुळे पुरातत्व खात्याचे संशोधक तेथे आले. राखाल दास बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तिथे उत्खनन करण्याचे ठरले आणि तसे ते झालेही. या उत्खननात सुमारे ५००० वर्षांपूर्वी पूर्णत्वाला पोचलेल्या एका विलक्षण नागरी संस्कृतीचे भव्य अवशेष मिळाले. हे ठिकाण होते हडप्पा. असेच उत्खनन मोहेंजोदडो इथे दयाराम सहानी या भारतीय पुरात्त्वज्ञानी केले.
यानंतर आसपासच्या अनेक ठिकाणांवर असे उत्खनन झाले आणि ५००० वर्षे जुनी असणारी भव्य संस्कृती जगासमोर आली. भारताचा इतिहास केवळ ख्रिस्तपूर्व दोनशे तीनशे वर्षे जुना आहे असे मानणाऱ्या पाश्चात्य संशोधकांसमोर प्राचीन भारतीय संस्कृती ५००० वर्षपूर्वीचे जुने अवशेष दाखवत दिमाखाने उभी राहिली.
आजपर्यंत सिंधू-सरस्वती संस्कृतीची सुमारे दोन हजार स्थळे सापडली आहेत. त्यापैकी पाचशे ठिकाणे पाकिस्तानात आहेत तर दीड हजार स्थळे भारतात आहेत.
या सर्व घटनाक्रमात आणि संशोधनात एका ब्रिटिश संशोधकाचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे सर जॉन मार्शल.
१८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कडून सगळे अधिकार काढून घेतले गेले आणि भारतात इंग्लंडच्या राणीचा एकछत्री कारभार सुरू झाला. १८७६ मध्ये राणी व्हिक्टोरिया परतंत्र भारताची अभिषिक्त सम्राज्ञी झाली. राणीच्या सत्तेखाली तत्कालीन भारतात विविध संस्थांची स्थापना झाली. अर्थात, यातील अनेक संस्था मुख्यत्वे अभ्यास आणि संशोधनासाठी स्थापन झाल्या असल्या तरीही ब्रिटिश साम्राज्याची भारतावरील पोलादी पकड पक्की करणे हा ही एक अंतःस्थ हेतू होताच. वानगीदाखल सांगायचं झालं तर- १७६७ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात स्थापन झालेली SOI अर्थात सर्वे ऑफ इंडिया. आता भारत सरकारच्या अधिकारात असणारी देशातील सर्वात जुनी संस्था. १७८४ मध्ये सर विल्यम जोन्स यांनी स्थापन केलेली एशियाटिक सोसायटी. ही प्रामुख्याने प्राच्यविद्या म्हणजे oriental research च्या संशोधनासाठी स्थापन झालेली संस्था १९१६ साली स्थापन झालेली ‘special irrigation cell’ अर्थात CWPRS (Central Water and Power Research Station, Pune)
भारतातील पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या निर्मितीमागे एशियाटिक सोसायटीच्या कामाचे बीज होते. गव्हर्नर वॉरेन हेस्टिंगच्या कारकिर्दीत अशा प्रकारच्या संस्थेच्या निर्मितीचा विचार प्रथम पुढे आला. भारताच्या अद्भुत आणि चित्तवेधक संस्कृतीचे कुतूहल ब्रिटिशांना होतेच. त्यामुळे या संस्कृतीच्या आणि परंपरेच्या मुळाशी जाऊन अभ्यास करण्यासाठी आधी एशियाटिक सोसायटी आणि नंतर अधिक सटीकतेने संशोधन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व खात्याची (Archeological Survey Of India) स्थापना १८७१ मध्ये झाली.
अलेक्झांडर कनिंगहॅम या खात्याचा प्रथम महानिदेशक म्हणजे डायरेक्टर जनरल बनला. भारतभर पसरलेल्या शिलालेखांमधली ब्राह्मी लिपी जेम्स प्रिन्सेप याने decode केली होती. यांच्याबरोबर अलेक्झांडर कनिंगहॅम ने काम केले होते. ब्राह्मी लिपी पुनरुज्जीवित करण्यात याचा मोठाच हातभार होता.
आपण ज्या सिंधू संस्कृतीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याच्या उत्खननामागे काम करणाऱ्या संस्थेचा एवढा मोठा इतिहास होता.
सर जॉन मार्शलची ASI (Archeological Survey of India) चे महानिदेशक म्हणजे डायरेक्टर जनरल म्हणून नेमणूक झाली तेंव्हा त्याचे वय अवघे २५ वर्ष होते. या नेमणुकीचा काळ केवळ पाच वर्षांचा होता. पण मार्शलच्या कार्यकुशलतेमुळे त्याने पुढे हे पद ३२ वर्षे भूषवले. त्याच्या कामावरील निष्ठेमुळे आणि नीतिमत्तेमुळे तो पुरातत्वाच्या जगात एक असामान्य पुरातत्वज्ञ म्हणून प्रसिद्धीस आला.
मार्शलने भारतातील पुरातन वस्तू आणि वास्तू यांचा शोध, दुरुस्ती, जीर्णोद्धार, देखभाल व जतन करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा महत्वपूर्ण पाया घातला. २० सप्टेंबर १९२४ च्या लंडन न्यूज च्या अंकात जॉन मार्शलने मोहेंजोदारो आणि हडप्पा या ठिकाणी एकाच नागरी संस्कृतीचे अवशेष सापडल्याची बातमी सर्वप्रथम जगाला दिली. काळाच्या उदरात दडलेल्या एक वैभवशाली नागरी संस्कृतीचे संशोधन जाहीर करण्याचे भाग्य लाभलेला असा एखादाच पुरातत्वज्ञ असेल.
अपघातानेच समोर आलेली सिंधू – सरस्वती संस्कृती ही जगातली एक विकसित नागरी संस्कृती (urban civilization) होती. तिची वैशिष्ट्ये तत्कालीन मानवी जीवनाचे पदर उलगडून दाखवतात.
विनिता हिरेमठ