आसिंधु सिंधुपर्यँता यस्य भारतभूमिका।
पितृभू: पुण्यभूचैव स वै हिंदुरिति स्मृत:।।
या श्लोकात उल्लेख असणारी सिंधू नदी ही प्रत्येक भारतीयाला वंदनीय आहे. याच नदीच्या काठी भारतीय संस्कृती निर्माण झाली आणि बहरली. मानवाच्या स्थैर्याचा इतिहास हा नद्यांच्या खोऱ्यापासून सुरू होतो. जगभरातील विविध संस्कृती नद्यांच्या खोऱ्यात निर्माण झाल्या. टायग्रीस, युफ्रेटीस, सिंधू, सरस्वती या नद्यांच्या खोऱ्यात प्राचीन नगरे वसली आणि भरभराटीला आली. पौर्वात्य संस्कृतीमध्ये भारतातील हडप्पा आणि मोहेंजोदारो ही दोन प्रमुख शहरे होती. प्राचीन नगर रचनेचा इतिहास सामान्यतः या शहरांपासूनच सुरू झाला.
या प्राचीन नगर रचनेचा इतिहास खूप interesting आहे. ही नगरे वर्तुळाकार किंवा लंबचौकोनी आकारात वसलेली असत. ही नगरे नदीकाठी असल्यामुळे पुरापासून संरक्षण होण्यासाठी या शहरांना भक्कम तटबंदी असे. वर्तुळाकार रचनेच्या नगरांमध्ये मध्यभागी बालेकिल्ला (citadel) असे. तर सार्वजनिक करमणुकीच्या इमारती शहराच्या पश्चिमेला असत. सिंधू संस्कृतीच्या नगरांमध्ये प्रचंड मोठ्या वास्तू बांधण्यात आल्या. तटबंदी, धान्याची कोठारे इतकेच नव्हे तर बंदरात बोटी दुरुस्त करण्याच्या गोद्या ही बांधण्यात आल्या. सामान्य जनांची घरेही दोन तीन मजली असत. मोहेंजोदारो मध्ये दर तिसऱ्या घराला विहीर होती. सांडपाण्याची व्यवस्था उच्चप्रतीची होती.
मोहेंजोदारो हे शहर साधारणपणे २०० हेक्टर वर पसरले होते. बांधकामासाठी या लोकांनी अत्यन्त प्रमाणबद्ध विटा वापरात आणल्या होत्या. याचे प्रमाण ४:२:१ म्हणजे ४०×२०×१० सेमी असे होते. प्राचीनकाळी इतरत्र कुठेही अशा प्रमाणबद्ध विटा वापरल्या गेल्या नाहीत.
सिंधू संस्कृतीमधील शहरे व्यापारावर बहरली. हा व्यापार केवळ प्रदेशांतर्गत नव्हता तर परदेशांशीही मोठया प्रमाणावर व्यापार होत असे. या व्यापारामुळे सर्वत्र सुबत्ता नांदत होती. प्राचीन भारताच्या वैभवाचा आणि सामर्थ्याचा पाया ५००० वर्षांपूर्वी रचला जात होता.
आदिमानवापासून आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास म्हणजे मानवाने आपल्या बुद्धीचा केलेला विकास आहे. परिस्थितीनुरूप बदल घडवत आणि विकसित होत मानव प्रजातीचा विकास हा आजच्या क्षणापर्यंत येऊन ठेपला आहे. हा प्रवास अविरत आहे. मानवाच्या या अविरत यात्रेत विकासाच्या अनेक पायऱ्या तो चढत गेला. या पायऱ्यांना आपण संस्कृती (civilization) म्हणतो. या संस्कृतींचा विकास हा वेगवेगळ्या कालखंडात आणि वेगवेगळ्या प्रदेशात झाला.
सिंधू संस्कृतीचा कालखंड आजपासून ५००० वर्षे मागे जातो. ही संस्कृती अचानक नागरी संस्कृती म्हणून उदयाला आली की छोट्याशा ग्रामीण वसाहती संस्कृती मधून तिचे रूपांतर भव्य अशा नागरी संस्कृतीमध्ये झाले याचे संशोधन अजूनही सुरू आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, या संस्कृतीच्या प्रगतीमध्ये व्यापाराचा खूप मोठा सहभाग आहे.
सिंधू संस्कृतीचा विस्तार हा बराच मोठा होता. आजपर्यंत सापडलेल्या स्थळांवरुन हा विस्तार १५०० किमी च्या विस्तृत पट्ट्यात पसरलेला होता. इतक्या मोठ्या प्रदेशामध्ये अंतर्गत व्यापार तर होतच असे पण परदेशी व्यापार ही मोठ्या प्रमाणावर होत असे.
सिंधू आणि सरस्वतीच्या अखंड जलस्रोतांमुळे या कालखंडात संपन्नता होती. धान्याचे मुबलक उत्पादन होते. मोहेंजोदारो, हडप्पा, लोथल येथे धान्याची कोठारे होती. तर हडप्पा येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गोदमजवळच घरे उभारली होती. कोठारांबाहेर धान्य उतरवून घेण्यासाठी कट्टे बांधले होते.
लोथल (गुजरात) येथील एक वास्तू अवशेष unique आहे. या ठिकाणी समुद्र तटावरील गोदीचे(dock) बांधकाम समोर आले आहे. या गोदीमध्ये समुद्रातील पाणी गोदीत घेण्यासाठी आणि जास्तीचे पाणी बाहेर काढून टाकण्याची व्यवस्था होती. जगातील सर्वात प्राचीन बंदर (port) म्हणून लोथल ओळखले जाते. या वास्तू रचनेवरून समुद्राच्या भरती आणि ओहोटीचे ज्ञानही प्राचीन स्थापत्यकारांना होते हे लक्षात येते. सध्याच्या लोथलपासून समुद्रकिनारा जरी लांब असला तरी साडेतीन चार हजार वर्षांपूर्वी हा किनारा लोथल जवळच असला पाहिजे.
सिंधू संस्कृतीचे वैभव हे असे विविध अंगांनी झळाळत होते. आणि या सुबत्तेच्या काळात मानवी आयुष्यात रंग भरणाऱ्या विविध कलाही बहरत होत्या.
– विनिता हिरेमठ