आजच्या कोरोना व्हायरस – कोविद १९ अनुषंगाने अचानक श्री सातवळेकरांचे पुस्तक मिळाले. हे पुस्तक वाचून जी माहिती मिळाली ती मी इथे थोडक्यात मांडली आहे.
२० व्या शतकात पाश्चात्य देशात वैद्यक शास्त्रात फारच वेगाने प्रगती होत होती. भारतीय वैद्यक शास्त्रातील अनेक विचार हे कालबाह्य ठरू लागले होते. पाश्चात्य देशातील अभ्यास करण्याचे पद्धत जी अनेक नवनव्या यंत्रांद्वारे केली जात होती त्यामुळे व्याधींची कारणे आणि उपचार याबद्दल निराळे विचार केले जात होते. सूक्ष्म जंतूं द्वारा रोगराई पसरते ह्याचा नुसता विचार व्यक्त करून न थांबता त्या जंतुंचे दर्शन सूक्ष्मदर्शक यंत्रांद्वारे समजू लागलेले होते. अर्थात मग आपल्या देशातील प्राचीन विचारांत ज्याचा इतिहास फारच जुना होता त्यांकाळांतील लोकांना रोगजन्तु ही संकल्पना ज्ञात होती कां? आणि अर्थातच सर्वात प्राचीन हे वेद असल्याने वेदांत रोगजन्तूंबद्दल काही माहिती आहे कां किंवा काही व्यक्त केले गेले आहे कां असा विचार आजही जसा होतो तसा त्यावेळीही झालेला दिसतो.
वेदांत काहीच नाही असे सांगणारे आणि येन केन प्रकारे वेदात सर्व काही आहे असे ओढून ताणून दाखविणारे असे दोन प्रकारचे लोक त्यावेळी होते. पं . सातवळेकरांचे हे पुस्तक वेदांत रोगजन्तु शास्त्र असे सार्थ मथळ्याचे आहे. हा एक निबंध असून त्यात पं सातवळेकरांनीच म्हटल्या प्रमाणे वेदांत रोगजन्तु शास्त्र आहे की नाही आणि असेल तर त्याचे स्वरूप काय आहे – एवढेच या निबंधात आहे. या निबंधातील खालील वेद मंत्र आणि त्याचा अर्थ लक्षांत घेण्यासारखा आहे.
ये अन्नेषु विविध्यंति पात्रेषु पिबतो जनान् – यजुर्वेद – १६/६२
खाण्याच्या अन्नांतून किंवा पाण्यातून माणसाच्या शरीरांत प्रविष्ट होऊन जे शरिरात व्याधी निर्माण करतात.
अन्वान्त्र्यं शीर्षण्यमथो पार्ष्ठेयं क्रिमीन् ।
अवस्कवं व्यध्वरं क्रिमीन् वचसा जंभयामसि ।। अथर्ववेद २/३१/४
आतड्यांत, मस्तकांत, व अन्य अवयवात जाणारे ( व तेथे व्याधी उत्पन्न करणारे) ’व्यद्वर’ आणि ’अवस्कव’ जंतू असतात ज्यांचा आम्ही नाश करतो. व्यध्वर याचा अर्थ येथे ’यज्ञ विरोधी’ असा असून जेथे यज्ञ नसतात तेथे ते उत्पन्न होतात असे किंवा ज्यांचा यज्ञाने नाश होतो असा आहे. याचा एक अर्थ ’हिंसेचा निषेध करणा-याचे विरोधी’ असाही आहे. म्हणजे हे जन्तु हिंसा होते तेथे असतात. जे मांस संपर्कामुळे उत्पन्न होतात.
दृष्टमदृष्टमतृहमथो कुरुरूमतृहम्
अल्गण्डून्त्सर्वान् छलुनान् क्रिमीन्
वचसा जंभयामसि ।। अथर्ववेद २/३१/२
दृष्य आणि अदृष्य कुरुरू, अल्गुण्डु आणि शलुन नावाच्या जन्तुंचा आम्ही नाश करतो. या मंत्रात कुरुरू, अल्गुण्डु आणि शलुन ही जन्तुंची नावे आहेत. त्याच प्रमाणे अनेक जन्तुंच्या जाती ज्या डोळ्याने दिसणा-या किंवा न दिसणा-या असतात असा उल्लेख आढळतो. यातून हे ध्वनित होते की वेदकाळात लोकांना अदृष्य असे रोगजन्तू असतात याची जाणीव होती. म्हणजे फक्त मायक्रोस्कोप आल्यावरच असे रोगजन्तु असतात हे कळले असे म्हणणे योग्य होणार नाही. रुद्र हे पण जन्तूंचे नाव आहे. रोदयन्तीति रुद्रा: – जे रडायला लावतात ते रुद्र, किंवा ज्यांच्या मुळे मनुष्याचा अन्त होतो ते रुद्र.
नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नं वातो वर्षमिषव: ।। यजुर्वेद १६/६४
रुद्राला नमस्कार असो. जे रुद्र पृथ्वी, अंतरिक्ष येथे रहातात आणि ज्यांचे अन्न वायु आहे आणि ज्यांचे शर पावसाच्या धारा आहेत. थोडक्यात हे रुद्र रूपी जन्तु संपूर्ण अंतरिक्षांत वायुभक्षण करून असतात. हे अती सूक्ष्म असतात आणि पाण्याद्वारे माणसाच्या पोटांत जाऊन व्याधी उत्पन्न करतात. त्यांचे हजारो प्रकार आहेत. व ते सर्वत्र निवास करून असतात. पुढे काही श्लोकांत असाही उल्लेख आहे की ते वृक्षांवरही असतात.
अशा रोगांपैकी ज्या रोगांत व्यक्तिगत व्याधी आहे तेथे व्यक्तिविशेषत्वाने औषधे आणि मानसप्रक्रियांचा उपयोग होतो. पण सामुदायिक रोगांपासून मुक्ती मिळविण्यास हे अपुरे आहेत. म्हणून यज्ञ प्रयोग सांगितलेला आहे. यज्ञामुळे वायु शुद्धी होऊन सर्व जन्तुंचा नाश केला जातो, जो आजारी व्यक्तीस आणि अन्य निवासी लोकांनाही होतो. यात काय करणे अपेक्षिलेले आहे?
१) विशिष्ट प्रकारच्या समिधांनी अग्नि प्रज्वलित करणे.
२) गाईचं उत्तम अशा तुपाची आहुती देणे
३) सुगंधित, रोग नाशक, स्निग्ध अथवा गोड अशा चार प्रकारच्या सामुग्रीचं यज्ञात ज्वलन करणे.
४) मनांत पवित्र भाव आणि श्रद्धा ठेवणे
५) परमेश्वर स्तुति रूप वेद मंत्रांचे उच्चारण करणे.
घरांत आणि बाहेर असा अग्नि जाळला तर हवा जन्तुंपासून शुद्ध होते. या पुस्तकात नोंदले आहे की ’ आजकाल मुनिसिपालिटीचे लोक सुद्धा हवा शुद्ध करतात, ज्या घरात प्लेगचे रोगी आहेत अशा घरात आणि घराभोवती चारी बाजूचा भाग अग्निने जाळतात. या अग्नीत गंधक किंवा अन्य द्रव्य जाळतात, जमीन खणून त्यात गवत भरून ते जाळतात’.
सूर्य प्रकाशात रोगजंतु टिकू शकत नाहीत. त्यामुळे विपुल सूर्यप्रकाश जेथे आहे तेथे रोगजंतुंचे भय कमी असते. विषयुक्त वनस्पतींनीही जन्तुंचा नाश करता येतो.
– श्याम वैद्य
संदर्भ:
रोगमें रोगजन्तु-शास्त्र – लेखक – श्रीपद दामोदर सातवळेकर – स्वाध्यायमंडल – औंध सातारा तृतीय आवृत्ती सन १९२३