शोधयात्रा भारताची #४ – सरस्वती-सिंधूची कला आणि अभिरुची

कला ही मोठी मनोरंजक गोष्ट आहे. अदृश्य असणाऱ्या तरीही जाणवणाऱ्या अनुभूतीला दृश्य स्वरूपात साकारणे म्हणजे कला. मग ते ऋग्वेदामधून येणारे उषस् सूक्त म्हणजे पहाट समयाचे वर्णन करणारी काव्यमय रचना असेल किंवा ऋग्वेदाचे पहिलेच अग्नीला उद्देशुन असणारे सूक्त असेल. निसर्गाच्या या विविध रूपांमध्ये जाणवणारी अविनाशी परमेश्वरी अनुभूती ऋचा बनून समोर येणे ही एक कलाच नाही का! वैदिक कलखंडामधील काव्याच्या कलेचे सर्वोच्च रुप आपल्याला वेदांमधून दिसते.

आता या कलेची अजून एक खासियत आहे बरं का! ही कला भीमबेटकाच्या गुहांमधून प्राथमिक स्वरूपात व्यक्त होते. या आदिम कलेमध्ये रोजच्या जगण्यातील चैतन्य दिसते. विकासाच्या पुढच्या टप्यात कलेची विविध रूपे विकसित होऊ लागलेली दिसतात. सरस्वती-सिंधूच्या नागरिकांना स्थैर्य आले आहे, सुबत्ता आली आहे आणि त्याच बरोबरीने त्या कलेला आश्रय मिळाला आहे.

भारतीय दृश्य कलांची सुरुवात मोहेंजोदारो हडप्पा या सिंधू संस्कृतीच्या कलेपासून ५००० वर्षांपूर्वी झाली. दैनिक गरजांसाठी आवश्यक असणारी शिवणकला त्यांना अवगत होती. त्याचबरोबर हा कालखंड ताम्र पाषाण युगाचा असल्याने धातूंचा वापर ही माहिती होता. धातूची केलेली नृत्यांगना तर प्रसिद्ध आहे. नक्षीकाम केलेली शाल पांघरलेल्या राजाचे शिल्प कलेच्या विकासाची साक्ष देते. घरांच्या भिंतींवर गेरूचा गिलावा करून त्यावर नक्षी काढत असत. तसेच मुद्रीकांवर तर अत्यंत सुबक चित्रे दिसतात.

आर्थिक सुबत्ता होती म्हणूनही असेल पण दागिन्यांची हौस स्त्रियांबरोबर पुरुषांनाही होती. त्यामुळे विविध प्रकारची आभूषणे बनवण्याची कलाही त्यांना अवगत होती. दागिने आणि स्त्रियांची नटण्याची आवड ही आजची नसून त्याचे ५००० वर्षांपूर्वीचे पुरावे सापडले आहेत. सोन्याचांदीचे दागिने, किंमती दगडाचे मणी एवढेच नव्हे तर कज्जल शलाका अर्थात eye pencil, ब्रॉंझ चे आरसे, हस्तिदंती कंगवे या गोष्टी तत्कालीन स्त्रियांची नटण्याची आवड समजण्यासाठी पुरेशा आहेत, नाही का!

सिंधू संस्कृती मध्ये भाजक्या मातीमध्ये घडविलेल्या मूर्ती आणि दागिने जे आज टेराकोटा म्हणून ओळखले जातात , त्याचबरोबर विविध आकारातील मातीची भांडी वापरली जात. आभूषणांमध्ये वापरण्यासाठी दगड,शंख,तांबे, चांदी आणि सोन्याचे मणी तयार केले जात. या सगळ्या पुराव्यांवरून तत्कालीन लोकांची कलेची अभिरुची उच्च प्रतीची होती हे लक्षात येते. पण इतक्या भरभराटीला आलेल्या या संस्कृतीच्या अंताचा प्रवास अज्ञात आहे. सुबत्ता, संपन्नता, स्थैर्याच्या उच्चतम अवस्थेला असणाऱ्या या संस्कृतीचा अंत आजही आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे करतो.

  • विनिता हिरेमठ

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s