राणी दुर्गावती

१६ व्या शतकात भारतात अनेक स्थित्यंतरे घडत होती. १३ व्या शतकात इल्तुतमिश भारतात आल्यापासून भारताच्या निरनिराळ्या भागात मुस्लिम आणि हिंदू राज्यांचा संमिश्र कारभार चालू होता. अनेक हिंदू राजे मुसलमान राज्यांबरोबर प्रसंगी सामोपचाराचा किंवा प्रसगी विरोध करून स्वत:स सांभाळून होते. मुस्लिम राजे वेळो वेळी आजूबाजूच्या भागातील हिंदू आणि मुस्लिम राज्याना आपल्या राज्यात समाविष्ट करून घेण्यासाठी कुरघोडी करण्याचे प्रयत्न करीत. बाबराने दिल्लीत मुघल सत्ता निर्माण केली होती. (१५२६-१५२७ – पानिपत) पण भारताच्या निरनिराळ्या भागातील राजवटींचा विचार केला तर अहमदनगर मधे अहमद निजामशहाने जम बसविला होता. (१४८९-१५०८) तर गोवळकोंड्यात कुतुब उल्मुल्कने कुतुबशाही प्रस्थापित केली होती. (१५१२-१५४३) व-हाडात अमीद बेरीदमुळे इमादशाहीचा उगम झाला होता. (१४८४-१५०४) आणि कर्नाटक आन्धात रामचंद्राने निर्माण केलेले विजयनगरचे राज्य अजून अस्तित्वात होते. (१४५१-१४७२) गुजराथ, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, बुंदेलखंड या भागातही काही स्वतंत्र राजे ज्यात निरनिराळ्या मुस्लिम घराण्याचे प्रमुख अथवा रजपूत थोड्या थोड्या भागावर कबजा करून होते.

अशाच अत्यंत अवघड आणि राजकीय अस्थिरतेच्या काळात १४८० मध्ये संग्रमशाह हा गोंडवनाचा राजा म्हणून गादीवर आला. तेंव्हा फक्त जबलपूर आणि मंडल भागात असलेलं त्याचं राज्य त्याने थोड्याच दिवसात सर्व नर्मदेभोवती पसरलं, ज्यात पूर्वी फक्त ४ जिल्हे होते ते ५०  पेक्षा जास्त झाले. ज्यांत सौगोर, डमोह आणि भोपाळ समाविष्ट होते. आपल्या सर्व राज्याचे काम नीट पहाण्याच्या उद्देशाने त्याने जबलपूरपासून सुमारे १५० कि.मि. वर चौरागड नावाचा किल्ला बांधला. त्याने गढा गावात जे पूर्वीचे राजधानीचे गांव होते ते पण अनेक सुविधांनी युक्त केले ज्यात मंदिरे, तलाव अशा गोष्टी होत. नर्मदेच्या उत्तर किना-यापासून विंध्य पर्वत राजीपर्यंतचा हा प्रदेश अनेक नैसर्गिक गोष्टींनी युक्त होता. संग्रामशाह इ.स. १५४२ मध्ये मरण पावला. हे लक्षांत घेतले पाहिजे की ज्यावेळी वर उल्लेखलेली अनेक राज्ये अन्यत्र निर्माण होत होती आणि तेथे सत्तासंघर्ष चालू होता, त्यावेळी या राजाने आपला भाग नीट संभाळून ठेवला होता.

संग्रामशाहचा मुलगा दलपतशाह हा देखणा तरूण होता आणि लढवय्या होता. त्याच्या लग्नाचा विचार चालला असताना, जवळच्या भागातील, महोबा येथील चंदेल राजाची मुलगी दुर्गावती ही त्याला योग्य आहे असे संग्रामशाहला वाटून त्याने लग्नाचा प्रस्ताव चंदेल राजाकडे पाठविला होता. चंदेल देशाची राजकन्या दुर्गावती ही एक लावण्यवती, शस्त्र शास्त्र शिकलेली मुलगी होती. पण चंदेलच्या क्षत्रिय राजघराण्यात आपली मुलगी कुणा गोंड व्यक्तीला, क्षत्रिय नसलेल्या व्यक्तीला देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे या प्रस्तावाला दुर्गावतीच्या वडिलांनी नकार दिला, आणि हा विवाह होऊ शकत नाही असे कळविले. पण असे सांगितले जाते की दुर्गादेवीने दलपतशाहाला पूर्वीच पाहिले होते आणि ती त्याच्या बद्दल त्याच्या शोर्याबद्दल जाणून होती. तिने मनाने त्यालाच पती म्हणून वरले होते. आपले हे हृदगत्  तिने एक पत्र दलपतरायाल लिहून कळविले आणि असे सुचविले की तुला हे मान्य असेल तर तू एका शूर वीराप्रमाणे प्रसंगी युद्ध करून मला पळवून घेऊन जा. हा प्रस्ताव  दलपतरायने स्वीकारून आपल्या सैन्यानिशी चंदेल राजावर स्वारी करून दुर्गावतीच्या पित्याला हारविले आणि दुर्गावतीला जिंकून स्वगृही येऊन तिच्याशी लग्न केले. संग्रामशाहच्या मृत्यूनंतर दलपतशाह राजा झाला आणि दुर्गावतीबरोबर राहून राज्य कारभार करू लागला. त्यांना लगेचच एक पुत्ररत्न झाले ज्याचे नांव त्यांनी वीर नारायण असे ठेवले.

दुर्दैवाने लग्नाच्या नंतर अवघ्या चार वर्षात दलपतराय घोड्यावरून पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दुर्गावतीने, जी एक रजपूत घराण्यातील मुलगी होती, सती जाण्याचा निर्णय केला. पण राज्याच्या कारभारी लोकांपैकी अनेकांनी तिचे मन वळविले, की वीर नारायण एवढा लहान असताना, राणीने असा निर्णय केला तर राज्यकारभार कोण करणार आणि प्रजेचे काय होणार, तेव्हा तिने असा दुराग्रह करू नये. मुलाला वाढवण्याचे काम करणे आवश्यक आहे व अशा अवघड वेळी तिने पतीबरोबर सती जाणे योग्य नाही असे मानून तिने पुढील सर्व आयुष्य मुलाचे आणि रयतेचे भले करण्यासाठी घालवायचे ठरविले. राणीने मग आपल्या मुलाला गादीवर बसवून स्वत: राज्यधुरा सांभाळायला सुरवात केली. १५४६ साली राणीने राज्यकारभार हाती घेतला आणि तिने पुढील १५ वर्षे वीर नारायणाला गादीवर बसवून राज्य चालवले.

तिच्या राज्यातील चौरागड (नरसिंगपूर जिल्हा), सिंगोरगड (दमोह जिल्हा), गढ (जबलपूर) आणि भोपाळ मधेल चौकीगड आणि गुनेरगड हे तिच्या राज्याचे पहारकरी होते आणि तिच्या राज्यशक्तीचे द्योतक होत.राणी सुविद्य होती, राज्यकारभाराची जाण  असलेली होती आणि प्रसंगी शस्त्र हाती घेऊन लढण्याची तिच्यात क्षमता होती. ती धनुष्यबाण, तलवार आणि त्यावेळी नुकत्याच येऊ लागलेल्या बंदुका वापरण्यात तरबेज होती.  धर्म, न्याय आणि व्यापार, व्यवसाय याची जाण तिला असल्याचे जाणवते. तिने शेतीसाठी पाणी साठवायला तलाव बांधून घेतले. मंदिर, महाल इमारती अशी अनेक बांधकामेही तिच्या काळात झाली. रयतेसाठी दानधर्म, दया आणि न्यायाने तिने त्यांच्यासाठी जे जे योग्य असेल ते केले. मुलाला चांगला शिकवून शस्त्रप्रवीण केला. तेव्हा जर काही आक्रमणाचा धोका आला तर ती स्वत: कमरेला तलवार बांधून हत्तीवरून संग्रामास सिद्ध होई. तिच्या काळात तिच्या प्रांतात अतीशय समृद्धी होती आणि खजिन्यात कर स्वरूपात खूप रकम जमा होत असे. असे म्हणले जाते की तिच्या प्रांतातील नागरिक सरकारी कर सोन्याच्या नाण्यात भरत. राज्यात लोक सुखी आणि समाधानी होते.

तिच्या राज्यावर पहिले आक्रमण १५५७ मध्ये बाज बहादूर – माळव्याचा राजा – याने केले. दुर्गावती स्वत: शत्रूचा मुकाबला करण्यास नर्मदेच्या काठावर जाऊन तिने बाज बहादूरचा पराभव करून त्याला परत फिरायला लावले. बाज बहादूर त्यानंतर पुन्हा तिच्या वाटेला गेला नाही. राणीने आपल्या प्रांताच्या संरक्षणासाठी खूप सैन्य आणि हत्ती कायम तयार ठेवलेले असत. तिच्या हत्तींच्या साठ्यात एक अतीशय देखणा पांढरा हत्ती होता. आपल्या मंत्रीगणाद्वारे  राणी आपला राज्यकारभार नीट करीत होती. तिच्या मंत्री गणांत आधार कायस्थ या नांवाचा एक अतीशय बुद्धीबान असा ब्राह्मण होता.

कृष्ण भक्त आणि मुनी वल्लभाचार्य (१४७९-१५३०)यांच्या वैष्णव पंथाचा उदय झाल्यावर  वल्लभाचार्यांच्या नंतर त्यांचा मुलगा विठ्ठलेश्वर हे त्या संप्रदायाचा प्रमुख बनले (१५४३). जगन्नाथपुरीच्या दौ-यानंतर (१५५९-६०) विठ्ठलेश्वर, राणी दुर्गावतीच्या गढ प्रांतात आले. राणी स्वभावत: अतीशय  धार्मिक प्रवृत्तीची होती आणि आपल्या इथे इतका श्रेष्ठ द्विज आलेला पाहून,  त्यांना भेटून तिने त्यांना आपल्याच प्रांतात  रहाण्याची विनंती केली. विठ्ठलेश्वरांनी तेथे मठ बांधला आणि ते तेथे तीन वर्षे राहिले. ज्या काळात राणी वेळोवेळी त्यांना भेटत असे. याच ठिकाणी विठ्ठलेश्वरांची बिरबल आणि तानसेन अशा अकबराच्या दरबारातील गुणी लोकांशी भेटी झाल्या. राणीने विठ्ठलेश्वरांसाठी सात घरे बांधली जी जागा आजही सातघर नावाने ओळखली जाते. विठ्ठलेस्वरांना अकबर गढ मंडलावर चालून येण्याचे कळल्यावर त्यांनी मथुरेला जाण्याचे ठरविले. राणीने त्यांना मथुरेपर्यंत जाताना त्याच्या बरोबर आपला मंत्री आधार आणि काही लोक पाठविले होते.

गढ मंडला राज्याची ही संपन्नता अन्य अनेक राज्याना कळत होती. या राज्याच्या संपन्नतेच्या कथा सर्वदूर माहीत होत होत्या.  कडा-मानिकपूर येथे (गंगा नदीच्या काठावर) असलेल्या अकबराच्या त्या भागावर नेमलेल्या सुभेदाराला – सुभेदार आसफखाँ याला मोह होत होता. त्याला असेही वाटत होते की रूपवान राणी दुर्गादेवीला आपल्या जनान्यात आणावी. पण हे जमायचे कसे? म्हणून त्याने अकबराकडे त्याच्या गढा मंडला घेण्याच्या विचाराबद्दल संमती विचारली आणि अकबर बादशहाने ती तत्वत: दिलीही पण काही कारण नसताना युद्ध करणं हे पण त्याला योग्य वाटेना.

एका दंतकथे प्रमाणे अकबर बादशहाने तिच्याकडील पांढरा हत्ती आणि तिचा मंत्री आधार कायस्थ या दोन्ही गोष्टी भेट म्हणून द्याव्या अशी याचना केली. राणीने खालील उत्तर दिले:

अपनी सीमा राज की, अमल करो परमान
भेजो नाग सुपेत सोइ अरु अधार दिवान

राणीने स्पष्ट शब्दात दोन्ही गोष्टी देऊ शकत नाही असे कळविले. राजा अकबराला कारण मिळाले आणि त्याने आसफखाँला गढ मंडलावर चढाई करून ते घेण्याचा आदेश दिला.

दुस-या एका दंतकथेप्रमाणे अकबर बादशहाने राणी दुर्गावतीकडे एक सोन्याचा चरखा पाठविला. त्याचा संदेश असा की एका विधवा स्त्रीने सूत काढावे,  राज्य करू नये, राज्य आम्हाला द्यावे. राणी काही कमी नव्हती. तिने प्रत्युत्तर म्हणून कापूस पिंजण्याचे धनुष्य पाठवले, संदेश असा की आपण  पिंजारी आहात, आपला व्यवसाय सांभाळा राज्य सोडा. राजाने आसफखाँला गढमंडल घेण्याचा आदेश दिला.

कारण काही झाले तरी एक नक्की की अकबर बादशहाने कपट करून राणी दुर्गादेवीचे राज्य बळकावण्याची मोहीम आखली. आसफखाँने गढ मंडलावर आक्रमण केले तेव्हा त्याच्याकडे ६००० घोडेस्वार आणि १२००० पायदळ होते आणि तोफखानाही होता. कडा माणिकपूरा कडून सैन्यासह आसफखाँ यमुना नदी ओलांडून सिंगोरगडाच्या दिशेने येऊ लागला. सिंगोर गड हा अतीशय दुर्गम किल्ला आहे. राणीने तो त्या गडापाशी येण्यापूर्वीच गडावर जाऊन तेथून प्रतिकार करण्याचे ठरवून सिंगोर गडाकडे सैन्य आणि हत्तीदलासह कूच केले. पण संग्रामशहा त्यापूर्वीच सिंगोरगडाशेजारून – संग्रामपुरातून राणी समोर गढ आणि सिंगोरगडा मधे येऊन पोहोचला होता. परिणामी राणीला मोकळ्या जागेतच त्याचा मुकाबला करण्याची वेळ आली. राणीने निकराने मुघल सैन्याचा मुकाबला दिवसभर केला आणि नंतर सुमारे १२ मैल (१८-२० कि.मी.) माघार घेत एका थोड्या डोंगराळ भागात मोर्चा बांधला. राणीचा रात्री मुघल सैन्यावर आघात करण्याचा विचार तिच्या दमलेल्या सैन्याला रुचला नाही पण त्यांची लढण्याची हिम्मत कमी झालेली नव्हती.

दुस-या दिवशी घनघोर युद्ध झाले. राणी स्वत: हत्तीच्या अंबारीत बसून पुढे जाऊन समोरासमोर शत्रूचा मुकाबला करत होती आणि आपल्या सैन्याला प्रोत्साहन देत होती. राणीचे सैन्य धनुष्य बाण, तलवारी आणि हत्तींच्या सहाय्याने मुघल सैन्याशी लढत होते. त्याच वेळी आसफखाँचा तोफखाना पोहोचला आणि त्याने गोंड सैन्यावर तोफांचा भडिमार चालू केला. राणी तरीही लढत राहिली, पण हा भडिमार तिच्या सैन्याची दुर्दशा करणारा होता. जमेल तशी माघार घेणे हा उपाय दिसत होता. राणीने हा मोर्चा बांधताना अशा जागी बांधला होता की त्याच्या मागील बाजूस एक कमी पाणी असलेली नदी होती ज्यातून माघार घेण्याची वेळ आली तर दुस-या तीरावर जाता येण्यासारखे होते. पण नेमके त्याच वेळी त्या नदीस पूर येऊन ती पाण्याने भरून वाहू लागली होती. आणि अशा वेळी अशी एक आवई उठेली की तिचा पुत्र वीर नारायण जो तिच्या सह युद्ध लढत होता तो मारला गेला. त्याच सुमारास राणीच्या डोळ्यात एक बाण लागून ती जखमी झाली आणि तिने बाण काढून टाकला पण त्याचे टोक आत राहिले आणि तिला त्या डोळ्याने दिसेनासे झाली. राणीचे सैन्य इतस्तत: विखुरले. राणी तरीही अंबारीतून बाण मारत राहिली, लढत राहिली. आता राणीच्या कंठात एक बाण लागला आणि राणी हतबल झाली. राणीला आपला अंत जवळ आल्याचे जाणवले. तिच्या माहुताने  आणि जवळच्या सैनिकांनी तिला सांगितले की हुकूम करा, नदीस पूर असला तरी आम्ही तुम्हाला मागे नदीतून घेऊन जातो. पण राणीने आपल्या माहुताला त्याच्या कट्यारीने तिला मारून जीवनातून मुक्त करावे असे सांगितले. तो माहूत हे करण्यास धजेना तेंव्हा तिने त्याच्या कमरेची कट्यार स्वत: काढून स्वत:च्या हृदयात खुपसून घेतली आणि प्राणत्याग केला. राणी दुर्गावतीस वीरगती प्राप्त झाली.

राणीचा मुलगा जखमी होता आणि त्याला काही सैनिक लपतछपत सिंगोरगडावर घेऊन गेले. आसफखाँ ने गढ मंडल लुटले आणि जेव्हा त्याला कळले की वीर नारायण सिंगोरगडावर गेला आहे तेव्हा त्याने मोर्चा परत गडाकडे वळवला. खरे म्हणजे हा गड इतका अवघड होता की वीर नारायणाला सहज पकडणे शक्य नव्हते. पण फंद फितुरी मुळे आसफखाँ ने गडावर ताबा घेऊन वीर नारायणास मारले. तेथे असलेले सर्व सैन्य मारले गेले आणि स्त्रियांनी जोहार करून आत्माहुती दिली. सर्व गोंड राज्य अकबराच्या साम्राज्याचा भाग झाले.

आसफखाँला या विजयाने अमाप संपत्ती मिळाली. सुवर्ण नाणी, हिरे आणि सुवर्ण तांब्यांच्या वस्तू त्याने लुटून नेल्या. राणी कडचे सुमारे १००० हत्तीही त्याने नेले. पण यातील फारच थोडा भाग त्याने अकबरास दिला. गढ मंडलाचे राज्य अशा त-हेने कायमचे मुघल राज्याचे झाले. राणी जेथे वीरगतीस प्राप्त झाली त्या जागेजवळ जबलपूर पासून १०-१५ कि.मी. वर राणीची समाधी आहे, रामनगर येथे सापडलेल्या शिलालेखात गोंड राजांची वंशावळ आहे, त्यात राणीचे नांव तिच्या या पराक्रमासह लिहिलेले आहे.

 

संदर्भ:

 1. त्रिपुरी का इतिहास – लेखक व्योहर राजेन्द्रसिंह और विजयबहादूर श्रीवास्तव – मानसमंदिर जबलपूर – १९३६
 2. Akbar – Vol. II- Author – J.M.Shelat- Bharatiya Vidya Bhavan – Published in 1959
 3. The Story Of Gondwana – By Eyre Chatterton, D.D. – Pitman & Sons – 1916
 4. Heroines Of Indian History – Rai Bahadr A.C.Mukerji – Oxford University Press – 1933
 5. Report of A Tour In the Central Provinces in 1873-74 and 1974-75 by
  Alexander Cunningham – Volume IX – Calcutta – Office of the Superinendent of Government Printing 1879 –
  references to Tarikh-i-Alfi, Invasion in 1560,
  references to Tabaka-i-Akbari – Invasion in 1563
  Also reference to Ferishta

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s