सरस्वती-सिंधू संस्कृतीची वैशिष्ठ्ये अशी– आखणी करून बांधलेली नगरे, नगरांना असलेली तटबंदी, त्यामधील काटकोनातील रस्ते, दोन किंवा तीन मजली घरे, घराघरात संडासची सोय, सांड पाण्याचा भुयारी मार्गाने निचरा करण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी वेगळी भुयारी व्यवस्था, पाणी साठवण्यासाठी मोठे हौद, विहिरी, बांधीव तळी, पुष्करणी, काही घरात मिळालेली यज्ञकुंड, दूर देशांशी चाललेला व्यापार, समुद्र मार्गाने व्यापार, जहाज बांधणी व दुरुस्ती करण्याची सोय, हस्तिदंताच्या वस्तू, दगडांपासून मणी व मण्यांपासून दागिने तयार करणारे कारखाने, नक्षीदार मातीची भांडी आणि लहान मुलांचे खेळ!

येथे केलेल्या उत्खननात मिळालेल्या वस्तूंवरून, येथील मुले कोणते खेळ खेळायचे, त्यांची खेळणी काय होती, मोठी माणसे सुद्धा काही खेळायची का, आदि गोष्टींचा मागोवा घेऊ. आपण पाहणार आहोत तो प्रदेश आहे – हरयाणा, पंजाब, राजस्थान, सिंध आणि गुजरातचा, आणि काळ आहे साधारण सामान्य युग पूर्व ७,५०० (7,500 BCE) ते सामान्य युग पूर्व १,५०० (1,500 BCE) दरम्यानचा. मुख्यत्वेकरून हे खेळ आहेत ४ ते ५ हजार वर्षांपूर्वीचे.

अगदी लहान मुलांसाठी असलेले खेळ प्रथम पाहू. लोथल येथे दोन सुबकशी मातीची भांडी मिळाली. त्या भांड्यांवर काळ्या रंगाच्या शाईने सुंदर चित्र काढले आहे. एक चित्र आहे – तहानलेल्या कावळ्याच्या गोष्टीचे. तळाशी पाणी गेलेल्या मडक्यात कावळा दगड टाकतो, आणि पाणी वर आल्यावर पाणी पिऊन तहान भागवतो. तर दुसरे चित्र आहे – चोचीत पुरी धरून झाडावर बसलेल्या कावळ्याचे. झाडाखाली एक लबाड लांडगा पुरीकडे आशाळभूतपणे पाहत आहे. आता तो लांडगा कावळ्याच्या गाण्याची स्तुती करणार, आणि कावळ्याने गाणे म्हणायला चोच उघडताच पुरी खाली पडली, की ती घेऊन तो पळून जाणार! ही भांडी  पाहून वाटते की, अरे! हे लहान मुलांसाठी केलेले चित्रांचे गोष्टीचे पुस्तक तर नाही! कोणा गुड्डी आणि बंटीची ही ठरलेली वाडगी होती का? दुपारच्या वेळी आई  त्यांना त्यांच्या ठरलेल्या वाडग्यातून खाऊ देत असे. मग गुड्डी आणि बंटी पायरीवर बसून खाऊ खातांना आपापल्या वाडग्यावरच्या चित्रातली गोष्ट एकमेकांना सांगत असतील का?

उत्खननातून वितभर किंवा त्याहून लहान मातीच्या पुतळ्या मिळाल्या आहेत. कोणी त्यांना मातृदेवता म्हणतात. कोणी शोभेच्या वस्तू म्हणतात. त्या लहान मुलींच्या खेळण्यातील बाहुल्या असतील का? आणखी मिळाली आहेत, छोटी छोटी भांडीकुंडी. पिटुकली वाटी, इत्कुसं ताट, लहानसा माठ, बारीकसा झाकणाचा सट आणिक काय काय. कुणा छकुलीने मैत्रिणींबरोबर ओसरीवर भातुकलीचा खेळ मांडला असेल का? पिटुकल्या वाटीतून खोटी-खोटी आमटी पितांना छकुलीने मैत्रिणीला फू-फू करून प्यायला सांगितले असेल?

आणि कोणा बंड्याने कधी “आता मी काय करू?” असे म्हणून फार कटकट केली, तर त्याची आई त्याला हा चक्रव्यूहाचा खेळ काढून देत असावी. मग थोडा वेळ एकट्याने बसून बंड्या हा खेळ खेळला असेल. मातीचे पिटुकले चेंडू चक्रव्यूहातून फिरवत फिरवत, खाली न पडता बरोब्बर मध्यभागी घेऊन जायचे!

लहान मुलांसाठी तयार केलेल्या सुंदरशा, पक्ष्यांच्या आकारातील अनेक शिट्ट्या मिळाल्या आहेत. अशा शिट्ट्या पाकिस्तान आणि भारतातील ग्रामीण भागात अजूनही मिळतात. एखाद्या सुस्त दुपारी, कुणा उनाड पोरांनी, या शिट्ट्या वाजवून वाजवून खूप आवाज केला असेल का?

खेळण्यातले मातीचे प्राणी आणि पक्षी देखील मिळाले आहेत. बैल, म्हैस, बकऱ्या, मेंढ्या, डुक्कर, वाघ, घोडा, गेंडा, माकड, कबुतर वगैरे प्राण्यांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती. कदाचित लहान मुले आपापली चित्रे घेऊन एकमेकांकडे खेळायला जात असतील. त्यांच्या मेंढ्या एकमेकांना खोटी खोटी टक्कर देऊन शक्ती दाखवत असतील. किंवा सगळ्या गुरांना घेऊन चिंटी पिंटी पोरं, शेजारच्या अंगणात चरायला नेत असतील.

काही प्राण्यांना पायाशी फिरणारी चाके आहेत. त्यांना धरून ‘गाडी – गाडी’ करत फिरवले असेल. नुकतंच  चालायला लागलेली ठकी अशा प्राण्याची दोर हातात धरून त्याला घेऊन घरभर फिरली असेल. काही प्राण्यांची डोकी दोरीने पाठीला बांधली आहेत. मागून दोरी ओढली की तो प्राणी मान वर-खाली करतो. खेळायला आलेल्या पिंटूने मान डोलवणारा बैल असलेल्या चिंटूला, विचारले असेल – “सांग सांग भोलानाथ! पाऊस पडेल काय?” मग चिंटूने त्याच्या नंदीबैलाची मान वर खाली करून “हो! पाउस पडणार!!” असा संकेत दिला असेल! काय सांगावे?

थोड्या मोठ्या मुलांच्या खेळातल्या चकत्या सापडल्या आहेत. भाजलेल्या माती पासून केलेल्या एकापेक्षा एक लहान चकत्या, एकमेकांवर रचून ठेवताच मनात आरोळी उठते “ल S गो S री S S !” चिंध्यांचा चेंडू करून आज सुद्धा हा खेळ पाकिस्तान आणि भारतातील मुले खेळतात. तसेच मातीपासून तयार केलेल्या गोट्या आणि भोवरे मिळाले आहेत.

दोरीने हलवता येणाऱ्या प्राण्यांच्या व स्त्री पुरुषांच्या बाहुलीचे कठपुतलीचे खेळ केले असावेत. काही मातीचे मुखवटे सापडले आहेत त्या वरून असा अंदाज व्यक्त केला जातो की वेगवेगळे मुखवटे लावून कलाकार नाटकांचे खेळ सदर करत असावेत. धोलाविरा येथे एका रंगमंचाचे अवशेष सापडले आहेत. त्यावरून मनोरंजनासाठी असे खेळ करत असावेत असे वाटते.

या गावांतील उत्खननातून अनेक लहान गाड्या सापडल्या आहेत. या छोट्या हातगडीत भाजी ठेवून, कोणी बिट्टू “भाजी घ्या भाजी! ताजी ताजी भाजी!” म्हणत फिरला असेल. या सुबकशा बैलगाडीत भोलुने एक छोटासा गाडीवान बसवला असेल, अन् गाडीत गवताच्या लहान लहान पेंढ्या, नाहीतर भांडी भरून, वडिलांसारखं दुसऱ्या गावी समान विकायला घेऊन चालला असेल! आपली गाडी पळवत तो म्हणाला असेल, “ए! सरका सरका! बाजूला व्हा! माझ्या सर्जा राजाची गाडी चालली रे चालली! हुर्रर्रर्र!!”

काही बैठे खेळ सापडले आहेत जसे – बुद्धिबळासारखा वेगवेगळ्या प्रकारच्या सोंगट्या असलेला पट सापडला आहे. हा बुद्धिबळाचा प्राचीन प्रकार असावा असे मानले जाते. तसेच दगड, माती व हाडापासून तयार केलेले विविध प्रकारचे dice मिळाले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आखीव रेखीव पट सुद्धा मिळाले आहेत. लहान खळगे असलेला एक पट मिळाला आहे. त्यावर चिंचोके वापरून खेळले असावेत असे वाटते.

खेळांमध्ये व्यायाम धरायचा असेल, तर असे वाटते की सिंधू संस्कृतीच्या लोकांना योगासने माहित होती. योगासनाच्या वेगवेगळ्या मुद्रेतील मातीच्या कैक बाहुल्या मिळाल्या आहेत. कदाचित शोभेच्या बाहुल्या म्हणून त्या तयार केल्या असाव्यात. किंवा त्यांचा वापर योगासने शिकवण्यासाठी सुद्धा केला गेला असेल. कोण जाणे! हे लोक कुस्ती सारखे काही खेळ खेळायचे का? कोंबड्यांची किंवा मेंढ्यांची झुंज लावायचे का? एखादा पैलवान प्राण्याला झुंज द्यायचा का? असे प्रश्न अजूनतरी अनुत्तरीतच आहेत.

या प्राचीन काळातल्या, मातीत गढलेल्या वसाहतींमधले काय टिकले आहे, तर दगडाच्या, तांब्याच्या आणि मातीच्या वस्तू. बाकी कापडाच्या, लोकरीच्या, चामड्याच्या किंवा लाकडापासून तयार केलेल्या वस्तू काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला मिळतात ती फक्त मातीची आणि दगडाची खेळणी. लहान मुलींसाठी कापडाच्या बाहुल्या केल्या असतील तर ते कसे कळणार? किंवा रंगीत कापडाचे चौकाड्यांचे पट केले असतील तर कोणास ठाउक? किंवा विटीदांडू सारखा लाकडी वस्तूंनी खेळलेला खेळ असेल तर काय जाणो? या खेळांबद्दल जर कुठे लिहून ठेवले असेल तर एक मार्ग आहे. पण ते भूर्जपत्रावर लिहून ठेवले असेल तर काय उपयोग? तो लेख दगडावर नाहीतर मातीच्या फळ्यावर कोरला असता तर ठीकय. अर्थात, या लोकांनी लिहिलेले अजून वाचता येत नाही तो प्रश्न वेगळाच. असो. कसे कळावेत त्यांचे सगळे खेळ? शिवाय  इतर खेळ जे कोणत्याही साहित्याशिवाय खेळले जातात, जसे – सूरपारंब्या, पकडापकडी किंवा लपाछपी हे चित्रित करून ठेवले असतील तरच कळणार. ते सुद्धा दगडावर किंवा मातीच्या खापरावर चित्रित / मुद्रित केले असतील तरच.

अशा अनेक जर-तर मधून मिळणारे धागेदोरे अगदी थोडे आहेत. त्या सर्व पुराव्यांना धरून बांधता येतात ते केवळ अंदाज. आणि त्यामधून उमटते ते एक पुसटसे चित्र. जे पूर्ण दिसत नसल्याने अधिक आकर्षक होते. जे अस्पष्ट असल्याने बारकाईने पाहायला लावते. आणि उत्तरे देण्यापेक्षा आपल्यालाच प्रश्नांवर प्रश्न विचारते, “ओळख पाहू, हा खेळ कोणता असेल! असा खेळ तुझ्या लहानपणी होता का? आणि सांग बरे, चित केल्यावर आम्ही काय म्हणून चित्कार करायचो? सांग! सांग!! सुटतंय का कोडं? की हरलास?”

 


2 responses to “सरस्वती-सिंधू – खेळ आणि खेळणी”

  1. मृणाल Avatar
    मृणाल

    यातले कित्येक खेळ तर साधारण चाळीस वर्षांपूर्वी आपल्या पिढीलाही खेळायला मिळाले.

  2. kalaapushpa Avatar
    kalaapushpa

    होय! त्या काळापासून आजपर्यंत अनेक प्रथा चालत आल्या आहेत. अशी continuity आक्रमण झाले असल्यास दिसत नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

%d bloggers like this: