सर मॉर्टीमर व्हिलर (१९४४-१९४८ Archeological Survey of India) यांनी असे मत मांडले की – “सिंधू संस्कृतीचा नाश तिच्या हडप्पा, मोहेंजोदारो सारख्या शहरांचा विध्वंस आर्यांनी केले. आर्यांनी इंद्राच्या अधिपत्याखाली अनार्यांचे ९९ किल्ले उध्वस्त केले. ऋग्वेदामध्ये हरियूपीया हे हडप्पाचे प्राचीन नगरनाम असावे.” इत्यादी विचार व्हिलर याांनी मांडले, व त्यासाठी ऋग्वेदामधील दाखले दिले.
त्यातच मोहेंजोदारो येथे केलेल्या उत्खननात विविध अवस्थेत पडलेले मानवी सांगाडे दिसून आले. एका ठिकाणी मानवी सांगाड्यांची गर्दी आढळली. काही जिन्यातच घराबाहेर पडण्याच्या धडपडीत मरून पडलेले आढळले. या आर्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे मोहेंजोदारोचे रहिवासी जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होते … असे मत सर व्हिलर यांनी मांडले. त्यांच्या नुसार सिंधू संस्कृतीचा विनाश हा आर्यांनी अनार्यांवर केलेल्या हल्ल्यामुळे झाला. परंतु, हे सांगाडे वेगवेगळ्या स्तरातील असून त्या सांगाड्यांचा आणि सिंधू नगरीच्या विनाशाचा प्रत्यक्ष संबंध नाही हे नंतर सिद्ध झाले.
असो. तर, सर मॉर्टीमर व्हिलर यांच्यासारख्या अनेक पश्चिमात्यांनी मांडलेल्या मतांमधून एक मूलभूत प्रश्न उभा राहिला. हे आर्य कोण होते? हाच तो आर्यप्रश्न! हा आर्यप्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न व संशोधने ही वर्तुळाकार साखळी आहे. म्हणजे या प्रश्नांच्या साखळीच्या उत्तराची शेवटची कडी आजही आपल्या हाती नाही. उलट त्यात नवीन प्रश्नांच्या नवीन कड्या जुळत गेल्या.
या प्रगत संस्कृतीची पायाभरणी करणारे आणि ती संस्कृती वैभवाच्या कळसाला नेणारे लोकच आर्य होते का? की आक्रमक म्हणून ते भारतात आले आणि नंतर इथलेच रहिवासी झाले?
पाश्चात्य संशोधकांचे संशोधन बहुतांशी पूर्वग्रदूषित ( biased) होते. हे संशोधन करताना ते कायम राज्यकर्त्यांच्या भूमिकेत राहिले. त्यामुळे आर्य प्रश्नाचे उत्तर शोधताना भारतीय संस्कृती बद्दलची तुच्छ भावना या संशोधकांच्या मनात होती.
या संशोधनाचा परिणाम म्हणून एक सिध्दांत समोर आला. तो म्हणजे आर्य आक्रमणाचा सिद्धांत! (Aryan invasion theory). या गृहितकाची सुरुवात झाली ती युरोपियन संशोधकांनी केलेल्या संस्कृत भाषेच्या अभ्यासापासून. हा अभ्यास करताना त्यांना संस्कृत आणि युरोपियन भाषांमध्ये साम्य आढळले. आणि यातून त्यांनी असा निष्कर्ष काढला की आर्य हे मूळचे भारतातील नसून परकीय होते आणि त्यांनी भारतावर आक्रमण केले. भारतीय पारतंत्र्याच्या कालखंडात ब्रिटिशांनी असा निष्कर्ष काढणे म्हणजे स्वतः चे श्रेष्ठत्व सिध्द करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
भारतामध्ये ब्रिटिश सत्ता जशीजशी बळकट होत गेली तसेतसे हे गृहितक त्यांनी पक्के केले. या Aryan Invasion Theory मध्ये त्यांनी म्हंटले होते की हे आर्य पश्चिम युरोपातून आले आणि येताना त्यांची भाषा आणि समृद्ध वारसा घेऊन आले. ब्रिटिशांना या ‘परकीय’ आर्यांचे तेजस्वी वारसदार म्हणून मिरवण्यात एक वेगळाच आनंद मिळत होता. जसजसा काळ पुढे सरकत होता तसेतसे हे गृहितक भारतीयांच्या मनात पक्के होत होते.
१९४७ साली दीडशे वर्षांच्या कारावसातून भारत स्वतंत्र झाला. पण या स्वातंत्र्याने भारतीयांना आपल्या संस्कृतीचा स्वाभिमान, आत्मसन्मान दिला नाही. ज्या संस्कृतीचा वारसा कित्येक सहस्त्रके भारतीयांनी जपला तो वारसा मूळचा आपला नाहीच हा सल होताच. आणि म्हणून या आर्य प्रश्नाचे खरे उत्तर शोधायलाच हवे होते.
– विनिता हिरेमठ