मॅक्स मुल्लर हा जर्मन scholar. म्हणजे जन्म आणि शिक्षण जर्मनीमध्ये. त्यानंतर इंग्लंड मधल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून जबाबदारी. आणि कार्यक्षेत्र संस्कृत भाषा, वेद, भारतीय धर्म आणि तत्वज्ञानाचा प्रगाढ अभ्यास. आता या प्रकांड पंडिताचा आणि आर्य प्रश्नाचा काय संबंध? तर याचं उत्तर असं आहे की आर्य सिद्धांताची संकल्पना अधिक बळकट झाली ती मॅक्स मुल्लरच्या भाषाविषयक संशोधनामुळे.
मॅक्स मुल्लर ने १८५१ ते १८७१ या काळात आर्य सिद्धांताचा मोठा प्रसार केला. यामुळे आर्य हा एक वंश होता, इंद्र त्यांच्यापैकीच एक होता आणि त्याने सिंधू संस्कृतीतील नगरांचा नाश केला अशी मते पक्की झाली.
पुढे १८७१ साली मॅक्स मुल्लर ना त्यांची चूक समजली आणि त्याचे आर्य प्रश्नाबद्दलचे मत पूर्णपणे बदलले. परंतु त्यांच्या त्या आधीच्या मत प्रदर्शनामुळे भारतीय इतिहासाचे झालेले नुकसान भरून येऊ शकले नाही.
आर्य हा एक वंश समजला गेल्यामुळे द्रविड हाही एक वंश ठरवला गेला. आणि विद्वानांनी भारतीय समाज या दोन गटात विभागला. भाषेचा निकष लावून या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या सिद्धांताच्या विरोधात असणारे ही काही पाश्चात्य संशोधक होते पण त्यांच्या मताला त्यावेळी फारशी किंमत दिली गेली नाही.
आर्य या शब्दाचा उहापोह करताना एक गोष्ट अभ्यासातून पुढे आली ती म्हणजे आर्य हा एक वंश होता अशी व्याख्या किंवा अर्थ कुठेही सांगितलेला नाही. तर आर्य या शब्दाचा अर्थ सुसंस्कृत, आदरणीय, श्रेष्ठ असा होतो. या बाबतीत स्वामी विवेकानंदांचे मत ही आर्य सिद्धांताच्या विरोधात होते. East and West या त्यांच्या भाषण संग्रहात त्यांच्या या मताचा उल्लेख आला आहे. त्यामुळे भाषेच्या आधारावर आर्य परकीय होते हे मत खरे धरता येत नाही.
१९२४ मध्ये रामप्रसाद चंदा या भारतीय पुरातत्वज्ञानी त्यांच्या सुरुवातीच्या अभ्यासात आर्य सिद्धांत मान्य केला होता. पण काही वर्षांतच त्यांचे हे मत पूर्णपणे बदलले. आणि साधारणपणे १९२९ च्या काळात रामप्रसाद चंदा यांनी त्यांच्या पुढच्या अभ्यासातून आणि लिखाणातून आर्य सिद्धांत अमान्य केला. पण नंतरच्या काळात त्यांनी केलेले हे काम फारसे पुढे आले नाही.
आर्य प्रश्नाचे उत्तर शोधण्याची अनेकांची धडपड अनेक वर्षे सुरू होती. पण या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेल असा कोणताही सर्वमान्य पुरावा समोर आला नव्हता.
६ सप्टेंबर २०१९ रोजी एक पत्रकार परिषद झाली. यात आर्य प्रश्नाचे latest संशोधन जाहीर करण्यात आले. पुण्यातील डेक्कन कॉलेजचे माजी कुलगरू आणि ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉ. वसंत शिंदे यांनी हे संशोधन जाहीर केले. या संशोधनाअंती आर्य हे मूळ भारतीय असून बाहेरून आलेले आक्रमक नव्हते हे सिद्ध करण्यात आले. हावर्ड मेडिकल स्कूल, कॅलिोर्निया विद्यापीठ अशा प्रख्यात १३ संशोधन संस्थांनी या संशोधनात आपला हातभार लावला होता. २००६ पासून हे उत्खनन आणि त्याचा अभ्यास सुरू होता.
राखीगढी हे हरियाणातील एक स्थळ. हडप्पा संस्कृती मधील एक महत्त्वाचे शहर. आर्य प्रश्नाचे उत्तर शोधताना येथे मोठ्या प्रमणावर उत्खनन करण्यात आले. याआधी इथे फारसे संशोधन झाले नव्हते. या उत्खननात सापडलेल्या मानवी सांगड्यांचा DNA हा भारतीयांशी मिळता जुळता असून त्यामुळे आर्य हे बाहेरून आलेले आक्रमक नसून मूळ भारतीयच होते हे सिद्ध झाले. आर्य प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा गेली ९८ वर्षे प्रयत्न सुरू होता, त्याचे उत्तर मिळाले!
अर्थात या संशोधनानंतरही प्रश्नांची आणि वादविवादाची मालिका थांबलेली नाही. ती सुरूच राहणार आहे. कारण नाविन्याचा शोध ही अखंड प्रक्रिया आहे. अथातो ब्रह्म जिज्ञासा!
विनिता हिरेमठ