जुलै १९४७. भारताला स्वातंत्र्य मिळणार आणि तेही १५ ऑगस्ट रोजी हे एव्हाना निश्चित झाले होते. स्वतंत्र देशांकडे कार्यभार हस्तांतर करण्याची तयारी ब्रिटिश सरकारने सुरू केली होती. तशातच त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते ते देशांच्या सीमा निश्चित करण्याचे. शेवटचा व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंबॅटन याने यासाठी जुलै महिन्यात बॉर्डर कमिशन ची नेमणूक केली होती. सर सिरील रँडक्लिफ या समितीचा अधयक्ष होता. या रँडक्लिफ कडे भलतेच किचकट काम होते. या समितीला खंडित भारतच्या सीमा निश्चित करायच्या होत्या. अखंड भारताचे तीन भाग होणार होते. पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान आणि खंडित भारत. आणि हे सीमा निश्चितीचं काम १५ ऑगस्टच्या आधी व्हायलाच हवे होते.
या सीमा निश्चितीच्या कामाबरोबरच माऊंटबॅटन समोर अजून एक आव्हान होते ते म्हणजे, अखंड भारतातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये असणाऱ्या वस्तूंची वाटणी करणे. भारताची फाळणी ही फक्त देशाचे तुकडे होण्यापुरतीच नव्हती तर अगदी त्या कार्यालयांमधून असणाऱ्या टेबल, खुर्च्या, पेन्सिली, शाईच्या बाटल्या यातही वाटे होते. एक वाटा भारताचा आणि एक वाटा पाकिस्तानचा.
या वस्तूंचे वाटप करण्यासाठी दोन्ही देशांची एक संयुक्त समिती नेमण्यात आली होती. या वाटणी मध्ये उत्खननात सापडलेल्या वस्तूंचे ही वाटप होणार होते. नव्याने जन्माला येणाऱ्या पाकिस्तानात उत्खननात सापडलेल्या अनेक वस्तू अखंड भारतातल्या वेगवेगळ्या वस्तू संग्रहालयात अडकून पडल्या होत्या. आता मात्र या वस्तूंवर मालकी हक्क प्रस्थापित होणार होता. आणि पाकिस्तानकडे असणाऱ्या वस्तूंची संख्या खूपच कमी होती. एकंदरीत चर्चा करताना भारतीय प्रतिनिधींच्या लक्षात आले की पाकिस्तानी प्रतिनिधींना या सगळ्या वस्तूंमध्ये फार काही इंटरेस्ट नाही. त्यांच्या या कामचलाऊ धोरणाचा फायदा भारतीय प्रतिनिधींनी घ्यायचे ठरवले. त्यांनी पाकिस्तानी प्रतिनिधींना असे पटवून दिले की या हजारो वस्तूंची वाटणी करणे फार अवघड काम आहे. कारण प्रत्येक वस्तूवर चर्चा करून अंतिम निर्णय घेणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे भारतीय प्रतिनिधींनी अशी शिफारस केली की फाळणीच्या दिवशी ज्या वस्तू ज्या देशाकडे आहेत त्या तिथेच राहाव्यात. पाकिस्तानी प्रतिनिधींनी याला कुठलाही आक्षेप घेतला नाही आणि भारतीय प्रतिनिधींच्या चातुर्यामुळे हडप्पा, मोहेंजोदारो येथे सापडलेल्या वस्तू भारताकडेच राहिल्या.
५००० वर्षांपूर्वीच्या या वस्तूंना बोलके करण्याचा प्रयत्न आजही अनेक संशोधक करत आहेत. या मध्ये अनेक दागिने, मातीची भांडी, खेळणी, याबरोबरच ब्राँझ च्या प्रतिमाही मिळाल्या आहेत. तर मातीच्या मूर्तीमध्ये काही शिल्पे अशी आहेत की ती मातृदेवतेची असावीत असा तर्क आहे. अर्थात सिंधू संस्कृतीमधील लोकांच्या धार्मिक चालीरीतीबद्दल अजूनही पूर्ण माहिती मिळाली नाही. या उत्खननात अनेक मुद्रा (seal) मिळाल्या आहेत. यावर सिंधू लिपीतील अक्षरे कोरली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही ही लिपी कुणालाही वाचता आलेली नाही.
सिंधू संस्कृतीचा १९२० च्या दशकापासून सुरू असणारा अभ्यास आजही संपलेला नाही आणि त्याबद्दलचं कुतूहलही! एवढ्या भव्य नागरी संस्कृतीमधल्या लोकांच्या धार्मिक कल्पना आजही समजलेल्या नाहीत. इतकी देखणी आणि नियोजनबध्द शहर उभारणी करणाऱ्या शासन व्यवस्थेबद्दल आजही आपल्याला माहिती नाही. व्यापारासाठी वापरल्या गेलेल्या मृण्मय मुद्रांवरची भाषा आजही अज्ञात आहे.
एखाद्या पडद्याआड असणाऱ्या सुंदर तरुणीचे वाऱ्याची झुळूक आल्यानंतर ओझरते दर्शन व्हावे तसे काहीसे सिंधू संस्कृतीचे आहे! आजही ही सिंधू नगरी गूढ आकर्षणाचे वलय पांघरून उभी आहे. आणि कदाचित या गूढ अंधुक वलयातूनच मानवी संस्कृतीचा पुढचा प्रवास सुरू झाला – तो होता दुसऱ्या नागरीकरणाचा…
काळाच्या अखंड वाहणाऱ्या प्रवाहात सिंधू संस्कृती उदयाला आली आणि प्रगतीच्या चरम अवस्थेला पोचून लयाला गेली. काळाच्या या अखंड प्रवाहात तिची अनेक रूपे आजही चमकून जातात.
संस्कृतीच्या उत्पत्तीचा प्रवास हा अंताकडे सुरू झाला तरी कालपुरूषाचे अव्याहत चक्र थांबत नाही. ते फिरतच राहते. सिंधू संस्कृतीच्या नाशाची अनेक करणे होती. आणि प्रामुख्याने ती नैसर्गिक आपत्तींशी संबंधित होती. निसर्गाच्या प्रकोपाचा फटका तिथल्या नागरिकांना बसत होताच. आणि यामुळेच येथील लोकांनी हळूहळू स्थलांतर करायला सुरुवात केली.
सिंधू संस्कृती उतरणीला लागल्यावर त्या संस्कृतीच्या लोकांनी तापीच्या खोऱ्यात स्थलांतर करायला सुरुवात केली. तापीच्या खोऱ्यात असणाऱ्या काळया कपाशीच्या ( black cotton soil) जमिनीमुळे हे लोक तापी खोऱ्यात स्थिर झाले आणि शेती मासेमारी पशुपालन करू लागले.
नागरी संस्कृतीचा प्रवास ग्रामीण संस्कृतीकडे सुरू झाला. सिंधू संस्कृतीच्या वैभवशाली खुणा या कालखंडात नाहीशा झाल्या. हा कालखंड उत्तर सिंधू संस्कृती ( late Harappan phase) म्हणून ओळखला जातो.
हळूहळू तापीच्या खोऱ्यातून हे लोक महाराष्ट्राकडे स्थलांतर करू लागले. सिंधू संस्कृतीची संपन्न परंपरा अशी सर्वत्र विखुरली गेली आणि सावळदा संस्कृती (तापी खोरे), माळवा संस्कृती ( नर्मदा खोरे), जोर्वे संस्कृती ( महाराष्ट्र) अशा छोट्या स्वरूपातल्या ग्रामीण संस्कृती उदयाला आल्या. या संस्कृतीमध्ये नागरी जीवनाच्या कोणत्याही खुणा आढळत नाहीत. एका उन्नत संस्कृतीचे विखुरलेले तुकडे तापी नर्मदा नद्यांच्या आधाराने तग धरून होते.
सिंधू संस्कृती हे भारतातील पहिले नागरीकरण होते. त्यानंतर साधारणपणे १००० वर्षांचा काळ गेला ज्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही नगरे विकसित झाली नाहीत. त्यानंतर भारतामध्ये एका नवीन युगाची सुरुवात झाली. या युगाने मानवी जीवन अधिक सोपे आणि सरळ केले. लोहयुगाची (iron age) ही सुरुवात होती. या नवीन युगाच्या आरंभानंतर पुन्हा एकदा मानवी जीवनाला आकार आला. स्थैर्य आले. शेतीच्या कामासाठी लोखंडी अवजारांचा वापर सुरू झाला. भारतातल्या दुसऱ्या नागरीकरणाची (second urbanization) ही सुरुवात होती. आणि यावेळी हे स्थळ होते पवित्र गंगेचे सुपीक खोरे!
– विनिता हिरेमठ