राणी दुर्गावती

गढ मंडलाची दिव्य राणी, राणी दुर्गावती
कथा तुझ्या शौर्याची आजही लोक तिथे सांगती

चंदेलांची रुपवती कन्या असे शूर वीर
गोंड राजा दलपतशहाला मनी मानीला वर

युद्ध करूनी गोंड राजा जिंकी दुर्गावतीला
कृष्णाने जणू पळवुन नेले प्रिय रुक्मिणीला

वीर नारायण वंशांकुर तो आला जन्माला
परी अचानक काळ घाली राजावर घाला

धैर्यवान दुर्गावती परि नच सोडी धीर
पुत्रा साठी शिरी घेतला सर्व राज्य भार

वर्षे पंधरा गोंडवनीचे राज्य राणीचे
विद्या, कीर्ति, ऐश्वर्याने सुखी समाजाचे

धर्म, न्याय, सेवा याने लोकप्रीय राणी
दिगंत कीर्ति होती पसरली लोक गाती गाणी

दुष्ट दृष्टि पण पडे अचानक अकबर राजाची
केली मागणी त्याने होण्या मांडलिक मुघलांची

स्वाभिमानी राणीने त्याला उत्तर पाठविले
नाही देइन राज्य तुला मी प्राण जरी गेले

दिल्लिश्वर मग धाडि गोंडवनी आसफ खानाला
चालुन आला राणीवरती घेउन सैन्याला

शूर राणी जाई चालुन थोपविण्या त्याला
सिंगुरगडच्या पायतळाशी शह देई त्याला

अवघड जागी बांधुन मोर्चे केला संग्राम
लढे राणीचे सैन्य घेऊनी मुखि दुर्गा नाम

हत्तीच्या अंबारित बसुनी ती चालवी चाप बाण
दुर्गेचा होई भास ती करिता शत्रूचे दमन

खानाने मग केला चालू तोफांचा भडिमार
सैन्य राणीचे झाले हतबल लढले परि वीर

भीष्मापरि ती विद्ध जाहली शत्रूच्या बाणांनी
परी म्हणे ती नाही जायचे येथुन परतोनी

जाणिव झाली राणीला की अंतसमय आला
खुपसुन घेऊन हृदयी खंजिर प्राणत्याग केला

जाता राणी, गोंडवन गेले मुघल राज्यात
नाही राहिले धर्म राज्य या कुठेच देशात

दुर्गेचाच अंश होती राणी दुर्गावती
वंदन करुया तिला आणिक गाऊ तिची आरती

धन्य गोंडवन, धन्य मंडला धन्य नर्मदा तीर
धन्य भारत भू जिथे जाहली दुर्गावती थोर

  • श्री श्याम वैद्य

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s