शोधयात्रा भारताची #९ – जनापदांचा उदय

गंगोत्रीला उगम पावून कधी अलकनंदा तर कधी भागीरथीच्या रुपात गंगा अवतरते. साठ हजार सगर पुत्रांना आपल्या आगमनाने आणि स्पर्शाने संजीवनी देणाऱ्या गंगेचा प्रवाह आजूबाजूचा प्रदेश सुजलाम् सुफलाम् करतो. या पवित्र गंगेच्या खोऱ्यात दुसऱ्या नागरीकरणाचा उदय झाला. या नागरीकरणाचा पाया होता लोह. म्हणजे लोहयुगाच्या सुरुवातीनंतर या दुसऱ्या नागरीकरणाचां पाया रचला गेला.

धातूंचा शोध ही मानवी जीवनातली क्रांतिकारक घटना मानली पाहिजे. कारण त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची अवजारे आणि हत्यारे बनवणे शक्य झाले. ज्या जमातींना या धातूंचा वापर ज्ञात झाला त्यांचे वर्चस्व सर्व क्षेत्रांत  प्रस्थापित झाले.  भारतामध्ये साधारणपणे इ.स. पूर्व ६०० हा कालखंड  या लोहयुगाचा आणि दुसऱ्या नागरीकरणाचा काल मानला जातो. याचा अर्थ या आधी भारतीयांना लोहाचा वापर माहिती नव्हता असे नव्हते. म्हणजे इ. स.पूर्व ८०० आणि त्या आधीही लोहाचा वापर होत असावा असे पुरावे मिळाले आहेत. तर एका मताप्रमाणे उत्तर प्रदेशात सापडलेल्या पुराव्यांवरून लोहाचा वापर कदाचित इ. स.पूर्व १५००-१६०० पासून होत असावा. पण हे मत अजून सर्वमान्य नाही. नागपूर जवळील नयकुंड येथे इ.स. पूर्व ७०० मधली एक लोखंडाची भट्टी (furnace) मिळाली आहे.

लोहयुगात लोहाचा वापर मुख्यत्वे शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजारांसाठी होऊ लागला. याचा परिणाम असा झाला की अवजारांच्या सहाय्याने  शेती केल्याने उत्पादन वाढू लागले. आणि जास्तीचा धान्यसाठा होऊ लागला. हा अतिरिक्त धान्यसाठा (surplus production) छोट्या छोट्या देवाणघेवाणीसाठी उपयोगात आणला जाऊ लागला. हळूहळू या देवाणघेवाणीतून विविध कामे करणाऱ्यांची वर्गवारी होऊ लागली. शेतकऱ्यांबरोबर कारागिरांचाही वर्ग उदयाला आला. कामाच्या वर्गवारीने मानवी वसाहती स्वयंपूर्ण होऊ लागल्या. अधिक होणारे धान्योत्पादन जसे देवाणघेवाणीला चालना देणारे होते तसेच या काळात या व्यापारासाठी अजून एक घटक महत्त्वाचा ठरला, तो म्हणजे मुद्रा किंवा नाणी. या मुद्रांमुळे व्यापार अधिक सहज होऊ लागला. याचा परिणाम असा झाला की, स्वयंपूर्ण वसाहती वेगाने विकसित होऊन वाढू लागल्या.  समाजव्यवस्था, शासनव्यवस्था यांच्यामध्ये वर्गवारी होऊ लागली. या स्वयंपूर्ण खेड्यांचे, गावांचे रूप बदलून ते अधिक व्यापक झाले. आता जनपदे (city states) आकार घेऊ लागली होती.

लोहयुगामधील जनपदांची सुरुवात आणि वाढ ही वेदांमध्ये वर्णन केलेल्या राज्यव्यवस्थेशी मिळतीजुळती आहे. अर्थात वेदोत्तर काळात त्यात काळानुरूप बदल ही होत गेले. वैदिक राज्यव्यवस्था असो किंवा नंतर असणारी जनपदांची व्यवस्था असो, ही व्यवस्था राजा सांभाळत असला तरीही प्राचीन काळापासून कधीही अनियंत्रित नव्हती. राजाचे अधिकार आणि त्याला पूरक (complementary) असणारे सामान्य जनांचे अधिकार कायमच होते.

वेदोत्तर काळामध्ये अनेक संकल्पना बदलू लागल्या. या काळात वेदांमध्ये वर्णन केलेल्या इंद्र, वरुण वगैरे देवतांचे महत्त्व कमी होऊ लागले होते. वैदिक रुद्राचा अवतार असणाऱ्या शिवाला आणि इंद्राचा सहाय्यक असलेल्या विष्णूला महत्त्वाचे स्थान प्राप्त होऊ लागले होते. याच काळात यज्ञाची कर्मकांडे ही वाढू लागली होती. आणि समाज यज्ञ व्यवस्थेमध्ये अडकू लागला होता. या  पार्श्वभूमीवर लवकरच म्हणजे इ.स.पूर्व ६ व्या शतकात दोन नवीन धर्म उदयाला आले.

– विनिता हिरेमठ

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s