ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्याईस्यात् सार्वभौम: सार्वायुष
आंतादापरार्धात् पृथिव्यैसमुद्रपर्यंताया एकराळिती ।
आमचे राज्य कल्याणकारी असो. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असो. येथे लोकराज्य असो. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असो. अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असो. आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.
मंत्रपुष्पांजली मधील या दोन श्लोकांवरून वैदिक समाजात ‘राज्य’ या संकल्पनेबद्दलची स्पष्टता दिसून येते. प्राचीन काळातील विविध वाङ्मयात राज्य, भौज्य, स्वाराज्य, वैराज्य, साम्राज्य, एकराज्य, अशा विविध राज्यप्रकारांचे उल्लेख मिळतात. वैदिक कालखंडात अशा विविध प्रकारची राज्ये अस्तित्वात होती याचे हे प्रमाण आहे.
कालानुरूप या राज्यव्यवसस्थेमध्ये काही बदल होत गेले पण भारतीय शासन व्यवस्था कायमच प्रजासत्ताक स्वरूपाची राहिली आहे. इ.स.पूर्व ६वे शतक हे इतिहासाच्या प्रवासातला मैलाचा दगड आहे. कारण याच कालखंडात बौद्ध आणि जैन धर्मांचा उदय झाला आणि याच शतकाच्या सुरुवातीला उत्तर भारतात लहान लहान राज्येही उदयास आली. पण ही राज्ये स्वतंत्र होती. या राज्यांना कोणीही सार्वभौम राजा नव्हता. अशा राज्यांना गणराज्ये म्हणत. या गणराज्यांमध्ये राजसत्ता एका व्यक्तीच्या हाती नसून गण किंवा अनेक व्यक्तींच्या हाती असे. पण त्याचबरोबरीने राज्य किंवा सार्वभौम अधिकार राजाच्या हातात असणारी जनपदेही होती.
जनपदे म्हणजे छोट्या आकाराची राज्ये तर महाजनपदे म्हणजे राजाच्या अधिकाराखाली येणारा बराच मोठा प्रदेश. प्राचीन ग्रंथांमधून उल्लेख असणारी महाजनपदे त्याकाळी खूप महत्वाची होती. कारण या महाजनपदांमध्ये गणराज्य स्वरूपाची व्यवस्था होती.
इ.स.पूर्व ६व्या शतकात अशी लहान मोठी पुष्कळ राज्ये गणराज्य किंवा प्रजासत्ताक पद्धतीने कारभार करत होती. या सर्व महाजनपदांमध्ये मगध महाजनपद हे बलाढ्य राज्य होते. या राज्याचा संस्थापक बिंबिसार राजा असला तरी हे राज्य वाढवण्याचे श्रेय नंद घराण्याकडे जाते. हे साम्राज्य मोठे असले तरी त्याचा राजा धनानंद अतिशय जुलुमी आणि लोभी होता. त्याने जनतेवर अनेक जाचक कर लादले होते. त्याच्या खजिन्यात चौदा कोटी सुवर्णमुद्रा जमा होत्या असे उल्लेख मिळतात.
याच धनानंदाविरूद्ध प्रतिकार करून आर्य चाणक्या व चंद्शीरगुप्त मौर्य यांनी महान मौर्य सम्राज्य निर्माण केले. नंद राजावर विजय मिळवून चंद्रगुप्त मौर्य घराण्याचा पहिला राजा झाला. आता जवळपास सगळा उत्तर भारत चंद्रगुप्त मौर्याच्या अधिपत्याखाली होता. चंद्रगुप्त हा अतिशय कुशल शासक होता. त्याच्या कारकिर्दीत मौर्य साम्राज्य भरभराटीला आले.
चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा राजा झाला. त्यानेही हे राज्य कुशलतेने सांभाळले. बिन्दुसारानंतर अशोकाने मौर्य साम्राज्याचा अफाट विस्तार केला. अशोकाने अनेक युद्धांत दिग्विजय प्राप्त केले आणि विजिगिषु सम्राट बनला. सम्राट अशोकाच्या काळात मौर्य साम्राज्य अफगाणिस्तानापासून ओरिसापर्यंत आणि दक्षिणेस कृष्ण तुंगभद्रा नद्यांपर्यंत पसरले होते.
चंद्रगुप्त मौर्याच्या काळात आर्य चाणक्याने जी शासनव्यवस्था आरंभली होती ती अशोकाने समर्थपणे पुढे नेली.
– विनिता हिरेमठ