श्री. जेफरी आर्मस्ट्रोंग VASA – Vedic Academy of Sciences and Arts या संस्थेचे संस्थापक आहेत. या संस्थेद्वारे ते योग, ध्यान, तत्त्वज्ञान या विषयांवर कार्यशाळा घेतात. गीता, रामायण, महाभारत, पुराणे आदिवर व्याख्यान देतात. मागची ४५ वर्ष ते योगाभ्यास करत आहेत. अमेरिकेतील युवकांसह ते भारतीय युवकांना सुद्धा भारतीय ज्ञानाचे धडे देतात. ज्योतिष, आयुर्वेद, योग व वैदिक तत्त्वज्ञानावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके बेस्ट सेलर्स आहेत. तसेच ते स्वत: एक उत्तम कवी आहेत. त्यांनी दोन हजाराहून अधिक कविता लिहिल्या असून त्यांचे ७ मुसिक अल्बम प्रसिद्ध झाले आहेत.
त्यांच्याशी झालेल्या गप्पांचा हा सारांश …
मला उत्सुकता होती त्यांच्या नावाविषयी. ‘कवींद्र ऋषी’ हे नाव त्यांनी घेतले आहे. त्या मागचे कारण काय होते? त्यावर जेफरी म्हणाले – “हे मी घेतलेले नाव नसून, मला मिळालेले नाव आहे. मला पहिले नाव मिळाले ‘जेफरी’, जे माझ्या जन्मदात्या आई-वडिलांनी दिले. त्यानंतर माझ्या दीक्षा गुरूंनी मला – ‘जामदग्न्यदास’ हे नाव दिले. व त्याही नंतर माझ्या ज्योतिष गुरूंनी मला ‘कवींद्र ऋषी’ हे नाव दिले. मी असे मानतो कि माझे गुरु भेटल्यावर माझा दुसरा जन्म झाला. मी खऱ्या अर्थाने ‘द्विज’ झालो. माझा दुसरा जन्म भारतीय संस्कृतीमध्ये झाला यात मला धन्यता वाटते.”
जेफरी यांचा जन्म अमेरिकेतील, डेट्रोईट मिशिगेन या शहरातला. १९४४ चा. एका मोठ्या कुटुंबात, आजी – आजोबांच्या सहवासात ते वाढले. आई वडील शहरात आणि आजोबा गावापासून दूर फार्मवर रहात असत. त्यांच्या फार्मवर त्यांनी घोडे पाळले होते. लहानगा जेफरी सुट्टीत आजोबांकडे गेला कि बराच वेळ या घोड्यांबरोबर घालवत असे. सहजच जेफ्रीला शहर आणि खेड्यातील जीवन पहायला मिळाले. शाळेत असतांना जेफ्री खेळत भाग घेत असे. athletics व gymnastics हे आवडीचे खेळ होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, शालेय वयातच जेफ्रीला अनेक प्रश्न पडत असत. तत्त्वज्ञान विषयीचे प्रश्न तो आई वडिलांना, शिक्षकांना विचारात असे. चर्च मध्ये फादरला विचारात असे. पण त्यांच्या प्रश्नांची कुणीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर –
माझा जन्म प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच झाला होता. त्यामुळे मी अगदी लहान असल्यापासून या प्रश्नांवर खोल विचार करत असे. पुढे शाळा संपली. मग जगरूढी प्रमाणे मी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. तिथे साहित्य, काव्य, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान या विषयांचा अभ्यास सुरु झाला. प्रत्येक विषयात प्रश्न पडतच होते. आणि प्रत्येक प्रश्नाचे धागे मला भारताकडे खेचत होते. हा काल होता १९६७ चा. मी २० एक वर्षांचा होतो. त्यावेळी पंडित रवी शंकर यांच्या सतार वादनाचा कार्यक्रम आमच्या गावात झाला. त्यांच्या वादनाने मी भारतीय संगीताने प्रभावित झालो.
माझे भारताशी जन्माच्या आधी पासूनचे एक नाते आहे, ते पण सांगतो. दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास माझ्या वडिलांचे पोस्टिंग मुंबईत होते. इथे असतांना ते वाराणसीला गेले होते. वाराणसीला गंगेत स्नान करून, तेथील मंदिरात दर्शन घेऊन आले. गुरुजींनी त्यांना प्रसाद व आशीर्वाद दिला होता. “विष्णूभक्त पुत्र होईल!” असा आशीर्वाद. अनेक जन्मांच्या तपश्चर्येचे फल म्हणून मला या जन्मात भारतीय गुरु भेटले आणि मी विष्णूभक्त भागवत झालो असे मी समजतो.
योगायोगाने याच काळात मी एका पुस्तकच्या दुकानात पार्ट टाईम काम करत होतो. तिथे देशोदेशीची तत्त्वज्ञानची पुस्तके होती. मला तिथे ‘योग’ या विषयाची भारतीय गुरूंनी लिहिलेली अनेक पुस्तके वाचायला मिळाली. आणि पुन्हा मला भारत खुणावू लागला.
अशा सर्व गोष्टींचा परिणाम होऊन, १९६९ मध्ये मी डेट्रोईट येथील भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या आश्रमात दाखल झालो. त्यावर मी ब्रह्मचर्य व्रत घेतले. मुंडन केले. श्वेत वस्त्र धारण केले. मी बिना चपलांचे फिरत असे. फरशीवर झोपत असे. आणि गुरु सांगतील ती सेवा करत असे. माझ्या जवळ पैसे, चेक बुक काही ठेवले नव्हते. सर्व काही त्याग करून मी या आश्रमात आलो होतो. त्यांनी मला Krishna Consciousness च्या पुस्तक विभागात Editor ची सेवा दिली. आणि मी भागवत पुराण या पुस्तकाचे काम करू लागलो. मला त्यांचा सहवास मिळाला. ज्ञान व भक्तीचे भांडार असलेल्या प्रभुपाद स्वामींनी मला खूप खूप शिकवले. त्यांनी मला नवीन नाव दिले – ‘जामदग्न्यदास’. विष्णू अवतार परशुरामाचा दास! आता मी खऱ्या अर्थाने भारताचा पुत्र झालो!
या आश्रमात मी ५ वर्ष होतो. आश्रमात यायच्या आधीपासून मी ज्योतिषाचा अभ्यास करत असे. अर्थात पाश्चात्य ज्योतिषाचा. आता मला भारतीय ज्योतिष शिकायचे होते. आश्रम सोडल्यावर मी त्याकडे वळलो. व श्री. गांधी यांच्याकडे ज्योतिष शिकायला गेलो. त्यावेळी ते अमेरिकेतील अतिशय प्रसिद्ध ज्योतिषी होते. मोठे मोठे सेलिब्रेटी त्यांना consult करत असत. श्री. गांधींनी माझी चौकशी केली व माझा आधीचा अभ्यास पाहून, मला नवग्रहांचे ९ मंत्र दिले. त्यांनी मला प्रत्येक मंत्राचा १ लाख जप करण्यास सांगितले. असा जप करून झाल्यावर ये, मग ज्योतिष शिकवतो म्हणाले. मी ताबडतोप जपाला सुरुवात केली. पुढचे ३ महिने मी फक्त आणि फक्त जप केला! त्यावर त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारले! त्यांनी मला भारतीय ज्योतिष पद्धती शिकवली. मी या पद्धतीला वेदिक ज्योतिष म्हणतो. माझ्या या गुरूंनी मला ‘कवींद्र ऋषी’ हे नाव दिले.
पुढे ज्योतिषासाठी पूरक म्हणून मी आयुर्वेदाचा देखील अभ्यास केला. मी वैद्य नाही, पण मला आयुर्वेदाचे चांगले ज्ञान आहे. ज्योतिष व आयुर्वेद, पत्रिकेवरून कळणारी जातकाची प्रकृती, या विषयी मी एक पुस्तक देखील लिहिले आहे.
या नंतर मी पुन्हा एकदा कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. या वेळी मी इतिहास व धर्म हे विषय घेतले. जगातील विविध धर्मांचा, त्यांच्या तत्त्वाज्ञानाचा अभ्यास सुरु केला. विशेषत: ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम या धर्मांचा अभ्यास मी बारकाईने केला. हे सर्व धर्म एका पुस्तकावर आधारित होते. तर हिंदू धर्म हजारो पुस्तकांवर अर्थात एका प्रचंड ग्रंथालयावर आधारित आहे हे लक्षात आले. या अभ्यास मुळे मला हिंदू धर्माचे महत्व तर कळलेच पण हिंदू धर्म किती वेगळा आहे, आणि मानवजातीसाठी किती गरजेचा आहे हे देखील कळले. या दरम्यान मी दोन थिसीस लिहिले – मध्वाचार्य व शंकराचार्य यांच्या तत्त्वज्ञानातील फरक व दुसरा वेदांतावर.
या नंतर मी काही काळ हवाई विद्यापीठात होतो. इथे मला माझे तिसरे गुरु भेटले – बनारसचे पंडीत रामनाथ शर्मा. संस्कृतचे विद्वान होते. पाणिनीच्या अष्टाध्यायीचा गाढा अभ्यास होता. यांच्याकडे मी संस्कृत शिकलो.
दरम्यान माझे लग्न झाले. एक कन्या झाली. आणि मी Apple Computers मध्ये नोकरीवर रुजू झालो. मी जरी संसारात पडलो होतो तरी माझा अभ्यास चालू होता. रोज सकाळी २ तास योगासने, ध्यान आणि जप चालू होते. माझे कविता लेखन चालू होते. ज्योतिष, आयुर्वेद, संस्कृत, अध्यात्म हा अभ्यास चालूच होता. काही काळाने मी Corporate speaker, trainer, motivational speaker म्हणून काम करू लागलो. या मध्ये २० वर्षांचा काळ गेला. मी आणि माझी पत्नी वेगळे झालो.
वयाच्या ५० व्या वर्षी मला माझी नवीन धर्मपत्नी Sandy भेटली. ती देखील योग शिक्षक म्हणून काम करत होती. भारतीय संस्कृती विषयीचे प्रेम आणि भारताने दिलेल्या ज्ञानाबद्दल कृतज्ञता याने आम्हा दोघांना जोडले. आम्ही दोघांनी ठरवले कि पुढील संपूर्ण आयुष्य केवळ वैदिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी घालवायचे. त्या करिता VASA ची स्थापना केली. या संस्थेमार्फत मी पुस्तके लिहितो. व्याख्याने देतो. योग शिबिर घेतो. ध्यान शिबीर घेतो. पत्रिका पाहून counselling करतो. अशी कामे चालू आहेत.
VASA मध्ये सध्या चालू असलेले काम आहे – भगवत गीता प्रोजेक्ट. आज पर्यंत गीतेची इंग्लिश मध्ये अनेक भाषांतरे झाली आहेत. परंतु त्यामध्ये संस्कृत शब्दांचे चुकीचे भाषांतर झाले आहे. जसे भगवान = God. हे चूक आहे. भगवान या शब्दाची व्याप्ती God मध्ये येत नाही. किंवा धर्म = Religion. हे भाषांतर तर पूर्णपणे चुकीचे आहे. किंवा आत्मा = Soul. हे देखील अतिशय चुकीचे भाषांतर आहे. आजपर्यंतची इंग्लिश भाषांतरे इंग्लिश नसून ख्रिश्चन शब्द असलेली आहेत असे मी मानतो. त्या मध्ये Sin, Heaven असे शब्द आले आहेत, जे मूळ गीतेत नाहीत. हे सर्व दुरुस्त करण्यासाठी मी नवीन भाषांतर करत आहे. या भाषांतरात काही दीडशे शब्द हे मूळ संस्कृत मध्येच ठेवणार आहे. तसेच हे शब्द नीट समजावेत म्हणून एक लहानशी डिक्शनरी लिहिणार आहे.
अनेक इंग्लिश शब्द संस्कृत मधून आले आहेत. जसे – डिक्शनरी हा शब्द ‘दीक्षा’ वरून आला आहे. ‘Vocabulary’ हा वाक् / वाचा वरून आलेला शब्द आहे. Pagan या शब्दाचे मूळ भगवान मध्ये आहे. अशा शब्दांचा देखील संग्रह करण्याचे काम चालू आहे.
मला भारताने खूप काही दिले आहे. भारतीय ज्ञानाने माझ्यावर केलेल्या उपकारांची फेड मी कधी करू शकत नाही. हे माझ्यावर असेलेले ऋषी ऋण आहे. या ऋणाप्रती मी भारतभर फिरू लागलो. भारतीय युवकांना मी वेदांतावर व्याख्याने देतो. कोणताही मोबदला न घेता मी व्याख्याने देतो.
भारतीय युवकांना मी आवर्जून सांगतो – तुम्ही म्हणजे तुमच्या कातडीचा रंग नव्हे! तुम्ही त्यापेक्षा खूप काही अधिक आहात. एखाद्याने जर गाडी घेतली, तर त्याला गाडीचे इंजिन कोणते? किती हॉर्सपॉवरचे आहे? कोणत्या कंपनीची गाडी आहे? असेच प्रश्न विचारतात. ज्यांना गाड्यांबद्दल काहीच माहित नसते तेच फक्त – कोणत्या रंगाची गाडी आहे? असे विचारतात. तसेच, फक्त अज्ञानी लोकच कातडीचा रंग काळा की गोरा याचा विचार करतात. व त्यावरून मनुष्य श्रेष्ठ कि कनिष्ठ हे ठरवतात.
गाडीच्या बाबतीत, म्हणजे कार असो नाहीतर सायकल असो, गाडी कोणती यापेक्षा ती कोणत्या दिशेने चालली आहे हे महत्वाचे. खड्यात जाऊन पडली तर मर्सिडीज असून उपयोग काय? गाडी न्यायाची कुठे हे चालवणाऱ्यावर अवलंबून आहे. गाडी पेक्षा ड्रायव्हर महत्वाचा आहे. तुमच्या गाडीचा ड्रायव्हर कोण आहे ते शोधा! तुमच्या आतमध्ये कोण आहे ते शोधा!
भारताने जगाला इतके ज्ञान वाटले आहे, पण खुद्द भारतीय व इथले युवक त्यापासून स्वत:ला दूर ठेवतात. भारतीय युवक स्वत:ची ओळख विसरले आहेत. त्यांनी ऋषींनी शिकवलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा. अशी मी अगदी कळकळीने विनंती करतो.
मी जेंव्हा भरतीय युवकांशी बोलतो, गीतेतील, पुराणातील, उपनिषदातील संस्कृत श्लोक घडाघडा सांगतो, रामायण महाभारतातले संदर्भ सांगतो, तेंव्हा इथली मुले अचंबित होतात. हा बाहेरचा माणूस इथे येऊन आपल्याला इथलच सांगत आहे, त्या अर्थी या मध्ये काही तथ्य असेल असे वाटते. कितीतरी भारतीय युवक माझ्यामुळे प्रभावित होऊन तत्त्वाज्ञानाकडे वळले आहेत.
मी भारतीय नवयुवकांना इतकेच सांगेन की – सत्याचा शोध घ्या. Be hungry for truth.