इ. स.पूर्व ३ ऱ्या शतकात चीनमध्ये हान राजवट होती. याच काळात चीनमध्ये हूण जमातीच्या टोळ्यांनी चिनी राजवटीला त्रस्त केले होते. या हूणांच्या टोळ्या अतिशय कडव्या होत्या आणि हूण लोक अतिशय तरबेज घोडेस्वार होते. या जमातीची टोळधाड युरोप पर्यंत पोचली होती. अश्या उपद्रवी टोळी पासून संरक्षण करण्यासाठी हान राजवटीमध्ये चीनची भिंत बांधण्यात आली.
तरीही या हूण टोळ्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. म्हणून हान राजवटीमधल्या ‘वो ती’ राजाने आपला दूत म्हणून ‘चंग चेन’ याला नेमले. त्याकाळी हूण टोळीबरोबर ‘यू ची’ नावाची अजूनही एक टोळी होती. वो ती राजाने चेनला या टोळीबरोबर मैत्री करायला आणि हूणां विरुद्ध माहिती गोळा करायला पाठवले. पण हा चंग चेन नेमका हूणांच्या हाती सापडला. हूणांनी त्याला मारून न टाकता कैदी म्हणून आपल्या टोळीत ठेवून घेतले. चंग चेन १० वर्षे हूणांबरोबर फिरत राहिला. त्यानंतर एके दिवशी चेन निसटून पळाला. आणि हूणांची शत्रू असणाऱ्या यू ची टोळीत सामील झाला. ही यू ची टोळी आता हल्ले न करता एके ठिकाणी आपले बस्तान बसवत होती. आणि या टोळीने आता लुटमार सोडून व्यापार सुरू केला होता. चंग चेन वर्षभर यू ची टोळी मध्ये राहिला. या वर्षाच्या काळात त्याला यू ची टोळीच्या व्यापाराबद्दल खूप बारीकसारीक माहिती मिळाली. ही माहिती घेऊन चेन परतीच्या वाटेला लागला. या परतीच्या प्रवासात त्याला पुन्हा एकदा हूणांनी पकडले. चंग चेन हूणांच्या टोळीत दीड वर्ष राहिला. आणि पुन्हा एकदा त्यांच्या कैदेतून निसटला. यावेळी मात्र तो चीनला पोचण्यात यशस्वी झाला.
चंग चेन ने त्याच्या १२-१४ वर्षांमध्ये जमा केलेली सगळी माहिती, वेगवेगळे व्यापारी मार्ग याबद्दल वो ती राजाला सांगितले. या सगळ्यात राजाला ला जिएम म्हणजे रोम बद्दल बरीच माहिती मिळाली. त्याचबरोबर पर्थिया (सध्याच्या इराणमधील प्रदेश) बॅक्ट्रिया (हिंदुकुश पर्वत आणि अमु नदी यामधील प्रदेश, सध्याचा उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि काझाकिस्तान मधील काही प्रदेश) या राज्यांबद्दलही माहिती मिळाली. हान राजवटीला चंग चेन मुळे प्रचंड फायदा झाला. या राजाने रोम, पर्थिया, बॅक्ट्रीया या राज्यांबरोबर व्यापार सुरू केला. हा व्यापारी मार्ग तकलामकान वाळवंटातून जात होता. या व्यापारी मार्गामुळे हूणांच्या टोळधाडीवर बऱ्याच प्रमाणात आळा बसला.
याच काळात रोमन लोकांचा व्यापार सर्व दिशांनी वाढता होता. या रोमन लोकांनी व्यापाराच्या देवाणघेवाणीत एक अतिशय अनोखी गोष्ट पाहिली. जी आजपर्यंत त्यांना अज्ञात होती. आणि ती गोष्ट म्हणजे रेशीम. या रोमन लोकांनी पर्थियन लोकांकडे असणारे रेशमी झेंडे पाहिले आणि या रेशमी कापडाबद्दल त्यांच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झाले. पर्थियन लोकांना रोमनांच्या या curiosity मुळे मोठीच आर्थिक संधी चालून आली. पर्थियनांनी चीनकडून येणारे रेशीम रोमनांना विकण्यास सुरुवात केली. आणि इ. स.पूर्व पहिल्या शतकात चीनमध्ये तयार होणारे रेशीम रोममध्ये पोचले. चीनच्या तकलामाकान वाळवंटातून रेशीम रोममध्ये जाऊ लागले. आणि हा मार्ग होता भारतीय व्यापाराला नवीन आयाम देणारा रेशीम मार्ग अर्थात SILK ROUTE.
विनिता हिरेमठ.