प्राचीन भारतीय उद्योगांचे स्वरूप – शहरे, गावे, गढी

प्राचीन काळातील काही प्रमुख राजधान्या असलेली गावे पाहिली तर त्यात पाटलीपुत्र, अयोध्या, मथुरा, मिथिला, गया, मगध, त्रिपुरी, उज्जैन, पैठण, अमरावती, कलिंग, पुरी, कांची, रामेश्वर, कोची, कालिकत, त्रिचनापल्ली अशी अनेक नांवे सांगता येतील. अनेक गावे अशी पण आहेत की जी आज कुठे होती हे सांगणे कठिण आहे. त्या त्या काळातील काही राज्यकर्त्यांनी त्यांच्या  गावांचा खूप विकास केला.

राजाची राजधानी म्हणून असलेल्या शहरासारख्या गावांतील गरजा या राजाच्या आवश्यकते प्रमाणे असणे स्वाभाविक आहे. राजा म्हणून त्याच्या जवळ लष्कर, मंत्री, सेवक, सरकारी खात्यांत काम करणारे लोक हे लागत आणि त्या त्या विषयानुरूप कामे तेथे होत असत. अशा कामांसाठी राजा आपल्या वा अन्य राज्यातील ज्ञानी लोकांना बोलवून आणून शहरात त्यांची सोय करे. राजाकडे परप्रांतातून येणारे लोक, ज्यात परकीय पाहुणे, देशातीलच अन्य प्रांतातील व्यापारी. प्रवासी यांचा समावेश असे. यांच्याही गरजा लक्षांत घेतल्या तर त्या भागविण्यासाठी अनेक प्रकारचे उद्योग अशा गावांत असणे स्वाभाविक होते. चाणक्याच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकात नगररचनेचा आणि राजाने नगर वसविताना तेथे व्यापार आणि उद्योगांबद्दल काय व्यवस्था करावी याचे अतीशय चांगले वर्णन केले आहे. तसेच विश्वकर्मा आणि मयमत या ग्रंथात नगरात कुठे काय प्रकारे उद्योग व्यवसायांसाठी जागा ठेवाव्या याची माहिती दिलेली आहे.

अशा नगरात राजाचे वसतीस्थान मग ते राजवाडा वा किल्ला अशा स्वरूपाचे असे. राजवाडा, किल्ला, गढी यांचे सर्व बांधकाम स्थपती करीत. स्थपती हे बांधकामात प्रवीण असत. वेदातही यांची नोंद पांचाल म्हणजे पांच प्रकारचे काम करणारे तज्ञ शिल्पी यात आहे. (शिल्पी हा शब्द त्या काळी काम करणारे कुशल जाणकार असा होता. शिल्पकार नव्हे.) यात बांधकाम करणारे स्थपती, लोहकाम करणारे, सुतार काम करणारे, तांब्याच्या वस्तू बनविणारे आणि सुवर्णकाम करणारे असे पांच प्रकारचे लोक शहरांत राजाश्रय असलेले होते. राजाने त्यांना शहरात जागा करून दिलेल्या असत जेथे ते वसती करून रहात आणि त्यांचे कारखाने – कार्यशाळा घरीच असत. हे कारखाने किंवा कार्यशाळा फार मोठ्या नव्हत्या, पण त्या शिल्पींचे सर्व कुटुंबच तेथे काम करीत असे. सहाय्याला लोक जरी असले तरी शिल्पी हाच कामाचा प्रमुख असे. तो वेद शास्त्र संपन्न असून त्याच्या कामामध्ये वेळ, काळ आणि कामाचा दर्जा याबद्दल अत्यंत जागरूक असे. याच बरोबर गावात वस्त्रे, तेल, चामड्याच्या वस्तू बनविण्याच्या कार्यशाळांना जागा असत, आणि हे व्यवसायही घरूनच चालत आणि सर्व कुटुंबच व्यवसायात भाग घेई. आजूबाजूच्या गावातून धान्य, कच्चा माल जसे की सूत, कच्चे लोह, तांबे वगैरे मिळत असे. गावात व्यापा-यांची दुकाने असत जेथे आजुबाजूच्या गांवातून किंवा परप्रांतातून आलेले व्यापारी, किंवा विक्रेते यांच्या बरोबर मालाची खरेदी विक्री केली जाई. या प्रकारच्या गावांत दारूचे विक्रेते आणि गणिकांची वस्ती पण असे. केश कर्तन आणि कपडे धुणे हे उद्योग असत. गावाजवळील नदीच्या काही भागात कपडे धुणा-यांसाठी (रजक) विशेष जागा करून दिली जात असे. युद्ध काळात आणि अन्य काळातही वैद्यांची गरज असे. भारतीय वैद्यकशास्त्र हे फार प्रगत शास्त्र होते की ज्यात शस्त्रक्रिया करणारे वैद्य होते, जे युद्ध काळात जखमी सैनिकांवर त्यांच्या शरिरात गेलेल्या बाणांची टोके काढणे, जखमा शिवणे अशा गोष्टी करत असत. चरक आणि सुशृत या दोन संहितांचा अभ्यास केलेले वैद्य फक्त शहरातच नव्हे तर गावा गावांत असत. त्यातील काही लोक वनस्पती आणि धातुजन्य औषधे बनवीत. रुग्णांची सेवा शुश्रुषा करणारे स्त्री पुरूष असत.

राजाकडे सैन्य असे. पूर्वी चतुरंग सेना या स्वरूपाचे लष्कर राजाकडे असे. म्हणजे पायदळ, रथदळ, अश्वदळ आणि गजदळ. पायदळ अश्वदळात प्रत्येकी एकच व्यक्ती असली तरी रथांत आणि हत्तीवर जास्त सैनिक एका वेळी असत. या सर्व सैन्याचा शस्त्रसाठा राजा ठेवीत असे. त्याच्या खजिन्याचा एक भाग शस्त्रागार असे. घोड्यांसाठी अश्वशाला (पागा) आणि हत्ती ठेवण्याच्या ही जागा निराळ्या केलेल्या असत. अश्वशाळेत व गजशाळांमध्ये घोड्यांची व हत्तींची देखभालीचे काम करणारे लोक असत. घोडे आणि हत्ती यांना शिकवावे लागे, त्यांचे शिक्षक असत. यांना लागणा-या गवत आणि अन्य खाद्यान्नाची सोय केली जाई. अर्थातच गवत आदि गोष्टी जवळपासच्या गावामधूनच पुरविल्या जात असल्या पाहिजेत. राजवाड्यातील सेवक, पाणी आणणारे, दासी, चार, भाट, पालख्या-मेणे-रथ आदि वाहणारे, असे लोक असत. निरोप देण्या – आणण्यासाठी निरोपे, गावागावातून हेरगिरी साठीचे हेर. अशी कामे करणारे लोकही लागत. राज दरबारात मंत्रीगण निरनिराळ्या कामांसाठी असत. संरक्षण, अर्थशास्त्र या बरोबरच प्रजेच्या सुखासाठी योजना करणे अशी कामे मंत्री गण करीत. कर वसूली, गावातील स्वच्छता यासाठी लोक नेमलेले असत. अनेक राजांनी नाट्य, नृत्य, काव्य, चित्र आणि साहित्याला विशेष मदत करून या विषयांत प्रगती करून आणली. परिणामी नर्तन, गायन, वादन, लेखन, काव्य, चित्रकला असे काही व्यवसाय चांगलेच विस्तार पावले. राजाकडे असे कलाकार राज्याच्या विविध भागातून आलेले असत. अगदी परप्रांतातील किंवा शत्रुच्या राज्यातील आलेल्या अशा कलाकरांना राजाश्रय मिळे. राजाच्या अनेक स्वा-या, व राजकीय घटना यांना ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला जाई. त्यामुळे असा एखादा वा अनेक राजज्योतिषी राजाश्रयाने रहात.

राजा आपल्या राज्यातील वेगवेगळ्या गावांतील समस्या पाहून त्यावर काही उपाय योजना करे. यात पाण्याची उपलब्धता, वैद्यकीय सुविधा, शेतक-यांवरील नैसर्गिक किंवा वन्यजनावरांमुळे आलेली आपत्ती अशा साठी राजा विशेष उपाय शोधून ते प्रत्यक्षांत उतरवून आणे. मंदिरे बाधणे हे काम या काळातील बहुतेक सर्वच राजांनी या ना त्या प्रकारे केलेले आढळते. मग ती जैन मंदिरे असोत, बुद्ध स्तूप असोत अथवा निरनिराळ्या देवतांची मंदिरे असोत, या कामाला सर्वच राजांनी सढळ हातांनी मदत केलेली दिसत. एक मंदिर म्हटले की त्याच्या भोवती अनेक उद्योग निर्माण होतात. नदीकाठांवर घाट बांधले जातात, किंवा गावांत तलाव निर्माण होतो. त्या त्या भागातील अनेक लोकांसाठी अनेक उद्योग निर्माण होतात.

राजाकडे टांकसाळी असत जेथे नाणी पाडली जात. हे काम सुवर्णकार, तांब्याचे काम करणारे यांच्या कडून केले जाई. राजा त्याच्या किल्ल्यात किंवा वाड्यात अशा कामाला जागा देऊन हे काम करून घेत असावा. किंवा शहरातील अथवा जवळच्या गावातील कारखान्यांतून करून घेत असावा. पूर्वी नाण्यांच्या सहाय्याने अर्थ व्यवहार फक्त शहरी भागातच होता असे दिसते. खेडोपाडी आणि लहान गावांत नाणी लागत नसत, कारण व्यवहार एकमेकांकडील वस्तूंची देवाण घेवाण करून होत नसे, जेथे पैसे लागत नसत. अगदी बिटिश काळा येई पर्यंत ही परिस्थिती होती. खेड्यातील लोकांना शहरात जायचे झाले तरच नाणी लागत.

शहरातील गरजा या वर वर्णिल्याप्रमाणे राजाच्या गरजांशी जास्त जोडलेल्या होत्या. या गरजांचा संख्यात्मक विचार केला तर असे जाणवते की अनेक प्रकारची उत्पादने फार मोठ्या संख्येने लागत. राजाकडे हजारो घोडे असत. एका घोड्याला एक खोगीर म्हटले तर एक हजार घोड्यांना हजार खोगिर लागले असतील, रिकिबी दोन म्हटल्या तर दोन हजार रिकिबी, घोडेस्वाराला प्रत्येकी एक तलवार, म्यान आणि ढाल म्हणजे त्या पण प्रत्येकी एक हजार होतात. हत्ती १०० म्हटले तरी तेवढ्या अंबा-या, हत्तीना बांधण्याचे साखळदंड वगैरे गोष्टी लागत असतील हे सहज जाणता येण्यासारखे आहे. म्हणजेच या प्रकारच्या गोष्टी करणा-यांना विविध प्रसंगी अनेक वस्तू बनविण्यासाठी मागणी केली जात असेल. या एका गावातील गरजा नसून राज्याराज्यातील गावो गावच्या गरजा होत्या. त्याच मुळे वस्तू निर्मितीत संख्या जास्तच होत्या.

– श्री. श्याम वैद्य

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s