प्राचीन भारतीय उद्योगांची वैशिष्ट्ये

आजच्या काळात प्राचीन भारतीय उद्योगांकडे पहाताना त्यांचे काही विशेष लक्षांत घ्यायला हवेत. सर्वप्रथम उत्पादनांची विविधता आणि त्यातील कलात्मकता फार विलक्षण आहे. या काळातील अनेक गोष्टी आजही जेव्हा आपण विविध वस्तुसंग्रहालयांत पहातो तेव्हा हेच जाणवते की वस्तू भारताच्या कुठल्याही भागातील असोत, त्यांची बनविण्याची पद्धत, आकारमानाचे प्रमाण यात सुसूत्रता आढळते. इ.स.५००-६०० नंतर झालेली वास्तुशास्त्रातील आणि धातुशास्त्रातील प्रगती यातून अशा उद्योगात असणा-यांची संशोधन वृत्ती दिसून येते. त्या वेळचे लोक अनेक गोष्टी काही संदर्भग्रंथांचा अभ्यास करून बनवीत असे लक्षांत येते. शेती असो अथवा गृहनिर्माण, नगरविकास किंवा मंदिराची निर्मिती ज्योतिष, खगोलशास्त्र, याच बरोबर मोजमाप करण्याची योग्य परिमाणे वापरून निर्मिती केली जात असे. काही पाश्चात्य निरिक्षकांचा असा एक आरोप आहे की मोजमापाच्या पद्धती फारच जुन्या प्रकारच्या असल्याने त्यात सारखेपणा नव्हता. एक ध्यानांत घेतले पाहिजे की भारतीय उद्योग हे एका सारख्या एक गोष्टी करण्यासाठी नसून गोष्टी उपयोगी करता येतील आणि ज्यातून निर्मितीचा आनंद मिळेल अशा असत. तसेच त्या एका ठिकाणी मोठ्या संख्येने बनत नसून ठिकठिकाणी बनविल्या जात. त्यामुळी आजच्या सारखे त्यात काढून बदलता येण्यायोग्य भाग लागत नसत. आणि समजा तसे ते लागले तर ते कारागीर अतीशय सहजपणे तसा एखादाच भाग बनवू शकत.

जेथे जे निर्माण झाले तेथेच ते वापरले जाई, अधिक झाले तर दुस-या ठिकाणी जरूर पाठविले जाई, पण उत्पादनांची अनावश्यक स्पर्धा नव्हती, कारण खूप अर्थार्जन करून जगांतील सर्वात श्रीमंत होण्याची आकांक्षा असलेल्या माणसांचा तो समाज नव्हता. गरीब माणूसही काही ना काही काम नक्कीच करत होता. आपल्या पंचक्रोशीत मिळणा-या गोष्टींमधून तेथील लोकांच्या गरजा भागविणारे उद्योग तेथेच  होते.

भारतीय उद्योग कार्यशाळेत फार थोडे होत आणि घरोघरीच जास्त होत. राजाकडील काही कार्यशाळा सोडल्या तर खरं म्हणायचं तर भारतात घर तिथे उद्योग अशी संकल्पना रुजलेली होती. आजच्या काळात जी Mass Production पद्धत असते त्या ऐवजी भारतात Production by Masses अशी पद्धत होती. अनेक उद्योग तर असे होते की काम करणारे लोक आपल्या कुटुंबासह कामाच्या जागी जाऊन आपली झोपडी करून तेथेच आवश्यक उत्पादने करीत. बाधकामाच्या जागीच सुतार, लोहार जाऊन राही. भारतीय उद्योगाचे अजून एक वैशिष्य  म्हणजे उद्योगांत अबालवृद्ध स्त्रिया पुरूष सर्वच काम करत. कारण उद्योग हा कुणा एकाचा नसून कुटुंबाचा असे. परिणामे भारतात त्या काळात जास्त हात काम करणारे होते आणि कमी जीव फुकट खाणारे होते – अशा काम करणा-यांवर विसंबून होते. आणखी एक आक्षेप घेतला जातो की लोक गरीब होते. गरीब-श्रीमंत हे सापेक्ष शब्द आहेत. लोक गरीब जरूर असतील पण समाधानी होते, आनंदी होते. कारण त्यांना काम करण्याची संधी कायम होती. प्राचीन काळातील समाजा कडे पाहिल्यावर एक गोष्ट खात्रीशीर सांगता येते की कदाचित लोक गरीब भले असतील पण बेकार नव्हते. घराघरात काही ना काही काम करण्याची संधी होती. त्या ऐवजी दुसरे करणे अवघड असे आणि त्याचे दुष्परिणाम लोक समजून होते. ठेविले अनंते तैसेची रहावे – चित्ती असू द्यावे समाधान या वृत्तीनी आपले काम हेच नियत काम समजून करणारा आणि समाधानी असा समाज होता. मग त्यातील लोक डोंगरद-यात  रहाणारे आणि खनिज गोळा करणारे असोत, अथवा रानावनांतून मध, डिंक गोळा करणारे असोत अथवा शेतकरी, केस कापणारा, कातडे बनविणारा असो, किंवा राजदरबारातला सेवक असो, त्याला काम होते. श्रीमंत व्हावं असं जरी वाटलं तरी माझ्यावर  विसंबून जे आहेत त्यांच्या भल्यासाठी जे करता येईल ते आपल्या क्षमते प्रमाणे करणे अशी कर्त्यव्यतत्परता होती.

निर्मिती उद्योगांत शिक्षण कसे दिले जाई याबद्दल अनेकांना कुतुहल असते आणि अज्ञानामुळे अशी काही व्यवस्था भारतात पूर्वी नव्हती असा एक प्रचार केला जातो. शिक्षण म्हणजे वेद, शास्त्रे, न्याय, छंद, भाषा हेच होते आणि प्रत्यक्ष हाताने काम करण्याच्या व्यवसायांना उपयोगी शिक्षण व्यवस्था नव्हती असे म्हटले जाते. प्रत्यक्षांत व्यवसायोपयोगी शिक्षण व्यवस्था अशी होती की ज्यामुळेच त्या काळात अनेक अज्ञात कलाकार निर्माण झाले, ज्यांनी अप्रतीम शिल्पे, मंदिरे, चित्रे, वाद्ये, मूर्ती निर्माण केल्या. जर शिक्षण नसते तर हे असे दिसले नसते. घरोघरी काम करणारी कलाकार मंडळी त्यांच्या कुटुंबातील  मुलांना लहानपणापासूनच त्या कामाचे ज्ञान  देत असत, ज्यातून अशी काम करणारी माणसे सर्व गावागावात उपलब्ध होती.  प्राचीन भारतीय उत्पादनांतील आज आढळणारे अवशेष हेच दर्शवितात की असे काम करणा-या लोकांना उत्तम शिक्षण मिळत असले पाहिजे. काम करता करता शिक्षण ही व्यवस्था जास्त प्रचलित होती. कामात अर्थार्जन न पहाता देव पहाणा-या लोकांनी काम हे परमेश्वरासाठी करायचे असते असे शिक्षण घराघरातून दिले. आणि महत्वाचा मुद्दा असा की शिक्षण नव्हते असे मानले तरी काम नव्हते असे नव्हते. काम आणि शिक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या.

निरनिराळ्या कामासाठी लागणारी अवजारे, हत्यारे अतीशय साधी असत. लोहकाम करणारे लोखंडी अवजारे बनवीत. कु-हाड, कुदळ, फावडे, डोंगरात डोंगर फोडण्यासाठी केलेली लांब दांड्याचे कु-हाडी सारखे अवजार, छोट्या छिन्न्या, पटाशी, लाकूड तासण्याची, व भोक पाडण्यासाठीचे गिरमिट या प्रकारची अवजारे भारतात फार प्राचीन काळापासून उपलब्ध होती. सुशृताच्या पुस्तकात शस्त्रक्रियेसाठीच्या अनेक अवजारांची नावे आहेत. सुवर्णकामासाठी लागणा-या छोट्या पकडी, चिमटे आणि लोहकामासाठी अथवा अन्य धातूंचे काम करण्यास लागणारे चिमटे, पकडी उपलब्ध असत. अवजारांना सहाणेसारख्या दगडावर घासून धार करीत असत. कात्री, विळी, नाणी पाडण्यासाठी लागणारे ठसे यांची निर्मिती होत होती.

भारतीय उद्योगांत स्त्रियांचा सहभाग हा फार मोठा आहे. वर उल्लेखलेल्या सर्व उद्योगात घरातील स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत. मग ती शेतक-याची पत्नी असो, चर्मकाराची, लाकुडकाम करणा-याची अथवा सुवर्णकाराची. आपल्या घरी चालणा-या उद्योगात स्त्रिया सर्व प्रकारचे काम करीत. चाणक्याच्या अर्थशास्त्रात विधवा स्त्रियांना वस्त्रोद्योगात घेऊन त्यांच्या अर्थार्जनाची सोय करण्याची नोंद आहे. अनेक उद्योगातील तरूण युद्ध काळात सैन्यात जात. अशावेळी स्त्रियाच अन्य वडिलधा-यांच्या आधाराने व्यवसाय चालू ठेवीत असत.

उद्योग म्हटला की त्याला पैशाची गुंतवणूक आलीच. काही उद्योगांसाठी राजा कडून अर्थसहाय्य मिळे, जसे नगर वसाहत, पाणी व्यवस्था, तलाव, मंदिर बांधणी वगैरे. अन्यत्र गावोगावी सावकाराकडून आव्यश्यकते नुसार कर्ज घेतले जाई. पण गावातील शेतक-याच्या भोवतीचे व्यवहार हे सामान्यपणे एकमेकांकडील वस्तू  एकमेकांना देण्याच्या (Barter Trade) पद्धतीने होत. पैशाने व्यवहार शहरात आणि काहीच उद्योगांत चालत. उद्योगातील लोकांच्या गरजा कमी होत्या त्यामुळे त्यांना नकदी रकमा फारश्या लागत नसत. वना रानातून आणले जाणारी उत्पादनेही वस्तूंच्या देवघेवीतून पुरी होत. वनातून आलेल्या लोकांसाठी कपडे, मातीची भांडी अशा ज्या वस्तू लागत त्या त्यांनी आणलेल्या वस्तूंच्या मोबदला स्वरूपात दिल्या जात. बलुतेदारीची पद्धत तर सातवाहन कालापासून आहे आणि मोबदला हा शेतीतून मिळणा-या धान्य स्वरूपातच होता.

नगरांमध्ये रस्ते बांधणीचे उल्लेख असले तरी गावा गावांना जोडणारे रस्ते तसे लहान, पाऊल वाटांसारखेच असावेत. उत्पादने एका गावातून दुस-या गावी नेण्यासाठी जनावरांचा वापर होई. बैलगाड्या असाव्यात तसेच हत्तीचा उपयोगही होत असावा. विशेष करून मोठ्या बांधकामासाठी लागणारे दगड हत्तींच्या सहाय्याने नेले जात असावेत. नद्यांतून होड्यांच्या सहाय्याने मालवाहतूक होत असे. माणसांना प्रवासासाठी घोडे, बैलगाड्या, रथ असे पर्याय असले तरी बहुसंख्य लोक प्रवास चालतच करत असावेत.

आपण इ.स. पूर्व ५०० ते इ.स. १२०० पर्यंतच्या काळातील भारतातील विविध उद्योगांबद्दल विवेचन केले. या काळात युरोपमधील अनेक राष्ट्रे अस्तित्वातही नव्हती. इंग्लंड आणि अमेरिका अस्तित्वांत नव्हते. त्या वेळच्या ज्ञात जगाच्या उत्पन्नाच्या सुमारे २८-२९% उत्पादन एकटा भारत देश करत असे. त्यामुळे तो त्यावेळी संपन्न समजला जाई. आजच्या जगाच्या सर्व उत्पादनातील ३०% उत्पादन एकटी अमेरिका करत आहे आणि आज तो देश सर्वात श्रीमंत समजला जातो. संपन्नता ही निर्मिती उद्योग आणि सेवांवर अवलंबून असते. भारत हा उद्योगप्रधान देश होता. त्याची संस्कृती उद्योगप्रधानच होती. आज आपण सर्व गोष्टींवर परदेशांवर विसंबू लागलेलो आहोत. संशोधन, नवीन उत्पादनांची निर्मिती याकडे दुर्लक्ष करीत आहोत. कदाचित या जुन्या उद्योगांच्या उत्पादन पद्धतींच्या अभ्यासातून आजच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळाली तर या लेखनाचा काही उपयोग झाला असे म्हणता येईल. इतिहासातील भारतीय उद्योगांचा अनमोल ठेवा आपण विसरून गेलो आहोत त्याकडेही अभिमानाने पहायला हवे आहे.

 – श्याम वैद्य 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s