रेशीम मार्ग हा मध्य आशिया, गांधार, पार्थिया, पर्शिया मार्गाने चीनकडून रोमकडे जाणारा व्यापारी मार्ग होता. या मार्गावरून रोमला मोठ्या प्रमाणावर रेशमाची निर्यात होत असे. रोमन लोकांना या रेशमाचे प्रचंड आकर्षण निर्माण झाले होते. त्यामुळे रेशमाची निर्यात वाढली होती आणि रेशमाचे भाव ही प्रचंड वाढले होते. इ.स. पहिल्या शतकाच्या अखेरीस पर्थियन व्यापारी एक किलो रेशमाच्या बदल्यात एक किलो सोने रोमनंकडून घेत असत. या रेशीम उत्पादनात चीनची मक्तेदारी होती. हा रेशमाचा व्यापार सुरू झाल्या नंतरही २५०-३०० वर्षे रेशीम कसे बनवतात हे चिनी लोकांशिवाय इतर कोणालाही माहिती नव्हते. हा प्रसिद्ध रेशीम मार्ग जुना रेशीम मार्ग (old silk route) म्हणून ओळखला जातो.
या रेशीम मार्गापासून एक फाटा तुर्कस्तान, अफगाणिस्तान येथील खैबर खिंडीतून भारतात येत असे. या मार्गाचा वापर मग भारतीय राज्ये आणि रोमन साम्राज्य यामधील व्यापारासाठी होत असे. हळूहळू भारत आणि रोमन साम्राज्य यांतील व्यापार वाढू लागला. आणि चीन आणि रोम मधील व्यापार कमी होऊ लागला. अर्थात याला काही कारणे होती. तकलामकान वाळवंटातून रोमला जाताना व्यापारी तांड्याना अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत असे. प्रखर उन आणि विषम हवामानाचा सामना करत हे व्यापारी पुढे जात. त्याचबरोबर तिथले रस्तेही खडतर होते. या नैसर्गिक कारणांबरोबर लूटमारीच्या संकटामुळे व्यापारी त्रस्त झाले होते.
या रेशीम मार्गावरून भारतात येताना व्यापारी बांधीव आणि मोठ्या मार्गांवरून प्रवास करीत. उत्तर भारतातील तत्कालीन राज्ये आणि रोमन साम्राज्यातील व्यापार दिवसागणिक वाढत होता. भारतीय वस्तूंची निर्यात (export) प्रचंड प्रमाणात होत होती. भारतातून रोमला देवदारचे उत्तम प्रतीचे लाकूड, सुती कापड, कापूस, केशर, हस्तिदंत, आणि वाघ, चित्ता, मोर, गेंडे यासारखे प्राणी निर्यात होत. तर त्या बदल्यात रोमकडून सोने, चांदी, द्राक्षाचे उत्तम प्रतीचे मद्य आणि गुलाम स्त्रिया यांची आयात (import) होत असे. त्याकाळी श्रीमंत आणि राजघराण्यातील व्यक्तींकडे सुरक्षा रक्षक म्हणून रोमन स्त्रिया असणे हा एक status symbol होता.
भारत आणि रोमन व्यापाराचे एक अनोखे वैशिष्टय होते. ते होते खांबायतच्या आखातात तयार होणारे उत्कृष्ट प्रतीचे मोती! रोमन लोकांना या मोत्यांनी अक्षरशः वेड लावले होते. हे मोती केसांत माळण्यापासून ते कपड्यांवर सुशोभित करण्यापर्यंत ते नखशिखांत वापरत असत. एवढेच काय तर या मोत्यांचा चुरा करून ते आपल्या मद्यात घालून पीत असत. आणि या बदल्यात भरपूर सोने भारतीय व्यापाऱ्यांना देत असत.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या या मोत्याच्या वेडामुळे रोमन अर्थव्यवस्था खिळखिळी होत होती. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राजाने मंत्र्यांची बैठक बोलावली. आणि मोत्यांची आयात बंद करण्याचे फर्मान काढले. पण याची अंमलबजावणी करणाऱ्या मंत्र्यांना मोत्यांचीच लाच देऊन गप्प केले गेले! आणि काही काळानंतर बलाढ्य रोमन साम्राज्य आर्थिक गर्तेत कोसळले. कोणत्याही युध्दाशिवाय, आक्रमणाशिवाय केवळ व्यापाराच्या बळावर एक साम्राज्य लयाला जाण्याचे ऐतिहासिक उदाहरण क्वचितच असेल.
या प्रसिद्ध व्यापारी मार्गाबरोबरच अजूनही एक मार्ग प्रसिद्ध झाला. तो होता मान्सून वाऱ्यांवर आधारित समुद्र मार्ग. हिप्पालस नावाच्या ग्रीक खलाशाला मोसमी वाऱ्यांचां शोध लागला. त्याने हे वारे फेब्रुवारी ते जून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात हे जाणले. या वाऱ्यांच्या मदतीने रोमन जहाजे जून महिन्यात भारतात पोचत आणि ऑक्टोबर पर्यंत व्यापार करीत. आणि नंतर परतीच्या मोसमी वाऱ्यांबरोबर रोमला पोचत.
उत्तरेपासून दक्षिणेकडे पसरलेल्या भारतीय भूमीवरील राज्ये चहू अंगांनी विकसित होत होती. कला, व्यापार, मजबूत राज्यव्यवस्था आणि बळकट अर्थव्यवस्था याने भारतातील समाजजीवन संपन्न झाले होते. भारतभूमीतून सोन्याचा धूर निघत होता.
यातील सर्व लेख कसे वाचायला मिळतील? लेख माहितीपूर्ण आहेत.