प्राचीन भारतीय उद्योगांचे स्वरूप – गावे, खेडी, वाड्या

मुख्य शहरापासून आजूबाजूला असलेल्या अनेक छोट्या गावातून आणि वाड्या वस्त्यांमधून मुख्यत्वे शेती हाच उद्योग असे. त्यामुळे या ठिकाणी शेतीला पूरक असे उद्योग असत. शेतीला पूरक उद्योगात पशुपालन हा एक महत्वाचा उद्योग असे. जो स्वत: शेतकरी किंवा काही लोक केवळ पशुपालनाचाच व्यवसाय करीत. शेती हा रोज काम करण्याचा व्यवसाय नाही, पण फार कष्टाचा आहे. निसर्गक्रमाने कामे करावी लागतात. यात ब-याच गोष्टी या पाऊस आणि वातावरण यावर अवलंबून असतात. जेथे शेते आहेत त्याच्याच जवळपास अनेक शेतक-यांच्या वाड्या असत. गाव थोडे मोठे असेल तर तेथेही उद्योगाप्रमाणे त्या कुटुंबांच्या वाड्या असत. म्हणजे सुतारांची वाडी, लोहारांची वाडी इत्यादि. हे लोक शेतीस पूरक काम करत असत. शेतकरी शेतीचे काम त्याचे  कुटुंबातील व्यक्तींच्या किंवा काही अन्य शेतकरी कुटुंबांच्या सहकार्याने करीत असत. शेती कामात मनुष्यबळ जास्त लागतं. वर म्हटल्याप्रमाणे रोज काम नसतं तरी जेव्हा असतं तेव्हा खूप काम थोड्या वेळात करावे लागते. म्हणजेच मनुष्य बळ जास्त लागतं. त्याच मुळे अन्य कुटुंबांशी अतीशय सलोख्याचे संबंध ठेऊन हे लोक एकमेकांस सहाय्य करत. फार पूर्वी पासून शेते बैलांच्या सहाय्याने नांगरली जात. पीक आल्यावर त्याची कापणी, कांडप अशी सर्व कामे पूर्वी शेतकरी कुटुंबच करीत असे. पीठ करण्यासाठी दगडी जाती वापरत.

शेतक-याला खालील अन्य उद्योगांवर विसंबून रहावे लागे. नांगर बनविणारे सुतार लोक, लोहकाम करणारे लोक त्यांना कोयते, खुरपे, कुदळी, फावडी अशी अवजारे बनवून देत, वेळोवेळी अवजारांना धार करणे, दुरुस्ती करणे हे काम ही लोहार करीत असत. धान्य ठेवण्यासाठी मातीचे रांजण वापरत, तसेच गाडगी मडकी अशी दैनंदिन व्यवहारात लागणारी भांडी कुंभार देत असे. नदी काठी कुंभारांची वस्ती असे आणि नदीतील मिळणा-या मातीतून ते मातीच्या विटा, कौले अशा वस्तू करत जी घर बांधणीस उपयोगी असे. गावात गवंडी काम करणारे असत. गावांत मृत जनावरांची कातडी काढून त्याचे कातडे प्रक्रिया करून ते शहरांत अथवा गावातीलच चांभार लोकांना विकणारे महार लोक असत. हे लोक गावाच्या एका बाजूला वस्ती करून रहात. त्यांच्या कामात फार दुर्गंधी असे, तसेच या कामाला पाणी जास्त लागते. गावातील चर्मकार हे चामड्यातून चपला, तेलासाठी बुधले, शेतक-याच्या मोटे साठी व खांद्यावरून पाणी नेण्यासाठी पखाली बनवीत. असे लोक घोड्याचे खोगीर, पट्टे अशा वस्तू ही बनवीत. शेती कामही काळ, वेळ पर्जन्यमान पाहून केले जाई. त्यामुळे येथे पण स्थानिक ज्योतिषी या कामासाठी शेतक-यास मदत करी. या सर्व एकमेकांवर अवलंबून काम करणा-यांना आपण बलुतेदार म्हणून जाणतो. गावात तांब्या-पितळेची कामे करणारे आणि सुवर्णकारही असत. प्रत्येक गावांत अगदी निश्चितपणे आढळणारे काम हे केशकर्तन होते. हे काम करणारे लोक घरोघरी जाऊन केशकर्तन करत असत.

ज्या शेतातून तेल बिया काढल्या जात त्यापासून बैलाने चालविलेले लाकडी कोलू वापरून तेल काढण्याचा व्यवसायही गावो गावीं होता, आणि निर्माण झालेले तेल गावात व शहरांत विकले जाई. पूर्वी उजेडासाठी पण तेलाचे दिवे वापरत असत. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे तेल बनविले जाई. यात खाद्य तेले, अन्य औषधी तेले असे अनेक प्रकार आहेत. हे सर्व काम तेली या नावाने ओळखली जाणारी कुटुंबेच एकत्रित पणे करीत असत. ज्या शेतात ऊस काढला जाई, अशी शेतकरी कुटुंबे त्यापासून गूळ, साखर निर्माण करीत. आपल्या देशात गूळ मोठ्या प्रमाणात सर्वच भागात वापरला जाई. साखर करायला जास्त मेहनत आणि वेळ लागत असे. पूर्वी साखर ही खडी साखर या स्वरूपाची असे. आपल्या देशात ऊस उत्पादन हे त्या काळातही खूप होते त्यामुळे साखरही खूप प्रमाणात निर्माण केली जाई आणि ती निर्यात होत असे.

पण शेतीमालावर आधारलेला सर्वात मोठा आणि भारताच्या जवळजवळ सर्व भागांत पसरलेला उद्योग हा वस्त्रोद्योग म्हणावा लागेल. ब्रिटिश लोकांनी आपला वस्त्रोद्योग मोडून काढेपर्यंत भारत सर्व जगाला वस्त्रांचा पुरवठा करीत असे. कारण इ.स. १४००-१५०० पर्यंत परदेशात आपल्या सारखा आणि आपल्या इतका कापसाची कुठेच पैदास होत नव्हती. भारतातील उद्योगात शेती खालोखाल लोक वस्त्रोद्योगात गुंतलेले होते. या कामालाही मनुष्य बळ जास्त लागते. कापूस शेतातून आणल्यापासून तो साफ करणे, पिंजणे, त्याचे सूत करणे, सुतापासून कापड बनविणे व नंतर ते रंगविणे असे काम एकाच कुटुंबातील अनेक लोक करत असत. रंगित सूतापासूनही विविध रंगांची कापडे बनविली जात. कापडात साड्या बनविणे हे एक विशेष काम समजले जाई आणि आजही देशाच्या अनेक भागातील साड्या प्रसिद्ध आहेत. कापड करताना मूलभूत सूत लागतेच आणि सुतांच्या उभ्या आडव्या रचनांतून कापड निर्माण होते. फार पूर्वी उभे धागे झाडाला बांधून आडवे धागे जमिनीवरून त्यात गुंतविले जात. पुढे माग निर्माण झाले. नैसर्गिक उपलब्ध वनस्पतींपासून अथवा काही प्रकारच्या मातीपासून रंग बनविले जात. रंगकामामधे पुढे लाकडी छाप वापरून त्यातून कापडांचे विविध प्रकार केले जात. भारताचा खेडोपाडी असलेला वस्त्रोद्योग हा ख-या अर्थाने अर्थपूर्ण उद्योग होता. भारताच्या त्याकाळातील भारताच्या वार्षिक  उत्पादनात त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुख्य म्हणजे तो देशाच्या सर्व भागात होता.

गावांतील उद्योगांत पशुपालन हा एक महत्वाचा उद्योग होता. त्यात प्रामुख्याने गाई, म्हशी पालन हा व्यवस्ताय होता. त्यातून दुग्धजन्य  पदार्थ जसे की दूध, दही, लोणी, तूप तर मिळेच, पण शेण खत म्हणून वापरले जाई, गाईंच्यामुळे पुढे शेतीस उपयुक्त बैल मिळत. गोमूत्र हे औषधी म्हणून तसेच काही प्रमाणात खत म्हणून वापरता येई. गाई गुरे सांभाळणे हे काम असेच कष्टाचे आहे. गुरांची निगा राखताना त्यांना वेळेवर अन्न (वैरण) मिळेल, पाणी मिळेल, याची सोय  पहावी लागते. उन्हाळ्याच्या दिवसात चा-यासाठी रानावनांत फिरावे लागते. बैलांचा उपयोग नांगरण्यासाठी, तसेच मोटेवर पाणी काढण्यासाठी, चुन्याच्या घाणीसाठी, तेलाच्या घाणीसाठी होत असे. या व्यवसायातही सर्व कुटुंब गुंतलेले राही. या व्यत्यरिक्त शेतक-यांच्या जवळपासच्या भागात मेंढपाळांची वस्ती असे. हे लोक प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्या पाळत. शेळ्यांचे दूध मिळे. मेंढ्यांपासून लोकर मिळे, त्यातून हेच लोक कांबळी, धाबळ्या अशा गोष्टी वस्त्रोद्योगासारख्याच निर्माण करीत. काही कुंभार लोक किंवा गवंडी लोक गाढवे पाळत. यांचा उपयोग सामान वाहण्यासाठी होत असे. आजही खेड्यापाड्यात बांधकामाच्या जागी वाळू, दगड, विटा गाढवावरून वाहिलेल्या दिसतात. शेतातील नांगरणी पूर्वी, उन्हाळ्याच्या दिवसात मेंढपाळ लोक त्यांच्या शेळ्या मेंढ्या शेतात बसवत. ज्यामुळे त्यांचे मल-मूत्र शेतास खत म्हणून उपयोगी पडे. शेळ्या मेंढ्यांना आजू बाजूच्या झाडा झुडपाच्या पाल्याचे खाद्य मिळे. अशा त-हेने परस्परांस उपयोगी असा हा व्यवसाय चाले. गावांतील ब्राह्मण समाज वगळता, बहुतेक सर्वच लोक एक पर्याय म्हणून घरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करीत. अंडी हे त्यातून मिळणारे आणि सामिष भोजन करणा-यांना उपयोगी  असा हा व्यवसाय घरोघरी सहज चाले.

अशा गांवांमध्ये काही भागात बांबूंपासून अनेक उत्पादने करणारे लोक घरातूनच व्यवसाय करीत. बांबूपासून टोपल्या, धान्य पाखडायचे सूप अशा गोष्टी बनविल्या जात ज्या शेतक-याच्या गरजेच्या होत्या. अशा लहान गावांत मनोरंजनाची साधने त्या काळी नसत. तेव्हा ग्राम उत्सवांत किंवा घरच्या काही विशेष समारंभात नाच, गायन करणारे काही लोक असत. ज्यात डोंबारी, गोंधळी अशांची नोंद करता येईल. ह्या प्रकारचे काम नेहमीचे नसले तरी ऋतुकालोद्भव असत आणि गावातील ग्रामस्थ अशा लोकांना घरा बोलवून हे कार्यक्रम करत असत.

गावातील उद्योग हे शेतीस पूरक असत आणि त्यांच्यात एक भावनिक बंधन असे की योग्य वेळी ते एकमेकांना मदत करत. यात पैशाच्या व्यवहार हा प्रत्यक्ष पैशांत न होता, शेतक-याकडून मिळणा-या धान्याच्या मोबदल्यावर  हा व्यवहार होत असे. अशा गावातील बहुतेक सर्वच व्यावसायिक हे प्रसंगी राजाच्या सैन्यात भरती होत. युद्ध काल  संपला की परत आपल्या आपल्या व्यवसायात कामे करीत. शेतीतील उत्पादन हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होते जसे ते आजही आहे. त्या काळी सैन्यातील काम हा एक चांगला पर्याय होता. युद्ध काळात या सर्वच व्यावयिकांना कामाची संधी असे.

गावात देवालये असत त्यात ब्राह्मण लोक पूजा अर्चा, त्याच बरोबर ग्रामस्थांना लेखन वाचनाची मदत करीत. त्यातील बरेच लोक शिक्षकही असत. गावातील सर्वच लोकांची देवादिकांवर श्रद्धा असल्याने देवालयाशी संबधित कामात सर्वच गावकरी हातभार लावीत असत. श्रद्धांवर, सण, व्रते यावर आधारित गरजांचा संख्यात्मक विचार वस्तू संख्येने किती लागत याचा अंदाज सांगू शकतात. भारतातील विधवा स्त्रिया सोडून बहुसंख्य स्त्रिया कुंकू लावत असत. त्या काळात देशाची लोकसंख्या ८ कोटी होती, त्यातील ५०% स्त्रिया होत्या आणि त्यातील फक्त ५०% स्त्रिया रोज १ ग्रॅम हळद-कुंकू वापरत असे म्हटले तरी दिवसाची हळदीची आवश्यकता ( (८,००,००,००० X ०.५ X ०.५ X 1)/१०००) = २०,००० किलो म्हणजे २० टन एवढी होते, म्हणजेच वर्षाला सुमारे ७००० टन इतकी होते. त्या काळाचा विचार केला तर हळदीची आवश्यकता नक्कीच जास्त होती. भारत हळद निर्माण करणारा एक प्रमुख देश आहे. औषधी उपयोग म्हणूनही हळद लागत असे. पण एका जागीच सर्व उत्पादन न करता अनेक भागात थोडे थोडे उत्पादन करून सर्व गरज पुरवली जात असे.

– श्री. श्याम वैद्य

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s