इ.स. पूर्व पाहिले शतक. शुर्परक (आजचे सोपारा) आणि कल्याण या दोन व्यापारी बंदरांवर रोम मधून व्यापारी जहाजे येत असत. रोम मधून आलेल्या वस्तू इथून इतर राज्यांत रवाना होत. पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांना सह्याद्रीच्या पलीकडे असलेल्या देशाशी जोडणारा मुख्य मार्ग होता नाणेघाट. सह्याद्रीची मोठी पर्वतरांग ओलांडण्या करिता नाणेघाट हा एक सोपा रस्ता होता. या भागावर ज्याचे राज्य असे, त्याला व्यापाऱ्यांकडून जकात मिळत असे. या व्यापाराने अनेक राज्ये भरभराटीस आली. नाणे घाटात एका मोठ्या रांजणात जकात भरून व्यापारी जीर्णनगर (जुन्नर), निधीनिवास (नेवासा), नाशिक, तगर (तेर) आणि प्रतिष्ठान (पैठणला) या ठिकाणी जात.
नाणे घाट हा इ.स. पूर्व पहिल्या शतकातील एक प्रसिद्ध व्यापारी थांबा आणि मार्गही होता. या घाटात असणारी गुहा आजही या वैभवशाली काळाची साक्ष देते. या गुहेत एक मोठा शिलालेख आहे. त्या मध्ये नागनिका राणीने व सातवाहन राजाने केलेल्या यज्ञांचा व मोठ्या प्रमाणावर केलेल्या दानधर्माचा उल्लेख आला आहे. पूर्वी या गुहेत राजाचा, राणीचा पुतळा देखील होता. आता मात्र तो नष्ट झाला आहे. या राणीने तिचे दोन्ही पुत्र सज्ञान होईपर्यंत २१ वर्षे अतिशय कुशलतेने राज्यकारभार सांभाळला होता.
नाणेघाटातील गुहेप्रमाणे भारतात ठिकठिकाणी अनेक शैलगृहे (rock shelters) आढळतात. या शैलगृहांचा (rock shelters) प्रवास सुरू होतो तो मौर्य काळात. राजा अशोक आणि त्याचा नातू दशरथ याने बिहार मधील बाराबर टेकड्यांमध्ये आजीवक पंथासाठी एक गुहा खोदली. लोमेष ऋषी गुंफा म्हणून ही गुहा ओळखली जाते. अशी शैलगृहे नंतरच्या काळात सार्थवाहांसाठी (व्यापारी तांडे) विश्रांतीचे ठिकाण बनली आणि त्याच बरोबर बौद्धधर्म प्रसाराची मुख्य केंद्रही झाली.पूर्वी सार्थवाहांबरोबर (व्यापारी तांडे) बौद्ध भिक्षूही प्रवास करीत आणि धर्म प्रसाराचे काम करीत. महाराष्ट्रातील व्यापारी मार्गांवरची ही लेणी या बौद्ध भिक्षूंची आश्रयस्थाने किंवा वर्षावास (वर्षावास म्हणजे पावसाळ्यामध्ये असणारे निवासस्थान) असत.
भारतामध्ये साधारणपणे १५०० शैलगृहे (rock shelters) आहेत. आणि यातली जवळपास ९०० ते १००० शैलगृहे महाराष्ट्रात आहेत. बरीचशी शैलगृहे ही तत्कालीन व्यापारी मार्गांवर दिसून येतात. महाराष्ट्रातील या शैलगृहाना आधार आहे तो सह्याद्रीचा. अतिशय टणक आणि अभेद्य अशा बसाल्ट (basalt) या अग्निज खडकापासून (igneous rock) पासून बनलेला सह्याद्री अजिंक्य आहे. या सह्याद्रीच्या डोंगररांगांनी शैलगृहांच्या निर्मितीचा पाया रचला.
शैलगृहे खोदताना कारागिरांसमोर सर्वात मोठे आव्हान असे ते म्हणजे गुहेसाठी योग्य डोंगर शोधणे आणि गुहेचा आराखडा बनवणे. हा गुहेचा आराखडा बनवताना कारागिरांना इमारतीच्या बांधकामाचा अनुभव कामास आला. आणि इमारतींमध्ये असणाऱ्या सगळ्या बारीसारीक तपशिलासह ही शैलगृहे उभी राहू लागली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाजे लेणी. या लेण्यांमध्ये छताला इमारतीच्या बांधकामाप्रमाणे लाकडी तुळया लावलेल्या दिसतात. या लाकडी तुळयांचे लाकूड आज २००० वर्षानंतरही शाबूत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेण्यां मध्ये भाजे लेण्यांचां समावेश आहे.
ही प्राचीन लेणी धार्मिक समरसतेची ग्वाही देतात. वेरूळ येथे असणाऱ्या लेण्यांमध्ये जैन, बौद्ध आणि हिंदू धर्माची लेणी दिसतात.
महाराष्ट्रातील शैलगृहांची किंवा लेण्यांची निर्मिती वेगवेगळ्या राजवंशाच्या कालखंडात झाली. इ.स. पूर्व पहिल्या शतकात सातवाहन घराण्याचा संस्थापक असलेल्या सिमुक राजापासून या घराण्याने ४०० वर्षे राज्य केले. यातल्या अधिकांश कालखंडात पूर्व आणि पश्चिम समुद्राच्या मध्य भूमीवर यांचे वर्चस्व होते. महाराष्ट्राच्या इतिहासाची सुरुवात ही सातवाहन घराण्यापसूनच करावी लागते. या राजांनी करवून घेतलेल्या अनेक गुहा सह्याद्री मध्ये आहेत. राज्ञी नागनिकेचा नाणेघाटातील शिलालेख त्यांची दैदिप्यमान परंपरा आणि धार्मिक वृत्तीची साक्ष देतो.
– विनिता हिरेमठ