भारताला हिमालय, अरावली, विंध्य-सातपुडा, सह्याद्रि ते दक्षिणेतील निलगिरी पर्यंत अनेक प्रकार्चे पर्वत लाभलेले आहेत. त्याच बरोबर देशाच्या अशा डोंगराल भागाच्या अवतीभवती अनेक वने, घनदाट अरण्येही लाभलेली आहेत. या सर्वच भागात बरेच लोक गटाने वस्ती करून रहात असत. हे लोक शहरी-ग्रामीण वस्त्यांतील लोकांत फारसे मिसळत नसत कारण त्यांची जीवनशैली निराळी होती आणि त्यात ते समाधानी होते. पण असे लोक त्यांच्या त्यांच्या भागातील पर्वतांतून किंवा अरण्यातून अनेक प्रकारच्या नैसर्गिक उपलब्ध गोष्टी गोळा करीत, त्यावर पुढील काही प्रक्रिया करीत आणि काही माहितगार लोकांमार्फत गांवात, शहरात अशी उत्पादने देत असत. भारत देश वनस्पतींसाठी आणि त्याच्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. आयुर्वेद प्रत्येक वनस्पती ही औषध मानतो. त्यामुळे अशा रानावनांत आणि डोंगर कपा-यांमधून पूर्वी अनेक प्रकरच्या वनस्पतीजन्य गोष्टी ज्यात, फुले, पाणे, फळे, बिया, खोडाच्या साली या पासून अनेक उत्पादने निर्माण केली जात. भारत ज्या मसाल्यांच्या पदार्थांसाठी सर्व जगभर प्रसिद्ध आहे, ते सर्व मसाले हे पूर्वी रानावनांत, जंगलात आणि डोंगराळ भागातच निर्माण होत असत. असे बहुसंख्य मसाल्याचे पदार्थ रानावनांत रहाणारी माणसेच गोळा करीत. पाश्चात्य लोकांनी आपल्या देशात येऊन या पदार्थांची शेतीसारखी सुबद्ध लागवड करे पर्यंत हे सर्व पदार्थ रानावनांतूनच गोळा केले जात. दक्षिण भारतात अनेक जंगलांमधे रहाणारे लोक या उत्पादनांशी जोडलेले होते. रानांतून गोळा केली गेलेली अन्य उत्पादने म्हणजे मध, डिंक, लाख आणि हिरडा, बेहड्या सारख्या अनेक औषधी वनस्पती. या उत्पादनांची यादी फार मोठी आहे.
भारतात अनेक भागात जी मोठी अरण्ये होती त्यात अतीशय उत्तम दर्जाचे लाकूड पैदा होत असे. हिमालयातील देवदार, मलबार मधील साग, तसेच शिसवी लाकूड, अशी अनेक प्रकारच्या लाकडांचा व्यापार लोक करत. या भागात रहाणारे लोक जंगलातील झाडे कापून लाकडे गावात पुरवत असत. देवदार, साग, शिसवी लाकडांची निर्यात होत असे. मौर्य गुप्त काळात अशी लाकडे ग्रीस मध्ये जात असत. कर्नाटक प्रांतातील चंदनाचे लाकूड तर भारतात घरोघरी वापरले जाई. त्याला धार्मिक महत्वही आहे. फार मोठी मागणी असलेले हे लाकूड असे. त्याच्या मऊ असण्याच्या गुणधर्माने त्यातून अनेक प्रकारची काष्ठशिल्पे, वस्तू कारागीर बनवीत, ज्याला गावांत मागणी असे. चंदनाचे तेलही केले जाई.
पण त्या मानाने दुर्लक्षित असे जे उत्पादन पर्वतराजीतील लोक करत ते म्हणजे अनेक प्रकारची खनिजे जमिनीतून, डोंगर फोडून जमा करणे. त्या काळात भारतातील सर्व प्रकारच्या धातु उद्योगात मिळणारे कच्चे धातू हे अशा लोकांनी गोळा केलेले असत. भारताच्या निरनिराळ्या भागात सोने, चांदी, लोखंड, तांबे, जस्त, शिसे अशा प्रकारचे धातू आहेत. ते कुठे मिळतात हे जाणणारे लोक अशा भागात वस्ती करून र्हात असत आणि त्यांना बाह्य निरिक्षणावरून कुठे खणले तर काय खनिज मिळेल याचे ज्ञान होते. आजच्या झारखंडमध्ये लोखंड खनिज स्वरूपात खणून काढून ते विशिष्ट प्रकारच्या जुलींमध्ये लाकूड/शेण्या वापरून पेटवून देत. काही काळाने त्यातील लोखंड वितळून ओघळून येत असे. असे लोखंड पुन्हा चुलीत तापवून ठोकून त्याचे पुढचे काम म्हणजे वस्तू करण्यास सोईचे आकार करून घेत. असे लोखंड गावातील-शहरातील लोहारांना पुरवत. ज्यातून लोहार अनेक उत्पादने करीत. मुशीमधे लोखंड वितळविण्याची पद्धत ज्यात हवेचा झोत वापरला जातो ते अजून विकसित झालेले नव्हते. पण आपल्या देशांतील लोखंड उत्तम दर्जाचे असे. खनिजापासून लोखंड करताना वापरलेल्या पद्धती फक्त त्या लोकांनाच ठाऊक होत्या आणि आज कालौघात ते ज्ञान नष्ट झालेले आहे.
राजस्थानात तांबे, रुपे आणि जस्त यांच्या खाणी होत्या. खनिज स्वरूप असे धातू डोंगराळ भागातील लोकच डोंगर पठारे खोदून काढत असत. जस्त हा असा धातू आहे की जो ज्या तपमानाला वितळतो त्याच तपमानाला त्याचे बाष्प हो ऊ लागते, त्यामुळे धातू मिळविण्यासठी काही मातीच्या कुप्या भट्टीत उलट्या ठेऊन त्याचे खाली खनीज तापविले जाई. वाफ झालेले जस्त उलट्या कुप्यामध्ये जमा होत असे. विटभट्ट्यांसारख्यी या भट्ट्या असत. दक्षिण भारतात कर्नाटकात अनेक ठिकाणे सोने काढले जाई. सोने जमिनी खणून त्यातून मातीतून गोळा केले जाई. माती मधील खडे ठोकून पहात, की सोने असेल तर ते ठोकले जाई, माती फुटून जाई. नंतर पाण्यातून धुवून काढून सोने बाजूला केले जाई. सोने पा-यात बुडते, त्यामुळे पा-याच्या उपयोगही सोने बाजूला करायला होत असे. या लोकांना पार कुठे मिळतो आणि कसा बनविला जातो याचे ज्ञान खचितच होते असे मानायला हवे. धातूंबरोबरच भारतातील काही भागात हिरे आणि खडे मिळत. हे गोळा करणारे लोक होते. खडे, जे दागदागिन्यांत वापरले जात, ते तर भारताच्या विविध भागात विविध प्रकारचे उपलब्ध आहेत. पण या साठी कुठे निर्माण केलेला व्यवसाय नसे तर निरनिराळ्या भागातील कुटुंबेच हे काम करीत आणि मिळालेल्या गोष्टी काही माहितगारांमार्फत गावात-शहरात पोचवीत असत.
रानावनात रहाणारे काही लोकं हे जनावरांची कातडी, शिंगे, दात, खुरे, नखे अशा गोष्टी गावातील लोकांपर्यंत पोहोचवीत. अनेक धार्मिक श्रद्धांमुळे अशा गोष्टींना मागणी असे. राजाकडे देता येतील असे हत्ती लहान असतानांच पकडून त्यांना शिकवणारे लोकही अशा अरण्यांजवळ रहात. त्या काळांत वाघ, हरीण यांच्या कातडीला मागणी खूप असावी. हस्तिदंत आणि त्यातून कलाकृती करणारे लोक अशा रानावनांतच रहात असत. डोंगराळ भागात मीठ करणारे काही लोक दक्षिण भागात प्रसिद्ध होते. क्षारयुक्त जमीन असलेल्या भागात टेकड्यांच्या उतारावर छोटे छोटे पाण्याचे साठे करीत आणि हे पाणी वरील भागातील साठ्यांमधून खालच्या सपाट भागावर केलेल्या उथळ साठ्यात उतारावरून वाहते आणीत. प्रथम फक्त पाणी साठवीत आणि ठराविक काळानी ते पाणी खालच्या भागात आणीत. वर साठवलेले पाणी जमिनीतील क्षार शोषून घेई. हेच पाणी खालील उथळ साठ्यात उन्हाने वाळवीत ज्यातून मीठ तयार होई. डोंगराळ भागातील गावांत हेच मीठ उपयोगी होत असे. अशा प्रकारे मीठ राजस्थानात व उत्तरप्रदेशांतही केले जाई.
भारतात काच सामान फार पुरातन काळापासून वापरलेले आढळते. काचेच्या वस्तू, ज्यात दिव्यांच्या काचा, बाटल्या, कुप्या, काचेचे मणी यांची मागणी राजाकडे, देवालयात तसेच घराघरात असे. भारतीय स्त्रिया नेहमीच हातात बांगड्या घालत असत. काचेच्या बांगड्या घेऊन विक्रेते गावातून, शहरातून घरोघरी जाऊन बांगड्या विकत असत. बांगड्यांची गरज संख्येने फार होती.
– श्याम वैद्य