भारतात अनेक मोठ्या नद्या आहेत आणि पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना प्रशस्त असा किनारा लाभलेला आहे. नदीकाठावरील आणि समुद्रकिना-यावरील लोक सामान्यत: मासे गोळा करीत. पण नदी काठावर काही ठराविक गावांपाशी नदी ओलांडून जाण्यासाठी ज्यामुळे माणसे आणि सामानाची वाहतूक एका तटाकडून दुस-या तटाकडे करण्यासाठी होड्या असलेले लोक रहात. त्याच भागातील सुतार लोकांच्या सहाय्याने अशा ठिकाणे होड्या बनविल्या जात. गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी अशा नद्यांच्या काठावर अशी वाहतूक चालत असे. मासे आणि वाहतूक अशा दोन्ही व्यवसायांनी तेथील लोकांचे अर्थार्जन होत असे. एक कथा सांगितली जाते की सदलपट्ट नावाच्या एका व्यापा-याने ५०० कुंभाराना आर्थिक मदत करून त्यांनी बनवलेली मडकी तो गंगेच्या काठावरील गांवात बोटीतून नेऊन विकत असे. मोठे व्यापारी स्वत:च्या बोटी ठेवत ज्यातून ते अनेक प्रकारच्या वस्तू आजुबाजूच्या प्रदेशांत विकत असत. थोडक्यात नद्यांच्या काठावरूनही काही उद्योग चालत होते हेच यातून लक्षांत येते.
समुद्र किना-यावर फार प्राचीन काळापासून अनेक बंदरे होती आणि परदेशाशी त्यांचा व्यापारी संबंध होता. पश्चिम किना-यावर जुन्या काळी (Barygaza)भडोच, (Sopara) शूर्पारक, (Calliena) कल्याण, Semylla चोल, (Mandagora) बाणगोट, (Palaepatamae) दाभोळ, (Melizigara) राजापूर, (Aegidii) गोवा, (Naura) कन्नानूर, कालिकत, (Tyndis) पोन्नाई, (Muziris) क्रंगानोर, (Nelcynda) कोट्टायम (Comar) कन्याकुमारी, (Colchi) कोरकाई, (Camara) तर पूर्व किना-यावर कावेरीपत्तनम, (Poduca) अरिकमेडू, (Nikam) नागपट्टणम,आणि (Maslia) मछलीपट्टणम, (Poduca) अरिकमेडू अशी अनेक प्राचीन बंदरे होती. या सर्व बंदरातून बोटी अफिका, अरब प्रांत, पूर्वेस जावा सुमात्रा बेटांपर्यंत व्यापारी मोहिमा करीत असत. या बंदरात या प्रांतातून बोटी येत आणि भारतीय उत्पादने निर्यात होत आणि आलेल्या परदेशी वस्तू उतरवून घेतल्या जात.
चाणक्याच्या पुस्तकांत बंदरातून येणा-या मालावरती करांबद्दल नोंद आहे, तसेच बदरांमध्ये कर वसूलीचे कार्यालय तसेच सामान ठेवण्याच्या कोठारांचा उल्लेख आहे. या कार्यालयात सरकारी कर्मचारी काम करत असत. बंदरात आलेल्या बोटींना प्रवासात काही अपघात, वादळी हवेमुळे नुकसान झाले असेल तर अशा बोटींची दुरुस्ती करण्यासाठी सोय बंदरात केलेली असे. बोटी बांधण्याचे व्यवसाय येथे चालत. भारतीय बोटी चांगल्या दर्जाच्या होत्या आणि काही बोटी खाजगी मालकीच्या होत्या, प्रामुख्याने व्यापारीवर्गाच्या ज्यातून ते स्वत: परप्रांतात माल ने आण करीत. बंदरात बोटींवरील सामानाची चढ उतार करणारे मजूर असत. देशाच्या अंतर्भागातून आलेला माल परदेशी पाठविणे आणि आलेला परदेशी माल देशाच्या अंतर्भागात पाठविणे असे काम येथे चाले. परदेशांतून भारतात येणा-या मालापेक्षा जास्त माल निर्यात केला जाई. भारतीय व परदेशी व्यापा-यांचे अशी बंदरे भेटीचे स्थान असे. अनेक परदेशी प्रवाशांनी या बंदरातील बाजारपेठा आणि त्यातील वस्तूंचे वर्णन केले आहे.
सर्वच समुद्रकिना-यावर मच्छिमारी हा व्यवसाय होत होता. भारतीय किनारे अनेक प्रकारचे विविध मासे असलेले आहेत. समुद्रातून मिळणारे शंख, कवड्या यांना त्या काळात सर्व समाजातून विशेष मागणी असे. त्याच बरोबर समुद्रात मिळणारे मोती गोळा करणे हा पण एक व्यवसाय चाले. केरळचा किनारा, कन्याकुमारी हे प्रांत मोत्यांसाठी प्रसिद्ध होते. समुद्रकिना-यावर मोठ्या प्रमाणात चालणारा व्यवसाय हा मिठागरे हा होता. मीठ ही अन्नपदार्थ बनविताना वापरण्याची महत्वाची गोष्ट आहे. मिठागरे करताना समुद्राचे जमिनीवर येणारे पाणी अडवून ते सूर्यप्रकाशात वाळू देतात ज्याने मीठ मिळते. मिठाची मागणी खूपच असे.
– श्याम वैद्य