इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा उत्तरार्ध. मेकांग नदीच्या मुखाशी असणारे ओकिओ बंदर. या ठिकाणी भारतातून एक व्यापारी जहाज आले. यातील भारतीयांचा प्रमुख होता कौंडीण्य नावाचा ब्राह्मण. हे जहाज बंदराला लागताच तेथील स्थानिक नागवंशीय लोकांनी या जहाजावर हल्ला करायची तयारी केली. जहाजावरील प्रमुख असणाऱ्या कौंडिण्याने त्या नाग वंशीय लोकांची राणी सोमा हिला सुंदर अशी वस्त्रे दिली. पुढे त्याने तिच्याशी विवाह केला. काही काळातच त्या ठिकाणचे स्थानिक लोक भारतीय संस्कृतीच्या आचार विचारांनी प्रभावित झाले. त्यांनी भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला आणि भारताबाहेरील पाहिले हिंदू राज्य स्थापन झाले. चिनी साहित्यात या राज्याचा उल्लेख फुनान असा येतो. हे फुनान राज्य म्हणजे कंबुज देश अर्थात आजचा कंबोडिया. हा देश त्या काळात इतर देशांच्या मानाने अधिक विकसित होता. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापसून ते चौदाव्या शतकापर्यंत हे राज्य अबाधित होते. या कालखंडात भारतीय संस्कृतीच्या तेजोवलयात येथे कला, साहित्य, स्थापत्य यांचे नवनवीन आविष्कार निर्माण झाले.
सातवा जयवर्मा याने थोम इथे बयान मंदिराची निर्मिती केली. हा राजा बौद्ध होता. आणि हे बयानचे मंदिर बौद्ध मंदिर आहे. या मंदिराची शिखरे ही चतुर्मुखी अवलोकितेश्वराची आहेत.
बाराव्या शतकात निर्माण झालेले अंगोरवाटचे भव्य विष्णु मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा लखलखता तारा. या मंदिराची निर्मिती दुसरा सूर्यवर्मा याने केली. हे मंदिर प्राचीन जगातील एक आश्चर्य आहे. आणि आजही हे मंदिर प्राचीन वैभवाचा इतिहास सांगते आहे.
भारताबाहेरील भारत हा केवळ कम्बुज देशापुरता मर्यादित नव्हतं तर चंपा म्हणजे आजचे व्हिएतनाम इथेही भारतीय भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला होता. येथे सापडणारे संस्कृत भाषेतील शिलालेख याची साक्ष देतात.
यवद्वीप म्हणजे जावा इथेही स्थानिक लोकजीवन भारतीय संस्कृतीने प्रभावित झाले आणि अनेक हिंदू मंदिरे निर्माण झाली. जावामध्ये बौद्ध धर्मही मोठ्या प्रमाणावर विस्तारला. जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप जावामधल्या बोरोबदूर येथे आहे. राजा श्रीविजय याने या स्तूपाची एका टेकडीवर निर्मिती केली.
या बरोबरच बोर्निओ, बाली, सुमात्रा, मलाया (मलेशिया) इथेही भारतीय संस्कृती विस्तारली होती. प्राचीन सयाम म्हणजे आजचा थायलंड येथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव आजही जाणवतो. रामायण हा थायलंडचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. तिथे हिंदू पद्धतीचे पंचांग, शालिवाहन शक वापरले जाते.
सिलोन अर्थात श्रीलंकेचे भारताशी पुरातन काळापासून संबंध आहेत. इ. स.पूर्व पाचव्या शतकात इथे सिंहली वंशाचे राज्य स्थापन झाले. आणि नंतर इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेत पाठविले होते.
ब्रह्मदेश हाही हिंदू आणि बौद्ध धर्माचां प्रसार झालेला देश. महाबोधी मंदिर,आनंद मंदिर ही भव्य मंदिरे प्राचीन भारताशी आणि संस्कृतीशी असणारे घट्ट नाते दर्शवितात.
चीनबरोबर प्राचीन भारताचे व्यापारी संबंध होते पण काही काळानंतर हे संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित न रहाता सांस्कृतिक धाग्यांनी जोडले गेले. इ. सनाच्या पहिल्या शतकात इथे बौद्ध भिक्षू धर्मप्रसारासाठी गेले आणि नंतर या धर्माचा मोठाच प्रसार इथे झाला. चीनमधून भारतात येणाऱ्या फाहियान, ह्युआन त्सांग यांच्या सारख्या प्रवाशांनी आपल्या लिखाणातून आणि प्रवास वर्णनातून भारतीय संस्कृतीचे गोडवे गायले. यामुळे अनेक वर्षे चीन आणि भारतामधील सांस्कृतिक देवाघेवाण अबाधित होती.
भारताच्या आग्नेय दिशेला (south east Asia) वसणाऱ्या भारताबाहेरील विशाल भारतात (Greater India) कोणत्याही आक्रमणाशिवाय आणि धार्मिक जबरदस्तीशिवाय भारतीय संस्कृती विस्तारली आणि स्थानिक लोकांनी भारतीय जीवनशैली स्वीकारली. एवढेच नाही तर ही संस्कृती येथे दैवतासमान पूजनीय ठरली!
सहिष्णूता आणि सहजीवन (co existence) यांचा आदर्श म्हणजे हा बृहत्तर भारत ( Greater India)!
– विनिता हिरेमठ