समोर अथांग समुद्र पसरलेला होता. सकाळची लवकरची वेळ असल्यामुळे आणि लॉकडाउनमुळे गर्दी नव्हतीच. दोनचार माणसं उत्साहाने व्यायाम करायला आली होती ती आणि सकाळी सकाळी ‘पक्षी निरीक्षण’ ह्या नावाखाली घराबाहेर पडलेले आम्ही तीन चार जण इतकीच काय ती वर्दळ.
किनाऱ्यावर समुद्राच्या लाटा निवांत येतजात होत्या. अनेक वर्षं त्यांचं हे येणंजाणं अव्याहतपणे चालू असूनही लाटा पुन्हापुन्हा किनाऱ्यावर येत राहतात. लाटांच्या आणि निसर्गाच्या सातत्याचं मला कौतुक वाटत राहतं.
पलीकडे समुद्रावर पांढरे काळे ढग जमा झालेले दिसतात. पाणी पिऊन टम्म झालेली ढगांची पोटं समुद्राच्या पाण्याजवळ येऊ पाहतात. त्यांचं शुभ्र प्रतिबिंब समुद्रात लांबलचक पडतं. ढगांच्या येण्याला मान्सून, ढगांना लोटणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे, शेकडो मैल पसरलेल्या अथांग समुद्राला, त्याच्या गहिऱ्या निळ्या पाण्याला, त्यात सामावलेल्या जीवसृष्टीला ‘अरबी’ नाव, लाटांचा प्रवासाला ‘चंद्राचं गुरुत्वाकर्षण’ वगैरे निरस शब्द मला आवडत नाहीत. समोर दिसणारं दृष्य आणि त्याला जोडले गेलेले तांत्रिक शब्द मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागात गोंधळ निर्माण करतात.
समुद्राला लागून सुरुची झाडं असतात. एक्स, वाय आणि झेड ह्या तिन्ही पातळ्यांवर सर्व झाडं शिस्तीत एका रेषेत उभी असतात. समुद्राच्या खारट सहवासात सुरू आपला फ्रेश ग्रीन विसरून गेलेला असतो. सगळ्या वनात सर्वत्र मळकट सॅप ग्रीन आणि त्यांचे ब्राउन बुंधे दिसतात. चालताना सुरुच्या बिया पायाला टोचतात. त्यांच्यावरची डायगोनल डिझाइन अगदी निगुतीने कोरल्यासारखी दिसते. बेशिस्तपणा अजिबातच नाही. एका रेषेत वाढण्याचा शिस्तीचा गर्भसंस्कार सुरुच्या झाडात अगदी बी असल्यापासून रुजलेला असतो. ‘हाय राईझ सी फेसिंग टॉप फ्लोअर’चं नशीब मात्र फक्त सुरुच्या झाडांकडे असतं. समुद्र किनारची बाकी सगळी झाडं लो राईझ बिल्डिंगज वाली.
उजव्या बाजूला लांबवर डोंगरांची रांग पसरलेली असते. पिवळ्या फ्रेश आकाशात त्यांचे रंग धूसर होत गेलेले असतात. ढगाळ भुरकट वातावरण त्या ढगांच्या कडा बोथट करतं. लांब लांब क्षितिजात मिसळताना डोंगर ब्राउन रंगांचा उबदारपणा सोडून देत व्हॉयलेटकडे वाटचाल करतात.
समुद्राच्या बाजूच्या खाडीच्या पाण्याच्या दलदलीत तीवर घट्ट पाय रोवून उगवलेला असतो. त्याच्या तीव्र गंधावरून त्या तीवर हे नाव मिळालं असेल अशी मला शंका येते. तीवरांकडे गंधाचं आणि रंगाचं प्रमाण व्यस्त असतं. दर्प ह्या शब्दाजवळ जाणारा वास त्याच्याकडे असला तरी सकाळच्या कोवळ्या पिवळ्या सूर्यप्रकाशात त्याचा लेमन येल्लो आणि पॅरट ग्रीन उठून दिसतात.
तिवरांच्या बाहेर खाडीच्या बाजूला पायवाट असते. पायवाटेवर चिंचेची झाडं. झाडांची पावलं त्याच्याच पाल्याने झाकून गेली असते. छोटीछोटी असंख्य पानं झाडांच्या पायथ्याशी पडलेली असतात. झाडांची साथ नुकतीच सोडलेली पिवळसर आणि जुनी झालेली ब्राउन, सिएना रंगांची. झाडावरच्या पानांचा रंग आंबूस ग्रीन असतो. पानं झाडांची साथ सोडताना रंग आणि वास दोन्ही मागे ठेवून जातात.
पक्षी शोधता शोधता पावलांना दिशा समजत नाही. नेहमीचे पक्षी सोडल्यास बाकीच्या पक्ष्यांचं ज्ञान मला यथातथाच असतं. तरीही नजर वेगळे पक्षी शोधत राहते.
आपलं सगळं वजन सोडून दिलं की बुंध्यापासून शेंड्यापर्यंत मुक्त संचार करता येतो. पक्षी ते करत असतात. आपण त्यांच्यामागे रान तुडवत राहतो.
समुद्रावरचा लठ्ठ ढग एव्हाना जमिनीपर्यंत पोहोचतो. पावसाचा शिडकावा चालू होतो. यंदाच्या मोसमाचा पहिलाच. अत्तराचा भाव खरोखरच कोसळतो. ही नुसती वर्दी असते मान्सून यायची. झाडांवरची धूळ धुतली जाते. वाऱ्याच्या दिशेबरोबर झाडांची हिंदकळ होते. आपण आसरा शोधतो. आता पायाशी चिखल जमा व्हायला सुरुवात होते. चिखल यंदाचा पहिला आणि कदाचित अनेक वर्षांच्या नंतरचा. मातीमोल असूनही काँक्रिटच्या घरात, वर्हांड्यात, अंगणात सगळीचकडे दुरापास्त झालेला. चपलेतल्या चपलेत पाय घसरत राहतात. पाऊस वाढल्यावर आपण आसरा शोधतो. चिंचेचा मोठा पसारा पाऊस अडवून बसलेला असतो. त्याखाली फांद्यांची पाघोळी अस्ताव्यस्त पडत राहते.
आकाशात एका बाजूला ग्रे ढगांच्या बॅकग्राउंडवर पांढऱ्याशुभ्र बागळ्यांचे ठिपके एकदम ब्राईट दिसतात. दुसऱ्या बाजूला सूर्याने अजूनही सकाळचा गोल्डन लाईट सोडून दिलेला नसतो. पायवाटेवर पडलेल्या पाण्याचे।शिंतोडे त्या प्रकाशात चमकत राहतात.
काही अंतरावर झाडाच्या तुटलेल्या बुंध्यावर बसलेला एखादा पिवळा बी-इटर आपलं अंग झटकत असतो. एखाद्या भारी रंगाचा खंड्या जोरात उडून झाडीत गायब होतो. अखंड चाललेली पक्ष्यांची चिवचिव पावसाच्या शिडकाव्याने क्षणभर शांत होते.
झाडाच्या खाली उभे असलेले आपण त्या सगळ्या लँडस्केपचा एक भाग होऊन जातो. लँडस्केप्स रंगवताना त्यात लाईफ असावं म्हणून चित्रकार माणसाचा एलिमेंट म्हणून वापर करतात. पण खरंतर निसर्गाने रंगवलेल्या चित्रात निसर्गाला मनुष्य प्राण्याची फारशी आवश्यकता नसते. त्याच्याशिवाय निसर्गाचं चित्र चैतन्यमय आणि परिपूर्णच असते.
सारंग लेले, आगाशी