भारतात लेखनकला कधीपासुन अस्तित्वात असावी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. प्राचीन काळी लेखन करण्यासाठी अनेक माध्यमे वापरली जात असत. लाकुड, कापड, भुर्जपत्र, ताम्रपत्र, शिलालेख आदी साहीत्य लिखाणासाठी वापरले जात असे. आज ताम्रपत्र व शिलालेख यांचेच केवळ प्राचीन भारतातील लिखाणाचे पुरावे अस्तित्वात आहेत. लाकुडावरील, कापडावरील, भुर्जपत्रावरील लिखाण जरी प्राचीन काळी केले जात असले तरी दोन हजार वर्षांपुर्वीचे हे पुरावे एकुण भारतीय हवामान पहाता अस्तित्वात असणे शक्य नाही. भारतात लिखाणाचे सर्वात प्राचीन पुरावे सिंधु-सरस्वती परीसरातील हरप्पा संस्कृती मधील मुद्रांवर सापडतात. पण अजुनही त्या मुद्रांवरील लिखाण वाचता आलेले नाही.
सम्राट अशोकाने चौदा लेख कोरीव स्तंभांवर लिहवुन घेतले व आपल्या साम्राज्याच्या कानाकोप-यात ते उभे करुन ठेवले. यातील दोन लेख वगळता इतर सगळे लेख हे ब्राह्मी लिपीतील आहेत असुन आज ते भारतातील वाचता येणारे सर्वात प्राचीन अभिलेख आहेत. सम्राट अशोकाच्या स्तंभ व शिलालेखांमधील लिपी पाहता ती प्रगत अवस्थेत असलेली आढळते. म्हणजेच या लिपीची सुरवात व तिची ही प्रगत अवस्था तिला जनमान्यता प्राप्त होण्यास काही शतके नक्कीच गेली असतील. त्यामुळे सम्राट अशोकाच्या आधी काही शतके ही लिपी वापरात असली पाहीजे. असे म्हटले की काही पुर्वग्रह दुषित लोक आम्हाला सम्राट अशोकाला या लिपीचे श्रेय द्यायचे नाही असा आरोप करणार. पण या आरोपात काहीच तथ्य नाही हे पुढील संदर्भांवरुन लक्षात येईल.
तथागत गौतमाचे महापरीनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या अस्थींचे आठ भाग करुन राजगृह, वैशाली, कपिलवस्तु, अलकप्प, रामग्राम, पावा, वेठदिप आदी आठ प्रमुख ठिकाणी महास्तुप उभारले गेले. या पैकी नेपाळ मधील तरणीतील पिपरावा येथे जो स्तूप उभारण्यात आला होता, तेथील उत्खननात सापडलेल्या अस्थी कलशावर ब्राह्मी लेख सापडला आहे. हा सम्राट अशोकपुर्व काळातील आहे. कारण बुद्धनिर्वाण काल हा इसवी सन ४८७ असल्याने भारतीयांना लेखनकला इसवीसन पुर्व पाचव्या शतकातच अवगत होती हे यामुळे नक्की होते. तसेच ललितविस्तर या ग्रंथात तथागत गौतमबुद्ध चंदनाच्या पाटीवर सोन्याच्या लेखणीने लिहावयास शिकला, असा उल्लेख आढळतो. म्हणजे तथागताच्या जन्मापुर्वीच भारतात लेखनकला अस्तित्वात होती हे दिसुन येते.
सम्राट अशोकाचे आजोबा चंद्रगुप्त मोर्य यांनी साम्राज्य निर्माण करण्यापुर्वीच अलेक्झांडर याने भारतावर स्वारी केली होती. त्याचा एक सेनानी निआर्कस याने ”भारतीय लोक कापुस कुटुन तयार केलेल्या कापडावर लिहीतात”, असे नमुद केले आहे. तर कार्टीअस याने भुर्जपत्रांचा लेखन सामुग्री म्हणुन उल्लेख केला आह्. मेगँस्थेनिस हा ग्रीक अधीकारी चंद्रगुप्ताच्या दरबारात वकिल म्हणुन आलेला होता. त्याने इंडीका या आपल्या ग्रंथात भारता विषयी खुप माहीती नोंदवुन ठेवलेली आहे. तो भारतातील व्यापारी मार्गांचे वर्णन करतो. या मार्गांवर ठिकठिकाणी अंतर दाखविणारे लेख असल्याचे तो नमुद करतो. धर्मशाळा कोठे आहेत, त्यांचे अंतर किती आहे. हे दर्शविण्यासाठी सम्राट चंद्रगुप्ताच्या काळात रस्त्यात दगड पुरलेले होते; असे तो सांगतो.
गौरी शंकर ओझा यांना सन १९१२ साली अजमिर जिल्ह्यात बडली नावाच्या गावी एक स्तंभलेख सापडला. हा लेख जैन तिर्थंकर महाविर यांच्या निर्वाणाच्या ८४ व्या वर्षी कोरविला असावा, असे मत ओझा यांनी मांडले आहे. त्यामुळे हा लेख अशोकाच्या पुर्वीच्या काळातील ठरला आहे.
सोहगौडा येथे सापडलेला ब्रांझ धातुच्या पत्र्यावरचा लेख इसवीसन पुर्व तिस-या शतकातील आहे. श्रावस्तीच्या महामात्यांनी दुष्काळ निवारणार्थ काढलेली आज्ञा या लेखात दिसुन येते. हा धातुलेख चंद्रगुप्त मोर्याच्या काळातील आहे. म्हणजेच सम्राट चंद्रगुप्ताच्या काळात अशा त-हेच्या शासकिय आज्ञा लेखी स्वरुपात काढल्या जात असाव्यात, असेही येथे दिसुन येते.
एकंदरीत हे अशारीतीने सम्राट अशोक काळात दिसणारी ब्राह्मी लिपीची ही प्रगतावस्था तिची पाळेमुळे, उगम व विकास त्याच्या पुर्वीची पाच सहा शतकांची तरी निश्चतच असली पाहीजे असेच उपलब्ध पुराव्यांवरुन दिसुन येते.
रणजित रमेश हिर्लेकर
मो.९४२३३०३६७०