साहित्यसङ्गीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः ।
तृणं न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनाम् ॥
– भर्तृहरि नीतिशतकम्
साहित्य,संगीत आणि कलाविहिन मनुष्य साक्षात् पशुसमान आहे. हे पशुंचे भागधेय (नशीब) आहे की तो (मनुष्य) त्यांच्याप्रमाणे गवत खात नाही. मनुष्य आणि पशू मधील फरक सांगणारा हा श्लोक कला आणि साहित्याचे मानवी जीवनातील महत्त्व ही अधोरेखित करतो. आदिम काळापासून ते आत्ताच्या आधुनिक काळापर्यंत या साहित्य आणि कलेच्या आविष्काराने मानवी जीवनाचे संदर्भ बदलले आहेत. असंख्य अमूर्त ( intangible) संकल्पना मूर्त (tangible) स्वरूपात अवतरल्या आहेत.
अग्नीची पाठ,मुख,केस इत्यादी अवयव घृताचे (तुपाचे) बनलेले आहेत. त्याचे केस अतिशय सुंदर आहेत. त्याला दाढी आहे. निसर्गात आकरहीन असणाऱ्या अग्नीचे वर्णन ऋग्वेदामध्ये अशा मूर्त स्वरूपात येते. कालौघात अशा अनेक संकल्पनांना मूर्त रूप प्राप्त झाले. मानवास पदोपदी होणारा दैवत्वाचा साक्षात्कार अमूर्त होता. पण त्या श्रद्धेला, ईश्र्वरालही मूर्त रूप प्राप्त झाले. आणि विविध कलाविष्कारात तो समोर आला.
दैवतांचे हे मूर्त रूप केवळ साहित्य किंवा लिखणापुरते मर्यादित नव्हते तर त्याला त्रिमितीय (three dimensions) आकारही आला. सिंधू संस्कृतीमध्ये काही मुद्रांवर पशुपती म्हणता येईल असे ठसे आणि काही मातृदेवतांच्या मूर्ती ही सापडल्या आहेत. पण या कालखंडात मूर्तिपूजा आजच्या प्रमाणे प्रचलित होती याचे ठोस पुरावे मिळत नाहीत.
या नंतरच्या काळात बौद्ध धर्माचा उदय झाला आणि बौद्ध धर्म वाढू लागला. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या स्मृती जपण्यासाठी अनेक स्तूपांची निर्मिती झाली. आणि या स्तुपांवर बुद्धाच्या जीवनातील प्रसंग कोरले जाऊ लागले. पण या शिल्पांमध्ये बुद्धाचे अस्तित्व मूर्तींमधून दर्शवले जात नव्हते तर ते सिंहासन, मुकुट, पिंपळाचे झाड अशा प्रतिकांमधून दाखवले जात होते. अजूनही ईश्वरी श्रध्देला मानवी शरीराचा आकार प्राप्त झाला नव्हता. पण नंतर म्हणजे साधारणपणे इ. स.पूर्व पाहिले शतक ते इसवी सनाचे पाहिले शतक या काळात गौतम बुद्धाच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली. या मूर्ती गांधार आणि मथुरा शैली मध्ये आढळतात. यामध्ये गांधार शैलीवर ग्रीक दैवतांच्या शैलीची छाप दिसून येते.
याच काळात अनेक शैलगृहांची निर्मिती होत होती. आणि ही शैलगृहे अनेक प्रकारच्या यक्ष आणि अप्सरांच्या शिल्पांनी सुशोभित केली जात होती. बुद्धमूर्तीप्रमाणेच आता इतरही संकल्पना शिल्पांच्या रुपात साकार होत होत्या. जैन धर्मातील तीर्थंकरांच्या मूर्तीचे ही निर्माण होऊ लागले. पण एवढे असले तरी या काळातही मूर्तिपूजा सर्वत्र रूढ होती असे म्हणता येणार नाही. पण मूर्ती शास्त्राचे नियम मात्र या काळात पक्के झाले.
इ. स.पूर्व पहिल्या शतकापासून कलेचे हे स्वरूप विकसित होऊ लागले जे प्रामुख्याने दगड आणि कातळाशी निगडित होते. पण इसवी सनाच्या पाचव्या सहाव्या शतकात अजंठा मधील बौद्ध लेण्यांमध्ये कलेचा उत्कट आविष्कार प्रकट झाला. या बौद्ध लेण्यांमध्ये रेषांच्या प्रवाहातून आणि तजेलदार रंगातून बुद्धाचे जीवन चित्र रूपाने साकार झाले.
पुढे आठव्या शतकात कलेला एक नवीन परिमाण प्राप्त झाले. राष्ट्रकुटांच्या काळात महाराष्ट्रात वेरुळचे एकपाषाणी (monolithic) शिल्प उभे राहिले. या कैलास मंदिरात रावणानुग्रह (रावणाचे गर्वहरण), कल्याणसुंदर ( शिव पार्वतीचा विवाह सोहळा), सरिता मंदिर ( गंगा,यमुना, सरस्वती यांच्या मूर्ती असणारे मंदिर) तर यज्ञ शालेमधील सप्त मातृकांचे रेखीव शिल्प अशी अनेक शिल्पे कठीण दगडातून शिल्पकारांनी निर्माण केली.
महाबलीपुरम येथील एकपाषाणी (monolithic) म्हणजे एकाच पाषाणातून कोरलेली मंदिरे आहेत. येथील गांगवतरण हे शिल्प अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्रवणबेळगोळ येथे असणारी गोमटेश्र्वराची भव्य मूर्ती शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे.
प्रत्यक्षाहूनही प्रतिमा उत्कट अशी भावना जागवणारी ही शिल्पे आणि अप्रतिम रेखांकने अमूर्त, निराकार ईश्वरी अस्तित्वाला आपल्यासमोर साक्षात् साकार करतात.
– विनिता हिरेमठ