छायाचित्रात – अशोकाचे ब्राह्मी, खरोष्टी, ग्रीक व अर्माईक लिपीतील लेख. प्रत्येक लिपी मधील लेखात “धम्म लिपी” शब्द वापरला आहे.
गेले काही दिवस धंमलिपी की ब्राह्मीलिपी असा वाद सुरु आहे. या वादात प्राच्यविद्या अभ्यासक व अस्मिता रक्षक असे दोन तट पडलेले स्पष्ट दिसत आहेत. या वादात खरोष्टी लिपीचा विषय काढला तरी धंमलिपी समर्थक त्यावर काहीच बोलायला तयार नाहीत. अभ्यासक असण्याचा आव आणणा-या या मंडळींना खरोष्टी लिपी अडचणीची ठरलेली दिसतेय. त्यामुळे ही मंडळी या विषयावर ब्र ही काढीत नाहीत. सर्वसामान्य लोकांना खरोष्टी लिपी ठाऊक नसल्यामुळे आज आपण थोडी खरोष्टी लिपी विषयी येथे चर्चा करुया.
सम्राट अशोकाने जसे ब्राह्मी लिपीत लिहीलेले लेख अगदी पार दक्षिण भारता पर्यंत सापडतात तसेच त्याने लिहीलेले खरोष्टी लिपीतील लेख भारताच्या वायव्य सिमावर्ती भागात सापडतात. आजचा पाकीस्थान, अफगाणीस्थान आदी हिंदुकुशापर्यंतचा हा भाग त्याकाळी भारताच्या सिमावर्ती भागात मोडत असे. या भागात दोन हजार वर्षांपुर्वी खरोष्टी लिपीचे प्रचलन होते. भारतात भगवान बुद्धांच्या जन्मकाली अनेक लिपी प्रचलित असाव्यात. स्वत: तथागत बुद्धाने शिक्षार्थी असताना ६४ लिपी आत्मसात केल्या होत्या, असा उल्लेख प्राचीन बौद्ध संदर्भग्रंथातुन आढळतो. तसेच १८ लिपींची यादी जैन ग्रंथांमध्ये आढळते. या ग्रंथातुन त्या लिपींची नावे देखील आढळतात. त्यात ब्राह्मी लिपीचे नाव सर्वात वरच्या क्रमांकावर आढळते. प्राचीन ग्रंथातुन या लिपीचे विषेश महत्व आढळुन येते. तिच्या खालोखाल खरोष्टी ही एक महत्वाची लिपी असलेली दिसुन येते. या लिपीचा उल्लेख फँ-वँन-शु-लिन या ग्रंथात देखील आढळतो. या काळात खरोष्टी लिपी ही एक अव्दितीय लिपी होती असे दिसुन येते.
खरोष्टी या शब्दातच या लिपीची ओळख दडलेली आहे. खर म्हणजे गाढव व ओष्ठ म्हणजे ओठ. म्हणजेच गाढवाच्या ओठांसारखी लपेटी असणारी लिपी ती खरोष्टी होय! खरोष्टी लिपी ही गाढवासारखे ओठ असलेल्या माणसाने शोधुन काढली, म्हणुन ही खरोष्टी. अशीही या लिपीची व्युत्पत्ती सांगितली जाते. काही वेळा तिचे मुळ नाव खरपोष्ठी होते असे देखील सांगीतले जाते. पोष्ठ म्हणजे चामडे. खरपोष्ठ म्हणजे गाढवाचे चामडे. गाढवाच्या चामड्यावर लिहीली जाणारी लिपी ती खरपोष्ठी होय! ही संकल्पना अधिक बरोबर असावी असे वाटते. कारण भारताच्या या वायव्य सिमावर्ती भागात, गांधारच्या आसपासच्या या प्रदेशात ही लिपी बहुतांश चामड्यावरच लिहीली जात असे. म्हणुन तिचे नाव खरपोष्ठी व त्यातुनच पुढे खरोष्टी झाले असले पाहीजे. या लिपीचे आणखी एक वैशिष्ठ्य वेगळेपण सांगीतले जाते, ते म्हणजे ही लिपी डावी कडुन उजवीकडे लिहीली जाते. ब्राह्मी व ब्राह्मीतुन निर्माण झालेल्या सर्वच लिपी या डावी कडुन उजवीकडे लिहील्या जातात. ब्राह्मी व ब्राह्मीतुन पुढे अनेक लिपी निर्माण झाल्या. तशा खरोष्टी मधुन अन्य लिपी निर्माण झाल्या नाहीत. त्यामुळेच ही लिपी कुषाण राजवटी नंतर नामशेष झाली.
भारताच्या वायव्य भागात राज्य करणा-या इंडोग्रिक, शक, कुषाण राजांच्या नाण्यांवर खरोष्टी लेख आढळतात. या वायव्य भागात अशा प्रकारची नाणी मोठ्या प्रमाणावर सापडली आहेत. सातवाहन काळात क्षहरात क्षत्रप राजा नहपान याने महाराष्टातील नाशिक, पैठण, रायगड पर्यंत आक्रमण करुन राज्यविस्तार केला होता. त्यामुळे नाशिक जवळील जोगलटेंभी या गावात नहपानाच्या खरोष्टी लेख असलेल्या नाण्यांचा मोठा संग्रह सापडला होता. या व्यतिरीक्त खरोष्टीतील लेख असलेली नाणी दक्षिण भारतात फारशी आढळुन आलेली नाहीत. इंडोग्रिक राजांची ग्रीक व खरोष्टी लेख असणारी नाणी मणिक्याल मधील उत्खननात सापडली आहेत. खरोष्टी लिपीतील लेखांचा आढळ मोट्या प्रमाणावर सिस्तान, कंदहार, अफगाणिस्थान, स्वात, लडाख, चीनी तुर्कस्थान, अँरीओना, सिंधुचा पश्चिम भाग, पाकीस्थान आदी भागात सापडली आहेत. पाकीस्थानातील मोन्सेरा व पेशावर येथील शहाबाझगढी येथे सम्राट अशोकाचे खरोष्टी लेख सापडले आहेत. कंदहार जवळ शेरेकुना येथे खरोष्टी व अरमाईक अशा दोन लिपीत अशोकाचे लेख सापडले आहेत. कुशाणांचे राज्य मथुरेपर्यंत होते. त्यामुळे मथुरेलाही कुषाणांचा खरोष्टी लेख सापडला आहे. हिंदुकुश पर्वताच्या उत्तरेला मात्र खरोष्टी लिपीचा प्रसार दिसुन येत नाही. खोतान येथे खरोष्टी लिपीतील भुर्जपत्रावरील हस्तलिखीत सापडले आहे. खरोष्टी लिपीत बौद्ध साहीत्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होता असे दिसुन येते. खरोष्टी लिपीतील अश्वघोषाचे ‘शारीपुत्रप्रकरण’ या नावाच्या लोकप्रिय नाटकाच्या हस्तलिखीताची एक पुष्पीका जर्मन अभ्यासक ल्युडर्स यांना तुर्फान येथिल उत्खननात सापडली होती. मुळात हे नाटक संस्कृत मधे लिहीलेले होते. त्याचे इथल्या तोखालियन या स्थानिक भाषेत भाषांतर झालेले होते. या भागात या नाटकाला अमाप लोकप्रियता मिळाली असली पाहीजे. या नाटकात दोन बौद्ध भिक्षुंचा संवाद आहे. दोघेही ब्राह्मण आहेत व त्यांनी बौद्ध धर्म कसा स्विकारला याची कथा त्यांच्या नाट्यमय संवादातुन फुलत जाते. अश्वघोषाने हे बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी लिहीलेले नाटक आहे. अश्वघोष हा प्रसिद्ध बौद्ध पंडीत असुन तो मुळचा वैदीक परंपरेतील काशीचा ब्राह्मण होता. त्याने लिहीलेले बरेच बौद्ध साहीत्य उपलब्ध आहे. बुद्धचरीत, सौंदरानंद ही महाकाव्ये शारीपुत्रप्रकरण हे त्यातील लोकप्रिय ग्रंथ आहेत.
सम्राट अशोकाचे ब्राह्मी लिपीतील जे चोदा लेख भारतात सर्वत्र सापडले आहेत, त्या लेखांमधे “इयं धंमलिपी”, असा जो उल्लेख आढळतो व तो पुरावा ग्राह्य धरुन ब्राह्मी लिपी हिच धंमलिपी आहे असा दावा करण्यात येतो. आता महाराष्ट्र शासनाने १२वी च्या पुस्तकात हा बदल करण्याचे योजले आहे. पण गंमत अशी की शहाबाझगढी व मोन्सेरा येथील सम्राट अशोकाच्या खरोष्टी व अरेमाईक लिपीतील लेखातही “इयं धंमलिपी” असेच लिहीलेले आढळते. जर अशोकाच्या ब्राह्मी लेखातील “इयं धंमलिपी” या उल्लेखा वरुन ब्राह्मी लिपी हिचे नाव धंमलिपी असे मान्य केले तर खरोष्टी व अरेमाईक लिपीचे काय? त्यांनाही याच न्यायाने धंमलिपी म्हणावे लागणार नाही काय? मग काय धंमलिपी नंबर एक, धंमलिपी नंबर दोन, धंमलिपी नंबर तीन असा या लिपींचा उल्लेख्र करायचा की काय? असे विचारले की धंमलिपीचे समर्थक तोंडात मिठाची गुळणी धरुन बसतात. खरतर “इयं धंमलिपी” या शब्दाचा अर्थ हा धार्मिक लेख असाच होतो. याच अर्थाने “इयं धंमलिपी” असा उल्लेख खरोष्टी व अरेमाईक लेखांमधे आलेला आहे. पण डोक्यावर अस्मितेचे भुत स्वार झाले की आपल्यातला अभ्यातक मरतो. अशीच गत आज धंमलिपी समर्थकांची झालेली आहे
रणजित रमेश हिर्लेकर
मो.९४२३३०३६७०